पृथ्वीमाहात्म्य (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

shrikant karlekar
shrikant karlekar

कोट्यवधी वर्षांपासून वसुंधरेनं अर्थात् पृथ्वीनं अनेक आघात सोसले आहेत, अनेक बदल पचवले आहेत आणि या सगळ्याशी ती जुळवून घेत आली आहे. आपली ही पृथ्वी म्हणजे एक वैश्विक आश्चर्यच होय! विलक्षण लवचिकता असलेला असा दुसरा ग्रह आपल्या ग्रहमालेत नाही. जागतिक वसुंधरादिन नुकताच (ता. २२ एप्रिल) झाला, त्यानिमित्त...
                  
पृथ्वीवरील माणसाच्या भविष्यातील वास्तव्याविषयी जगप्रसिद्ध पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांनी केलेलं भाष्य अनेकांना आजही आठवत असेल.  
ते म्हणाले होते : ‘‘माणसाकडे आता फक्त शंभर वर्षांचा कालखंड शिल्लक असून या काळात वास्तव्य करण्यासाठी त्याला दुसऱ्या ग्रहाचा शोध घ्यावा लागणार आहे."
त्यांचं हे वक्तव्य सन २०१७ मधलं आहे. वेगानं  सुरू असलेली प्रचंड लोकसंख्यावाढ, हवामानबदल, संभाव्य अणुयुद्धे, अवकाशातून होऊ घातलेला लघुग्रहांचा मारा आणि रोगराई यांमुळे मनुष्यजातीला फार मोठ्या संकटांचा सामना भविष्यात करावा लागणार आहे. पृथ्वी ही वास्तव्यासाठी अनुकूल राहणार नाही, त्यामुळे माणसाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर वस्तीकरता योग्य अशा दुसऱ्या ग्रहाचा शोध घ्यावाच लागेल असं हॉकिंग यांचं म्हणणं होतं.  ‘‘येत्या हजार ते दहा हजार वर्षांत पृथ्वीवर मोठं संकट येण्याची शक्यता खूपच मोठी आहे, त्यामुळे तोपर्यंत माणसानं इतर ग्रहावर वस्ती केलेली असायलाच हवी,’’ असं हॉकिंग यांनी सन २०१७ पूर्वीही एकदा म्हटलं होतं. ब्रिटनच्या ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी युनियन’मध्ये सन २०१६ मध्ये केलेल्या भाषणात त्यांनी याच प्रकारचं मत व्यक्त केलं होतं.

‘‘या काळात अवकाशाच्या अफाट पसाऱ्यातील ग्रह व ताऱ्यांवर मानवानं वास्तव्याची ठिकाणं शोधून, ती राहण्यायोग्य केली तरच मानवजातीचं अस्तित्व अबाधित राहू शकेल,’’ असा इशाराही त्यांनी दिला होता.   

आपल्या पृथ्वीसारखंच जीवन असलेला आणखी कुठला ग्रह अवकाशाच्या अथांग पोकळीत आहे का याचा शोध घ्यायला निघालेल्या ‘नासा’च्या ‘केप्लर मोहिमे’तून माहितीचा प्रचंड साठा शास्त्रज्ञांच्या हाती सन २०१७ मध्ये पडला. वस्ती करण्यायोग्य आणि जीवनाला पोषक ठरू शकतील अशा २० नव्या ग्रहांचा शोध आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका गटाला या माहितीच्या प्रचंड साठ्यातून लागला. एखाद्या गवताच्या गंजीतून काही धुंडाळताना खूप महत्त्वाचा ऐवज सापडावा तसंच हे होतं!

