esakal | शिक्षक, शिक्षण, शिकवण (डॉ. यशवंत थोरात)
sakal

बोलून बातमी शोधा

dr yashwant thorat

पुष्कळ विचार केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोचलो की कोणत्याही संस्थेत पगार कितीही असला तरी २० टक्के लोक मनापासून काम करतात आणि २० टक्के लोक मनापासून मौज-मजा करतात! उरलेले ६० टक्के कर्मचारी चांगले असतात; पण ते कुंपणावर बसून, वारा कुठल्या दिशेनं वाहत आहे, हे पाहत असतात.

शिक्षक, शिक्षण, शिकवण (डॉ. यशवंत थोरात)

sakal_logo
By
डॉ. यशवंत थोरात

पुष्कळ विचार केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोचलो की कोणत्याही संस्थेत पगार कितीही असला तरी २० टक्के लोक मनापासून काम करतात आणि २० टक्के लोक मनापासून मौज-मजा करतात! उरलेले ६० टक्के कर्मचारी चांगले असतात; पण ते कुंपणावर बसून, वारा कुठल्या दिशेनं वाहत आहे, हे पाहत असतात. ज्या शाळांचं नाव चांगलं असतं तिथलं नेतृत्व प्रभावी असतं आणि ते कुंपणावरच्या ६० टक्के कर्मचाऱ्यांना काम करण्यास प्रवृत्त करतं.

टोकाचा आग्रह आणि हट्ट यातून आलेला ठामपणा हे माझी पत्नी उषा हिच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. ‘एक बार उन्हो ने मन की ठान ली’ की मग विषय संपला. निर्णय ठरलेला असतो. युद्ध त्याच क्षणी संपलेलं असतं.
उषाच्या मित्र-मैत्रिणींचा एक गट आहे. सगळे नर्मदेच्या खालच्या भागातले. म्हणून शहाणे. शाळा आणि कॉलेजमध्ये एकत्र शिकलेले. उषा रिझर्व्ह बँकेत अधिकारी झाली आणि ते सगळे शिक्षक-प्राध्यापक बनले.

