

प्रशासकीय सेवेत पदार्पण करायला निघालेल्या त्या तरुणाला मी म्हणालो : ‘सर्वच बाजूंनी बरोबर असतील असेच निर्णय मी घेतले पाहिजेत’ या चिंतेत तुझ्या करिअरची महत्त्वाची वर्षं खर्च करू नकोस. निर्णय घे आणि मग परिस्थितीप्रमाणे त्यात सुधारणा कर. हे करताना लोकांवर विश्र्वास ठेव.
तसा तो अगदीच तरुण होता. एका खेड्यातून आलेला. स्पर्धा परीक्षेत निवड झाल्यामुळे अचानकच तो आयएएसच्या झगमगाटी वातावरणात आला होता. त्यानं भेटायची विनंती रमाकांतमार्फत केली होती.
‘‘माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला तो कशाकरता
भेटेल? तू खात्री केली आहेस ना, त्याला मलाच भेटायचंय म्हणून...’’ मी रमाकांतला विचारलं?
‘‘उगीच खोटी नम्रता दाखवणं तुम्हाला शोभत नाही,’’ रमाकांत म्हणाला : ‘‘त्याला तुम्हालाच भेटायचंय आणि तो उद्या सकाळी ११ वाजता येणार आहे’’
बरोबर अकराच्या ठोक्याला तो आला. आल्या आल्या त्यानं खाली वाकून मला नमस्कार केला आणि थोडं लाजत मला विचारलं : ‘‘सर, मला मिठी माराल?’’ मागणी अनपेक्षित होती.
पण मी त्याचं म्हणणं पूर्ण केलं.
त्याला मनात साठवून ठेवलेलं भराभर बोलून टाकायचं होतं.
‘‘सर, माझं करिअर कसं घडवावं याबाबत मार्गदर्शन घ्यायला मी आलोच आहे; पण त्यापेक्षा या वयात तुम्ही आयुष्य इतक्या उत्साहात कसं जगताहात हे मला जाणून घ्यायचंय,’’ तो एका दमात म्हणाला.
‘बाप रे बाप,’ मी मनात म्हणालो, ‘रमाकांतची कानउघाडणी केली पाहिजे. माझं ज्ञान आणि अनुभव याविषयी त्यानं या मुलाच्या मनात काय काय भरवलं आहे देव जाणे.’
तो समोरच्या खुर्चीत बसला. त्याच्या चेहऱ्यावर आश्वासक स्मित होतं आणि डोळे निरागस होते.
दहा वर्षांनंतर हे भाव असेच राहतील का असा प्रश्न उगीच माझ्या मनात येऊन गेला. त्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं होतं; पण टिपिकल आयएएस टाईपचे भाव त्याच्या चेहऱ्यावर अद्याप दिसत नव्हते. त्याचा पोशाख साधा होता. आपण ठीकठाक आहोत असं तो भासवत असला तरी त्याच्या हालचालींत सहजता नव्हती. कदाचित हा त्याच्या वयाचा परिणाम असावा किंवा आमच्या त्या जुन्या वास्तूचं दडपण त्याच्या मनावर आलं असावं.
‘‘एक प्रश्न विचारू?’’
‘‘जरूर,’’ मी म्हणालो.
आमचा संवाद सुरू झाला. चर्चेच्या ओघात माझ्या लक्षात आलं की त्याला माझ्याकडून मार्गदर्शन नको होतं, तर कसलं तरी आश्वासन हवं होतं. याच अपेक्षेतून मिठी मारण्याची विनंती त्यानं कदाचित केली असावी. कदाचित, आपण ज्या परिस्थितीतून आलो ती परिस्थितीच आपल्या मार्गातला अडथळा ठरेल अशी त्याला भीती वाटत असावी. मला माहीत नाही; पण ही शक्यता गृहीत धरून मी त्याला म्हणालो : ‘‘तसं पाहिलं तर तुझ्या आणि माझ्या पार्श्वभूमीत फारसा फरक नाही.’’
