स्वरूप महागणपतीचं.... (डॉ. विजय बाणकर)

dr vijay bankar
dr vijay bankar

आनंद आणि चैतन्याचा, मंगलदायी अशा गणरायाचा उत्सव कालपासून सुरू झाला आहे. गणरायाची भक्ती करताना या दैवताचं स्वरूप नेमकेपणानं समजावून घेतलं पाहिजे. गणरायाची समजून उमजून केलेली भक्ती आपल्या आत्मिक उन्नतीसाठी अत्यंत मोलाची आहे. गणरायाची जी काही नावं आहेत, त्यांतली काही नावं समजून घेतली, तरी या विश्‍वविनायकाचं स्वरूप किती व्यापक आहे, ते लक्षात येईल. गणरायाच्या या नावांविषयी....

अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्रिपुरासुराशी झालेल्या युद्धारंभी श्रीशंकरांना श्रीगणपतीनं आपल्या सहस्रनामांचा उपदेश केला होता. त्या नामांचा अर्थ मनी बाळगत, महागणपतीच्या स्वरूपाचं ध्यान करणं हे आपलं कर्तव्य होय. परिणामी, आपल्या शरीरातील मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता असलेल्या गणपतीचं दर्शन होतं, अंतर्निष्ठ भक्तीचा शुभारंभ होतो आणि शेवटी आपल्या मेंदूच्या पोकळीत असलेल्या सहस्रदलकमलातील चिदाकाशस्वरूप महागणपतीशी एकरूप होऊन जीव भक्तीची परिसीमा गाठतो.

ऋषिमुनींनी व संत श्रीएकनाथांनी महागणपतीच्या काही नामांचे सकलार्थ सांगून ठेवले आहेत. ते समजून घेताना आपल्या अंत:करणातील भक्तिभावना उत्कट होत जाते. १) गणपती / गणेश, २) लंबोदर, ३) मूषकवाहन, ४) विघ्नहर किंवा दु:खहर्ता, ५) सुखकर्ता, ६) गजानन...
या नामांच्या अर्थाधारे महागणपतीचं स्व-रूप आपण समजून घेणार आहोत.
१. गणपती किंवा गणेश :
सर्व गणांचा पती तो गणपती व सर्व गणांचा ईश तो गणेश होय. गण म्हणजे एखाद्या गुणप्रभावानं एखादं वैशिष्ट्य वा वेगळेपण प्राप्त झालेला जीवसमूह होय. जीवांचे अनेक प्रकार (जाती) आहेत. उदाहरणार्थ - मनुष्य, देव, राक्षस, पशू, पक्षी, कीटक, जंतू इत्यादी. हे सारे जीवसमूह ज्यात आहेत ते, हे सर्व जगत् गणपतीपासून निर्माण होतं, गणपतीत वसत असतं व शेवटी गणपतीतच लय पावतं. अनेक सृष्टींतील अनेक जीवसमूहांचा पती, मालक वा नियामक म्हणजे गणपती होय. गणपती या नामाचा अर्थ अंशत: स्पष्ट करणारी आणखीही काही नामं ‘श्रीगणेशसहस्रनामावली’त आहेत. उदा. महागणपती (महागणांचा पती), चराचरपती:, गणाध्यक्ष: (शरीरातील छत्तीस तत्त्वरूप गणसमुदायांचा पालक), गणनाथ (गणसमूहाचा रक्षक), गणेश्वर (पंचभूतादी गणांचा ईश्वर), गणाधिप: (आदित्य इत्यादी गणदेवतांचा अधिपती म्हणजे ईश्वर), गणनायक (काव्यपद्यातील म य व स वगैरे गणांचा अधिपती), गणप: (अध्वर्यू आणि होता आदी गणांचा मालक), विश्वेश्वर प्रभु:, देवदेव, देवत्राता, सर्वदेवात्मा इत्यादी.