कोरोनाचं वादळ सुरू होण्यापूर्वी त्यांच्यापैकी काहीजण आमच्या घरी आले होते. आनंदी स्नेहमीलन होतं. काही वेळा ते सगळेजण नववी-दहावीतल्या मुलांसारखे वाटायचे, तर काही वेळा ते स्टाफरूममध्ये बसलेल्या प्राध्यापकांसारखी गंभीरपणे चर्चा करायचे. विविधरंगी स्वभावच्छटा असलेल्यांचा तो एक गट होता. सगळे ‘इम्प्रेशन मारण्याच्या’ वयाच्या पलीकडे गेलेले होते. थोडक्यात, साध्या-सरळ मित्रांचा तो एक ग्रुप होता. दिवसभर घरात त्यांचा चिवचिवाट असायचा. ते गेल्यानंतरच ‘घरात’ आणि ‘शहरात’
शांतता निर्माण होईल असा माझा समज होता; पण अंदाज चुकला.
सगळेजण गेले आणि थोड्याच दिवसात इंटरनेटवर या ट्रिपच्या अनुभवांविषयीच्या मजकुराची देवाण-घेवाण सुरू झाली. सोबत फोटोंचा भडिमार सुरू होताच. त्यानंतर फोटोंचा तपशील देणाऱ्या ई-मेल्सचा ओघ सुरू झाला. लॉकडाउनच्या काळात मोबाईलवरची चर्चा आणि व्हॉट्स ॲपवरचे संदेश यांनी आगीत तेल ओतलं; पण अमर्यादित बोलण्याची इच्छा आणि मर्यादित विषय असं असल्यामुळे हे कुठं तरी थांबणार असं मला वाटलं; पण पुन्हा एकदा उषाबद्दलचा माझा अंदाज चुकलाच.
एक दिवस अगदी सकाळीच ती माझ्या अभ्यासिकेत आली आणि
‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’ या पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखांच्या इंग्लिश प्रती तिनं मागितल्या.
‘‘कशासाठी हव्यात?’’ मी विचारलं.
‘‘चर्चा नको. लेखांच्या इंग्लिश प्रती तेवढ्या द्या.’’
‘‘पण तुला त्या कशासाठी हव्यात, एवढं तरी लेखकाला समजलं पाहिजे!’’
‘‘योग्य वेळी समजेल,’’ ती म्हणाली आणि लेखाच्या प्रती घेऊन गेली.
पुढच्या दोन दिवसांत थोडासा प्रकाश पडला. लेखांच्या प्रती तिच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना देण्याची तिची योजना होती. पाठोपाठ या मजकुराची ऑडिओ लिंकही पाठवण्यात येणार होती.
‘‘तू वेडी आहेस का?’’ मी विचारलं.
ती शांतपणे म्हणाली : ‘‘तुम्ही चांगलं लिहिता असं माझं मत आहे आणि मी स्वतःला तुमची प्रसिद्धि-अधिकारी म्हणून नेमलंय!’’
मी घाबरलो.
‘‘असं काही करू नकोस, बाई. ‘सकाळ’ त्याला आक्षेप घेईल!’’
‘‘काहीही बोलू नका...हे लेख इंग्लिशमध्ये आहेत आणि ते माझ्या मित्र-मैत्रिणींत आणि त्यांच्या कुटुंबीयांतच वाटले जाणार आहेत.’’
पहिला लेख तर रवाना झालासुद्धा.
‘तर आता शहाण्यासारखं वागा आणि या लेखांचं रेकॉर्डिंग करा,’ असा आदेशच तिनं नंतर सोडला.
‘‘मुळीच नाही,’’ सारं बळ एकवटून मी म्हणालो.
‘‘रात्री जेवायला मी चिकन-पुलाव करणार होते. तुम्हाला दही-भात हवा असेल तर...’’
मी बिनबोभाट होकार दिला.
***

साधारणतः २४ तासांनंतर ‘प्रसिद्धी-अधिकारी’ माझ्या अभ्यासिकेत पुन्हा आल्या.
‘‘पाहा, मी म्हणत होते तेच बरोबर होतं. शांती, शशी, ॲनी, हीरा, सुषमा आणि गायत्री या सगळ्यांनी तुमच्या ऑडिओचं खूप कौतुक केलंय. अर्थात्, त्यात थोडी सुधारणा करण्याची गरज आहे; पण त्याबाबत नंतर सांगण्यात येईल. आपलं पुढचं रेकॉर्डिंग संध्याकाळी चार वाजता करू.’’
‘हो’ म्हणण्याशिवाय मला गत्यंतरच नव्हतं.
दुपारच्या जेवणाच्या वेळी उषानं आणखी एक बॉम्बच टाकला.
‘‘हे पाहा, लेखकमहाशय...’’ ती म्हणाली : ‘‘गुरुपौर्णिमेविषयी तुम्ही ऐकलंय का?’’
‘‘नक्कीच. हा काय प्रश्न झाला?’’
‘‘माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना मी त्यांच्या शैक्षणिक जीवनातला एकेक प्रसंग लिहायला सांगणार आहे. त्या सगळ्याचं संकलन आणि संपादन तुम्ही करायचं आणि तुमच्या स्पेशल कॉमेंट्सह ते ‘सप्तरंग’मधल्या तुमच्या सदरात प्रसिद्ध करायचं!’’
‘‘त्याबाबत फारशी खात्री बाळगू नकोस!’’
‘‘उगीच काहीतरी बोलू नका. हे तुम्ही करणार आहात की नाही एवढंच सांगा...’’
मी पुन्हा मान तुकवली!
नंतर विचार केल्यावर वाटलं की तिची कल्पना वाईट नाही. तिच्या मित्र-मैत्रिणींनी आयुष्यभर शिक्षक म्हणून काम केलं. शेकडो विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले असतील. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या मनावर सखोल ठसा उमटवला असणार. त्यांच्या अनुभवांचं मूल्य केवढं तरी मोठं होतं. काही बऱ्या-वाईट गोष्टी सोडल्या तर शेवटी त्यांच्या मनात काय भावना राहिल्या होत्या?
जे मागं उरलं त्याविषयी त्यांना काय वाटतं? शिक्षक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा काही उपयोग झाला की सगळं वाया गेलं? विद्यार्थ्यांमधलं सर्वोत्तम शोधण्यात ते यशस्वी झाले की त्यांनी केवळ आपलं कर्तव्य केलं आणि थांबले? विद्यार्थ्यांमुळे त्यांच्यात काही महत्त्वाचा बदल झाला का? संधी मिळाली तर पुन्हा शिक्षक व्हायची त्यांची तयारी आहे का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उभे राहिले.
व्यक्तिशः मी शिक्षणाबाबत अतिशय हळवा आहे. खरं तर मलाही शिक्षकच व्हायचं होतं; पण प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचं धाडस नसल्यामुळे ते राहून गेलं. ती चूक भरून काढण्यासाठीच निवृत्तीनंतरच्या जीवनात मी शिक्षणक्षेत्रासाठी जास्तीत जास्त वेळ द्यायचं ठरवलं आणि दिलाही.