‘‘सर, मला काहीतरी करून दाखवायचंय. सचिवालयात काम करण्यापेक्षा प्रत्यक्ष फील्डवर काम करणं योग्य होईल का? राजकारण्यांबरोबर कसं वागायचं? आर्थिक दबाव, मोह, प्रलोभन किंवा लाच या सगळ्याशी कसा सामना करायचा? हे सगळं मला सांगा.’’
‘‘ऐक, मी म्हणालो : ‘‘तुझ्या मनातलं सगळं विसरून जा. पहिली गोष्ट म्हणजे हे भव्य घर आणि इथलं वैभव यांचं दडपण घेऊ नकोस. गेल्या चार पिढ्यांची ती मिळकत आहे; पण आमचा उगम साधा आहे. माझे पूर्वज शेतकरी होते, जमीनदार नव्हेत. आम्ही गरीब होतो, असं मी म्हणू शकत नाही; पण आम्ही श्रीमंत होतो असंही मला म्हणता येणार नाही. आमच्यात एकच वेगळेपण होतं - जे तुझ्यातही आहे - अन् ते म्हणजे, जर आपलं भविष्य आपल्याला स्वतःच लिहायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही याची आम्हाला जाणीव होती.
माझी आजी भाकरी करताना पिठात थोडा कोंडा घालत असे. माझ्या वडिलांनी पहिल्यांदा पायात बूट कधी घातले असावेत हे तुला माहीत आहे का?’’
‘‘नाही,’’ तो म्हणाला : ‘‘जेव्हा त्यांना इंग्लंडमधील रॉयल मिलिटरी कॉलेजच्या इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आलं तेव्हा. सुरुवातीला त्यांच्या मनात थोडी न्यूनगंडाची भावना होती; पण थोड्याच कालावधीत त्यांनी त्यावर मात केली.’’
‘‘कशी?’’ त्यानं निरागसपणे विचारलं.
‘‘त्यांनी इतके कष्ट केले की पासिंग आऊट परेडच्या वेळी त्यांच्या कमांडरनं जाहीरपणे सांगितलं की एक दिवस थोरात नेतृत्व करतील.’’ अचानक त्याच्या मनात वेगळाच प्रश्न निर्माण झाला असावा.
कारण, ‘तुम्ही काय वाचता?’ असं त्यानं मला विचारलं. शेजारच्या अभ्यासिकेत माझी पुस्तकं ठेवलेली होती. तिकडं बोट दाखवत मी म्हणालो : ‘‘जा आणि प्रत्यक्ष बघ.’’
तो अभ्यासिकेत गेला; पण परतला तो गोंधळलेला चेहरा घेऊनच.
‘‘ती सगळी इंग्लिश पुस्तकं आहेत,’’ तो काहीशा त्राग्यानं म्हणाला.
‘‘तुला फारसं इंग्लिश येत नाही म्हणून दडपण आलंय का?’’ मी विचारलं.
त्याच्या गप्प बसण्यात मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.
‘‘इंग्लिश भाषा येणं म्हणजे सगळं काही प्राप्त होणं नव्हे, त्यामुळे त्या भाषेचा बाऊ करू नकोस आणि तिला अडसरही ठरू देऊ नकोस. प्रशासन म्हणजे काही नुसतं फायलींवर शेरे मारणं नव्हे. प्रशासन म्हणजे लोकांशी संवाद आणि त्यांच्या कामांचं व्यवस्थापन. खेड्यात , शेतीमध्ये किंवा रस्त्यावर राबणाऱ्या सामान्य माणसाशी इंग्लिश बोलून काय उपयोग? संपर्क महत्त्वाचा आहे, इंग्लिश नव्हे!’’ माझ्या बोलण्यानं तो थोडासा सैलावला.
‘‘सर, तुम्हाला एवढा व्यापक अनुभव आहे, तर मी माझ्या कामाची सुरुवात कशी करावी याबाबत मला मार्गदर्शन कराल का?’’ तो म्हणाला.