२. लंबोदर : श्रीगणपतीच्या लंबोदर या नामाचा अर्थ श्रीएकनाथांनी स्पष्ट केला आहे. ‘भागवतारंभी’ श्रीगणपतीला उद्देशून ते म्हणतात, “तुजमाजी वासु चराचरा । म्हणोनि म्हणिजे लंबोदरा । यालागी सकळांचा सोयरा । साचोकारा तू होसि ॥” चराचर विश्व तुझ्यामध्ये वसलं आहे म्हणून तुला लंबोदर म्हणतात व त्यामुळंच तू खऱ्या या अर्थानं सर्वांचा सोयरा आहेस, असा या ओवीचा सरळ अर्थ आहे. गणपतीच्या सर्वव्यापक रूपाच्या तुलनेत चराचर विश्व अगदीच छोटं आहे. जंगम व स्थावर विश्व त्याच्या पोटात मावलंय. म्हणूनच जसं काय त्याचं उदर लंब म्हणजे मोठं झालंय.
‘महोदर’ असंही गणपतीचं एक नाम आहे. अनंत ब्रह्मांडं ज्याच्या महाउदरात समाविष्ट आहेत, तो महोदर होय. याशिवाय गणपतीचं महाकाय रूप सांगणारी आणखी नामं आहेत : अर्णवोदर: (सारे समुद्र ज्याच्या उदरान्तर्गत जल आहे तो), व्योमनाभि: (व्योम म्हणजे आकाश हेच ज्याचं नाभिस्थान आहे असा), कुक्षिस्थयक्षरक्षगंधर्वरक्ष: किंनरमानुष: (यक्ष, राक्षस, गंधर्व, किन्नर आणि मानव ज्याच्या कुक्षित म्हणजे छातीत विराजमान आहेत तो), स्थूलकुक्षि: (ज्याची कुक्षि विशाल आहे असा), सप्तपातालचरण: (तल, अतल, वितल, सुतल, रसातळ, महातळ व पाताळ हे सप्त पाताल ज्याच्या चरणांचे आश्रित आहेत तो), सप्तद्वीपोरूमंडल: (जंबू, कुश, वृक्ष, शाल्मली, क्रौंच, शाक आणि पुष्कर ही सप्तद्वीपं ज्याच्या उरुमंडलाची म्हणजे मांड्यांची आश्रित आहेत तो), कुलाचलांस: (महेंद्र, मलय, सह्य, शुक्तिमान, ऋक्ष, विंध्य आणि परित्राय हे सप्त पर्वत ज्याचे कणास्वरूप आहेत असा), पृथ्वीकटि: (पृथ्वी ही ज्याची कंबर आहे असा), ब्रह्मांडावलिमेखल: (संपूर्ण ब्रह्मांडपंक्ति हीच ज्याची मेखला म्हणजे कटिसूत्र आहे असा).

३. मूषकवाहन : संत श्रीएकनाथ श्रीगणपतीला उद्देशून म्हणतात, ‘सूक्ष्माहुनी सूक्ष्म सान । त्यामाजी तुझे अधिष्ठान । यालागी मूषकवाहन । नामाभिधान तुज साजे ॥’ अर्थात, सूक्ष्मातिसूक्ष्म वस्तूतही गणपतीचं अधिष्ठान आहे. म्हणूनच त्याला मूषकवाहन असं संबोधलं आहे. संत श्रीनामदेवांनी एक रूपक लिहिलंय. त्या अभंगातील तिसरं चरण ‘मुंगीचे गळां तुळईचा लोढणा । विष्णुदास नामा बोलिला खुणा ॥’ असं आहे. इथं मुंगी म्हणजे जीव व तुळईचा लोढणा म्हणजे शरीर होय. ज्या न्यायानं दिसावयास, आकारानं लहान असलेली मुंगी (जीव) तुळईचा लोढणा (शरीर) सहज वाहून नेऊ शकते (शकतो) त्याच न्यायानं गणपतीच्या कृपेनं सामर्थ्य प्राप्त झालेला उंदीर त्याच्यापेक्षा शरीरानं मोठा असलेल्या देहधारी गणपतीला सहज वाहून नेऊ शकतो. समजून घेण्याची ही रीत म्हणजे खूण श्रीनामदेवांनी सांगितली आहे.
श्रीनामदेवांनी सांगितलेली खूण म्हणजे आत्मस्वरूपाचं पवित्र ज्ञान होय. परिणामी मूषकवाहन या नामाचा श्रीएकनाथांनी घेतलेला पारमार्थिक अनुभव घेण्याची इच्छा तीव्र होत जाते आणि श्रीगणपतीच्या चराचरव्यापक दर्शनानं ती पूर्ण होते.

