मान्सूनची विस्कळित झालेली यंत्रणा (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

डॉ. श्रीकांत कार्लेकर shrikantkarlekar18@gmail.com
Sunday, 7 July 2019

सदैव बदलते मॉन्सूनचे आकृतिबंध (पॅटर्न) ही भारतासमोरची सध्याची मोठी समस्या आहे. देशातील शेती, अन्न-उत्पादन, पृष्ठजल आणि भूजल यांची उपलब्धता या गोष्टी त्यामुळे नेहमीच संवेदनशील बनलेल्या आहेत. भारताच्या मोठ्या भागांत जाणवणारी पाण्याची समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. या सगळ्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे मॉन्सूनचा नेमका अंदाज आणि भाकीत करणं ही आज फार मोठी गरजही आहे.

सदैव बदलते मॉन्सूनचे आकृतिबंध (पॅटर्न) ही भारतासमोरची सध्याची मोठी समस्या आहे. देशातील शेती, अन्न-उत्पादन, पृष्ठजल आणि भूजल यांची उपलब्धता या गोष्टी त्यामुळे नेहमीच संवेदनशील बनलेल्या आहेत. भारताच्या मोठ्या भागांत जाणवणारी पाण्याची समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. या सगळ्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे मॉन्सूनचा नेमका अंदाज आणि भाकीत करणं ही आज फार मोठी गरजही आहे.

उलटणाऱ्या प्रत्येक वर्षागणिक अधिकाधिक विस्कळित होऊ लागलेल्या मॉन्सूनचा विचार वर्षभरातल्या सर्वच विकासकामांत आता प्राधान्यानं करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मॉन्सूनमध्ये होऊ शकणाऱ्या जोरदार किंवा अतिवृष्टीचा विचार जराही न करता वर्षभरात त्याला दुर्लक्षून केलेल्या कामांमुळे कशी वाताहत होते हे आपण सर्वांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पाहिलं आणि भोगलं आहे. अतिवृष्टी किंवा दुष्काळासारख्या घटनांमुळे काय होऊ शकतं याचा अंदाज घेऊनच वर्षभरातली विकासकामं झाली पाहिजेत; पण याबाबतीत आपल्याकडं आहे निव्वळ हलगर्जीपणा आणि अनास्था! भूस्खलन, दरडी कोसळणं, बंधारे, धरणं यांना खिंडारं पडणं, संरक्षकभिंती आणि घरं पडणं अशा संभाव्य घटनांचा विचार आपल्या विकासकामांत कुठंही केलेला दिसत नाहीं. ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या धावपळीपेक्षा बदलत्या निसर्गक्रमाचा अभ्यास करून त्यातून धडा घेणं महत्त्वाचं.

मॉन्सून ही एक अवाढव्य; पण शिस्तबद्ध अशी यंत्रणा आहे. मात्र, यंत्रणा कितीही शिस्तबद्ध असली तरीही त्यात अनिश्‍चिततेचं प्रमाणही तितकंच मोठं आहे. सध्याच्या काळात ही यंत्रणा अनेक कारणांनी बाधित होऊ लागल्याचे संकेत याआधीच मिळू लागले आहेत. उष्ण कटिबंध प्रदेशातील जमीन व पाण्याच्या तापमानात मानवी हस्तक्षेपामुळे सतत होणारे बदल यामुळं ही यंत्रणा प्रामुख्यानं बाधित होऊ लागली आहे. सामान्यपणे जमीन ही समुद्रापेक्षा जास्त वेगानं तापते; त्यामुळे जमीन आणि पाण्याच्या तापमानात जो फरक पडतो तो मॉन्सून वाऱ्यांच्या निर्मितीला पोषक ठरतो. मात्र, सन 1950 नंतर समुद्रजल पूर्वीपेक्षा जास्त उष्ण होत गेलं. ही प्रक्रिया एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत म्हणजे सन 2002 पर्यंत प्रकर्षानं दिसून आली. याचं मुख्य कारण हे जमीन आणि समुद्र या दोन्ही पर्यावरणसंरचनांमध्ये होत असलेला मानवी हस्तक्षेप हेच असल्याचंही लक्षांत आलं.

