तू ज्ञानमयी, तू विज्ञानमयी (जयराज साळगावकर)

jayraj salgaonkar
jayraj salgaonkar

मनात धार्मिकतेबरोबरच प्रसन्नतेची, सकारात्मकतेची बीजं रोवणारा; अंधार, मरगळ, नैराश्य दूर करणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. ता. दोन सप्टेंबरपासून हा गणेशोत्सव थाटामाटात सुरू होत आहे. सार्वजनिक देखाव्यांपासून घरगुती सजावटीपर्यंत अनेक गोष्टींना वेगही आला आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं श्रीगणेशाची आराधना, उत्सवाचं स्वरूप आदींवर दृष्टिक्षेप; तसंच गणरायाचे कोणते गुण अंगी बाणावेत, उत्सवाला विधायक स्वरूप कसं द्यावं, ताज्या संदर्भांनुसार बदल काय करावेत, स्वरूप कसं असावं आदींबाबत ऊहापोह.

हिंदू धर्मातल्या प्रमुख देवता त्यांच्या काही ना काही विशेष गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. साधक आपल्या आराध्य दैवतांचं ध्यान, पूजाअर्चा करतात, तेव्हा त्यांच्या गुणांची (आणि कदाचित दोषांचीही) साधना केली जाते. उदाहरणार्थ, आदिनाथ शिवशंकर शिव, डमरू वाजवतात. तांडव नृत्य करतात, त्यांच्या भाळातून गंगा निर्माण होते आणि ते भाळी चंद्रही धारण करतात. वाघाचे चामडे ते वस्त्र म्हणून पांघरतात. हाती त्रिशूल धरतात, गळ्यात सर्प घालतात, कधी अर्ध नारीनटेश्वर होतात आणि स्त्री-पुरुष एकात्मतेच्या रूपानं अद्वैताचं रूपकही दाखवतात. त्यांना तिसरा डोळा आहे, रागानं त्यांनी हा तिसरा डोळा उघडला, तर शत्रू भस्मसात होतो. भगवान विष्णू समुद्रात शेष नागावर पहुडलेले असतात. हा पाच तोंडाचा अजस्त्र नाग त्यांच्या डोक्यावर आपल्या फण्याचं छत्र धरून त्यांचं रक्षण करतो, तर त्यांच्या नाभीतून कमळाचा जन्म होतो. त्यांची पत्नी सुख, शांती, संपत्तीचे आगर असलेली ‘श्रीलक्ष्मी’ होय. राम, हनुमान, स्कंद, काली, श्री दत्तगुरु अशा अनेक देवतांचीही अशीच वेगवेगळी वैशिष्ट्यं, आणि सुदर्शनधारी भगवान श्रीकृष्ण यांच्यावर लिहावं तेवढं कमीच आहे.

