माझं भारतीयत्व (भाग १) (डॉ. यशवंत थोरात)

dr yashwant thorat
dr yashwant thorat

आपण एक देश बनलो ते आपली भिन्नता दडपून नव्हे, तर ती स्वीकारून. त्या विभिन्नतेतल्या एकतेतूनच भारत अशी आपली नवी ओळख निर्माण झाली. या विविधतेतल्या एकतेचा आपण गौरव करतो. आपण हिंदू , मुस्लिम, ज्यू किंवा ब्राह्मण, क्षत्रीय, महाराष्ट्रीय किंवा पंजाबी आहोत म्हणून भारतीय आहोत असं नाही. आपण या भूमीत जन्म घेतला म्हणून आपण भारतीय आहोत.

स्वतःच स्वतःवर लादून घेतलेल्या शिक्षांपैकी संपादकांना पाक्षिक सदरासाठी नियमितपणे लेख लिहून देणं यापेक्षा आणखी कठोर शिक्षा दुसरी कुठली नसेल! हे फेरविचार करण्याचा कुठलाही पर्याय नसताना लग्न करण्यासारखं आहे!! वाघाच्या पाठीवर बसण्याचा निर्णय तुमचा आणि तुम्हाला तिथून उतरवायचा अधिकार मात्र त्यांचा असतो.

नुकताच मी अशा विमनस्क अवस्थेत सापडलो होतो. मन  लॉकडाउन झालं होतं. लेखाची डेडलाईन अवघ्या चार दिवसांवर आली तेव्हा मी देवाला मनोमन प्रार्थना केली : काहीतरी सुचव बाबा...तीन दिवस उरले तेव्हा देवाला नवस म्हणून वाहायच्या नारळांची संख्या मी दुपटीनं वाढवली! दोन दिवस उरले तेव्हा मी माझ्या एका मित्राला फोन करून, ‘तू येत्या रविवारच्या लेखासाठी काही विषय सुचवू शकतोस का,’ असं विचारलं.
तिथं आशेचा धागा निर्माण झाला. त्याच्या आश्वासक आवाजात तो म्हणाला : ‘‘यशवंतराव, तुमचं जीवन अनुभवसंपन्न आहे. तुम्हाला एखादा विषय सहज सुचू शकेल.  तुम्हीच विचार करा, तुमचे वडील मराठा होते. आई पंजाबी. वडील लष्करात अधिकारी, तर आई डॉक्टर, जिनं दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. तुमच्या एका बहिणीचं सासर बंगालमधलं, तर दुसरीचं  उत्तर प्रदेशातलं. एक आकाशवाणीवरची प्रोग्रॅम आर्टिस्ट. दुसरी बुद्धिमान अर्थतज्ज्ञ. (तिचं वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झालं). तुमचा एक भाचा परदेशात यशस्वी डॉक्टर, तर दुसरा अभिनेता. तुम्ही कावेरी ओलांडून तामिळनाडूतल्या मुलीशी लग्न केलंत. तुमची पत्नी एक यशस्वी बँकर. तुमच्या दोन्ही मुली इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या. एक मानवी हक्कांसाठी काम करणारी, तर दुसरी ब्रिटिश राजघराण्याकडून विविध देशांना मानवतावादी भूमिकेतून दिल्या जाणाऱ्या देणग्यांची व्यवस्था पाहणारी. तुमच्या एका मुलीनं जैनधर्मीयाशी लग्न केलं, तर दुसरीनं ब्रिटिश व्यक्तीशी. केवढा हा व्यापक नातेसंबंध...शिवाय, तुमची कारकीर्दही अशीच विविध पैलू असलेली. रिझर्व्ह बँक, नाबार्ड, लिबरल आर्ट्स कॉलेजमध्ये अध्यापन, समाजसेवेच्या क्षेत्रात काम, कॉर्पोरेट जगात संचालक म्हणून लक्षणीय कामगिरी, लेखक आणि आता आवड म्हणून ‘प्रवरा’च्या शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन. किती विविधांगी अनुभव.’’