‘‘एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या कारकीर्दीत तू जे काही करणार आहेस ते लोकांसाठी करणार आहेस. स्वतःची ओळख सरकारी नोकर म्हणून नव्हे, तर जनतेचा नोकर अशीच राहू दे. ‘सरकारी’ हा शब्द नसून ‘प्रवृत्ती’ आहे. तू सरकारी नोकर आहेस हे सत्य आहे; पण सरकारी प्रवृत्तीनं काम करणं चुकीचं आहे असं मला वाटतं.’’
‘‘मग योग्य प्रवृत्ती कोणती?’’ त्यानं विचारलं.
‘‘ते ठरवणं कठीण आहे. आमचे नेते जेव्हा राज्यघटना तयार करत होते त्या वेळी त्यांच्यासमोर दोन परस्परविरोधी पर्याय होते. फाळणीमुळे देशात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. नव्यानं जन्माला आलेलं प्रजासत्ताक वाचवणं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता; पण हेही खरं होतं की प्रशासकीय सेवेबद्दल लोकांच्या मनात प्रचंड राग होता. लोकांचा हा राग व्यक्त केला तो स्वातंत्र्यसैनिक आणि घटना समितीचे सदस्य महावीर त्यागी यांनी. आपल्या धीरगंभीर आवाजात महावीर त्यागी म्हणाले होते, ‘देशानं स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांबरोबर जे युद्ध केलं ते केवळ गोऱ्यांच्याविरुद्धचं युद्ध नव्हतं, तर ब्रिटिश कायदे राबवणाऱ्याविरुद्धचं ते युद्ध होतं.’
लक्षात ठेव, राज्यकर्ते बदलतात, जनता बदलत नाही. ज्या दिवशी तू लोकांपासून दूर जाशील, त्यांच्या आशा-आकांक्षांबाबत संवेदनाहीन होशील, त्या दिवसापासून तुला बदलण्याचा विचार त्यांच्या मनात सुरू होईल.’’
हातातल्या कागदांवर टिपून आणलेल्या काही मुद्द्यांकडे पाहत तो म्हणाला : ‘‘कामावर रुजू होण्यापूर्वीच वेगवेगळ्या स्तरांतून माझ्याकडे अनेक मागण्या मांडल्या जात आहेत.’’
‘‘ते स्वाभाविकच आहे,’’ मी म्हणालो : ‘‘तुझी जबाबदारी आणि कामाचं स्वरूप पाहता शांत आणि तणावरहित आयुष्य तुला कसं मिळू शकेल? समजा, मला तुझ्याकडून एक काम करून घ्यायचं आहे. काम चुकीचं आणि नियमांच्या विरुद्ध आहे; पण त्यासाठी मी प्रयत्न करणं किंवा तुझ्यावर दबाव आणणं किंवा तुला लाच देणं हे तू थांबवू शकतोस का? मला जे हवं आहे ते तू देशील किंवा नाही हा अगदी वेगळा प्रश्न आहे; पण माझं ऐकून घेण्याव्यतिरिक्त तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी यावर एक उपाय सांगितला होता. ते समोरच्या व्यक्तीच्या - शक्य किंवा अशक्य - सगळ्या मागण्या शांतपणे ऐकून घेत असत. त्या व्यक्तीचं बोलणं झालं की शेवटी ते त्याला म्हणत असत, ‘पाहू या.’ ते एकदा माझ्या वडिलांना म्हणाले होते, ‘माझ्याकडे येणाऱ्या लोकांपैकी निम्म्याजणांना त्यांचं म्हणणं मी फक्त ऐकायला हवं असतं. त्यांना ती संधी देणं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे माझं कामच आहे. उरलेल्यांपैकी बहुतेकांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. ज्यांच्या मागण्या योग्य आहेत त्यांना मी मदत करतो. ज्यांच्याबाबत काही करता येणार नाही अशांची संख्या मी कमीत कमी ठेवतो. एवढंच मी करू शकतो.’ तात्पर्य, म्हणजे प्रशासनात तुम्ही सगळ्यांचंच समाधान करू शकत नाही. काहीजण असमाधानी राहणारच.’’