४. विघ्नहर किंवा दुःखहर्ता : भक्ताला आपल्या चराचरव्यापक रूपाचं दर्शन दिल्यानंतर देव सदैव त्याच्या समोर असतो. खरंतर, देव व आपण वेगळे नाही, असं तो भक्त अनुभवत असतो. असं अनुभवास येत राहणं म्हणजे ‘सदोदित होणं’ हेच खर्‍या भक्तीचं व परमार्थाचं स्वरूप होय. हा विचार ‘स्वसंवेद्य सन्मुखता भेदु नाही आता । भक्ति आणि परमार्था हेचि रूप ॥’ या अभंगातून श्रीज्ञानदेवांनी व्यक्त केला आहे. संत श्रीएकनाथ श्रीगणपतीला संबोधून लेखन करीत होते, त्या वेळी तेदेखील गणपती सन्मुख असल्याचं अनुभवत होते. म्हणूनच ते म्हणतात, ‘तुज देखे जो नरू । त्यासी सुखाचा संसारू । यालागी विघ्नहरू । नामादरू तुज साजे ॥.... तुझी अणुमात्र झालिया भेटी । शोधितां विघ्न न पडे दृष्टी । तोडिसी संसार फासोटी । तोचि तुझे मुष्टी निजपरशू ॥ भावें भक्त जो आवडे । त्याचे उगविसी भवसाकडे । वोढुनी काढिसी आपणाकडे । निजनिवाडे अंकुशें ॥’ ‘तुला गणपतीला जो मानव पाहतो त्याचा संसार सुखाचा होतो, त्याचं संसाररूपी विघ्न लय पावतं म्हणून मोठ्या आदरानं दिलेलं ‘विघ्नहर’ हे नाव तुला साजेसं आहे. तुझी अल्पकाळ जरी भेट झाली किंवा तुझ्या रूपाचं थोडं जरी ज्ञान झालं, तरी शोधूनही विघ्न दृष्टीस पडत नाही. संसाररूपी फास तोडून टाकणारी कुऱ्हाड आत्मज्ञानरूपी अभय देणाऱ्या या तुझ्या हातात आहे.
आत्मस्वरूपाचं सानुभव ज्ञान नसलेले जीव वेगवेगळ्या इच्छावासनांमुळे जन्म-मरणाच्या फेर्‍यात गुंतून पडतात. जन्मल्यानंतर सुख-दु:खांत जगत राहतात. जीवावर ओढवणारं हे सर्वांत मोठं विघ्न होय. या विघ्नाचं निवारण गणपती आपल्या भक्ताला आत्मानात्मविवेक देऊन करतो. या अर्थानं तो ‘विघ्नहर्ता’ किंवा ‘दु:खहर्ता’ होय. आर्त भक्त हे शारीरिक दु:खांचं निवारण व्हावं म्हणून, तर अर्थार्थी भक्त प्रापंचिक अडीअडचणी दूर होण्यासाठी धनधान्यसंपत्ती, मानसन्मान वा सत्ता मिळावी म्हणून देवाला प्रार्थना करीत राहतात. जिज्ञासू भक्त देवविषयक विविध प्रकारची माहिती होत रहावी या हेतूनं वाचनमननपूर्वक भक्ती करीत असतात. या तिन्ही प्रकारच्या भक्तांच्या मनात वेगवेगळ्या इच्छा-अपेक्षा असतात. ते सत्त्व, रज व तम या गुणांच्या प्रभावाधिक्यामुळं निर्माण होणाऱ्या सुखविषयक कल्पनाविश्वात अडकून राहतात; त्यामुळं त्यांना स्वत:च्या व देवाच्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. चौथ्या प्रकारचे, म्हणजे ज्ञानी भक्त मात्र निष्काम भक्ती करीत असतात. ते देवाला आवडतात. त्यांना देव आपल्याकडं आकर्षित करून घेतो व त्यांना भवसंकटातून (जन्म-मरणजन्य दु:खातून) मुक्त करतो. त्यांना गणपती आपल्या व त्यांच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान देतो.