एका अर्थानं उषाचे मित्र ज्या वेळी हे क्षेत्र सोडत होते त्या वेळी मी या क्षेत्रात प्रवेश करत होतो. वयाच्या साठाव्या वर्षी मी ‘फ्लेम युनिव्हर्सिटी’त तत्त्वज्ञानावर पहिलं व्याख्यान दिलं. पहिल्या पाच मिनिटांतच जाणवलं की समोर बसलेले विद्यार्थी माझ्या हातात आहेत, शब्दांवर झुलत आहेत. मला असा अनुभव पूर्वी आला नव्हता.
उषाच्या ग्रुपमधल्या शिक्षकांनाही त्यांच्या कारकीर्दीत असा अनुभव कधी आला होता का? शिक्षक असण्याचं खरं समाधान पगारात नसून विद्यार्थ्यांना असं मंत्रमुग्ध करण्यात आहे हे त्यांना कधी जाणवलं का? आज मी प्रवरा शिक्षण संस्थेची जबाबदारी सांभाळत आहे. या सगळ्या ग्रुपला एक-दोन दिवसांसाठी शैक्षणिक वातावरणाशी आपल्या संस्थेत पुन्हा जोडलं तर काय होईल? ‘प्रवरा’तल्या काही लोकांशी मी या विषयावर बोललो.
सर्वसाधारण मत असं होतं : ‘शिक्षकांची सध्याची पिढी ही मागच्या पिढीइतकी निष्ठावान नाही आणि या पिढीला विद्यार्थ्यांच्या एकूण गुणवत्तेपेक्षा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अधिक रस आहे. सध्याचे शिक्षक पैशाच्या मागं लागले आहेत आणि खासगी शिकवण्यांमध्येच त्यांना रस असतो.’
पुष्कळ विचार केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोचलो की कोणत्याही संस्थेत पगार कितीही असला तरी २० टक्के लोक मनापासून काम करतात आणि २० टक्के लोक मनापासून मौज-मजा करतात! उरलेले ६० टक्के कर्मचारी चांगले असतात; पण ते कुंपणावर बसून वारा कुठल्या दिशेनं वाहत आहे, हे पाहत असतात. ज्या शाळांचं नाव चांगलं असतं तिथलं नेतृत्व प्रभावी असतं आणि ते कुंपणावरच्या ६० टक्के कर्मचाऱ्यांना काम करण्यास प्रवृत्त करतं.
अपयश हे शिक्षकांचं की नेतृत्वाचं? शिक्षक चांगले किंवा वाईट नसतात. नेतृत्व, व्यवस्थापन, प्राचार्य चांगले किंवा वाईट असतात. याच तर्कानुसार, कोणत्याही संस्थेत विद्यार्थी चांगले किंवा वाईट नसतात, शिक्षक चांगले किंवा वाईट असतात.
* * *

