आनंद... आईचा! (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse
dr shruti panse

एके काळी आनंदाच्या वर्षावात न्हाऊन निघणारी मुलगी आई झाली, की काय होतं? तिचा आनंद वाढतो, की कमी होतो? आईचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ म्हणजे ‘आनंद निर्देशांक’ वाढतो की कमी होतो? की त्याची सगळी परिमाणंच बदलून जातात. ‘मॉम्‍सप्रेसो’ नावाच्या संस्थेनं ‘मॉम्स हॅप्पीनेस इंडेक्स’ नावाचं एक सर्वेक्षण केलं. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्यात.पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आया सध्याच्या स्थितीत तितक्या आनंदी नाहीत, आदी प्रकाराचे वेगवेगळे निष्कर्ष त्यातून हाती आले आहेत. त्या निमित्तानं ‘आईचा आनंद’ या विषयाचा वेगळ्या दृष्टिकोनातून वेध.

आई ही ‘आई’ होण्याआधी कोण असते? आईबाबांची लाडकी मुलगी. त्यांच्या जिवाचा तुकडाच! स्वत:ला घडवणारी- त्यासाठी शिकत राहणारी एक मुलगी. खूप हुशार असली नसली, तरी मार्क मिळवण्यासाठी धडपड करणारी मुलगी. शिक्षण संपवून मनासारखं काम शोधणारी, काम करण्यात आनंद मानणारी. काम चांगलं व्हावं म्हणून धडपडणारी, सुट्या न घेणारी, काम हेच करिअर, असं मानणारी मुलगी. ऑफीसमध्ये महत्त्वाची मीटिंग असली, की कितीही वेळ गेला तरी चालेल, रात्रंदिवस खपून पुरेपूर- अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशनची तयारी करणारी. या सगळ्या गोष्टींबरोबरच स्वत:चे छंद जोपासणारी, मित्रमैत्रिणींच्या गराड्यामध्ये मजा करणारी मुलगी. सुटीच्या दिवशी हक्काने उशीरा उठणारी एक मुलगी. स्वत:ला हवा तसा, योग्य नवरा लाईफ पार्टनर म्हणून निवडला आहे, अशा आनंदात असलेली ही मुलगी उंबरठा ओलांडते आणि तिचं विश्व बदलतं, भावविश्व बदलतं.

... लग्नाआधी घरादाराची लाडकी लेक असलेल्या या मुलीला आता बाळ होणार आहे. त्यासाठी तिला आता थोडंसं बदलावं लागणारं आहे. बाळ झाल्यावर काही महिन्यांनी एखाद्याच्या दिनचर्येत- जीवनशैलीत- मानसिकतेत अचानक १८० अंशांनी बदल होऊ शकतो. तर हो! होतो. ज्यांची बाळं केवळ काही महिन्यांची आहेत, त्यांच्यात नक्कीच होतो.
तिचा दिवस कसा जातो आणि रात्र कशी संपते हेच कळत नाही. घरात प्रेमाची, काळजी घेणारी माणसं असतील तर ठीक; सगळे मिळून बाळाची आणि तिच्या आईची काळजी घेतात. ती या अनोख्या क्षेत्रात पूर्णपणे नवीनच असते. तिच्यासाठी एके काळी रात्रीची जागरणं म्हणजे मैत्रिणींच्या बरोबरची नाईटआऊट्स फक्त! पण इथं तर ती रखवालदार काकांचं काम करते. बाळ टक्क जागं असताना स्वत:लाच ‘जागते रहो’ म्हणत राहते. आजपर्यंत तिनं कधीच स्वत:च्या झोपेशी कसलीही तडजोड केलेली नसते; पण आता... सगळंच बाळाच्या हातात.
ये तो सिर्फ शुरुआत है!...

एके काळी आनंदाच्या वर्षावात न्हाऊन निघणारी मुलगी आई झाली, की काय होतं? तिचा आनंद वाढतो, की कमी होतो? मुलांना वाढवणं, त्यांना मोठं होताना बघणं हे आईसाठी खूप आनंदाचं असतं हे तर खरंच; पण तिच्या वैयक्तिक आनंदाचं काय? आई म्हणून आनंदाचं काय? तो कशात असतो, कशात शोधावा लागतो? आईचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ म्हणजे ‘आनंद निर्देशांक’ वाढतो की कमी होतो? की त्याची सगळी परिमाणंच बदलून जातात. हे सगळे प्रश्न मनात आले, ते एका सर्वेक्षणाच्या निमित्तानं. ‘मॉम्‍सप्रेसो’ नावाच्या संस्थेनं ‘मॉम्स हॅप्पीनेस इंडेक्स’ नावाचं एक सर्वेक्षण केलं. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्यात. शहरी आईपेक्षा ग्रामीण आई तुलनेनं जास्त आनंदी असते किंवा कमी तणावात असते, पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी आया सध्याच्या स्थितीत तितक्या आनंदी नाहीत, असे वेगवेगळे निष्कर्ष त्यातून हाती आले आहेत. त्या निमित्तानं ‘आईचा आनंद’ या विषयाकडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघू या.
***