सन २००९ पासूनच्या मोहिमेत ‘केप्लर’नं अक्षरशः अगणित नवीन घटनांचा शोध घेतला. त्यानं शोधलेल्या स्वतःच्या सूर्यांभोवती फिरणाऱ्या २० बहिर्ग्रहांवर माणसाला वस्ती करता येईल अशी परिस्थिती असावी असं लक्षात आलं होतं. त्याआधी केप्लर यानानं एकूण २१९ बहिर्ग्रहांचा शोध घेतला होता. त्यापैकी वस्ती करण्यायोग्य दहा ग्रह असावेत असा अंदाज करण्यात आला होता. इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसदृश ग्रहांचा शोध घेण्यासाठीची मोहीम ‘नासा’च्या अवकाश निरीक्षण केंद्रानं ता. सात मार्च २००९ रोजी सुरू केली होती. या ग्रहांपैकी एक ग्रह तर आपल्या पृथ्वीसारखाच असल्याचं दिसून आलं होतं. तिथल्या एका वर्षाचे दिवसही ३९५, म्हणजे पृथ्वीवरच्या ३६५ दिवसांशी मिळते-जुळते आहेत आणि त्याचा आकारही पृथ्वीच्या आकाराच्या ९७ टक्के इतका आहे! हा ग्रह ज्या सूर्याभोवती फिरतोय तो सूर्यही आकारानं, वस्तुमानानं आणि वयोमानानंही आपल्या सूर्यासारखाच आहे. मात्र, त्याचं धातुत्व आपल्या सूर्याच्या दुप्पट आहे. धुक्यानं वेढलेल्या या खडकाळ, थंड ग्रहावर जीवनाचं अस्तित्व असू शकेल इतकी ऊब आणि उष्णताही आहेच, त्यामुळेच काही शास्त्रज्ञांच्या मते, या ग्रहावर माणसासारखेच किंवा आपण कल्पना करतो तसे परग्रहीय जीव (एलियन्स) असण्याची दाट शक्यता आहे. या ग्रहावरचं हवामान पृथ्वीवरच्या सैबेरियासारख्या टुंड्रा हवामानाशी साधर्म्य सांगणारं आहे. यापैकी बऱ्याच ग्रहांच्या त्यांच्या स्वतःच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गती, त्यावरील तापमान, सामान्य हवामान हे पृथ्वीवरील या सर्व घटकांच्या कमी-अधिक प्रमाणात सारखंच असल्याचं आढळलं आहे. त्यामुळेच दुसरी ‘वसुंधरा’ शोधण्याचे माणसाचे प्रयत्न अवकाशाच्या याच भागात पूर्णत्वास जातील असाही आशावाद बळावला  होता. ‘एक हजार वर्षं’ हा कालावधी वैश्विक संदर्भात ‘क्षणिक काळ’ असला तरी माणसासाठी ती ‘एक आठवड्याभराची सूचना’ आहे असं  म्हणता येतं!