उषाच्या ग्रुपमधल्या सगळ्यांनी पाठवलेले त्यांचे अनुभव दुसऱ्याच दिवशी माझ्या टेबलावर होते. त्यातला काही संपादित भाग मी वाचकांसाठी देत आहे...
शिक्षणाच्या संदर्भात या मुद्द्यांना कालातीत महत्त्व आहे असं माझं मत आहे.

प्रिय उषा,

मी प्राथमिक शाळेत शिक्षिका असतानाचा हा अनुभव आहे. त्या शाळेत चौथीच्या वर्गात अनुजा नावाची एक कर्णबधीर विद्यार्थिनी होती. चेन्नईमधल्या कर्णबधीरांच्या एका विशेष शाळेतून ती आली होती. त्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी ‘दाखवा आणि वर्णन करा’ असं एक विशेष सत्र असतं. प्रत्येक विद्यार्थी त्याच्या आवडीची एखादी वस्तू घेऊन येतो आणि तीन ते पाच मिनिटांत तिची माहिती विद्यार्थ्यांना सांगतो.
अनुजा बोलायला उभी राहिली ती तिच्या हिअरिंग एड्स ( ऐकण्याचं उपकरण ) आणि त्यांची बॅटरी हातात घेऊन. ‘मला याविषयी बोलायचंय,’असं ती आत्मविश्वासानं म्हणाली. ती हे उपकरण का वापरते आणि तिला त्याची कशी मदत होते हे तिनं सांगितलं. तिचं बोलणं सगळ्यांना भावलं; पण तिच्या शेवटच्या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि माझ्या डोळ्यांत पाणी तरारलं. अनुजा म्हणाली : ‘संपूर्ण शाळेत असं उपकरण फक्त माझ्याजवळ आहे आणि त्याचा मला अतिशय अभिमान आहे. हा प्रसंग मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.’

किती खरं होतं हे. मलाही माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली. लहान असताना माझ्या आजोळच्या भावंडांपेक्षा मी सावळा होतो. ते सगळे गोरेपान आणि देखणे होते. एकदा मी माझ्या मामीला याचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली : ‘तू अमुक साबण वापरतोस, तर ते तमुक साबण वापरतात!’
‘हात्तीच्या! असं आहे काय,’ मी मनात म्हणालो. मात्र, साबणाच्या अनेक वड्या वापरल्यानंतरही काही फरक पडला नाही आणि नकळत मनात एक अढी निर्माण झाली. मुद्दा हा की शैक्षणिक वातावरण असं असायला हवं की जिथं एखाद्या विद्यार्थ्याच्या वेगळेपणावर टीका-टिप्पणी होण्याऐवजी त्याच्या वेगळेपणाचा गौरव व्हायला पाहिजे. अनुजा खरोखरच भाग्यवान मुलगी होती, तिच्यासाठी तिचे शिक्षक असं वातावरण निर्माण करू शकले.

आता आणखी एक अनुभव पाहा.