घरातलं छोटं बाळ बालवाडीत जायच्या वयाइतकं मोठं होतं. आई ऑफीसला जात असेल/ नसेल, बाळाला सांभाळायला घरचे असतील किंवा अजून कोणी असेल. असं समजूया, की बाबासुद्धा आपली कर्तव्यं अगदी प्रेमानं पार पाडत असेल; पण रस्त्यावरून गाडी चालवत जात असताना दुसरं कोणी लहानगं स्वत:च्या आईला हाक मारत असलं, तरी आपलंच मूल आपल्याला हाक मारतं आहे, असे भास आईला होतातच.
जीव असा काही गुंततो प्रेमाच्या कोंदणात, की इतर कोणाहीपेक्षा फक्त आपल्यालाच आपल्या बाळाचं हित-अहित, भलं-बुरं कळतं. ‘माझा निर्णय शेवटचा’ हे आईला मनाच्या आतल्या गाभ्यातून अगदी पक्कं ठाऊक असतं. केवळ चार-पाच वर्षांचा अनुभव; पण रडणं, ओरडणं, किंचाळणं, ताप भरणं, हट्टाची परिसीमा गाठणं अशा कोणत्याही प्रसंगी ‘मी बघते,’ हा अविर्भाव एकदम खासच. निष्णात सर्जन्सच्या हाताखालची माणसं असतातच मदतीला. त्यांची मदत हवीच असते; पण शेवटी येऊन सर्जन जे काही करतात, तो अधिकार फक्त आईला!
***

मूल अभ्यास करत नाही- आईला बोलावून घेऊन सांगा. (‘पालकांना बोलावून घ्या’ असं खरं तर वाक्य असतं; पण बहुतांश वेळेला येते ती आईच.)
वर्गात उद्धट उत्तरं- आई.
खेळताना पडून लागलं- आईला फोन.
परीक्षेतले मार्क कोणाला सांगण्यासारखे नाहीत- फक्त आईला माहीत.
मित्रमैत्रिणींचं प्लॅनिंग- ‘आई, बाबांना सांगू नकोस!’
खर्चाला पैसे हवेत- आई!
ही मुलगी/ हा मुलगा आवडला आहे. - ‘बाबांना तू सांग तुझ्या पद्धतीनं.’
....अशा प्रकारे सर्व बाबतीत सांभाळून घेणारी आई.
आपल्याला काय वाटतं, आईला ताण येत नसेल? कोणतीही तक्रार आल्यावर कामांची जुळणी लावून शाळेत पळणाऱ्या आईची तिथं पोचेपर्यंत हृदयाची धडधड वाढलेली नसेल? मुलांच्या अयोग्य वर्तनाबद्दल, कमी मार्कांबद्दल ऐकून घेताना तिच्या मेंदूचं आणि संपूर्ण शरीराचं काय होत असेल? एखाद्या गोष्टीबद्दल मुलांना परवानगी देताना इतरांपासून आणि बाबांपासून लपवून ठेवताना काळजीनं जीव नकोसा होत असतो. मुलगा/ मुलगी आणि बाबा यांच्यातले बेबनाव दूर करताना, अगदी हसून समेट घडवून आणताना ती शब्दांवर, भावनांवर नियंत्रण ठेवते. तारेवरची कसरत करते; पण तेव्हा ती आतून प्रसन्न, हसरी, आनंदी नसते.