‘‘त्यात काय विशेष?’’ मी म्हणालो.
‘‘विशेष आहे की नाही, मला माहीत नाही; पण हे विविधरंगी आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही. आपल्यापैकी बहुतेकजण सरळमार्गी जीवन जगतात; पण तुम्ही चाकोरीबाहेर गेलात. अनेक गोष्टी केल्यात. आता या विविध प्रवाहांचा तुमच्यावर जो प्रभाव आहे आणि ज्या विविध अनुभवांना तुम्ही सामोरे गेलात, ते पाहता आपलं भारतीयत्व म्हणजे काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे?’’
त्याच्या या प्रश्नानं मी थोडा चमकलोच.
‘‘तू स्वतः तरी याचा कधी विचार केला आहेस का?’’ मी विचारलं.
‘‘नाही...पण मला त्याची गरजही कधी वाटली नाही,’’ तो शांतपणे म्हणाला : ‘‘कारण, भारतीय आणि मराठी म्हणून माझी ओळख सुस्पष्ट आहे. माझे आचारविचार आणि रीती-रिवाज परंपरेनं आलेले आहेत. मी त्यात कालानुरूप काही बदल केले असले तरी आपल्या कुटुंबाचे रीती-रिवाज म्हणून हा वारसा मी माझ्या मुलांकडे  सोपवणार  आहे. त्याबाबत माझ्या मनात कसलीही शंका नाही; पण तुम्ही तुमच्याबाबत असं म्हणू  शकता का? आपण एकाच वेळी वेगवेगळ्या प्रभावांमुळे वेगवेगळ्या दिशांना ओढले जात आहोत असं तुम्हाला वाटत नाही का?’’
त्याच्या फोननंतर मी किती तरी वेळ याच प्रश्नाचा विचार करत होतो...‘‘भारतीय असणं म्हणजे काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?’’
प्रश्नाचं उत्तर सोपं नाही.
मला काही गोष्टी जन्मजात मिळाल्या. आयुष्य पुढं सरकत गेलं तशा अन्य काही  गोष्टी जीवनात आल्या. काही गोष्टी नशिबानं मिळाल्या, तर काही मी माझ्या प्रयत्नांनी मिळवल्या. एक माणूस आणि एक भारतीय म्हणून मी जो काही आहे त्यात या सगळ्या गोष्टींचा वाटा आहे.
माझे वडील लष्करात असल्यानं बदल्या मॉन्सूनसारख्या ठरलेल्या होत्या. दर दोन-तीन वर्षांनी त्यांची बदली होत असे आणि बाड-बिस्तारा गुंडाळून आम्ही नव्या ठिकाणी जात असू. प्रत्येक पोस्टिंगची किंवा शहराची एक वेगळी भारतीय ओळख होती. प्रत्येक जागेनं मनावर भारताचा एक वेगळा ठसा उमटवला. झाशीला असताना माझे वडील मला झाशीच्या किल्ल्यात घेऊन जायचे आणि महाद्वाराकडे बोट दाखवत ते मला सांगायचे, ‘भय्या, ते बघ. त्या महाद्वारातून पाठीवर आपल्या मुलाला बांधून बाहेर येत लक्ष्मीबाई ब्रिटिशांवर तुटून पडली आणि इतिहासात अमर झाली. जीवन जगावं तर असं.’

मी त्यांना लक्ष्मीबाईंची गोष्ट पुनःपुन्हा सांगायला लावायचो आणि ते सांगायचेही. झाशीमध्ये ख्रिश्चन धर्माशी माझा संबंध आला. मला कॉन्व्हेंट शाळेत दाखल करण्यात आलं होतं. आपल्या धर्मासाठी का असेना; पण नि:स्वार्थ भावनेनं काम करण्याची त्यांची वृत्ती माझ्या मनावर ठसली आणि  ती आजतागायत कायम आहे.
जालंधर म्हणजे पंजाब...पंजाब म्हणजे मजा. बैसाखी, होळी, भांगडा आणि हास्यविनोद यांची मजा काही औरच होता. तिथल्या तरुण महिला पुढारलेल्या, धीट होत्या आणि मुलं माझ्या दुप्पट आकाराची. गव्हाची लांबच लांब शेतं...पाटाच्या बाजूला आमरस-पुरीचं जेवण आणि सहल...मामा चीफ इंजिनिअर असल्यामुळे भाकरा-नानगल धरणाखालच्या बोगद्यात चकरा मारायला मिळायच्या. जीवन आनंदानं आणि निर्भयपणे कसं जगायचं ते पंजाबनं मला शिकवलं.

