esakal | संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे! (दा. कृ. सोमण)
sakal

बोलून बातमी शोधा

d k soman

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे! (दा. कृ. सोमण)

sakal_logo
By
दा. कृ. सोमण dakrusoman@gmail.com

मनात धार्मिकतेबरोबरच प्रसन्नतेची, सकारात्मकतेची बीजं रोवणारा; अंधार, मरगळ, नैराश्य दूर करणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. ता. दोन सप्टेंबरपासून हा गणेशोत्सव थाटामाटात सुरू होत आहे. सार्वजनिक देखाव्यांपासून घरगुती सजावटीपर्यंत अनेक गोष्टींना वेगही आला आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं श्रीगणेशाची आराधना, उत्सवाचं स्वरूप आदींवर दृष्टिक्षेप; तसंच गणरायाचे कोणते गुण अंगी बाणावेत, उत्सवाला विधायक स्वरूप कसं द्यावं, ताज्या संदर्भांनुसार बदल काय करावेत, स्वरूप कसं असावं आदींबाबत ऊहापोह.

‘‘आजी, आपला एलिफंट गॉड कधी आणायचा?’’ : नातवाचा प्रश्न.
‘‘अरे बाळा, त्याला एलिफंट गॉड नाही म्हणायचं. गणपती म्हणायचं.’’ : आजीचं उत्तर.
‘‘आजी, पण गणपतीची पूजा का करायची?’’
‘‘अरे, गणपतीचे गुण आपल्या अंगी येऊन आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठी पूजा करायची असते.’’  
‘‘आजी, मग दरवर्षी का पूजा करायची असते.’’
‘‘अरे बाळा, गणपतीला चौदा विद्या, चौसष्ट कला अवगत होत्या. तो शूर होता. त्याचे सर्व गुण एका वर्षात कसे अंगीकारता येतील? म्हणून तो दरवर्षी येत असतो.’’
‘‘आजी, गणपतीची सोंड डावीकडं वळलेली का असते? उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो का?’’
‘‘हे बघ. त्याच्या डाव्या हातात मोदक आहे ना, तो खाण्यासाठी सोंड डावीकडे असते. अरे बाळा, देव हा कधी कडक नसतोच. तो कृपाळू, दयाळूच असतो.’’
....आधुनिक काळात अशा प्रकारचे अनेक प्रश्न नातवंडं आपल्या आजी-आजोबांना विचारत असतात. नातवंडाना पटेल असंच उत्तर आजी-आजोबांना द्यावं लागत असतं. आज आपण गणेश पूजा, उत्सव उद्देश, परंपरा आणि सध्याचं स्वरूप या विषयी माहिती करून घेऊ या.

गणेशपूजेची परंपरा
श्रीगणेशपूजेची प्रथा कधी सुरू झाली, या विषयी विद्वानांत मतभेद आहेत. डॉ. रामकृष्ण भांडारकरांच्या मते गणेशपूजा पाचव्या ते आठव्या शतकात सुरू झाली असावी. मात्र, काही पंडितांच्या मते श्रीगणपती अथर्वशीर्ष इतकं जुनं आहे, त्याअर्थी गणेशपूजा साडेतीन हजार वर्षांपूर्वी वैदिक काळीही प्रचलित असावी. भारताप्रमाणंच नेपाळ, तिबेट, ब्रह्मदेश, थायलंड, इंडोनेशिया, चम्पा, जावा, बाली, बोर्निओ, श्रीलंका, चीन, तुर्कस्तान, जपान आणि मेक्सिको इथंही प्राचीन गणेशमंदिरं आहेत.
प्राचीनकाळचे गणेशविषयक माहिती असलेले श्रीगणेशपुराण आणि श्रीमुद्‍गलपुराण हे ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. भाद्रपद शुक्ल चतुर्थी मध्यान्हकालव्यापिनी असेल, तर तो दिवस श्रीगणेश चतुर्थीचा मानावा असं शास्त्रात सांगितलेलं आहे. मध्यान्हकाल म्हणजे कोणता तेही सांगतो. दिनमानाचे पाच समान भाग करावेत. पहिला प्रात:काळ, दुसरा संगवकाळ, तिसरा मध्यान्हकाल, चौथा अपराण्हकाल आणि पाचवा सायंकाळ मानला जातो. दोन्ही दिवशी संपूर्ण, अथवा कमी-जास्त मध्यान्हकालव्यापिनी असेल किंवा दोन्ही दिवशी मध्यान्हकालव्यापिनी नसेल, तर पूर्व दिवशीची घ्यावी असंही शास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्याप्रमाणं या वर्षी दोन सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी आली आहे.

गणपतीची एकूण अकरा प्रमुख व्रतं सांगण्यात आली आहेत ः (१) वरद चतुर्थी व्रत, (२) दूर्वा गणपती व्रत, (३) एकवीस दिवसांचे गणपती व्रत, (४) कपर्दी विनायक व्रत, (५) पार्थिव गणेशपूजा व्रत, (६) गणेश चतुर्थी व्रत, (७) वटगणेश व्रत, (८) संकष्ट हर चतुर्थी व्रत, (९) तिळी चतुर्थी व्रत, (१०) अंगारकी चतुर्थी व्रत, (११) संकष्ट चतुर्थी व्रत.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर श्रीगणेश चतुर्थीबद्दल सांगायचं असेल, तर भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्यामुळे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मातीच्या गणेशमूर्तीचं पूजन करून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. नंतर पितृपक्ष येतो. त्यावेळी आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर आश्विन महिना येतो. त्या महिन्यात शेतात तयार झालेलं धान्य घरात येत असतं. पृथ्वीच्या निर्मितीशक्तीमुळं हे धान्य तयार होत असतं. म्हणून आश्विनातल्या नवरात्रात निर्मितीशक्तीची पूजा केली जाते. निर्मितीशक्ती हीच आदिशक्ती आहे. त्यानंतर दसरा, दिवाळी इत्यादी सण येत असतात. भारत हा शेतीप्रधान देश असल्यानंच शेतीवर आणि ऋतूंवर आधारित अशी सणांची रचना केलेली आहे.

आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी केलेल्या पूजेला ‘षोडशोपचार पूजा’ असं म्हणतात. घराघरात श्रीगणेशमूर्तीची स्थापना करून गणेश चतुर्थीला तिची पूजा केली जाते. प्राणप्रतिष्ठा मंत्रानं मूर्तीमध्ये देवत्व आणलं जातं. दीड, पाच; गौरींबरोबर सात किंवा दहा दिवस गणेशमूर्तीचं पूजन केलं जातं. विसर्जनाच्या दिवशी उत्तरपूजेच्या मंत्रांनी मूर्तीमधलं देवत्व काढून घेऊन गणेशमूर्तीचं पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं.
घरगुती गणेशोत्सवाच्या निमित्तानं घराची स्वच्छता केली जाते. श्रीगणेशाचं दर्शन घेण्यासाठी आप्तेष्ट, मित्रमंडळी एकत्र येत असतात. सर्वजण दु:ख, चिंता, काळजी विसरून गणेशोत्सवात सामील होत असतात. श्रीगणेश हा सुखकर्ता आहे, तो दु:खहर्ता आहे. तो विघ्नांचं निवारण करणारा आहे. तो बुद्धिदाता आहे, अशी उपासकांची श्रद्धा असते. हा उत्सव घराघरात आनंद निर्माण करून जातो. हा आनंद पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत  भाविकांना सुखी ठेवत असतो.  

उत्सवातले बदल
आधुनिक कालातल्या घरगुती गणेशोत्सवाबद्दल सांगायचं म्हणजे लोकसंख्या वाढल्यानं घरगुती गणेशोत्सवांची संख्याही वाढली आहे. तसंच पूर्वींपेक्षा माणसांची आर्थिक क्षमताही वाढली आहे. गणेश दैवताची लोकप्रियताही वाढली आहे. लोक घरगुती गणेशोत्सवावरही जास्त खर्च करू लागले आहेत. लोक धार्मिकतेपेक्षा सांस्कृतिक गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. वाढती असुरक्षितता, प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवघेणी स्पर्धा, कमी श्रमात मोठं यश मिळवण्याची इच्छा यामुळं माणसांचा स्वकर्तृत्वापेक्षा दैवावर जास्त विश्वास बसू लागला आहे. घरगुती गणेशोत्सवांची संख्या वाढल्यानं पर्यावरणासंबंधीचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. गणेशोत्सवामुळं जलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात येऊ लागले आहेत. लोकांचा त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. निर्माल्य-कलश ठेवून त्या निर्माल्याचा उपयोग खतनिर्मितीसाठी करण्यात येऊ लागला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्याही खूप वाढली आहे. धार्मिकतेपेक्षा उत्सवाला महत्त्व प्राप्त झालं आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी घरगुती गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिलं, त्याचा प्रसार केला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जनसामान्यांच्या मनात जागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवांचा चांगला उपयोग झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अशा उत्सवांचा उपयोग पर्यावरण, आरोग्य, लोकशिक्षण, स्वच्छता, रक्तदान, रुग्णसेवा इत्यादी गोष्टींबाबत जनजागृती करण्यासाठी व्हावयास हवा आहे. परंतु, तसं होताना प्रत्यक्षात दिसत नाही. सध्या तर काही गणेशोत्सवांचं मार्केटिंग केलं जात असल्याचं दिसून येत आहे. ‘नवसाला पावणारा राजा’, ‘पाद्यपूजा’, ‘पावतीपुस्तक पूजा’, ‘पाटपूजा’ इत्यादी गोष्टींच्या जाहिराती करून मार्केटिंग केलं जात आहे. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा करून घेतला जात आहे-  ते अजिबात योग्य नाही. त्यासाठी समाजप्रबोधनाची खूप आवश्यकता आहे.

यावर्षी सांगली-कोल्हापूर भागात जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मोठा पूर आला. अनेक घरं उद्ध्वस्त झाली. जीवित हानी आणि वित्तहानी झाली. शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. अनेक जनावरं मरण पावली. हे मोठं नुकसान भरून येण्यासाठी खूप दिवस लागतील. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या वर्षी खर्च कमी करून एकेक गाव दत्तक घेऊन जर आर्थिक मदत केली, तर ती मोठी गणेशपूजा होईल. घरगुती गणेशोत्सवही या वर्षी कमी खर्चात साजरा करून जर मदत पूरग्रस्त भागांत दिली, तर श्रीगणेश आपल्या सर्वांवर नक्कीच प्रसन्न होईल. ‘संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे’ अशी प्रार्थना समर्थ रामदासांनी गणेशाच्या आरतीमध्ये म्हटली आहे. श्रीगणेश हा बुद्धिदाता आहे. तो सर्वांना अशी बुद्धी देवो, हीच गणेशचरणी प्रार्थना आहे.

loading image
go to top