जो प्रश्न तो नक्की विचारेल असं मला वाटत होतं तोच प्रश्न त्यानं विचारला.
‘‘हे सगळं ठीक आहे; पण राजकारण्यांबरोबर कसं वागायचं?’’ त्यानं विचारलं.
‘‘त्यांच्यात कमी गुणवत्ता असते अशा आविर्भावात तू मला हा प्रश्न का विचारतोयस? तू स्पर्धा परीक्षा पास झालास म्हणून तू त्यांच्यापेक्षा सरस आहेस असं तुला वाटतं का? समज, मी तुला निवडणूक लढवण्यासाठी भरपूर पैसे दिले तरी तू निवडून येण्यासाठी काही लाख लोकांना प्रेरित करू शकशील का? तू निवडून येशीलच याची हमी तू मला देऊ शकशील का? मला खात्री आहे की लोकांची मतं तुझ्या बाजूनं वळवणं तुला शक्य होणार नाही. तुझ्यात एक विशिष्ट गुणवत्ता आहे, तर त्यांच्यात वेगळी. दोन्ही प्रकारच्या गुणवत्तांची देशाला गरज आहे. ही गुणवत्ता परिपक्व असेल तरच कसोटीच्या वेळी ती सिद्ध होईल. आपण आता परिपक्व लोकशाहीच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. काही वेळा हा प्रवास अतिशय कष्टदायक असतो. गेल्या सात दशकांत काही राजकारण्यांना असं वाटायला लागलंय की ते राज्यकर्ते आहेत आणि त्यांच्या सूचना पाळणं आणि त्यांच्या कल्पना व धोरणं प्रत्यक्षात आणणं एवढंच नोकरशाहीचं काम आहे; पण राज्यकर्त्यांनी नाटककार रा. ग. गडकरी यांचं वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणतात, ‘राजा हा जगाचा उपभोगशून्य स्वामी असतो.’
राजयोग म्हणजे राजसंन्यास. आणि मित्रा, एक लक्षात घे की, राज्यकर्त्यांना जी गोष्ट लागू होते ती तुलादेखील लागू होते. मंत्र्याप्रमाणे तुलादेखील सत्ता मिळेल. अर्थात्, तिचं स्वरूप आणि व्याप्ती वेगवेगळी असेल; पण ती सत्ताच असेल. सत्ता मिळाली की माणूस बदलतोच.
काहीजण स्वतःला वेगळं समजतात, तर काहीजण भ्रष्ट बनतात. काहीजणांचा उद्धटपणा उफाळून येतो; पण काही जण असेही असतात की सत्ता राबवताना तिचे परिणाम त्यांच्या लक्षात येतात आणि ते शहाणे बनतात. राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी अशा दोघांच्याही बाबतीत हे घडू शकतं. जेव्हा दोघंही आपापल्या कार्याचं मूल्यमापन करतात तेव्हाच त्यांचे एकमेकांबरोबरचे संबंध आणि त्यांचं जनतेविषयी असलेले नातं यात अर्थपूर्ण आणि सकारात्मक बदल होतो.’’
तो थोडासा चिडला.
‘‘तुम्ही असं बोलत आहात की जणू काही आतापर्यंत काहीच घडलेलं नाही.’’
‘‘मी तसं म्हटलेलं नाही; पण मी जे काही पाहतोय त्यावरून असं दिसतं की आतापर्यंत जी काही घुसळण झाली आहे तीमधून कुठलीही विशिष्ट पद्धत दिसत नाही. गोंधळाचीच स्थिती आहे; पण एवढं खरं आहे की जेव्हा आर्थिक व सामाजिक गरजा घेऊन धोरणं राबवली गेली
तेव्हा त्यांचा खूप फायदा झाला आहे. दुसऱ्या बाजूला जेव्हा अधिकारी आणि राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष यांच्यातली स्वार्थी समीकरणं जुळतात तेव्हा तोंडपुज्या अधिकाऱ्यांचा जन्म होतो आणि कणा असलेल्या निःस्वार्थ अधिकाऱ्यांची परंपरा मागं पडते.’’
