तत्त्वचिंतक नटसम्राट (प्रेमानंद गज्वी)

premanand gajwi
premanand gajwi

आपल्या उत्तुंग अभिनयानं प्रेक्षकांवर अधिराज्य करणारे आणि त्याचबरोबर बुद्धिप्रामाण्यवादाची कास धरून समाजजागृती करणारे डॉ. श्रीराम लागू म्हणजे नाट्यवादळच. त्यांची या दुनियेच्या रंगमंचावरून एक्‍झिट झाली असली, तरी या तत्त्वचिंतक नटसम्राटाचं युग हे म्हणजे नाट्यसृष्टीचा सुवर्णाक्षरी इतिहास आहे. या वादळाचे हे काही पैलू.

माणूस जन्मतो तेव्हा हे गृहीत असतं, की तो कधीतरी एकदिवस हे जग सोडून जाणार आहे; पण सर्वसाधारण माणसाचं जाणं आणि एखाद्या श्रेष्ठतम कलाकाराचं जाणं यात फरक आहे. डॉ. श्रीराम लागू हे मराठी; तसंच भारतीय रंगभूमीवरील अत्यंत महत्त्वाचे अभिनेते आपल्यातून जाणं, अगदी वय ९२ असलं तरी धक्कादायक आहे. कारण त्यांचं आजूबाजूला असणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं होतं. आपल्यात एक महान कलावंत आहे, ही जाणीवसुद्धा दिलासा देणारी होती.

डॉ. लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा इथं झाला आणि मृत्यू १६ डिसेंबर २०१९. या ९२ वर्षांतल्या कालखंडात, (त्यांचा जन्म एका आस्तिक कुटुंबात झाला असला, तरी त्यांच्या आयुष्यात) ते ‘देवाला रिटायर करा’ असं सांगत राहिले. कारण देव या संकल्पनेमुळे समाजात अंधश्रद्धा वाढते आणि माणूस कष्ट करायचे सोडून देव आपल्यासाठी काहीतरी करील, या भावनेत अडकून पडतो, हे त्यांना योग्य वाटत नव्हतं. त्यांना अंधश्रद्धाळू माणसांचा नव्हे, तर डोळस माणसांचा समाज हवा होता. डॉ. लागूंच्या या भूमिकेतूनच त्यांचा संबंध अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी आला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करत होते. त्याचाच एक भाग म्हणून अंनिसमध्ये पूर्ण वेळ काम करणाऱ्या समाजसेवकांना काहीतरी मानधन देता यावं, या कल्पनेतून ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ या संकल्पनेचा जन्म झाला. या निधीसाठी ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर डॉ. लागू यांनी केले. या उपक्रमासाठी निळूभाऊ फुले, सदाशिव अमरापूरकर, रोहिणी हट्टंगडी अशा अनेक कलाकारांचं मौलिक सहकार्य त्यांना मिळालं. आजही या निधीतून अंनिसमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मानधन दिलं जातं. हे अपूर्व कार्य डॉ. लागू यांच्या संकल्पनेतून सिद्ध झालं.

