‘किक स्टार्ट’साठीची तयारी (नरेश शेळके)

naresh shelke
naresh shelke

तीन वर्षांनी होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मान कतारला मिळाला आहे. या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या सर्वांत छोट्या देशांपैकी एक असं कतारचं वर्णन केलं जातं. या स्पर्धेची तयारी कतारमध्ये कशा प्रकारे सुरू आहे, या स्पर्धेची कोणती वैशिष्ट्यं असतील, पायाभूत सुविधा कशा प्रकारे उभारल्या जात आहेत आदी गोष्टींचा प्रत्यक्ष भेटीवर आधारित वृत्तांत.

जगातल्या अनेक देशांप्रमाणंच कतार हाही फुटबॉलप्रेमी देश. स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये आशियात त्यांचा दबदबा आहे. जागतिक मैदानी स्पर्धेच्या आयोजनानंतर हा छोटासा देश तीन वर्षांनंतर फुटबॉलचं महाकुंभ समजल्या जाणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेचं आयोजन करण्यास सज्ज झाला आहे. पाश्चिमात्य माध्यमांनी कितीही टीका केली किंवा भौगोलिक मर्यादा असल्या, तरी विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासातली सर्वोत्तम स्पर्धा आयोजित करण्याचं शिवधनुष्य स्थानिक आयोजन समिती, कतार फुटबॉल संघटना आणि कतार सरकारनं स्थापन केलेल्या सर्वोच्च समितीनं उचललं आहे. शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू असलेली तयारी पाहून कतार हे आव्हान सहज पार करेल, यात शंका नाही. आठही स्टेडियम्स, मेट्रो, बसेसचं जाळं, निवासव्यवस्था, सुरक्षा, विमानतळावरची व्यवस्था या सगळ्या गोष्टी पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्‍वास आयोजन समितीला आहे. जागतिक मैदानी स्पर्धेच्या निमित्तानं कतारमध्ये असताना विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीचीही पाहणी करता आली, ती तयारी मांडण्याचा हा प्रयत्न.

कतारच्या इतिहासात २ डिसेंबर २०१० हा दिवस सुवर्णक्षरांनी लिहिला जाईल. कारण याच दिवशी झुरीच इथं फिफा कौन्सिलच्या बैठकीत दोहाला (कतार) सन २०२२ च्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद देण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी कतारमध्ये जल्लोषाचं वातावरण असल्यानं पुढचे पंधरा दिवस वाहतुकीमध्ये सवलत देण्यात आली होती. यजमानपद मिळविणाऱ्या देशाला दावा करताना सादरणीकरण करावं लागतं. कतारनं सातशे पानांचं सादरीकरण त्यावेळी केलं होतं. अंतिम टप्यात अमेरिकेवर मात करून कतारनं हे यजमानपद प्रथमच मध्य आशियात खेचून आणलं होतं.

सहसा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा एप्रिल ते जुलै या काळात होत असते. जगातल्या प्रमुख फुटबॉल लीगचं वेळापत्रक विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर सुरू होतं. मात्र, यावेळी प्रथमच असं घडलं, की ही स्पर्धा २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्याचं निश्‍चित करण्यात आलं. त्यामुळे बरीच ओरड झाली. सप्टेंबर अखेरपर्यंत असललं कतारचं तापमान आणि दमटपणा यामुळं या तारखा बदलणं भाग पडलं, असा युक्तिवाद करण्यात आला आणि तो खराही आहे. कारण नोव्हेंबर व डिसेंबर हे दोन महिने दोहा किंवा कतारमध्ये तुलनेनं थंड असतात. त्यामुळे खेळाडूंसह जगभरातून येणारे प्रेक्षक यांना त्रास होणार नाही, असा विचार करूनच या तारखा निश्‍चित करण्यात आल्या.

ज्या दिवशी कतारनं यजमानपदाचा दावा जिंकला, त्याच दिवशी कतारचा फुटबॉल संघ यजमान म्हणून विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरला. यावेळी प्रथमच ३२ संघ सहभागी होणार आहेत. या ३२ संघांची आठ गटांत विभागणी करण्यात येणार आहे. ‘विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत छोटा देश’ (क्षेत्रफळाच्या दृष्टीनं) असा मान कतारला मिळाला आहे. पहिला मान अजूनही स्वित्झर्लंडकडेच आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी उभारण्यात आलेली आठही स्टेडियम्स ही दोहा शहरातच आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ही आठ स्टेडियम आठ महानगरपालिका क्षेत्रांत उभारण्यात आली आहे. या स्टेडियमची उभारणी करताना किंवा नूतनीकरण करताना कतार किंवा अरब देश, तिथला समाज यांच्या परंपरा, संस्कृती आदी गोष्टींवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं. त्यानुसार या स्टेडियमचं डिझाईन तयार करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, अल् थुमामा या स्टेडियमचा आकार मुस्लिम व्यक्ती नमाजाला जाताना जी टोपी घालतात (तकियाह) त्यानुसार करण्यात आला आहे. इतर स्टेडियम्सचं डिझाईनसुद्धा अशाच प्रकारे करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही सर्व स्टेडियम्स वातानुकूलीत आहेत. त्यामुळे तपामान किंवा दमटपणाचा कुठलाही परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होणार नाही आणि प्रेक्षकांनाही त्रास होणार नाही.