यावर तो काहीच बोलला नाही.
‘‘वाईट वाटून घेऊ नकोस. एखाद्या देशाच्या इतिहासात ७० वर्षं म्हणजे काही फार मोठा काळ नव्हे. कोणतंही मोजमाप लावलं तरी आपलं प्रजासत्ताक अद्याप अतिशय तरुण आहे. आपला भूतकाळ राजेरजवाड्यांचा होता. नंतरच्या काळात आपण गुलाम होतो, म्हणजे चांगल्या-वाइटाचा विचार न करता जे सांगितलं तेवढंच करण्याची आपली वृत्ती बनली. यातूनच आपली परावलंबी मनोवृत्ती निर्माण झाली. मात्र, एक लक्षात ठेव, ज्या संकटांमधून आपण जात आहोत ती काही फक्त आपल्यावरच कोसळली आहेत असं नाही. परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या प्रत्येक लोकशाही राष्ट्राला अशा अंधकाराच्या आणि नैराश्याच्या मार्गावरून जावं लागलं आहे. त्यांच्या वाटचालीत असे काही प्रसंग आले की त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं. भ्रष्ट राजकारणी, नोकरशाही आणि उद्योगपती यांची मैत्री हा काही नव्या जगातला शोध नाही.’’
वातावरण थोडं हलकं करण्यासाठी मी गमतीनं त्याला विचारलं : ‘‘समजा, कुणी तुला लाच देऊ केली तर तू काय करशील?’’ तुला लाच हवी की नको याचा विचार न करता असं एखादं पाकीट तुझ्या हाती आलंच तर तुझी प्रतिक्रिया काय असेल?’’
हा चुकीचा प्रश्न आहे हे मला माहीत आहे. कारण, ‘मी ते स्वीकारेन’ असं तू म्हणू शकणार नाहीस आणि ‘मी ते नाकारलं ’ असं तू म्हटलंस तर कुणी त्यावर विश्र्वास ठेवणार नाही.’’
‘‘तुम्हाला कुणी लाच देण्याचा प्रयत्न कधी केलाय का?’’ त्यानं मलाच विचारलं.
‘‘होय, सुमारे ४५ वर्षांपूर्वी,’’ मी म्हणालो.
‘‘नेमकं काय घडलं?’’ त्यानं विचारलं.
‘‘तो एक मजेशार किस्सा आहे. सुरुवातीला काही क्षण मला मोह झाला होता; पण नंतर लाच देऊ करणाऱ्याला चांगलंच झापडलं आणि ही गोष्ट मी माझ्या वरिष्ठांच्या कानावर घातली; पण खरं सांगू, लाचेची रक्कम भली मोठी होती. घेतली असती तर खूप मजा करता आली असती! प्रत्येकजण मला हसत होता.’’
‘‘तुम्ही एवढं पारदर्शी कसं राहू शकलात?’’ त्यानं विचारलं.
‘‘ती काही फार मोठी गोष्ट नाही. मीही शेवटी माणूसच आहे. मोह होणं हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे. त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. स्वतःमधला दुबळेपणा ओळखणं ही त्याविरुद्धच्या लढ्याची सुरुवात आहे. मात्र, त्या मोहाला किंवा दुबळेपणाला वाव देणं ही लाज वाटण्याजोगी गोष्ट आहे.’’
‘‘मी द्विधा मनस्थितीत आहे. आमचे सर मला म्हणाले आहेत, की ‘फील्डवर काम करण्यापेक्षा तू सचिवालयात काम करावंस’ ’’ तो म्हणाला.