नमस्कार,

तुझ्या कारकीर्दीतला एखादा संस्मरणीय प्रसंग तुला आठवतो का, असं माझ्या बालपणीच्या एका मित्रानं मला विचारलं. वीस वर्षांपूर्वी मी वर्गात प्रार्थना घेत होतो. प्रार्थना झाल्यानंतर मी प्रत्येक विद्यार्थ्याला ‘तू कुणाची प्रार्थना करतोस?’ असं विचारलं. एकजण म्हणाला : ‘मी कृष्णाची प्रार्थना करतो.’ दुसरा म्हणाला : ‘मी अल्लाची प्रार्थना करतो.’ तिसरा म्हणाला : ‘मी येशू ख्रिस्ताची प्रार्थना करतो.’ लीना अल्दादाहची वेळ आली तेव्हा तिनं डोळे मिटले आणि दोन्ही हात छातीजवळ जोडले. तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं. तिनं डोळे उघडले तेव्हा, ‘तुला काय वाटलं?’ असं मी तिला विचारलं. त्या तीन वर्षांच्या मुलीचं उत्तर ऐकून मी थक्क झालो. ‘देव मला माझ्या हृदयात जाणवला’ असं ती खांदे उडवत म्हणाली. तिच्या त्या वाक्यातला अर्थ मी कायमस्वरूपी लक्षात ठेवला आहे आणि प्रत्येक कसोटीच्या वेळी मला तो आठवतो.
मला वाटतं की ‘देव मला माझ्या हृदयात जाणवला’ हे वाक्य एखादी तीन वर्षांची मुलगीच म्हणू शकते किंवा रामकृष्ण परमहंसांसारखे संत म्हणू शकतात. ते संत होते म्हणूनच लहान मुलासारखे निरागस होते की लहान मुलासारखे निरागस होते म्हणूनच ते संत होते, देव जाणे.
कुणीतरी म्हटलं आहे : ‘लहान मुलांकडे पाहून असं वाटतं की परमेश्वर अद्याप या जगाबद्दल निराश झालेला नाही.’
हे किती खरं आहे ते या प्रसंगातून जाणवतं. मात्र, मुलांचं अंतरंग समजण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहता हे महत्त्वाचं आहे. मुलं जगाकडे त्यांच्या हृदयापासून पाहतात, तर मोठी माणसं जगाकडे त्यांच्या मनातून पाहतात! तिथंच घोटाळा होतो. शालेय शिक्षणातली शोकान्तिका आणि आव्हानं इथूनच सुरू होतात. प्रसिद्ध फ्रेंच लेखक अँटनी द सेंट एक्झुपेरी यांनी त्यांच्या ‘लिटल प्रिन्स’ या पुस्तकात म्हटलं आहे, ‘जर तुम्ही एखाद्या माणसाला सांगितलंत की मी लाल विटांचं एक सुंदर घर पाहिलं...त्याच्या खिडकीबाहेर फुलांनी बहरलेली झाडं होती आणि त्याच्या छपरावर सुंदर पक्षी होते.’ तरी त्याला त्या घराची कल्पना येणारच नाही. कारण, तसं घर तो डोळ्यासमोर आणू शकत नाही; तुम्ही त्याला समजा असं सांगितलंत की ‘मी एक घर पाहिलंय ज्याची किंमत एक लाख फ्रँक आहे.’ त्यावर तो म्हणेल : ‘वा, काय सुंदर घर असेल ते’!

शिक्षणातलं अंतिम उद्दिष्ट म्हणजे मुलांपर्यंत पोचणं, त्यांच्या हृदयाला
हात घालणं, स्पर्श करणं आणि त्यांच्यात दडललेल्या सौंदर्याला बहार आणणं. कठोपनिषदात सांगितल्यानुसार, खरा शिक्षक बनणं हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं आहे. जिथं शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात अंतर असतं, तिथं लीनाचे शब्द म्हणजे कल्पनेचा उथळ आविष्कार वाटतील; पण जिथं हे अंतर संपलेलं असेल तिथं तिचं बोलणं हे केवळ शब्द न राहता तिच्या निरागसतेचा जिवंत आविष्कार ठरेल.

उषा,

ही अजयची गोष्ट आहे.