आठपैकी खलिफा आणि अल जौनब (अल वकराह) ही स्टेडियम्स खुली करण्यात आली असून, एज्युकेशन सिटी स्टेडियमचं उद्‌घाटन कतारचा राष्ट्रीय दिवस असलेल्या १८ डिसेंबरला होणार आहे. तीन वर्षांनंतर १८ डिसेंबरलाच ऐंशी हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या आणि दोहाच्या उत्तेरला असलेल्या लुसेल स्टेडियममध्ये अंतिम सामना होणार आहे. सर्व आठही स्टेडियम्सची प्रेक्षकक्षमता सध्या चाळीस ते ऐंशी हजार करण्यात आली असली, तरी विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर स्टेडियमची प्रेक्षक क्षमता वीस ते चाळीस हजार करण्यात येणार आहे. त्यातल्या खुर्च्या काढून त्या दक्षिण आशिया किंवा आशियातल्या काही देशांना देण्यात येणार आहेत. हा आकडा एक लाख ऐंशी हजार असा आहे. तसंच ही स्टेडियम्स कतारमधल्या क्‍लबना देण्यात येणार आहे. लुसेल स्टेडियम कतार फुटबॉल संघटनेकडे राहणार असून, एज्युकेशन सिटी स्टेडियम हे कतार विद्यापीठ संघाला देण्यात येणार आहे. खलिफाचा ताबा अस्पायर अकादमीकडे राहणार आहे. ही अकादमी कतारमधल्या खेळाडूंची गुणवत्ता हेरून त्यांना घडवण्याचं कार्य करत आहे.

आत्तापर्यंत ज्या देशात विश्‍वकरंडक स्पर्धा झाली, त्यातले सामने विविध शहरांत झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना साखळी सामन्यानंतर बाद फेरीचे सामने पाहण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. प्रेक्षकांचा हा त्रास कतारमध्ये वाचणार आहे. कारण सर्व स्टेडियम्स पन्नास किलोमीटरच्या परिसरात आहेत आणि आठपैकी पाच स्टेडियम्स मेट्रो रेल्वेनं जोडलेली आहेत. या मेट्रोचं काम जोरात सुरू आहे. लुसेल ते अल वकराह या चाळीस किलोमीटरच्या रेड लाईनला सुरवात झाली आहे. त्यानंतर २२ किलोमीटरची ग्रीन आणि १४ किलोमीटरची गोल्ड लाईन पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत सुरू होईल. त्यामुळे प्रेक्षकांना एक साखळी सामना पाहिल्यानंतर त्याच दिवशी दुसऱ्या सामन्याचा आनंदसुद्धा घेता येऊ शकेल. मेट्रोचं तिकीटही अतिशय स्वस्त आहे. रेड आणि ग्रीनचं तिकीट किमान दोन रियाल (म्हणजे सरासरी चाळीस रुपये) आणि गोल्डचं तिकीट दहा रियाल आहे. स्टेशन मुख्य स्टेडियमपासून दीडशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर असल्यानं प्रेक्षकांना फार धावफळ करावी लागणार नाही. याशिवाय उर्वरीत तीन स्टेडियम्स आणि स्थानिक प्रवासासाठी सरकार नियंत्रीत कारवा कंपनीच्या वातानुकूलीत बसेसची सोय आहे. सध्या असलेल्या बसेस काढून विश्‍वकरंडकासाठी तीनशे नवीन बसेस आणण्यात येणार आहे.