लघुग्रहांचा पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर मारा होण्याची खगोलीय घटना आता केव्हाही घडू शकेल. ही घटना अनेक दिवसांपासून अपेक्षित आहे. लोकसंख्यावाढीचा उद्रेक आणि हवामानातील मोठे बदल या अगदी नजीक येऊन ठेपलेल्या संकटांमुळे पृथ्वीचं भवितव्य अनिश्चितपणे संकटग्रस्त होऊ लागलं असल्याच्या खुणा खरं म्हणजे आता हळूहळू दिसू लागल्याच आहेत. माणसाच्या विविध क्रिया-प्रक्रियांमुळे (अॅक्टिव्हिटीज्) पृथ्वी माणसालाच राहण्यासाठी प्रतिकूल बनत असल्याची अनेक उदाहरणं रोज आपल्यासमोर येत आहेत. पृथ्वीवरील पृष्ठजल, भूजल, मृदा,  वनस्पती आणि वातावरणाचा थर यांतील  बदलांचा विचार करता गेल्या पाच हजार  
वर्षांचा काळ हा मनुष्ययुगाचा कालखंड आहे असा दावा काही शास्त्रज्ञ करत आहेत. कोणताही अडथळा नसेल तर पृथ्वीवरील जैवविविधता घातांकी दरानं वाढत राहते. मात्र, गेल्या काही शतकांत माणसानं निसर्गात केलेल्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ही वाढ काही ठिकाणी संथ गतीनं होते आहे, तर काही ठिकाणी ती पूर्णपणे थांबली आहे. निसर्गातल्या व पर्यावरणीय प्रक्रियांतल्या माणसाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील जैवविविधता झपाट्यानं कमी होत असून पृथ्वीवरील सर्व पारिस्थितीकी संस्था (इकोसिस्टिम्स) या एकसारख्याच बनू लागल्या आहेत. त्यातली वैशिष्ट्यं नष्ट होण्याच्या  
मार्गावर असून त्या सगळ्या  एकसुरी दिसू लागल्या आहेत. सन २०१० मधील एका संशोधनानुसार, जगातील सगळ्या समुद्रांतील वनस्पती-प्लवकांचं (फायटोप्लँक्टन) प्रमाण गेल्या दशकात  निम्म्यावर आलं आहे. प्रवाळ व प्रवाळप्रदेश, सदाहरित जंगलं आणि आर्द्रभूमी-प्रदेश ही पृथ्वीवरची ऊर्जाकेंद्रं आहेत. इथूनच जैविक विविधता सर्वदूर पसरते. त्यांच्या विनाशाला आणि लोप पावण्याला आजचा मनुष्यच कारणीभूत आहे. वैज्ञानिकांच्या मते, आत्ताच्या अंदाजानुसार सध्या अस्तित्वात असलेले प्रवाळ हे या मनुष्ययुगातील घटनांचा पहिला बळी ठरण्याची शक्यता आहे. गेल्या लाखभर वर्षांत वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण १८० पीपीएम पासून २८० पीपीएमपर्यंत बदलतं राहिलं आहे. आपण एक वेगानं बदलणारं  आणि अत्यल्प विविधता असलेलं एकसुरी  जग आपल्याभोवती तयार करतो आहोत. या  जगात अनेक जीवजंतूंच्या  प्रजाती लोप पावत आहेत. गवताळ   प्रदेश वाळवंटे बनत आहेत. वेगानं वाढणारी शहरं पृथ्वीचा चेहरामोहरा झपाट्यानं बदलत आहेत. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली. त्यानंतरच्या  काळात अंतराळातून अनेक वेळा लक्षावधी लघुग्रहांचा पृथ्वीवर मारा झाला. अनेक घडामोडींनी आणि क्रिया-प्रक्रियांनी  पृथ्वीवर विविध भूखंड, समुद्र  आणि भूरूपे तयार झाली. आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासात पृथ्वीवर भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक यांसारखे अनंत आघात झाले. अतिथंड हिमयुगे, मोठ्या प्रमाणावर झालेला जीवसृष्टीचा नाश, सदैव बदलतं हवामान अशा अनेकविध संकटांना टक्कर देत ही पृथ्वी आजही भक्कमपणे  टिकून आहे.  

पृथ्वी सूर्यापासून अगदी आदर्श अशा अंतरावर आहे. हे १५० दशलक्ष किलोमीटरचं अंतर सजीवांच्या अस्तित्वासाठी आणि उत्क्रांतीसाठी अगदी नेमकं आहे. पृथ्वीवरचा प्रत्येक जीव आज एका प्रदीर्घ उत्क्रांतीचा साक्षीदार आहे. विविध ठिकाणी आढळणारे, खनिजभूत आणि शीलाभूत स्वरूपात अश्मीकरण झालेले प्राण्यांचे सांगाडे, दात, झाडांची पानं, बिया आणि त्यांचे ठसे यांवरून अशा विविधरंगी जीवनाचा पुरावा मिळतो. आत्तापर्यंत सजीवांच्या अस्तित्वाचा केवळ एक टक्का एवढाच जीवाश्मपुरावा आपल्या हाती गवसला आहे! भूमिखंडांची मोठ्या प्रमाणावर झालेली हालचाल किंवा भूखंडवहन आणि हवामानातील बदल यामुळेही जीवजंतूंचा विनाश झाला आहे. कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वी या सगळ्या बदलांशी जुळवून घेत आहे! आपली ही पृथ्वी म्हणजे एक वैश्विक आश्चर्यच होय! विलक्षण लवचिकता असलेला असा दुसरा ग्रह आपल्या ग्रहमालेत नाही.   