अजय हा हॉलिवूडमधला चाळिशीतला एक नामांकित चित्रकार आहे; पण शाळेत असताना तो एक अतिशय कल्पक आणि खोडकर मुलगा होता. प्राथमिक शाळेत असताना एकदा त्यानं खडूच्या पेटीत एक रबरी पाल ठेवली होती. खडू काढताना माझ्या बोटांचा तिला स्पर्श झाला आणि मी भीतीनं ओरडलोच. नंतर आम्ही सगळे हसायला लागलो. ‘मी आज जिथं पोचलो आहे त्याचं सगळं श्रेय माझ्या शाळेलाच आहे,’ असं त्यानं एकदा मला कळवलं होतं. त्यानं त्या मेलमध्ये पुढं म्हटलं होतं : ‘ती शाळा जरी जुनी आणि परंपरावादी असली तरी तिथल्या शिक्षकांनी मला हवं तसं वागू दिलं. त्यामुळे माणूस म्हणून माझा विकास झाला.’

याबाबत कुणाचं दुमत असू शकेल का? आपलं दुर्दैव हे की शाळेतल्या मुलांची क्षमता इंद्रधनुष्यासारखी विविधरंगी असताना आपण फक्त त्यांच्या स्मरणशक्तीचीच परीक्षा घेतो. काही नामवंत शाळांमध्ये मुलांच्या अंगभूत गुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातो; पण अशा शाळा या केवळ अपवाद आहेत. सर्वसाधारण पद्धत हीच असते की, ‘हे प्रश्न आहेत आणि ही त्यांची उत्तरं आहेत. बसा आणि ती चुुपचाप पाठ करा. ती तुम्हाला समजलीत की नाही हा प्रश्नच नाही. तुम्हाला ती उत्तरं जशीच्या तशी कागदावर उतरवता आली पाहिजेत.’

उषा ,

ही उच्च माध्यमिक शाळेतली एक गोष्ट आहे. ती अजूनही माझ्या मनात कोरली गेली आहे. एका मुलीनं त्या शाळेत सातव्या वर्गात प्रवेश घेतला. ती अतिशय हुशार, गुणवान आणि विविध कलांमध्ये प्रवीण असलेली मुलगी होती. तिच्याकडे सभाधीटपणा होता, अभिनयात ती निपुण होती. ती व्हॉलीबॉल चांगला खेळायची. चांगलं गायची आणि नृत्यही करायची. ती मॉनिटर झाली आणि ती जबाबदारी सांभाळताना तिनं आपल्या नेतृत्वाची चमकही दाखवली. अकरावीत असताना तिचं तिच्या आईशी भांडण झालं. ती माझ्याकडे नेहमी येत असे आणि रडत असे. मी नेहमी तिला समजावून शांत करत असे. तिची आईसुद्धा मला रोज फोन करून तिच्याविषयी नाही नाही त्या तक्रारी माझ्याकडे करत असे. तिची आईही मला विश्वासात घेऊन माझ्याशी बोलत होती हे त्या मुलीला माहीत नव्हतं. एके दिवशी ती मुलगी माझ्याकडे आली. चुकीची कबुली देत ती एकदम रडायला लागली. म्हणाली : ‘‘मला आईबरोबर जुळवून घ्यायचं आहे; पण कसं ते समजत नाही.’’ मी तिला पिवळ्या गुलाबाच्या फुलांचा गुच्छ दिला व तो आईला द्यायला सांगितलं. ‘आईला पुष्पगुच्छ देऊन फक्त ‘आय लव्ह यू’ असं म्हण,’ असंही मी तिला सुचवलं. त्या दिवशी रात्री साडेदहा वाजता तिच्या आईचा फोन आला. ‘माझ्या मुलीनं आज एक अतिशय अनोखी आणि मनाला आनंद देणारी गोष्ट केली,’ असं ती म्हणाली. मात्र, ती फुलं मीच आणली होती आणि मीच ती तिला देण्याविषयी मुलीला सांगितलं होतं हे मी तिला कळू दिलं नाही. ती मुलगी आज प्राध्यापिका आहे. प्रत्येक वेळी ती मला भेटते तेव्हा तिच्या मनातली कृतज्ञता मला जाणवते. त्या पिवळ्या गुलाबांची कहाणी आम्ही अजून कुणालाही समजू दिलेली नाही!

