पालक आनंदी, तर मूल आनंदी (गिरीजा गोडबोले)

girija godbole
girija godbole

कबीर चार वर्षाचा असताना मी त्याला घेऊन उत्तराखंडमध्ये गेले होते. कबीर खेळताना तिथं पडला आणि त्याच्या कपाळाला खोक पडली. खूप रक्तस्त्राव होऊ लागला. तिथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही कबीरला घेऊन गेलो. जखम बघून माझ्या लक्षात आलं होतं, की टाके घालावे लागणार आहेत. प्रत्यक्ष टाके घालताना मला बघवलं जाणार नाही असं डॉक्‍टरांना आणि इतरांनाही वाटत होतं. सगळे मी बाहेर जावं असं सांगत होते; पण मी खूप शांत होते. मी तिथंच थांबले आणि सगळं व्यवस्थित होत आहे ना हे पाहू लागले. खरं तर आतून मला खूप त्रास होत होता; पण मी स्वतःला रोखून धरलं होतं.

माझ्या आई-वडिलांनी दोघांनी मला वेगवेगळ्या प्रकारे घडवलं आहे. दोघांची पालकत्व निभावण्याची पद्धत वेगळी होती. त्यामुळे दोघांकडून मी वेगवेगळ्या आणि चांगल्या गोष्टी शिकले. बऱ्याच लोकांना वाटतं, की माझ्यामध्ये असणारा आत्मविश्वास, कॅमेऱ्यासमोरची सहजता किंवा व्यवहारज्ञान यासारख्या गोष्टी मी वडिलांकडून शिकले असेन; पण खरं तर या सर्व गोष्टी मी आईकडून शिकले आहे. आईची एक खूप महत्त्वाची गोष्ट मला लक्षात राहिलेली आहे ती म्हणजे तिनं मला कधीच डोळे बंद करून फक्त तिची आज्ञा पाळणारं मूल म्हणून वाढवलं नाही. आईबरोबर खूप लहान असल्यापासून मी मुंबईत फिरले आहे. लोकलचा प्रवास करताना ती मला लोकलबद्दल, स्टेशनबद्दल, वेळापत्रकाबद्दल अगदी सखोल माहिती द्यायची. कोणती लोकल केव्हा येणार, कुठं जाणार, लेडीज डबा कोणता असतो यासारख्या साध्या गोष्टींपासून ते पासपोर्ट ऑफिस कुठं आहे, रेशन कार्ड कसं बनवतात अशा किती तरी महत्त्वाच्या जीवनावश्‍यक गोष्टी- ज्या शाळेत नाही शिकवत- त्या मला आईनं लहानपणीच शिकवल्या. बरेच ठिकाणी आई-वडीलच या गोष्टी करतात आणि मुलांना त्याचा गंधही नसतो; पण आई मला या सर्व ठिकाणी स्वतः घेऊन जायची. आमच्या घरी मला सांभाळायला दुसरं कुणी नसायचं. मी आईबरोबर नेहमी राहत असले, तरी आईनं मला तिच्यावर कधी रेलू दिलं नाही. लोकलनं जाताना तिनं माझ्यासाठी एक गेम सुरू केला होता. कुठल्या स्टेशननंतर कुठलं स्टेशन येतं हे मी बरोबर सांगितलं, तर ती मला पॉइंट्‌स द्यायची. तिकीट कुठून काढायचं, स्टेशनला जाताना रिक्षा कुठं थांबवायची इथपासून ते फ्रिजमधलं दुधाचं भरलेलं पातेलं बॅलन्स करून कसं काढायचं यांसारख्या अनेक बारीकसारीक गोष्टी तिनं मला अनुभवातून शिकवल्या. त्याचा मला आता आई झाल्यानंतर खूप फायदा होतो. आईनं मला नेहमी सजग राहायला शिकवलं. मीदेखील कबीरला म्हणजे माझ्या मुलाला- "मी सांगते तसंच कर' असं कधी सांगत नाही. त्याला नेहमीच माइंडफुल राहण्याचा सल्ला देते. हे माइंडफुल राहणं आईनं मला अनुभवातून शिकवलं. ज्या गोष्टी शाळेत शिकवत नाहीत; पण जगताना नेहमीच उपयोगी ठरतात त्या मी आईकडून शिकले आणि मी त्याच पद्धतीनं कबीरला शिकवण्याचा प्रयत्न करते.