हॉकिंग यांच्या म्हणण्यानुसार, जर वस्तीसाठी बाहेरच्या ग्रहांचा शोध घ्यावाच लागणार असेल तर आज आपल्याला वस्ती करण्यायोग्य अशा किती आणि कोणत्या ग्रहांची माहिती आहे याचाही विचार यानिमित्तानं वैज्ञानिकांनी पुन्हा एकदा सुरू केला आहे. ता. २२ फेब्रुवारी २०१७ रोजी, पृथ्वीपासून ३९ प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘ट्रॅपिस्ट१’असं नाव देण्यात आलेल्या एका नवीन ग्रहमालेचा शास्त्रज्ञांनी शोध लावला होता. या ग्रहमालेत पाणी आणि खडक असलेले, पृथ्वीच्याच आकाराचे सात ग्रह सापडले होते. दोन आठवड्यांपेक्षाही कमी भ्रमणकाळ असलेले हे ग्रह एका छोट्या ताऱ्याभोवती फिरत असल्याचं दिसून आलं होतं. पृथ्वीबाहेर ‘जीवन’आहे का याचा शोध घ्यायचा असेल तर आणि मनुष्यवस्तीला ग्रह अनुकूल आहे का हे तपासायचं असेल तर अशाच ग्रहमालेवरून काही जैविकसूचक (बायोइंडिकेटर्स) मिळू शकतील याची खगोल पदार्थवैज्ञानिकांना खात्री आहे. आत्तापर्यंतच्या अभ्यासातून ‘ट्रॅपिस्ट-१’ ग्रहमालेच्या सात ग्रहांपैकी तीन ग्रह हे निश्चितपणे माणसाच्या वास्तव्यासाठी योग्य असावेत असं दिसून आलं आहे.  

काही शास्त्रज्ञांच्या मते, ‘पृथ्वी’सारखा ग्रह अवकाशात मिळेल की नाही यापेक्षा तो कुठं मिळेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे! पृथ्वीसारखे ग्रह असतीलच याची खात्री अनेकांना आहे. अवकाशाच्या पोकळीतील अशा प्रकारच्या  ग्रहांवर पृथ्वीसदृश परिस्थिती असावी व ते माणसाच्या वास्तव्यासाठी योग्य असावेत असा अंदाज ‘नासा’च्या ‘केप्लर मिशन’मधून याआधी वर्तवण्यात आला आहेच. ‘केप्लर’ आणि ‘हबल स्पेस टेलिस्कोप’च्या निरीक्षणातून, अनेक ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या तीन हजार पृथ्वीसदृश ग्रहांचा आपल्या आकाशगंगेतच समावेश असावा असा अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आला आहे.  मात्र, यातले किती ग्रह माणसाला राहायला योग्य असतील आणि किती ग्रहांपर्यंत जाता  येईल ते सांगणं कठीण आहे. चंद्र आणि मंगळ यांच्यावर जाऊन राहणं आपल्या आवाक्यात असल्यामुळे दुसऱ्या ग्रहावर वस्ती करावीच लागली तर यांचाच प्राधान्यानं विचार करणं हितावह होईल असाही सूर उमटू लागला आहे! इतका टोकाचा विचार करण्याची खरं म्हणजे आज गरजही नाही असासुद्धा  एक मतप्रवाह आहेच. वस्तीसाठी दुसरा ग्रह शोधण्याऐवजी पृथ्वीवरील बिघडलेल्या पर्यावरणात आपण किती वेगानं आणि कशी सुधारणा घडवून आणू शकतो याचा विचार होणं महत्त्वाचं आहे. माणूस विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे आणि स्वतःच्या बुद्धीच्या वापराद्वारे, पृथ्वी सध्या आहे त्यापेक्षा अधिक सुंदर करू शकतो, तसेच मानवासाठी हे एक उत्तम आणि एकमेव वसतिस्थान नक्कीच निर्माण करू शकतो असा दुर्दम्य आशावाद यामागं आहेच हे नाकारून चालणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com