बाबांनी मुलांवर- मुलीवर राग काढून नये, आपल्या मुलांना कोणी काही बोलू नये, मुलं कायम सुरक्षित राहावीत- आनंदी राहावीत यासाठी ती धडपडत असते- अखंड! ती चिडते, रागावते, बडबड करते, उपाशी राहते, विविध पद्धतीनं जवळच्या लोकांना समजावून सांगते, समजून घेते, या सर्व वेळी ती आनंदी नसते. प्रसन्न नसते. अस्वस्थ असते. स्वत:च्या क्षमतेपेक्षा खूप जास्त काम रेटत असते - मानसिक पातळीवर. भावनिक पातळीवर. शारीरिक पातळीवर. असं असलं, तरीही मुलांचे डबे करताना संपूर्ण लक्ष देऊन कामं करते. घराकडे सतत लक्ष देते, ऑफीसमधल्या कामात चुका ठेवत नाही. या सर्व वेळा ती प्रचंड जीव ओतते. कोणत्याही माणूसप्राण्यात असते तेवढीच एनर्जी तिच्यात असू शकते; पण ही एनर्जी काही वेळा पूर्णपणे संपते. तेव्हाच ती चिडते, रागावते. इत्यादी इत्यादी.
‘तुला काय काम असतं?’, ‘सगळी कामं फक्त तुलाच करावी लागतात?’, ‘तू मुलांना लाडावून ठेवलं आहेस, तुझ्यामुळंच ती बिघडलीत’, ‘तुम्ही थोडं तुमच्या मुलांकडे लक्ष द्या’, ‘करतेस काय तू दिवसभर?’, ‘तुझी बडबड जरा बंद कर’, ‘माझा अभ्यास/ माझी परीक्षा/ माझा मित्र/ माझी मैत्रीण... तुला काय त्याचं? माझं मी बघीन.’ ही सर्व विधानं स्वतंत्र आहेत. स्वतंत्रपणे आणि वेळोवेळी जिव्हारी लागतात. विसरता येत नाहीत यातलं काहीच.
म्हणूनच मुलींनो-आयांनो, आपलं सध्याचं वय काहीही असो, आयुष्य हे एकदाच मिळतं. ते आनंदानं जगायचं आहे. विशेषत: भारतातला आईवर्ग हा कमी आनंदी असतो, असं सांगणारा हा अहवाल आला आहे. आपण किती आनंदी आहोत? खरंच मनापासून, आपल्या आवडी- निवडींसह आपण आनंदी आहोत का, हे तपासाच एकदा.

ताणाला ठेवा दूर
आई म्हणून मुलांमध्ये जीव गुंतणं नैसर्गिक आहे. ‘मेरे घर आयी एक नन्ही परी... चांदनीके हसीन रथपे सवार...’ असं खूश तर जरूरच व्हा; पण आपल्याला ताणात ठेवण्याचा अधिकार इतर कोणालाही न दिलेलाच बरा! आपल्याला जेव्हा कोणत्याही कारणानं ताण येतो, तेव्हा आपल्या मेंदूत कॉर्टिसोलसारखी नकारात्मक रसायनं तयार होतात. ती शरीरभर पसरतात. सतत असं होत असेल तर दुष्परिणाम नक्कीच होतात. राग, अस्वस्थता, अपराधी भावना या आपल्यासाठी नाहीतच. कारण या भावना मनाला फक्त खचवतात; समस्येवर मार्ग शोधून देत नाहीत. उलट समस्या अजून मोठी, अजून भीषण वाटत राहते.

प्रत्येकाला समस्या असतातच. तिथं घोटाळत राहायचं, की समस्येपासून दूर राहून अलिप्तपणे समस्या सोडवायची हे आपल्या आणि आपल्याच हातात असतं.
कोणतीही व्यक्ती जेव्हा फिट असते तेव्हा आनंदी असते आणि आनंदी असली तरच ती स्वत:कडे लक्ष देऊ शकते. फिट राहू शकते. या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका गोष्टीपासून सुरवात करणं फारच आवश्यक. मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी उपास करायचे. पित्त वाढवून घ्यायचं आणि पित्त वाढलं, की चिडचिड करायची. हे कशाला? यापेक्षा सर्व जीवनसत्त्वं आहारात असली, तर माणूस स्वस्थ आणि आनंदी राहतं.

पतीला सहभागी करून घ्या
सर्वांत महत्त्वाचं, या सगळ्यात ज्या गोष्टींचा ताण येतो अशा गोष्टी बाबाला आवर्जून सांगा. त्याला सामावून घ्यायचा प्रयत्न करा. अनेक बाबांना जबाबदारी घ्यायची असते; पण कोणी सोपवतंच नाही, सामील करून घेत नाही, असंही असू शकतं.
मूल हे आई-बाबा दोघांचं आहे. आपण शरीरानं एकविसाव्या शतकात आणि मनानं अठराव्या शतकात तर नाही ना, हे तपासायला हवंय. आई म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून, आई-बाबांची लाडकी लेक म्हणून स्वत:कडे बघितलं तर स्वत:ची काळजी निश्चित घेता येईल. आनंदी, प्रसन्न राहता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com