त्यानंतर जवळपास ४० वर्षं मी उत्तरेत गेलो नाही. साधारणतः वयाच्या पन्नासाव्या वर्षी दिल्लीत पोस्टिंग झाल्यामुळे माझं लहानपण पुन्हा माझ्यापुढं  उभं राहिलं. आजोळची माणसं पुन्हा सहवासात आली. खूप वर्षांपूर्वी शिकलेली पंजाबी भाषा जणू विसरलीच नाही अशा थाटात पुन्हा आठवली! सरसो-दा-साग आणि  मक्के-दी-रोटी याविषयीचं माझं प्रेम पुन्हा उसळून आलं; पण या उत्साहानं उधाणलेल्या पंजाबी जीवनाला देशाच्या फाळणीच्या आठवणींची एक दुःखी किनार होती. या फाळणीचे दुर्दैवी दिवस ज्यांनी अनुभवले - ज्यात माझ्या आजोळच्या माणसांचाही समावेश होता - ते त्या काळातल्या करुण कथा मला सांगत असत.
मधल्या काळातल्या प्रदीर्घ वाचनानंतर आणि चिंतनानंतर मी शिकलो की गुन्हा माणसं करतात, माणसं दोषी असतात. संपूर्ण जातीला दोषी ठरवणं कितपत बरोबर आहे? फाळणीच्या वेळी पंजाब आणि बंगालमध्ये वेडेपणा, उन्माद पसरलेला होता. अतिरेक दोन्ही बाजूंनी झाला. इतिहासाचा निर्णय स्पष्ट आहे. पाकिस्तान दोषी आहे. भारत दोषी आहे. हिंदू दोषी आहेत, मुसलमानही दोषी आहेत.
पत्नी उषा रजा घेऊन आली तेव्हा आम्ही आमचं परंपरागत घर पाहण्यासाठी गेलो असताना अमृतसरला सुवर्णमंदिरात दर्शनाला गेलो. गुरू नानक यांचा प्रेमाचा संदेश देणारं ‘शबद कीर्तन’ ऐकलं. मनाला बरं वाटलं.
उषाला जालियनवाला बागेत घेऊन गेलो. मन दुःखानं भरून आलं. डोळे पाणावले. बागेतला नरसंहार ता. १३ एप्रिल १९१९ रोजी झाला होता. ता. १४ एप्रिल रोजी डायरनं एक विचित्र आदेश काढला, ‘बागेजवळ जे लोक राहतात त्यांना सरळ चालत घरी जाता येणार नाही. त्यांना सैनिकांसारखं पोटावर रांगत जावं लागेल.’ माझ्या आजोबांचं घर बागेच्या जवळच होतं. ते शहरातले ख्यातनाम वकील असतानाही त्यांना त्या रस्त्यावरून पोटावर रांगत जावं लागलं होतं. उषाला मी तो रस्ता दाखवला.  

लखनौचा अनुभव सर्वस्वी वेगळा होता. ते एक साचेबंद शहर नव्हतं. ते शहर नसून ‘लखनवी जीवना’कडे बघण्याचा तो एक दृष्टिकोन होता. तिथं उर्दू भाषेची नजाकत, खानदानीपणा, तेज आणि लावण्य सर्व काही होतं. ‘ईस्ट इंडिया कंपनी’नं तिथं एक बाग तयार केली होती. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना हुलकावणी देऊन त्याच बागेतून निसटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला तेव्हा ते गोळीबारात हुतात्मा झाले. तिथल्या लष्करी छावणीच्या परिसरातल्या बागांमध्ये मी माझ्या आई-वडिलांबरोबर जेव्हा फिरत असे तेव्हा माझी आई मला त्या ठिकाणी घेऊन जायची आणि नमस्कार करायला सांगायची. तिथं भरलेल्या डोळ्यांनी ती मला म्हणाली होती : ‘‘आझाद यांच्यानंतर भगतसिंग यांनी गदर पार्टीचं नेतृत्व हाती घेतलं आणि लढा सुरू ठेवला. तेनु पता है, भगत ने कि लिख्यासी?’, (भगतसिंगांनी काय लिहिलंय ते तुला माहीत आहे का?) ‘मै ‘इष्क’ भी लिखना चाहूँ तो ‘इन्कलाब’ लिखा जाता है’, ’’असं भगतसिंगांचं वाक्य ती मला सांगत असे. (मी ‘प्रेम’ असा शब्द लिहायला गेलो तरी कागदावर ‘क्रांती’ असा शब्द उमटतो!).