मी लहान असताना आम्ही वसईत राहायचो. बाबा त्यांच्या कामासाठी शिवाजी मंदिरजवळ एक खोली घेऊन राहायचे. ते रविवारी अथवा सुटीच्या दिवशी घरी यायचे. नंतर मुंबईत राहायला लागले, तेव्हा त्यांच्या नाटकांचे दौरे चाळीस वगैरे दिवसांचे असायचे. त्यामुळे बाबा माझ्यासोबत खूप कमी असायचे. मला जास्त करून आईनं वाढवलं; पण बाबा घरी यायचे तेव्हा धमाल असायची. पावसाळ्यात आम्ही पाच-सहा दिवसांच्या सहलीला जायचो. चार-पाच कुटुंबाचा आमचा एक ग्रुप होता. आम्ही सर्व मिळून सहलीला जायचो. बाबांचं एक प्लॅनर असायचं. कार्डबोर्ड कापून, रेषा आखून अतिशय पद्धतशीर प्रकारे ते हे दरवर्षी बनवायचे. त्यांचं काम अतिशय शिस्तबद्ध आणि आखीवरेखीव असायचं. वर्षभराचं नियोजन, दौरे त्यावर लिहिलेले असायचे. त्यात जून-जुलैच्या दरम्यान पाच-सहा दिवसांचा मोठा भाग रंगवलेला असायचा आणि त्यात "कौटुंबिक जिव्हाळा' असं लिहिलेलं असायचं. एरवी घरात नीटनेटकेपणाच्या बाबतीत अगदी आग्रही असणारे बाबा सहलीत मात्र मला वाट्टेल ते करू द्यायचे. मला जितक्‍या वेळा पावसात भिजायचं तेवढ्या वेळा ते मला भिजू द्यायचे. मला जेवायचं नसेल, फक्त कणीस खायचं असेल, तर ते तीन-चार कणसंसुद्धा एकाच वेळी खाऊ द्यायचे. ते म्हणायचे ः "खाऊ दे तिला. पोट बिघडलं तर मी डॉक्‍टर आहे, मी तिला औषध देईन.' तो काळ मला फार मजेशीर वाटायचा.

आई एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करत असायची. माझे वडील ज्यावेळी पूर्ण वेळ अभिनेता म्हणून काम करायचे, त्यावेळी आतासारखी भरपूर चॅनेल्स अथवा माध्यमं नव्हती आणि दूरदर्शनचं एकच चॅनेल होते. त्यामुळे काम थोडंसंच असायचं. नाटक, एखादी मालिका किंवा एखादा चित्रपट एवढीच माध्यमं होती. त्यामुळे वडिलांना सलग मनासारखं काम मिळेलच असं नसायचं. काम मिळालं तरी पैसे भरपूर मिळेलच अशी शक्‍यता नसायची. त्या काळात बहुतेक कलाकारांनाच हा संघर्ष करावा लागला असेल असं मला वाटतं. त्यामुळे आईनं आयुष्यभर नोकरी केले. खूप नंतर तिनं नोकरी सोडली. मला ती वर्किंग वुमन म्हणूनच आठवते; पण तरीही माझ्या सगळ्या आवडीनिवडी तिने पुरवल्या. "माझा आज मूड नाहीये, मला कंटाळा आलाय' किंवा "बरं नाही' असं मी कधीच तिच्याकडून ऐकलं नाही. मी आई झाल्यावर आता मला हे जाणवतं, की आपल्या कामाचा, शारीरिक, अथवा आपल्या आयुष्याबद्दलचा एक वेगळा स्ट्रेस असू शकतो. अशा अनेक प्रसंगांत मला स्वतःचा त्रास बाजूला ठेऊन कबीरसाठी, त्याला काही हवं असेल तर त्यासाठी उभं राहावं लागतं. हे सर्व आईच्या वागण्यातून माझ्याकडे आलं आहे असं मला वाटतं.