शिवाचे दोन पुत्र श्रीगणपती आणि श्रीषडानन होत. गणेशाचा महिमाही असाच आहे. उंदीर हे त्याचं वाहन आहे, तर गजमुख हा त्याचा चेहरा आहे. रिद्धी-सिद्धी अशा दोन विदुषी सहचारिणी त्यांच्या डावी-उजवीकडे नेहमी स्थित असतात. हाती पाश आणि त्रिशूलासारखी शस्त्रं ते धारण करतात. व्यासमुनी महाभारत लिहिण्यासाठी एक उत्तम लेखनिक म्हणून त्यांची निवड करतात. ते सर्व दिशांचे अधिपती आहेत. ते अक्षरविद्येचे अधिपती आहेत. ते तत्त्वज्ञानाचे अधिपती आहेत. ते ज्ञानमय आहेत आणि विज्ञानमय आहेत. सर्व जग त्यांच्यामुळं चालतं. त्यांचं अस्तित्व देह आणि काल यांच्या पलीकडं आहे. प्राणिमात्रांच्या मूलाधर चक्रात ते स्थित असतात. ते ब्रह्मरूप आहेत. ते सूर्यरूप आहेत. ते विष्णुरूप आहेत, ते वायुरूप आहेत, ते सच्चिदानंद रूप आहेत. गणकऋषींनी रचलेल्या अथर्वशीर्षात हे गणेशाचं वर्णन केलं गेलं आहे. गणकऋषी-गणकयंत्र-संगणक-माऊस-उंदीर-अक्षरविद्या (DTP Typography) या संज्ञा विज्ञान-गणितातल्या समकालीन अशा भासतात. हे सगळे गुण धारण करणारे गणेश हे रसिक आहेत. मोदक (मोद म्हणजे आनंद) त्यांना प्रिय आहेत. ताज्या हिरव्या दुर्वांची जुडी त्यांना प्रसन्न करते. या मंगलमूर्तीची आरती समर्थ रामदासस्वामींनी लिहिली आहे. त्यात श्रीगणेशाच्या केवळ दर्शनानं मनोकामना पुऱ्या होतात, असे म्हटले आहे. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥’ अशा प्रकारचं आर्जव हे गणेशासमोरच केलं जातं. असे हे नयनरम्य रसिकराज पराक्रमी, वीर, शार्दुल मूर्तिरूप लहान मुलांपासून अनुभवी वृद्धांपर्यंत सर्वांना मोहित करतं. वैष्णवांना गणेश सौम्यरूपात दिसतो, तर शैव आचारविचारांच्या भक्तांना तो तंत्ररूपातील शक्ती गणेशाच्या रूपात दिसतो.
‘देवा तूचि गणेशु’ या लेखात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात : ‘ज्ञानेश्र्वरमहाराजांनी आपल्या ‘भावार्थदीपिका’ या भगवद्‍गीतेवरच्या टीकेत प्रारंभी मंगलमूर्ती गणेशाचं स्तवन केलं आहे. हे स्तवन विद्याधिपती गणेशाचं आहे. हे स्तवन शब्दब्रह्माचं आहे. वाड्मयरूप गणेशाचं गुणवर्णन हे संपूर्ण गणेशस्तवनाचं एक मनोहर साहित्यरूपक आहे. श्रुती, स्मृती, षट्दर्शनं, अठरा पुराणं इथपासून काव्य आणि नाटकापर्यंत सर्व साहित्यअलंकार हे गणेशाच्या ठिकाणी विविध रूपांत ज्ञानेश्र्वर महाराजांनी या रुपकात वर्णिले आहेत. दशोपनिषदं म्हणजे गणपतीच्या गंडस्थळावर असलेल्या मुगुटातून शोभणारी, नाना मकरंदानं सुगंधित झालेली जणू काही फुलंच आहेत, असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे. सर्व बाजूंनी साहित्यगणेशाचं असं मनोरम वर्णन ज्ञानेश्र्वरीच्या पहिल्या अध्यायातल्या प्रारंभीच्या अठरा ओव्यांतून केलेलं आहे. अठरा हा आकडा महाभारत, भगवद्‍गीता; तसंच महाभारतातल्या विविध घटना यांच्याशी कसा संबंधित आहे, ते जाणकारांना सांगायला नको. पहिल्या अठरा ओव्यांत गणपतीचं असं वर्णन केल्यानंतर ज्ञानेश्र्वर महाराज एक अतिशय सुंदर अशी ओवी लिहून जातात. ती ओवी अशी...
‘अकार चरण युगल। उकार उदर विशाल।
मकार महामंडळ। मस्तकाकारे॥’

ॐकार हाच कसा गणेशस्वरूप आहे, हे ज्ञानोबांनी या एका ओवीत आपल्या मनावर बिंबवलं आहे. याच्या आधीच्या अठरा ओव्या या गणपतीला साहित्यप्रतीक म्हणून प्रस्थापित आणि प्रतिष्ठित करणाऱ्या आहेत, तर ही एकोणिसावी ओवी गणपती आणि ॐकार यांचं अभिन्नत्व दाखवणारी आहे. ॐकारस्वरूप गणेश ही कल्पना आपल्याकडे पूर्वापार रूढ आहे. जगताच्या प्रारंभी ‘ॐकार’ प्रथम उमटला आणि नंतर इतर शब्दांची निर्मिती झाली. गणपतीला कोणत्याही कार्याच्या प्रारंभी आपण जे मानाचं आद्यस्थान देतो, त्याचा आणि जगतारंभी निर्माण झालेल्या ‘ॐकारा’चा असा हा अन्योन्य संबंध आहे.’

ज्ञानेश्र्वर महाराज हे खरं म्हणजे गुरुपरंपरेप्रमाणे नाथपंथी. त्यांच्या उपास्य किंवा कुलदैवताबद्दल बोलायचं झालं, तर पंढरीचा विठ्ठल हेच त्यांचं उपास्य दैवत! शिवाय ज्ञानोबांना आपण वारकरी संप्रदायाचे आद्य प्रणेते मानतो. आजही वारकरी ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात पंढरीची वाट चालत असतात. हे सर्व ध्यानी घेतल्यानंतर ज्ञानोबा प्रारंभी विठ्ठलाचं स्मरण न करता गणपतीचं इतक्या मनोरम पद्धतीनं स्तवन करतात हे मुद्दाम लक्षात घेण्यासारखं आहे. ज्ञानेश्र्वरांचे जे दुसरे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत त्यात, म्हणजे ‘अमृतानुभव’ आणि ‘चांगदेव पासष्टी’ यांत, प्रारंभी गणपतीला नमन केलेलं नाही. ‘अमृतानुभवा’त पशुपतीला नमन आहे, तर ‘चांगदेव पासष्टी’चा प्रारंभ ‘स्वस्ति श्रीवटेश्र्वरु’ असाच सरळ झालेला आहे.