माझा आठव्या वाढदिवसानंतर मी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकू लागलो. वह्या-पुस्तकांची बॅग आणि एक पत्र्याची पेटी...जिच्यावर लिहिलं होतं, ‘यशवंत थोरात, रोल नंबर २३८, जोधपूर हाऊस, मेयो कॉलेज, अजमेर’.  ब्रिटिशांनी रजपूत संस्थानिकांच्या मुलांसाठी स्थापन केलेल्या अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये मला  दाखल करण्यात आलं. ‘मेयो’ला त्या काळी भारताचं Eton म्हणत असत. तिथल्या राजे-रजवाड्यांच्या मुलांमध्ये मी अगदी वेगळा होतो. शाळेतला ‘इंडिया’ आणि बाहेरचा ‘भारत’ यांत खूप तफावत होती. सुरुवातीला त्यांच्या झगमगाटापुढे मी थोडा बुजलो; पण लवकरच माझ्या लक्षात आलं की केवळ जन्मदाखल्यामुळे ते राजे आहेत, कर्तृत्वामुळे नाहीत. राजेशाहीचा भपका दाखवून ‘मेयो’नं मला  खऱ्या भारतीयत्वाच्या मार्गावर आणलं.

शालेय शिक्षण पूर्ण करून मी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत गेलो; पण विज्ञान आणि गणित यांत माझं ‘पानिपत’ झालं. पहिल्या वर्षी नापास झाल्यानंतर मला कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये कला शाखेत दाखल करण्यात आलं. अनपेक्षितपणे आलेला तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ होता. तिथं मी खऱ्या अर्थानं फुललो. माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. इतिहास, राज्यशास्त्र  आणि तत्त्वज्ञान या विषयांत मी चांगलंच प्रावीण्य मिळवलं. विद्यापीठात पहिला आलो.  
जमीन, संस्कृती आणि लोक यांच्याशी माझं खऱ्या अर्थानं नातं जुळलं. ही सामान्य माणसं असामान्य असल्याचं मला जाणवलं. त्यांनी मला खूप काही शिकवलं. त्यांच्याकडे भौतिक संपन्नता नव्हती; पण श्रद्धा आणि निष्ठेच्या बळावर समोर येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य होतं. मला त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटायला लागला आणि त्यांनी त्यांच्या घरात आणि हृदयात मला स्थान दिलं. अरुण आणि गाजापूर
यांची आठवण आजही माझ्या मनात कायम आहे. दीर्घ सुटीतली ती जंगलातली सहल, उडणाऱ्या तितराला गोळी मारून खाली पाडण्यातला थरार, दिवसभरच्या ट्रेकनंतर झोपडीच्या अंगणात  घेतलेला विसावा, रात्रीच्या जेवणापूर्वी जवळच्या नदीच्या थंड पाण्यात मारलेली डुबकी, उसाच्या शेतातून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज, रात्री पोटात कावळे ओरडत असताना आणि आम्ही गरमागरम झुणका-भाकरीची वाट पाहत असताना त्याच्या वडिलांनी केलेलं गीतेविषयीचं भाष्य…कितीतरी गोष्टी. गाजापूर आता पाण्याखाली आहे; पण त्याच्या आठवणी मनातून जात नाहीत...