५. सुखकर्ता : संत श्रीएकनाथ श्रीगणेशाला उद्देशून म्हणतात, “साच निरपेक्ष जो नि:शंक । त्याचे तूचि वाढविसी सुख । देऊनि हर्षाचे मोदक । निवविसी देख निजहस्तें ॥” एक देवच भेटायला हवा, त्यातच आपलं खरं कल्याण आहे, अशा दृढ श्रद्धेमुळं जो नि:शंक असतो, तोच खरा (= ज्ञानी) भक्त होय. देवाशिवाय अन्य कोणत्याही लाभाची त्याला अपेक्षा नसते. अशा भक्ताला गणपती स्वहस्ते आत्मानंदरूपी हर्षाचे मोदक देऊन सुख, समाधान व शांती प्रदान करतो.

जीव व आत्मा यांचं मिलन होतं, जीव व शिव एकरूप होतात, तेव्हा जे जे अनुभवास येतं ते म्हणजे सुख होय. ‘किंबहुना सोये । जीवआत्मयाची लाहे । तेथ जे होये । तया नाम सुख ॥’, अशी त्या सुखाची व्याख्या श्रीज्ञानदेवांनी केली आहे. त्यास आत्मसुख म्हणतात. तेच खरं सुख असतं, कारण ते अविनाशी असतं. ते सुख संत श्रीतुकाराम अखंडपणे अनुभवीत होते. म्हणूनच ‘माझे आत्मसुख । कोण घेईल हिरावून ॥’ अशा शब्दांनी त्यांनी ते सुख मिळविण्यास अप्रत्यक्षपणानं उपदेशिलं आहे. परमात्मारूपी डोहात आपण त्याचेच अंश असलेले आत्मारूपी तरंग आहोत. अर्थात, आपण देवस्वरूपातच वास करीत आहोत. हा सर्वश्रेष्ठ सुखाचा अनुभव ‘आनंदाचे डोहीं आनंद तरंग’ या अभंगातून त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं की भक्त हे आयतं म्हणजे स्वयंसिद्ध असलेलं सुख भोगू लागतो. अल्पकाळ टिकणारं इंद्रियजन्य, तसंच बौद्धिक सुख मिळविण्यासाठी संसारी वा प्रापंचिक लोकांना जे व जसे काबाडकष्ट करावे लागतात, कष्टाचे डोंगर उपसावे लागतात, ते व तसे कष्ट ज्ञानी भक्ताला करावे लागत नाहीत, असं ‘आम्ही आयते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा व्यवहार । तेणेंचि वाढे॥’ या अभंगातून श्रीतुकारामांनी स्पष्ट केलंय. ज्ञानी भक्त सदैव आत्मारूपी विश्वव्यापी महागणपतीतच स्थित असतात, म्हणजे आत्मरत असतात. आत्मरतीचं सुख अविनाशी म्हणजे चिरकाल टिकणारं असतं. गणपती हे सुख सद्भक्ताला देतो, या अर्थानं तो सुखकर्ता होय.
आत्मसुखाकडं दुर्लक्ष करून इतर सुखांची अपेक्षा करणं हे दु:खास कारणीभूत होतं. भक्ताच्या मनात इंद्रियसुखाची अपेक्षा निर्माण होणं हेच मोठं विघ्न असतं. त्यापासून व तज्जन्य दु:खांपासून ज्ञानी भक्ताचं संरक्षण करणारा तो विघ्नहर भक्ताला खरं सुख (आत्मसुख) देऊन सुखकर्ता होत असतो.
वर उल्लेखलेल्या चार प्रकारच्या भक्तांपैकी ‘ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझे ।’ या वाक्यानं निष्काम भक्ताला श्रीज्ञानेश्वरांनी गौरविलं आहे; आणि श्रीगणपतीची आरती लिहिणार्‍या श्रीरामदासस्वामींनी ‘निष्काम भावाचिया भजना । त्रैलोक्यीं नाही तुळणा ।’ या ओवीतून निष्काम भक्ती करण्याची प्रेरणा भाविकांना दिली आहे.