काळ बदलला तसं बरंच काही बदललं. खासकरून माझ्या आणि कबीरच्या पिढीत तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे खूपच मोठा बदल दिसून येतो. आता कबीरला मोबाईलशिवाय आयुष्य कसं असू शकतं हा विचारच करता येत नाही. तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे पालकत्वाची पद्धतीही खूप बदलली आहे. तंत्रज्ञानाची खूप मदत आजच्या पालकांना आहे; पण तरीही माझ्या आईनं ज्या पद्धतीनं मला वाढवण्याचा प्रयत्न केला, तो मी काही प्रमाणात अंमलात आणण्याचा प्रयत्न करते. मी नववीत असताना बाजारात मोबाईल फोन आल्यानंतरही तिनं मला बारावीपर्यंत फोन दिला नव्हता. त्यामुळे तिची मला वाढवण्याची पद्धत आणि आता मोठ्या प्रमाणात आसलेली तंत्रज्ञानाची उपलब्धता यांच्यात मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न कबीरला वाढवताना करत आहे. आजच्या काळात वेगवेगळ्या डिव्हायसेसपासून, नव्या तंत्रापासून मुलांना दूर ठेवणं शक्‍य नाही आणि ते योग्यही नाही; पण त्यातही गरज किती आणि चोचले किती याचा बॅलन्स पालकांनी साधणं गरजेचं आहे. मी तेच करायचा प्रयत्न करते. कबीर अजून लहान आहे पण उद्या त्याला फोन द्यावा लागेल; पण तो देताना फक्त कॉलिंगसाठीचा द्यायचा की त्यात इतर डिव्हायसेस, गेम्स वगैरे असलेला द्यायचा याचा मी नक्कीच विचार करेन. त्याबाबतीत मी आईच्या विचारांचा, संस्कारांचा आधार घेईन आणि गरजेपुरता आवश्‍यक असणारा फोन देईन. किती गरजा पुरवायच्या आणि किती लाड करायचे याचं संतुलन पालकांनी राखलं पाहिजे. "मला मिळालं नाही त्यामुळे तुला घे' ही भूमिका चुकीची ठरणारी आहे. आता कबीरला मी आठवड्यातून एकदाच फोन हातात देते. याचं खूप जणांना आश्‍चर्य वाटतं. काही वेळा एखादा चांगला चित्रपट वगैरे आमच्याबरोबर बघतो; पण असे प्रसंग बरेच कमी येतात. आयपॅडवर खेळण्यासाठीही आठवड्यातून एकच दिवस परवानगी आहे. अर्थात याचा थोडा त्रास नक्कीच होतो. तो कुरकुर करतो, मित्रांशी तुलना होते; पण त्या गोष्टी हाताळण्याची आपली तयारी हवी. कबीरला माझा फोन परवानगीशिवाय वापरण्याची अजिबात परवानगी नाही. एक्‍सपोजर मर्यादित ठेवलंच पाहिजे. लोकांना वाटतं, की मुलांना जेवढं एक्‍स्पोजर देऊ तेवढं ते जास्त शिकतील; पण हा गैरसमज आहे. वास्तविक मर्यादित गोष्टींना एक्‍स्पोज करून त्याचं प्रोसेसिंग झालं पाहिजे. त्यातून मुलांची कौशल्यं वाढतात. मुलांना सतत गुंतवून ठेवणंही फारसं योग्य नाही. कधीकधी मुलांना कंटाळाही येऊ द्यावा. कारण त्यांना आलेल्या कंटाळ्यातून ते खूप गोष्टी करायला शिकतात. सतत आपण त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न करू लागलो तर त्यांनी निर्णयक्षमता क्षीण होते. माझ्याकडे एक तास वेळ आहे, त्याचं मी काय करायचंय हे त्यांनीच ठरवलं तर त्यातून त्यांची निर्णयक्षमता वाढते. म्हणून मुलांना कंटाळा येऊ द्यावा. याचा अर्थ मी त्याच्याबरोबर वेळ घालवतच नाही असं अजिबात नाही. मी कबीरबरोबर खेळते, गप्पा मारते, बरंच काही करते; पण पूर्ण वेळ गुंतवून नाही ठेवत. कबीरला वाचायला खूप आवडतं. मग त्याची आवड ओळखून तशी पुस्तकं त्याला आणून देते. तसंच नवीन, वेगवेगळं काही बनवता येईल अशी अनस्ट्रक्‍चर्ड खेळणी त्याच्यासाठी आणते. त्यातून तो बरंच काही शिकतो. तसंच स्वयंपाकघरातील वस्तू- उदाहरणार्थ दोऱ्या, झाकणं अशा गोष्टींशी कबीर तासन्‌तास खेळतो. काहीतरी बनवतो. ही जी क्रिएटीव्हीटी आहे त्यातून मुलं संतुलन, भौमितिक आकार यासारख्या मूलभूत गोष्टी शिकतात. या गोष्टी शिकवून समजत नाहीत, तर त्या करूनच बघाव्या लागतात. ड्रॉइंगच्या बाबतीतही पालक ते व्यवस्थितच आलं पाहिजे असा आग्रह धरतात. चित्र रंगवताना ते बॉर्डरच्या आतच रंगवलं पाहिजे हा हट्ट कशासाठी हवा. काय बिघडतं ते रंग बाहेर गेले तर. मी असला हट्ट कबीरच्या बाबतीत कधीच धरत नाही. त्याच्या कल्पनाशक्तीला जे पटेल ते तो करेल. हाच माझा विचार असतो.