याच काळांत भारतीय मॉन्सूनमध्ये पर्जन्यमानात दहा टक्‍क्‍यांनी घट झाली. जागतिक तापमानवाढीमुळे जमीन ही समुद्राच्या तुलनेत जास्त तापू लागल्यामुळे त्यानंतर पुन्हा एकदा तापमानातील हा फरक थोडा वाढू लागला. यामुळं पाऊसमान वाढेल किंवा मॉन्सून पूर्वपदावर येईल व सन 2018 चा भारतीय मॉन्सून सामान्य मॉन्सून असेल असं भाकीत मागच्या वर्षी करण्यात आलं होतं. मात्र, भारताच्या बहुतेक राज्यांत गेल्या वर्षी मॉन्सूनचा पाऊस बरसलाच नाही! देशात सर्वसाधारणपणे 887 मिलिमीटर इतक्‍या सरासरीनं पर्जन्यवृष्टी होते. गेल्या वर्षी ही वृष्टी 804 मिलिमीटर म्हणजे 9 टक्‍क्‍यांनी कमी झाली.

जमीन आणि समुद्राच्या पाण्याच्या तापमानातला फरक मॉन्सूनमधलं पाऊसमान वाढेल की कमी होईल हे ठरवत असतो. असं असलं तरी जागतिक तापमानवृद्धी, उत्तर व दक्षिण ध्रुव प्रदेशातील बर्फाचं वितळणं, हिमनगांचं उत्तरेकडून व दक्षिणेकडून 30 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तांच्या दिशेनं होत असलेले स्थानबदल व त्यामुळे जागतिक हवामानात होत असलेले बदल या व अशा अनेक गोष्टींचा मॉन्सूनवर निश्‍चितच परिणाम होऊ लागला आहे यावर अनेक शास्त्रज्ञांत एकमत दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मॉन्सूनचं आगमन, त्याची तीव्रता याबद्दलचे अंदाज अचूक राहण्याची शक्‍यताही थोडी कमी होते आहे असं म्हणता येईल. मॉन्सूनचं भाकीत करण्याच्या प्रक्रियेत एल्‌ निनोवर आधारित केलेले अंदाज नेहमीच खरे ठरले आहेत असंही दिसून येत नाही.

सदैव बदलते मॉन्सूनचे आकृतिबंध (पॅटर्न) ही भारतासमोरची सध्याची मोठी समस्या आहे. देशातील शेती, अन्न-उत्पादन, पृष्ठजल आणि भूजल यांची उपलब्धता या गोष्टी त्यामुळे नेहमीच संवेदनशील बनलेल्या आहेत. भारताच्या मोठ्या भागांत जाणवणारी पाण्याची समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. या सगळ्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे मॉन्सूनचा नेमका अंदाज आणि भाकीत करणं ही आज फार मोठी गरजही आहे.
"भारतातील शास्त्रज्ञांकडून मर्यादित काळाकरता म्हणजे दोन किंवा तीन दिवसांकरता केलेलं भाकीत खूपच विश्वासार्ह असतं. मात्र, आठवड्याकरता किंवा पंधरवड्याकरता केलेलं भाकीत तितकंसं अचूक नसतं,' असं
प्रथितयश वैज्ञानिक जे. श्रीनिवासन यांचं मत आहे. महासागर, वातावरण आणि ढग यांतील सहसंबंध नीटसे न समजणं यामुळे मॉन्सूनचं दीर्घकालीन भाकीत करण्यात अडचणी येतात असंही ते म्हणतात.

या वर्षी आत्तापर्यंत पडलेल्या आणि गेल्या काही वर्षांत पडून गेलेल्या पावसाच्या प्रमाणाचा आढावा घेतला तर भारतीय मॉन्सून किती विस्कळित झाला आहे याची थोडीफार कल्पना येऊ शकते. भारतांत या वर्षी 50 वर्षांच्या दीर्घकालीन सरासरीच्या (LPA : लॉंग पीरिअड ऍव्हरेज) 95 टक्के पाऊस जुलैमध्ये आणि 99 टक्के ऑगस्टमध्ये पडेल असं भारतीय हवामान खात्यानं आता म्हटलं आहे. एप्रिलमध्ये खात्यानं केलेलं भाकीत 96 टक्‍क्‍यांचं होतं. प्रशांत महासागरावर तयार झालेली क्षीण एल्‌निनो परिस्थिती संपूर्ण मॉन्सूनच्या काळात कायम राहील असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. वायव्य आणि ईशान्य भागांतल्या राज्यांत कमी पाऊस होईल, मध्य भारतात चांगली वृष्टी होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, "या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमीच असेल,' असं "स्कायमेट' या संस्थेनं म्हटलं आहे! गेल्या वर्षी हवामान खात्यानं 97 टक्के पावसाचं भाकीत केलं होतं; पण प्रत्यक्षात तो 91 टक्केच झाला. गेल्या वर्षी ता. 10 जुलै 2018 पर्यंत मध्य आणि दक्षिण भारताचा काही भाग वगळता मॉन्सून दुर्बळच होता. याच काळात खरीप पिकांची पेरणी होते. त्यावर याचा परिणाम झालाच. उत्तम आणि सरासरी पाऊस व्हायला बंगालच्या उपसागरावरून येणारी मॉन्सून शाखाही प्रबळ असणं आवश्‍यक असतं.