६. गजानन : “पाहता नरू ना कुंजरू । व्यक्ताव्यक्तासी परू । ऐसा जाणोनि निर्विकारू । नमनादरू ग्रंथार्थीं ॥” असं भागवत ग्रंथारंभी संत श्रीएकनाथ श्रीगणपतीला म्हणतात. ‘तुझ्या सद् रूपाचं दर्शन झाल्यावर तू जसा मानव नाहीस तसाच गजही नाहीस, व्यक्त आणि अव्यक्तही नाहीस, तर त्याही अतीत म्हणजे पलीकडचा असा तू निर्विकार आहेस, असं समजलं म्हणून तुला आदरपूर्वक नमस्कार करतो,’ असा या ओवीचा भावार्थ आहे.
गणपतीचं ‘देवार्थनृगजाकृथ:’ असंही एक नाव आहे. देवतांच्या कार्यसिद्धीसाठी गणपतीने ‘नरदेह आणि गजमुख’ असं रूप धारण केलं म्हणून तो गजानन होय. अगोदर श्रीशंकर व पार्वती यांच्यासारखं मानवरूप असलेल्या त्यांच्या पुत्राला नंतर हत्तीचं तोंड प्राप्त झालं, हे सर्वश्रुत आहे. पण गणपतीचं ‘अप्रमितानन:’ असंही एक नाम आहे. ज्यानं असंख्य मुखं धारण केली आहेत, त्या अप्रमिताननाचं गजानन हे एक नाम (व रूप) आहे.
ग्रंथारंभी नमन करताना विघ्नहराचं रूप जसं मानुष (मानवी) नाही, तसंच ते कुंजरासमही (हत्तीसारखंही) नाही; ते व्यक्त (इंद्रियगोचर, साकार) व अव्यक्त (इंद्रियातीत, निराकार) या दोहोंपलीकडील आहे, म्हणून ते ‘निर्विकारू’ आहे, असं श्रीएकनाथ म्हणतात. व्यक्त वा अव्यक्त, सगुण वा निर्गुण, दृश्य वा अदृश्य असणं म्हणजे उपाधीयुक्त असणं होय. गणपती मुळात तसा नाही; तर तो या सर्व द्वंद्वांच्या पलीकडचा म्हणजे स्वसंवेद्य निरुपाधिक आत्मरूप आहे.
‘श्रीगणेशसहस्रनामावली’तही सत्, असत्; व्यक्त, अव्यक्त आणि सचेतन, अचेतन ही परस्परविरुद्ध वाटणारी नामं दिली आहेत. त्यावरूनही गणपतीचं द्वंद्वातीत स्वरूप सूचित होतं.