ग्रंथारंभी ‘श्रीगणेशाय नमः।’ म्हणण्याचा प्रघात असला किंवा दासबोधात समर्थ रामदासस्वामी प्रत्येक दशकाच्या प्रारंभी जसं गणेशाचं स्मरण करतात, तसं गणेशाचं स्मरण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे, हे खरं असलं तरी ‘भावार्थदीपिका’ या ग्रंथाच्या प्रारंभी ज्ञानेश्र्वरांनी केलेलं गणेशस्तवन हे केवळ प्रघात किंवा प्रथा म्हणून केलेलं नसून नाटकाच्या प्रारंभी सूत्रधार जशी नाटकाच्या विषयाची नांदी करून देतो, तशी या ग्रंथातल्या विषयाची गणेशस्तवनातून ज्ञानेश्र्वरांनी करून दिलेली ती नांदी आहे.

आपली ही भगवद्‍गीतेवरील टीका साहित्यगणेशाच्या अंगावरच्या सर्व अलंकारांत अधिक उठून दिसणार आहे, ती शतकानुशतकं समाजाला प्रभावित करणारी आहे, हेच जणू काही ज्ञानेश्र्वर माऊलीला या प्रारंभीच्या गणेशस्तवनातून सूचित करायचं असावं.
गुरू हेच परब्रह्मस्वरूप मानणाऱ्या ज्ञानेश्र्वरांनी ज्ञानेश्र्वरीतल्या सतराव्या अध्यायाच्या प्रारंभी गणेशस्वरूप गुरूला नमन केलं आहे (अध्याय सतरा, ओवी १ ते २०). तसंच पहिल्या अध्यायाच्या प्रारंभीच्या दोन ओव्यांत ‘वेदप्रतिपाद्या। आत्मरूपा। सकलार्थ मतिप्रकाशु।’ अशा स्वरूपाची जी गणेशाच्या विशाल स्वरूपाचं दिग्दर्शन करणारी विशेषणं वापरली आहेत, ती ‘गणेशो वै परब्रह्म।’ या उपनिषदांतील वचनांशी साधर्म्य दाखवणारी आहेत हे विशेष होय.

काही संशोधकांच्या मताप्रमाणं, ज्ञानेश्र्वरांनी प्रारंभी गणपतीला नमन केलं आणि अठरा अध्यायांची ज्ञानेश्र्वरी लिहून झाल्यानंतर पसायदानात त्यांनी ‘विश्र्वात्मक देवा’कडे आपलं मागणं प्रकट केलं असं आहे. खरं तर प्रारंभापासूनच ज्ञानेश्र्वरांना गणेश हेच दैवत विश्र्वात्मक देवता, विश्र्वरूप देवता म्हणून अभिप्रेत होतं. गणपती हा ज्ञानेश्वरांच्या काळात अधिक मान्यता पावलेला असा देव होता. ज्ञानेश्र्वरीमध्ये दहाव्या अध्यायात देव आणि भक्त यांच्या अद्वैताबद्दल विवरण करताना ‘तैसे प्रयाग हात सामरस्याचे। वरी वोसाण तरत सात्विकाचे। ते संवाद चतुष्पतीचे। गणेश जाहले॥’ असं म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या परंपरेनंच विनायकाच्या अष्टरूपांना एक विशिष्ट स्थान बहाल केलं गेलं आहे. लग्नकार्यात जी मंगलाष्टकं म्हटली जातात, त्यामध्येही सर्व अष्टविनायकांची नावं आणि गावं गुंफलेला एक श्र्लोक प्रचलित आहे. तो श्र्लोक असा -
स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्र्वरं सिद्धिदम्।
बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणिं थेवरम्॥
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्र्वरं ओझरम्।
ग्रामे रांजण संस्थिते गणपतिं कुर्यात् सदा मंगलम्॥


महाराष्ट्रात श्रीगणेश हे उत्सवरूपी आराध्य दैवत आहे. गेली १२५ वर्षं हा भक्तिरसाचा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या अविरत चालू आहे. वर नमूद केल्याप्रमाणं महाराष्ट्रात गणपतीची आठ प्रमुख क्षेत्रं आहेत. त्यांना ‘अष्टविनायक’ म्हणतात. त्या अष्टविनायकांचं स्मरण करून गणेशभक्तांना हा गणेश उत्सव सुखाचा, समृद्धीचा, संपन्नतेचा जावो, अशी श्रीविनायकाकडे प्रार्थना करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com