‘‘मला हे पटत नाही. उलट, मी हे मान्यच करणार नाही. माझी रिझर्व्ह बॅंकेत निवड झाल्याबरोबर बॅंकेच्या एका प्रशिक्षणकेंद्रात इन्स्ट्रक्टर म्हणून माझी नेमणूक झाली होती. मी चांगलं बोलू शकत होतो; पण माझं त्या विषयाचं ज्ञान फारच तोकडं होतं. परिणाम काय झाला असावा याची तू कल्पना करू शकतोस. फील्डवरचा अनुभव न घेता सचिवालयात काम करणाऱ्यांचं जे होतं तेच माझं झालं. कोण काय सल्ला देतो त्यावरून काही निर्णय घेऊ नकोस. आपला स्वभावधर्म काय आहे, हे तू स्वतःलाच विचार. त्यातूनच तुला नेमकं उत्तर मिळेल. मात्र, मी तुझ्या जागी असतो तर जास्तीत जास्त काळ मी जिल्ह्यात काम केलं असतं. एखादा क्लार्क म्हणून काम करणं मला कधीच मानवलं नसतं.’’
अर्जुनाच्या भात्यातल्या न संपणाऱ्या बाणांसारखे त्याच्याकडे असंख्य प्रश्न होते. त्याचा पुढचा प्रश्न तयार होताच.
‘‘जर समजा व्यवस्थाच कोलमडलेली असेल तर एखादी व्यक्ती ती
सावरू शकेल का?’’ त्यानं विचारलं.
‘‘शक्य आहे,’’ मी म्हणालो : ‘‘अलीकडच्या काळातलं एक उदाहरण मी तुला देतो. कम्युनिस्ट नेते कॉम्रेड एन. डी. पाटील यांच्याविषयी मला खूप आदर आहे. काही दिवसांपूर्वी मी त्यांना सहज भेटण्यासाठी गेलो होतो. आम्ही बराच वेळ चर्चा केली. त्या वेळी मी त्यांना विचारलं ‘एखाद्या गोष्टीतून काहीच निष्पन्न होणार नाही हे दिसत असतानाही त्यासाठी लढत राहणं हे योग्य आहे का?’ ते म्हणाले, ‘अगदी शेवटपर्यंत त्यासाठी लढत राहा. आयुष्यातल्या सगळ्या लढाया फक्त जिंकण्यासाठी लढल्या जात नाहीत. पराजय होणार हे पक्कं माहीत असतानाही काही लढाया लढाव्या लागतात. जय किंवा पराजय महत्त्वाचा नसतो. तुम्ही कशासाठी लढता
आहात ते महत्त्वाचं असतं.’ शरणागती आणि झोपण्यासाठी गोळ्यांचा आधार यापेक्षा पराभव; पण शांत झोप हे केव्हाही चांगलं.’’
बराच उशीर झाला होता.
‘‘आता शेवटचा प्रश्न हां’’ मी म्हणालो.
त्यानं विचारलं :‘‘आयएएस हे स्वतःच्या प्रगतीसाठीचं की सामाजिक बदल घडवण्यासाठीचं साधन मानायचं?’’
‘‘हा काय प्रश्न झाला? आणि तू असं विचारतोसच का?’’ मी म्हणालो : ‘‘भारतात कोणत्या पद्धतीची राजवट असावी हा चर्चेचा जुना विषय आहे. इथल्या प्रशासकीय आराखड्याचा वेळोवेळी कस लागला आहे. त्यात सुधारणा करण्याचे, तो आधुनिक बनवण्याचे आणि तो संवेदनशील बनवण्याचे प्रयत्न वेळोवेळी केले गेले. यापैकी अनेक प्रयत्न म्हणजे निव्वळ चर्चेची गुऱ्हाळं होती. अशा चर्चांचे अहवाल इतिहासाच्या केराच्या टोपलीत फेकले गेले. असं म्हटलं जातं की व्यवस्था ही कधीही बदलाला अनुकूल असत नाही. आजही ती तशीच राहिली आहे. मी प्रशासकीय सेवेतला नाही. या सेवेवर मी अनेकदा चर्चा केली आहे. या सेवाप्रणालीत अनेक दोष व त्रुटी आहेत; पण या सेवेची व्याप्ती, त्यातली विविधता आणि गुंतागुंत यामुळे तिला लाभलेली अभूतपूर्वता कुणी नाकारू शकत नाही.