७. श्रीगणपतीचं दर्शन कधी होतं? -
‘अथर्वशीर्षात’ गणपती ‘अवस्थात्रयातीत:’ म्हणजे ‘तिन्ही अवस्थांच्या पलीकडील आहे’, असं विधान केलं आहे व ‘चतुर्थीतिथीसंभव:’ हे गणपतीच्या सहस्र नामांपैकीचं एक नाम आहे. जागृती, सुषुप्ती व स्वप्न या तीन अवस्थांत होणारं ज्ञान हे आकार व गुण असलेल्या वस्तूंचं असतं. यांपैकी कोणत्याही अवस्थेत गणपती-दर्शन होत नाही. या तिन्ही अवस्थांच्या पलीकडील चौथ्या ‘तुर्या’नामक अवस्थेत दिव्यज्ञानदृष्टी प्राप्त होते, त्या वेळी आपल्या शरीरातील मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता असलेल्या गणपतीचं दर्शन घडतं. श्रीज्ञानदेवांनी उपदेशिल्याप्रमाणं श्रीमुक्ताबाईंनी आपल्या मूळद्वारीं म्हणजे स्वदेहातच गणपतीची स्थापना करून ‘देवाला आवडणाऱ्या थोर अंतर्निष्ठ भक्तीचा’ शुभारंभ केला होता, असं ‘श्रीज्ञानेश्वराची सनद’नामक अभंग वाचताना लक्षात येतं.
‘मूलाधारचक्रावर नित्य स्थित’ असलेला, म्हणजे श्रीतुकारामांच्या भाषेत ‘आपल्यापाशीच असलेला आपला (आत्मरूप) गणपती’ आपल्या डोळ्यांना दिसत नाही, म्हणून त्यास अव्यक्त म्हटलंय. ‘ध्याता-ध्येय-ध्यान’ ही त्रिपुटी ओलांडून गेल्यावर प्राप्त होणार्‍या दिव्यज्ञानदृष्टीला तो दिसू लागतो. या अर्थानं भक्तांसाठी तो व्यक्त झालेला असतो, व्यक्त होत असतो. गणपतीचं दर्शन व्हावं म्हणून साधकांनी प्राप्त करून घ्यावयाची ही तुर्यानामक चतुर्थ स्थिती म्हणजे पारमार्थिक किंवा आध्यात्मिक चतुर्थी होय. ही चतुर्थ स्थिती प्राप्त झालेली नसते, तोपर्यंत जीव अज्ञानी असतो आणि त्यास गणपतीचं दर्शन झालेलं नसतं, म्हणजे गणपती त्याच्यासाठी अव्यक्त असतो. अवस्थात्रयातीत स्थिती म्हणजे चतुर्थ स्थिती प्राप्त झालेल्या साधकास म्हणजे ज्ञानी व्यक्तींसाठी मात्र तो संभवतो म्हणजे व्यक्त होत असतो. या अनुभवानं ‘चतुर्थीतिथीसंभव:’ हे गणपतीचं नाम सार्थ असल्याची साधकाची निश्चिती होते. तुर्येच्या परिपक्व अवस्थेत म्हणजे उन्मनी अवस्थेत, श्रीरामदासस्वामी म्हणतात त्याप्रमाणे, ‘सन्मुख चहूंकडे तो एक देवाधिदेव’च असल्याचं त्यास सदोदित होतं. म्हणूनच गणपतीचं स्वरूप व्यक्त व अव्यक्त या दोन्ही अवस्थांच्या पलीकडचं आहे, हे संत श्रीएकनाथांनी ‘व्यक्ताव्यक्तासी परु’ या शब्दांनी सांगितलं आहे. अर्थात, चतुर्थीला जन्मलेल्या गणपतीचं तुर्यानामक चतुर्थ स्थितीत प्रवेशलेल्या साधक-जीवाला आत्मरूप गणपतीचं दर्शन होत असतं. परिणामी मनबुद्धीचे अहंभावयुक्त व्यवहार लय पावून व्यक्ती उन्मन होत असते.

अशाप्रकारे स्वसंवेद्य आत्मरूप गणपतीशी सोऽहंभावजन्य तद्रूपता अनुभवणं म्हणजे अद्वयभावें त्यास नमन करणं होय. तसंच श्रीएकनाथांनी व आत्मज्ञानी साधुसंतांनी केलं आहे. म्हणूनच उदा. ‘नमन हाचि अनुभव । नमन हाचि मुख्य भाव । नमन हाचि पैं देव । देवाधिदेव तू पावसी ॥’ असं सन्मार्गदर्शक विधान संत श्रीनामदेवांनी करून ठेवलंय. ‘मन मुरे मग जे उरे । ते तू कां रे सेवीसिना ॥’ अशा अगदी विनम्र शब्दांत आपल्या आत्मरूपाचा म्हणजे श्रीमहागणपतीच्या ‘स्व’रूपाचा अनुभव घेण्याबाबत संत श्रीज्ञानेश्वरांनी आपणास विनवलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com