कॉलेजच्या शिक्षणानंतर कायद्याची पदवी घेतल्यावर मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चेन्नईच्या रिझर्व्ह बँक स्टाफ कॉलेजमध्ये गेलो. सुमारे ५० वर्षांपूर्वीची ही घटना. तत्त्वज्ञानातून बँकिंगकडे जाणं हा बौद्धिक धक्का होता; पण माझी colleague आणि तमिळ अय्यर घराण्यातली उषा हिच्याबरोबरच्या मैत्रीनं सगळंच बदललं. मंतरलेले दिवस होते ते. आम्ही लग्न करणार असल्याचं सांगितलं तेव्हा दोन्ही घरांच्या भिंती हादरल्या! आंतरजातीय विवाहात अनेक अडचणी होत्या; पण आम्ही आई-वडिलांची मनं जिंकून विवाहबद्ध झालो. प्रेमाचा विजय झाला.
हा विवाह आनंददायी होताच; पण त्यातून दोन संस्कृतींच्या मीलनातून निर्माण होणारी अनेक सामाजिक व सांस्कृतिक आव्हानं समोर उभी राहिली. प्रेमाबाबत मी ठाम होतोच; पण रसम्-सांबारपेक्षा तांबडा-पांढरा रस्साच अधिक चवदार असतो यावरही मी ठाम होतो आणि आजही ठाम आहे!

याच वेळी मला जाणवायला लागलं की उषा आणि मी किती वेगळे आहोत; किंबहुना सगळेच भारतीय परस्परांहून किती वेगळे आहेत याचा मी विचार करायला लागलो. मला माझ्या ओळखीबाबतच प्रश्न निर्माण झाला. मी मराठा होतो की पंजाबी की भारतीय की तिन्ही मिळून बनलेला?
नोकरीमुळे मला सर्व देशांत फिरावं लागलं. त्या वेळी सर्वप्रथम माझ्या लक्षात आली ती एकता नव्हे, तर परस्परांना विभागणारी भिन्नता.  
आम्ही सगळे एक राष्ट्र कसे झालो? अगदी सुरुवातीला आम्ही म्हणजे ५०० पेक्षा जास्त संस्थानांचं एक कडबोळं होतं. स्वातंत्र्याच्या वेळी एक ब्रिटिशराज्य होतं आणि अन्य तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र-सार्वभौम राज्ये होती. राजकीयदृष्ट्या भारत एक होता की फक्त ब्रिटिशांना घालवून देण्याच्या भावनेतून सगळे एकत्र आले होते? आम्ही एक राष्ट्र होतो की अनेक राष्ट्रांचं बनलेलं एक राज्य होतो?
आजही काहीही म्हटलं तरी वंश, जात आणि धर्म यांविषयीची आपली भिन्नता जशी त्या वेळी होती तशीच आहे. सत्य हे आहे की आपण एक देश नव्हतो, तर एक देश बनवलो गेलो. आपण सुरुवातीला भारतीय नव्हतो, भारतीय बनवले गेलो हे समजायला मला सगळं आयुष्य घालवावं लागलं.

आपण एक देश बनलो ते आपली भिन्नता दडपून नव्हे, तर ती स्वीकारून. त्या विभिन्नतेतल्या एकतेतूनच भारत अशी आपली नवी ओळख निर्माण झाली. या विविधतेतल्या एकतेचा आपण गौरव करतो. आपण हिंदू , मुस्लिम, ज्यू किंवा ब्राह्मण, क्षत्रीय, महाराष्ट्रीय किंवा पंजाबी आहोत म्हणून भारतीय आहोत असं नाही. आपण या भूमीत जन्म घेतला म्हणून आपण भारतीय आहोत. देशाच्या रक्षणाची शपथ आपण at birth घेतो म्हणून आपण भारतीय आहोत. ही भावना, हाच माझ्या भारतीयत्वाचा वारसा आहे. भारतीय असणं म्हणजे या भूमीचा हिस्सा असणं आहे...
मै हिंदुस्थान हूँ
हिमालय मेरी सरहदों का निगेहबान है.
गंगा मेरी पवित्रता की सौगंध.  

(पूर्वार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com