पालकत्वाचा अनुभव खूप छान असतो, गौरवास्पद असतो; तसाच तो खूप जबाबदारीचा पण असतो. आपल्या छोट्या छोट्या निर्णयाचा मुलांच्या आयुष्यावर प्रभाव पडणार आहे याची जाणीव सतत ठेवावी लागते. कारण याच छोट्या गोष्टीतून ते माणूस म्हणून आकार घेत असतात. त्यामुळे ही खूप मोठी जबाबदारी आहे. अनेकांना त्याचा स्ट्रेस येतो तसा मलाही येतो; पण ज्यावेळी कबीरकडून त्याची खूप छान पावती त्याच्या कृतीतून मिळते तेव्हा बक्षिस मिळाल्याचा आनंद मिळतो. अशावेळी स्ट्रेस घेतल्याचा आनंदही होतो. दोन गोष्टी पालकांनी मुलांच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवाव्यात. एक म्हणजे मुलांची संवेदनशीलता जपली पाहिजे. कारण एका ठराविक वयात मुलं खूप संवेदनक्षम असतात. खूप चिडणं, खूप जोरात हसणं, खूप रडणं यासारख्या तीव्र भावना ते व्यक्त करतात. नेमकं तेव्हाच पालक हळू रड, हळू हास, चिडू नको असं सारखं सांगतात. याचा खूप नंतर परिणाम दिसू लागतो. मुलं मोठी होतात तेव्हा ती त्यांच्या भावना नीट व्यक्तही करू शकत नाहीत आणि समरसून या भावना त्यांना अनुभवताही येत नाहीत. या "बंदपणामुळे' मोठे म्हणून आपण सारेच खूप त्रास सहन करतो. त्यामुळे या भावना मोकळेपणाने मुलांना व्यक्त करू दिल्या पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबतचा अवेअरनेस. बरीचशी मुलं टीव्ही बघताना जेवतात. मग त्यांना जेवणातल्या पदार्थाची वेगवेगळी चव कशी समजणार? एकावेळी एकच गोष्ट केली पाहिजे. सभोवतालच्या गोष्टींबद्दलचा अवेरनेस खूप महत्त्वाचा असतो. समाजात सभोवताली काय घडतंय, सरकारचं सध्याचं धोरण काय? उजवी आणि डावी विचारसरणी म्हणजे काय? वगैरे गोष्टी वाढत्या वयात मुलांना हळूहळू सांगायला हव्या. सामाजिक आर्थिक समस्या कोणत्या, आता लॉकडाऊनमध्ये कोणत्या वर्गाला अधिक आर्थिक झळ सोसावी लागत आहे, यासारख्या गोष्टी मुलांना चर्चेतून सांगितल्या पाहिजे. म्हणून संवेदनशीलता आणि अवेअरनेस या दोन गोष्टी मुलांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या शिकवण्यापेक्षा मुलांना अनुभवू द्याव्यात.