सामान्य परिस्थितीत जूनमध्येच चार लघुभार प्रदेश इथं तयार होतात आणि नंतर ते अधिक तीव्र होत जातात. त्यामुळे जून-जुलैमध्येच चांगला पाऊस पडतो. गेल्या वर्षी असं झालं नाही. तेव्हा ता. 13 जूनपर्यंत केवळ एकच "कमी भार प्रदेश' (लो प्रेशर) बंगालच्या उपसागरावर तयार झाला. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरावर अनेक वेळा "कमी भार प्रदेश' निर्माण झाले आणि ते पश्‍चिमेकडं मध्य भारताच्या दिशेनं सरकत राहिले. या वर्षी "वायू' या वादळामुळे मॉन्सूनचं आगमन लांबलं. मुंबईत पाऊस 10 दिवस उशिरा आला. गेल्या वर्षी तो मुंबईत ता. नऊ जूनलाच थडकला होता. सन 2014 मधे "नानौक' या वादळामुळे मॉन्सून उशिरानं आला होता. मॉन्सूनचं उशिरा किंवा लवकर आगमन होण्याची कारणं दरवर्षी वेगवेगळी असतात. खरं म्हणजे एका दशकातल्या निरीक्षणांवरून पावसाचे आकृतिबंध (पॅटर्न) कळत नाहीत. शंभर वर्षांची आकडेवारी पाहिली तर मॉन्सून विलंबानं येत असल्याच्या घटनांत वाढ झालेली दिसून येते. भारतातल्या पर्जन्यवृत्तीत गेल्या काही वर्षांपासूनच बदल जाणवू लागल्याचं हवामानशास्त्रज्ञांचे निरीक्षण सांगते. काही ठिकाणी जूनमधे पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ झाली आहे, तर काही ठिकाणी घट झाली आहे. जुलैमध्ये पावसात बहुतांश ठिकाणी घट झालेलीही दिसते आहे.

"स्कायमेट'न दिलेल्या माहितीनुसार, सन 1971 पासून 2018 पर्यंतची मॉन्सूनच्या दीर्घकालीन सरासरीच्या प्रमाणातील आकडेवारी असं दर्शवते, की यातील केवळ 15 वर्षे सामान्य पर्जन्यवृष्टी झाली (887 मिलिमीटर या दीर्घकालीन सरासरीच्या 96 ते 104 टक्के), 21 वर्षे कमी पावसाची किंवा दुष्काळवर्षे होती (दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस) आणि 12 वर्षे जास्त पावसाची किंवा अतिवृष्टीची होती (दीर्घकालीन सरासरीच्या 104 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस). 21 दुष्काळी वर्षांत एल्‌ निनोचा परिणाम सन 1974 सारखे एखादं वर्ष वगळता सगळ्या वर्षी थोडाफार होताच.

दरवर्षी कमी-जास्त होणारं पाऊसमान, मॉन्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या बदलत्या वेळा, पावसाच्या वारंवारितेत आणि वितरणात होणारे बदल या सर्व गोष्टींत जागतिक हवामानबदलाचाही मोठा हात आहे यावर अनेक हवामानशास्त्रज्ञांत एकमत दिसून येतं. भारतात दरवर्षी सरासरी 887 मिलिमीटर पाऊस देणारी मॉन्सून ही यंत्रणा विलक्षण स्थिर आणि सातत्यपूर्ण आहे. मात्र, तरीही दरवर्षी या यंत्रणेच्या विविध घटकांत दिसून येऊ लागलेला 10 टक्के इतका अल्प बदलही देशाच्या
कृषिव्यवसायावर आणि अर्थव्यवस्थेवर मोठाच परिणाम घडवू लागला आहे हे नक्की. मॉन्सून परतीचा होईपर्यंतच्या आणि त्याचं पूर्णपणे निर्गमन होण्यापर्यंतच्या विविध टप्प्यातील पाऊसमान, पर्जन्यदिवस , मृदा आर्द्रता प्रमाण, पृष्ठजल आणि भूजल निर्देशांक या सर्वच गोष्टी गेल्या काही वर्षांपासून विसकटल्यासारख्या झाल्या आहेत. यामागची नेमकी कारणं शोधणं आणि इथल्या शेतकऱ्याला दिलासा देणं हे मोठं आव्हान भविष्यात आपल्यासमोर आहे.