खरं तर डॉ. लागू कान, नाक, घसातज्ज्ञ होते. या पैशातून त्यांना लाखो रुपये मिळवून गडगंज श्रीमंत होता आलं असतं; पण ते त्यांनी नाकारलं. कारण लहानपणापासूनच त्यांचा कल नाट्यकलेकडे झुकलेला होता. पुण्यातल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमध्ये काही काळ ते रमले. पुढे पीडीएमध्ये ‘घाशीराम कोतवाल’मुळे मतभेद झाले. त्यातून ‘थिएटर अकादमी’चा जन्म झाला. तसंच डॉ. लागू यांनी त्यांना अपेक्षित असं थिएटर करता यावं म्हणून ‘रूपवेध’ या संस्थेची स्थापना केली.
डॉ. लागू हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व मानलं जातं. ज्यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘नटसम्राट’मध्ये लागूंना पाहिले असेल, त्यांना लागू यांच्या भव्य व्यक्तिमत्त्वाची कल्पना येईल. ‘नटसम्राट’ हे नाटक डॉ. लागू यांच्यासाठीच लिहिलं असावं, इतके ते त्या भूमिकेत फिट्ट बसले होते. वास्तविक हे नाटक म्हणजे एका वयोवृद्ध अभिनेत्याची शोकांतिका; पण अभिनेत्याच्या शोकांतिकेपेक्षाही म्हातारवयात आलेल्या म्हाताऱ्याचीच ही शोकांतिका आहे आणि त्यामुळेच या नाटकात ‘समोरचं ताट द्यावं; बसण्याचा पाट देऊ नये’ अशा प्रकारचं विधान या नाटकामध्ये येतं. भविष्यात आपलंही असं होऊ शकेल, या भीतीनं प्रेक्षक थरारून जातो. या नाटकामुळेच डॉ. लागू यांना ‘नटसम्राट’ ही पदवी दिली गेली. डॉ. लागूंच्या नंतर दत्ता भट, सतीश दुभाषी अशा अनेक मान्यवर अभिनेत्यांनी या नाटकातली अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका केली; पण तरीही नटसम्राट करावं, तर डॉ. लागूंनीच असं मानलं गेलं.

डॉ. लागू यांनी वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, रत्नाकर मतकरी ते अलीकडच्या कालखंडातले प्र. ल. मयेकर, अजित दळवी, मी स्वत:, मकरंद साठे अशा जुन्या आणि नव्या नाटककारांच्या नाटकांमधून भूमिका केल्या. त्यांनी केवळ भूमिका केल्या असं म्हणता येणार नाही, तर त्यांना स्वत:ची एक अशी स्वतंत्र नाट्यदृष्टी होती. आपल्याला नाटकातून काय सांगायचं आहे, नाटकाचा आशय काय आहे, पुरोगामी आहे की प्रतिगामी याकडेही त्यांचा कटाक्ष असे. गो. पु. देशपांडे यांचं ‘उद्‌ध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक. या नाटकातल्या डाव्या विचारसरणीच्या श्रीधर कुलकर्णी नावाच्या प्राध्यापकाची ही शोकांतिका. खरं तर डॉ. लागू हे गांधीवादी. गांधी विचारसरणीवर त्यांचा दृढ विश्‍वास; पण त्यांचा गांधीवाद श्रद्धावान नव्हता. ते अनेक वाद समजून घेण्याचा प्रयत्न करीत असत. त्यातूनच त्यांनी ‘रूपवेध’ या संस्थेतर्फे ‘उद्‌ध्वस्त धर्मशाळा’ सादर केलं आणि प्रायोगिक रंगभूमीवरील एक महत्त्वाचं नाटक मानलं गेलं.

‘पिंजरा’ आणि ‘सामना’ या मराठी चित्रपटामुळे डॉ. लागूंचा नावलौकीक, अधिक दरारा एवढा वाढलेला होता, की त्या कालखंडातल्या आमच्यासारख्या नवोदितांना त्यांना भेटावं कसं असा प्रश्‍न पडायचा; पण जेव्हा त्यांच्या सहवासात येता आलं आणि मला स्वत:लाही वाटलं, की आपण लिहिलेल्या ‘किरवंत’ नाटकात त्यांनी काम करावं, तेव्हा त्यांना ‘किरवंत’ नाटकाची संहिता पाठवली. आश्‍चर्य असं, की चार दिवसांत त्यांचं पत्र : ‘नाटक वाचलं. दोनदा. सुन्न झालो. हे नाटक कुणी करतंय का?’ आणि पुढचं वाक्‍य होतं : ‘मी करू का?’ मुद्दा असा, की डॉ. लागूंच्या विषयीचं आम्ही आमच्या मनात जे रूप समजत होतो, तसं ते अजिबात नव्हतं. लेखक जुना की नवा यापेक्षा लेखकानं काय लिहिलं, काय नवं आहे हे शोधणं त्यांना महत्त्वाचं वाटायचं. अनेकदा आपण एखाद्याविषयी न भेटताच तो गैरसमज करून घेतो, तसा तो करून घेऊ नये, याचं हे एक उदाहरण.