कबीरनं मला खूप प्रेम करायला शिकवलं. किती राग आला, तरी दुसऱ्या क्षणी आपण याच्यावर इतकं प्रेम कसं करू शकतो या बदलाचं मला आश्‍चर्यही वाटतं आणि आनंदही होतो. आई होणं हे आपल्याही नकळत आपल्याला स्ट्रॉंग बनवणार असतं. कबीर चार वर्षाचा असताना मी त्याला घेऊन उत्तराखंडमध्ये गेले होते. पंचेचाळीस दिवसांचं शूटिंग होतं. युनिटमधल्या आणखी दोघांची लहान मुलं होती. त्यामुळे आम्ही ठरवूनच मुलांना नेलं होतं. या अनुभवातून मी एक महत्त्वाची गोष्ट शिकले, की परिस्थिती कशीही असो, गोष्टींची उपलब्धता असो वा नसो मी कबीरची काळजी उत्तम प्रकारे घेऊ शकते. कबीर खेळताना तिथं पडला आणि त्याच्या कपाळाला खोक पडली. खूप रक्तस्त्राव होऊ लागला. ते ठिकाण अतिशय एकांतात होतं. छोटसं गाव होतं. तिथलं सरकारी हॉस्पिटल म्हणजे दहा बाय दहाच्या दोन खोल्या. आम्ही कबीरला घेऊन तिथं गेलो. जखम बाघून माझ्या लक्षात आलं होतं, की टाके घालावे लागणार आहेत. मी हॉस्पिटलला नेण्याआधीच कबीरला जवळची पेनकिलर दिली होती. प्रत्यक्ष टाके घालताना मला बघवलं जाणार नाही असं डॉक्‍टरांना आणि इतरांनाही वाटत होतं. सगळे मी बाहेर जावं असं सांगत होते; पण मी खूप शांत होते. मला भीती होती, की या ठिकाणी निर्जंतुक साहित्य वापरलं जाईल की नाही. त्यामुळे मी तिथंच थांबले आणि सगळं व्यवस्थित होत आहे ना हे पाहू लागले. खरं तर आतून मला खूप त्रास होत होता; पण मी स्वतःला रोखून धरलं होतं. सगळे सोपस्कर झाल्यावर सुहृदला, माझ्या नवऱ्याला फोनवर सांगताना मग माझा बांध सुटला आणि मी रडू लागले. नंतर आम्ही पुढचं वीस दिवसांचं शूटिंग पूर्ण केलं; पण या प्रसंगानंतर माझा आत्मविश्वास खूप वाढला. तो धीर, आत्मविश्वास कुठून आला माहीत नाही; पण मी ते निभावून नेलं.

नियमित नोकरी करणाऱ्या पालकांपेक्षा मला माझं शेड्यूल जास्त आवडतं. कारण मी जर पाच-सहा दिवस सतत शूटिंगमध्ये असेन तर पुढचे पाच सहा दिवस सलग मी घरी राहते. मला तो संपूर्ण वेळ कबीरसाठी घालवता येतो. शिवाय मी कामाला जाते, तर सुरुवातीपासूनच कबीरला सगळं खरं सांगत आले आहे. त्यामुळे त्याचीही लहानपणापासून, आई कामाला जाते अशी मनाची तयारी झाली आहे आणि सांगितल्याप्रमाणे त्याच वेळी येते, हे त्याला माहीत आहे. तसंच हे काम मी केवळ पैसे मिळतात म्हणून करत नाही, तर अभिनय करणं मला आवडतं हेदेखील मी कबीरला सांगितलंय. मी घरी नसते तेव्हा बरेचदा कबीर सुहृदबरोबर असतो. त्याचं सुहृदचं नातं खूप छान मैत्रीचं आहे. काही वेळा तो माझ्या आईकडे किंवा सासूबाईंकडे पुण्यातही राहतो. आई मुंबईत माझ्या घरापासून जवळच राहते. सुहृदच्या पालकत्वच्या थोड्या वेगळ्या संकल्पना आहेत; पण त्याही कबीर खूप एंजॉय करतो. त्यांच्यात खूप धमाल सुरू असते.

पालक ही अशी जबाबदारी आहे, जी जितकी आपल्या आपत्याप्रती असते, तितकीच स्वतःप्रतीसुद्धा असते. कारण आपण एक आयुष्य घडवत असतो. मागण्या पूर्ण करताना पालक म्हणून स्वतःला विसरून चालत नाही. कारण शेवटी पालक आनंदी असेल तरच ते एक आनंदी मूल वाढवू शकतात. हे संतुलन राखता येणं याला मी पालकत्व म्हणीन. मुलांच्या मागण्या पूर्ण करताना तुम्ही स्वतःही आनंदी राहायला पाहिजे आणि तुमचं मूलही आनंदी असलं पाहिजे. थोडक्‍यात मुलांना वाढवताना स्वतःचा आनंदही जपा. तुम्हाला आनंदी बघून तुमचं मूल किती आनंदी होतं हे बघा! कदाचित तुम्ही आश्‍चर्यचकित व्हाल!
(शब्दांकन ः मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com