गेल्या काही वर्षांतल्या मॉन्सूनचं वैशिष्टय म्हणजे दैनंदिन पावसांत दिसून येणारी अस्थिरता आणि तफावत (व्हेरिएबिलिटी). अनेक ठिकाणी एकूण पावसाच्या 97 टक्के पाऊस केवळ 3 दिवसांपासून ते 27 दिवसांपर्यंत अनुभवाला येत आहे. त्या वर्षी मुंबईत केवळ एका दिवसात 375.2 मिलिमीटर इतका जवळपास महिन्याभराचा पाऊस झाला. सन 1974, सन2000 मध्ये इतक्‍याच पावसाची नोंद जुलैमध्ये झाली होती. ता. 26 जुलै 2005 रोजी 944.2. मिलिमीटर इतका पाऊस मुंबईत झाला होता. मॉन्सून परतीचा होऊ लागला की मग विजांचा गडगडाट, विजेचे लोळ आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस या घटना हमखास दिसून येतात. परतीच्या मॉन्सूनची गेल्या काही वर्षांतली तऱ्हा मात्र वेगळीच असल्याचंही लक्षात येतंय. कधी सकाळपासून, कधी दुपारी, नाहीतर संध्याकाळी आणि रात्री-बेरात्रीही परतीचा हा मॉन्सून नुसता ओततो असतो. शेतातली उभी पिकं भुईसपाट करतो आणि जमिनींची झीजही करतो. या पावसामुळे काही फायदेही नक्कीच होतात. मृदेची आर्द्रता वाढते आणि भूजलातही या पावसामुळे वाढ झाल्याची उदाहरणं भरपूर आहेत.

"स्कायमेट'च्या निरीक्षणानुसार, मॉन्सूनमधे बंगालच्या उपसागरावर तयार होणारी तापमान- वारे-वायुभार यंत्रणा भारताच्या मध्यवर्ती भागाकडं सरकते आणि विदर्भापर्यंत तिचा परिणाम जाणवतो. विदर्भ आणि मध्य प्रदेशाच्या भौगोलिक समीपतेमुळे (प्रॉक्‍सिमिटी) विदर्भात मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडतो. मात्र, अरबी समुद्रावरून येणारी मॉन्सूनची शाखा मराठवाड्याला येईपर्यंत खूपच दुर्बल होऊन जाते. मॉन्सून ट्रफ किंवा पश्‍चिमी अडथळे (डिस्टर्बन्सेस) या यंत्रणाही इथपर्यंत पोचू शकत नाहीत. ईशान्य भारतातल्या मॉन्सून मधल्या लक्षणीय त्रुटींचा (डिफिशिअन्सी) परिणाम संपूर्ण भारताच्या सरासरी पावसावर झालेला दिसतो.

भारतीय मॉन्सूनच्या अशा काही निश्‍चित वृत्ती (टेंडन्सीज्‌) असल्या तरी अनिश्‍चितता आणि विस्कळितपणा हा अलीकडच्या काही वर्षांत मॉन्सूनचा स्थायीभावच बनतो आहे. त्याच्या आगमनाची वेळ, तो एकदा सुरू झाल्यावर त्यांत पडणारा खंड, त्याच्या प्रमाणात आणि तीव्रतेत होणारे चढ-उतार, अवर्षण आणि अतिवृष्टी अशा सर्व गोष्टींवर निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे बदलणाऱ्या पर्यावरणाचा निश्‍चित परिणाम होत आहे. अवेळी निर्माण होणारी आवर्ती वादळं, त्यांची बदलणारी दिशा आणि मॉन्सूननिर्मितीसाठी आवश्‍यक असलेल्या बाष्पाचं बिघडणारं गणित हे तर मॉन्सून विस्कळित करणारं मुख्य कारण. त्याचाही फटका मॉन्सूनच्या शिस्तबद्ध यंत्रणेला दरवर्षी बसतोच आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang dr shrikant karlekar write monsoon article