या अशा काही गोष्टी आहेत की ज्या नव्या पिढीतल्या शिक्षकांनी आत्मसात केल्या पाहिजेत. त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांविषयी केवळ प्रेम वाटलं पाहिजे. ‘चांगल्या आणि महान शिक्षकात काय फरक आहे,’ असं मला नेहमी विचारलं जातं. चांगल्या शिक्षकामध्ये अनेक गुण असतात; पण महान शिक्षक विद्यार्थ्याचं मन प्रज्वलित करतो. हे शिक्षक ज्यांचं हृदय स्पर्शून जातात त्यांच्यात ते चैतन्य निर्माण करतात, विद्यार्थ्याला त्याच्यातल्या उणिवांवर मात करण्यासाठी प्रेरित करतात.

मलाही असेच एक महान शिक्षक लाभले होते. तसं पाहिलं तर त्यांच्यात वेगळं असं काही नव्हतं; पण ते जेव्हा शिकवायचे तेव्हा बाकी सगळं विसरायला लावायचे. त्यांच्या वाणीचा अखंड प्रवाह विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करत असे. ते जे शिकवत ते विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजत असे. शिक्षक या नात्यानं ते सगळं सांगत असत; पण मुलांना त्यांनी कधी बोळ्यानं दूध पाजलं नाही. वाचनावर भर देण्याचं त्यांनीच मुलांना शिकवलं. तर्क, विचार, धर्मनिरपेक्षता, वस्तुनिष्ठता आणि कुठलीही गोष्ट गृहीत न धरण्याची वृत्ती त्यांनी मुलांच्या अंगात बाणवली. त्यातून मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जीवनात शोधण्याची सवय लागली.
त्या शिक्षकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती; पण त्यांना त्याची फिकीर नव्हती. सध्याच्या काही शिक्षकांसारखे ते प्रसिद्धीच्या मागं लागलेले नव्हते. पुरस्कार आणि लोकप्रियता त्यांच्या मागं चालत आली; पण या बाबींचं आकर्षण त्यांना नव्हतं. कधी कधी मला वाटतं की सभोवतीच्या लोकांपेक्षा त्यांना वेगळेच सूर ऐकू येत होते! त्यांचं व्यक्तिमत्त्व एवढं प्रभावी होतं, की माझ्या कुटुंबीयांनी मला रोखलं नसतं तर मी नक्कीच शिक्षक झालो असतो. त्यांचं जीवन हे, बुद्धिमत्ता आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तिमत्त्वात एकत्र नांदू शकतात, याचं जिवंत उदाहरण होतं.

संध्याकाळ होत आली होती. फिरण्याची वेळ झाली असल्याची आठवण उषानं मला करून दिली. समोरची कागदपत्रं आवरून मी उठलो.
‘‘तुमचं काम संपलंय?’’ तिनं विचारलं.
मी मानेनंच ‘हो’ म्हटलं.
‘‘छान; पण माझ्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या कारकीर्दीतले जे अनुभव पाठवले आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते थोडक्यात मला सांगा,’’ ती म्हणाली.
‘‘त्यात छोटा मुद्दा असा काहीच नाही,’’ मी म्हणालो : ‘‘असूच शकत नाही. जे आहे ते पुनःपुन्हा शोधण्यासारखं, काहीतरी शाश्वत असं आहे.’’

जाहिद, तुझे आदाबे मुहब्बत नही मालूम|
सर आप ही झुकता है, झुकाया नही जाता |

हे पंडिता, एवढं ज्ञान मिळवूनही तुला हे कळलं नाही की जेव्हा आदर मनापासूनचा असतो तेव्हा मस्तक आपोआप नत होतं, झुकतं, ते झुकवावं लागत नाही.

हेच माझं सगळ्या शिक्षकांना अभिवादन आहे.

loading image