आपला देश हा केवळ चुका शोधणाऱ्या व्यावसायिक टीकाकारांचा देश आहे. नेमकं काय चुकलं एवढ्या एकाच गोष्टीवर ते अनंतकाळपर्यंत चर्चा करत असतात. आपण म्हणतो की आपण भ्रष्ट आहोत. हे खरं आहे; पण दीड अब्ज लोक भ्रष्ट आहेत का?
आपली लोकशाहीप्रक्रिया थोडीशी मंद आहे. आपल्या त्रुटी शोधताना आपण समतोल ढळू देता कामा नये. आपण चर्चा करतो, फेरविचार करतो, अनेक चौकश्या समित्या स्थापन करतो. त्यामुळे आपली गती मंदावते. लोकशाही कमकुवत होत असल्याबद्दल आपण चिंता व्यक्त करतो; पण आपण आपलं स्वातंत्र्य बळकट करण्यासाठी सध्याही संघर्ष करतो. सरकारची प्रत्येकच गोष्ट आपण ऐकतो असं नाही. त्याविरुद्ध आपण निषेध व्यक्त करतो आणि
पोलिसांशी संघर्षही करतो; पण केव्हातरी आपण प्रशासकीय सेवांना त्यांचं श्रेय दिलं पाहिजे. या सेवांनी बजावलेल्या भूमिकेचं आपण मोकळेपणानं कौतुक केलं पाहिजे. दर पाच वर्षांनी सुमारे दीड अब्ज लोक निवडणुकीत मतदान करतात. काही अपवाद वगळले तर देशातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सर्वसामान्य असते. काही वेळा अत्याचाराच्या घटना घडतात; पण आपली विचारी न्याययंत्रणा गुन्हेगारांना शिक्षा करते. शेती आणि उद्योगासाठी बॅंकेतून कर्ज मिळतं.
महसूल गोळा होतो. सरकारच्या खजिन्यात करांच्या माध्यमातून पैसा जमा होतो. जेव्हा सगळा देश झोपलेला असतो तेव्हा आपले जवान देशाच्या भूमी-नभ-जल या सीमांचं अहोरात्र रक्षण करत असतात.
तू यापैकी एका सेवेत रुजू होण्यासाठी तुझ्या भवितव्याच्या उंबरठ्यावर उभा आहेस.
सगळ्यांच्या शुभेच्छांसह शुभारंभ कर. हिंमतीनं पुढं जा. ‘सर्वच बाजूंनी बरोबर असतील असेच निर्णय मी घेतले पाहिजेत’ या चिंतेत तुझ्या करिअरची महत्त्वाची वर्षं खर्च करू नकोस. निर्णय घे आणि मग परिस्थितीप्रमाणे त्यात सुधारणा कर. हे करताना लोकांवर विश्र्वास ठेव. विश्र्वास न ठेवण्यापेक्षा विश्र्वासघात झाला तरी चालेल...आणि शेवटी जेव्हा एखादी गोष्ट करावी किंवा नाही याचा निर्णय घेता येत नसेल तेव्हा महात्मा गांधीजींचं हे वाक्य आठव : ‘अशा वेळी देशातल्या सर्वात गरीब आणि दुबळ्या माणसाचा चेहरा नजरेसमोर आण आणि तू घेणार असलेला निर्णय त्याच्या उपयोगाचा आहे का हे तुझ्या मनालाच
विचार’
हिमतीनं पुढं जा. भविष्य तुझी वाट बघतंय...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.