डॉ. लागू यांनी ‘किरवंत’ हे नाटक त्यांच्या ‘रूपवेध’ या संस्थेतर्फे केलं आणि डॉ. लागूच या नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत, हे नाट्यसृष्टीत कळलं, तेव्हा ‘डॉ. लागू हे काय दिग्दर्शक आहेत? तू चांगल्या दिग्दर्शकाला का देत नाहीस?’ असं बोललं गेलं. मात्र, एक दिवस डॉ. लागू स्वत:च असं म्हणाले : ‘‘जे स्वत:ला दिग्दर्शक मानतात, ते स्वत:च्या दिग्दर्शनाचे पैलू नाटकात दाखवण्याचं काम अधिक करतात. परिणामी नाटकात दिग्दर्शकच जास्त दिसतो. तुझ्या नाटकाला अशा दिग्दर्शकाची गरज नाही. नाटकाचा आशय महत्त्वाचा आणि म्हणून मीच हे नाटक दिग्दर्शित करतो आहे.’’ म्हणजे डॉ. लागू यांच्या विचारात ‘दिग्दर्शक’ या कल्पनेचा स्पष्ट विचार समाविष्ट आहे, हे आपल्या लक्षात येतं. खरं तर डॉ. लागू ‘किरवंत’ या नाटकात भूमिका करणार नव्हते. कारण त्यांचा चेहरा काहीसा उग्र आणि ‘किरवंत’मधली व्यक्तिरेखा अत्यंत दीनवाणी. मात्र, त्यांना दाताची कवळी बसवण्याची कल्पना सुचली आणि ती कवळी लावल्यामुळे चेहरा दीनवाणा होतो, हे लक्षात येताच ‘किरवंत’मधली ती भूमिका त्यांनी साकार केली. मुद्दा असा, की दिग्दर्शक म्हणूनही आणि अभिनेता म्हणूनही अत्यंत सखोल विचार करणं आणि आपल्या देहयष्टीला जे अनुरूप आहे, तेच साकार करणं, अशी ही नाट्यदृष्टी डॉ. लागूंकडेच होती.

नटाविषयी असं म्हटलं जातं की, ‘यू आर द इन्स्टुमेंट अँड यू आर द प्लेअर.’ म्हणजे वाद्यही तूच आणि वाजवणाराही तूच आहेस. यासोबतच नट हा ऍथलिट फिलॉसॉफर असला पाहिजे. म्हणजे अभिनयाचं आहार्य, आंगिक, वाचिक आणि सात्त्विक हे चार घटक अभिनेत्याला लीलया पेलता आले पाहिजेत. डॉ. लागूंच्या अभिनयाचं वैशिष्ट्य असं, की ते या चारही घटकांचा वापर ते अत्यंत जाणीवपूर्वक करत असत आणि यामुळेच लेखकाच्या नाटकातली तात्त्विकता म्हणजे आशय नेमकेपणानं अधोरेखित होत असे. या अर्थानं डॉ. लागू हे नुसते अभिनेता नव्हे, तर ‘तत्त्वचिंतक अभिनेता’ होते, असं म्हटलं पाहिजे. वसंत कानेटकर यांच्या ‘वेड्याचे घर उन्हात’पासून मकरंद साठे यांच्या ‘सूर्य पाहिलेला माणूस’पर्यंत सुमारे ५० नाटकांतून डॉ. लागू यांनी ज्या भूमिका साकारल्या, त्यात त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या सगळ्या कालखंडाचा विचार केल्यास डॉ. लागू यांनी त्यांचं युग निर्माण केलं. त्यांची या दुनियेच्या रंगमंचावरून एक्‍झिट झाली असली, तरी या तत्त्वचिंतक नटसम्राटाचं युग हे म्हणजे नाट्यसृष्टीचा सुवर्णाक्षरी इतिहास आहे.

(लेखक ज्येष्ठ नाटककार आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आहेत.)

(शब्दांकन : महेंद्र सुके)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com