भारतीयांचं योगदान
कतारची लोकसंख्या ही जवळजवळ दोन कोटी सत्तर लाख आहे. मूळ नागरिकांशिवाय राहणारे उर्वरीत नागरीक ऐंशी देशातून आले असून, त्यात सर्वाधिक आकडा भारतीयांचा आहे. त्यामुळे आयोजन समिती भारतीय फुटबॉलप्रेमींवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. त्या दृष्टीनं आत्तापासूनच कतार एअरवेजच्या भारतातल्या विविध शहरांतून फेऱ्या वाढवण्यात येत आहेत किंवा नव्यानं सुरू करण्यात येत आहेत. रशियात झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत पात्र न ठरलेल्या संघांपैकी सर्वाधिक प्रेक्षक असलेल्या देशांत भारताचा अमेरिका आणि चीनपाठोपाठ तिसरा क्रमांक होता. सर्वत्र हिंदीचा वापर, भारतीयांची दुकानं, हॉटेल्स, शुद्ध देशी जेवण यांमुळे कतार तर भारतीयांसाठी दुसरं घरच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तसंच हा देश खर्चाच्या दृष्टीनं परवडण्यासारखा आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त भारतीयांनी कतारमध्ये विश्‍वकरंडक फुटबॉलचा आस्वाद घेण्यासाठी यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अल् रेयानमध्येही भारतीय
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात स्टेडियमच्या बांधकामात प्रथमच भारतीय कंपनीला मान मिळाला आहे. अल् रेयान जिल्ह्यात असलेल्या पूर्वीच्या अहमद बिन अली स्टेडियमवरच नवीन स्टेडियम उभारण्यात आलं आहे. पूर्वी २१ हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या या स्टेडियमची क्षमता आता ४४ हजार करण्यात आली आहे. अल् रेयान जिल्ह्यातच खलिफा आणि एज्युकेशन सिटी ही अन्य दोन स्टेडियम्सही येतात. अल् रेयान स्टेडियम हे दोहा मेट्रोच्या ग्रीन लाईनवर असून, बांधकामाची मुख्य जबाबदारी कतारच्या अल् बलघ आणि भारतातल्या लार्सन अँड टुब्रो कंपनीला देण्यात आली आहे. साहजिकच स्टेडियमला भेट दिल्यावर मोठ्या प्रमाणात भारतीयांची भेट होते. स्टेडियमचा आकार हा पारंपरिक अरब नागरिक वापरतात, त्या बाऊलप्रमाणं (काचेचं भांडं) आहे. स्टेडियमचा वरचा भाग मोकळा असल्यानं सूर्यप्रकाश थेट मैदानावर येणार आहे. तसंच विद्युतपुरवठ्यासाठी स्टेडियमच्या वरच्या भागात सोलारची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातून विद्युतनिर्मिती करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या निमित्तानं प्रेक्षक, पाहुणे, माध्यमांचे प्रतिनिधी असे मिळून जवळजवळ दहा लाख लोक येतील, असा अंदाज आहे. त्यांच्या निवासासाठी एक लाख सत्तर हजार खोल्यांची व्यवस्था लागणार असून, सध्या साठ हजार खोल्या तयार आहेत, तर उर्वरित पन्नास हजार निर्माण करण्यात येणार आहेत. उर्वरित निवासासाठी कतारवासीयांना आवाहन करण्यात येणार असून ‘होम स्टे’ची व्यवस्था करण्यात येईल. सुरक्षेसाठी इंग्लंड, रशिया, अमेरिकासह इंटरपोलची मदत घेण्यात येणार आहे.

कामगारांसाठी सर्व काही
जी बांधकामं होत आहेत, तिथं कामगारांची पिळवणूक होत आहे, अशी ओरड सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष भेट दिल्यावर असं चित्र दिसलं नाही किंवा कोणताही कामगार याविषयी तक्रार करताना दिसला नाही. उलट त्यांच्या आरोग्यासाठी नियमितपणे शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत. त्यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. निवासव्यवस्था उभारण्यात आली आहे. या कामगारांसाठी नुकतीच फुटबॉल स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.

खास प्रेक्षकांसाठी ‘फॅन झोन’
जगातल्या विविध संस्कृती, पंरपरा मानणारे प्रेक्षक कतारमध्ये येणार आहेत. मात्र, कतारमध्ये खुलेपणानं मद्यप्राशन करण्यास मनाई आहे. त्यामुळे अशा प्रेक्षकाची सोय करण्यासाठी ‘फॅन झोन’ उभारण्यात येणार आहेत. नियम आणि कायद्याचं पालन करून सर्व प्रेक्षकांनी विश्‍वकरंडक स्पर्धेचा आनंद घ्यावा, अशी विनंती आयोजक करत आहेत. आपण कतारच्या परंपरा, संस्कृती यांचा आदर करावा, असंही आयोजन समितीचं म्हणणं आहे. सध्या सुरू असलेली तयारी पाहता कतारमधली विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा सर्वोत्तम ठरेल, असा दावा करण्यास हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com