संवेदना - जागरूकतेचा आदर्श (डॉ. हमीद दाभोलकर)

dr hamid dabholkar
dr hamid dabholkar

विविध सामाजिक चळवळींशी स्वतःला सक्रियतेनं जोडून घेणाऱ्या ज्येष्ठ विदुषी पुष्पा भावे यांचं नुकतंच (शनिवार, ता. ३ ऑक्टोबर) निधन झालं. तत्त्वांसाठी अत्यंत निर्भयपणे लढा देणाऱ्या संवेदनशील पुष्पाताई चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांच्या वैचारिक आधार होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्या अग्रभागी होत्या, तसंच सामाजिक कृतज्ञता निधीच्या उभारणीच्या प्रकल्पात त्यांचा मोठा सहभाग होता. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या पुष्पाताईंच्या कार्याला दिलेला उजाळा...

लौकिक अर्थानं समृद्ध म्हणता येईल अशा स्वरूपाचं आयुष्य जगून पुष्पाताईंनी मागच्या आठवड्यात जगाचा निरोप घेतला. समाजातील एकत्रित शहाणीव टिकण्यासाठी काही जणांचं नुसतं असणंदेखील महत्त्वाचं असतं, तसं पुष्पाताईंचं होतं. मानवी समाज म्हणून आपल्या ज्या सभ्यता आहेत, त्यांच्यापासून आपण उलट्या पावलानं तर प्रवास करत नाही ना, अशी शंका मनात रोज निर्माण होण्याच्या काळामध्ये त्यांचं जाणं हे अधिक अस्वस्थ करणारं आहे. पुष्पाताई सातत्यानं आणि जाणीवपूर्वक, समाजातील वंचित आणि शोषित वर्गाच्या बाजूनं उभ्या राहिल्या. दलित आणि महिलांच्या हक्कांच्या बाबतीतल्या लढायांमध्ये त्यांचं सातत्यपूर्ण योगदान राहिलंय. उत्तर प्रदेशमधील हाथरसची घटना ज्या आठवड्यात घडली, त्याच आठवड्यात पुष्पाताईंचं जाणं मनाला अधिक अस्वस्थ करून गेलं.

रूढ अर्थानं माझा आणि पुष्पाताईंचा थेट संपर्क हा अगदी मर्यादित म्हणावा असा होता. त्यामुळं त्यांच्याविषयी लेख लिहिण्यासाठी विचारलं, त्या वेळी मी थोडा विचारात पडलो होतो. पण, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कामाच्या पाठीराख्या आणि ज्येष्ठ सहकारी म्हणून त्यांचं व्यक्तिमत्त्व जवळून बघण्याची संधी मला मिळाली होती. त्याच संदर्भात पुष्पाताईंचं मला जाणवलेलं वेगळेपण मांडण्याचा हा माझा प्रयत्न आहे.

पुष्पाताईंना आठवताना सगळ्यात अधोरेखित होते ती त्यांची आयुष्यभर महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांशी जोडून घेण्याची आस! एका सुखवस्तू घरात जन्म, प्राध्यापिकेची सन्मानाची नोकरी आणि नाट्यशास्त्रातल्या समीक्षक म्हणून असलेलं प्रस्थापित नाव आणि कर्तृत्व हे किंवा यांसारख्या गोष्टी ज्यांच्याकडं आहेत, अशांमधील बहुतांश लोक हे आत्ममग्न होतात. आपल्या आजूबाजूच्या सामाजिक प्रश्नांशी जोडून घेणं तर दूरची बाब, ते संवदेनशील मनानं समजून घेण्याचे प्रयत्नसुद्धा त्यांच्याकडून होत नाहीत. जगातील सर्व प्रश्नांविषयी त्यांची तज्ज्ञ मतं आपोआपच तयार झालेली असतात आणि ती किती योग्य आहेत हेदेखील ते हिरिरीनं मांडत असतात. सांप्रतकाळी तर अशा लोकांची मोठी गजबज आपल्या आजूबाजूला झालेली आहे. ज्या अस्वस्थ करणाऱ्या कालखंडातून आपण जात आहोत, त्याचं एक महत्त्वाचं कारण ही सामाजिक प्रश्नांविषयी वाचाळ असलेली असंवेदनशीलता आहे. या पार्श्वभूमीवर पुष्पाताईंनी आपल्या आयुष्यात निवडलेला मार्ग समजून घेणं खूपच महत्त्वाचं ठरतं. नामांतराच्या लढ्यात त्यामधील प्रतीकात्मकता मान्य करूनदेखील प्रत्यक्षात घेतलेला सहभाग, ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ या सामाजिक कार्यकर्त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या संस्थेशी आजीवन जोडलेलं राहणं, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात सातत्यानं घेतलेला सक्रिय सहभाग आणि पाठबळ, स्त्री-मुक्ती चळवळ आणि ‘मिळून साऱ्याजणी’शी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध, बाबा आढाव, मेधा पाटकर, नरेंद्र दाभोलकर, उल्का महाजन, सुरेखा दळवी यांच्या चळवळींना त्यांनी दिलेली साथ, असा एक मोठा पट नजरेसमोर येतो.

अत्यंत महत्त्वाचं म्हणजे, या सर्व गोष्टी त्यांची स्वत:ची प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून असलेली जबाबदारी, नाट्य-समीक्षक म्हणून असलेली कारकीर्द आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावत पार पाडल्या. आपल्याकडं सर्वस्व वाहून, स्वत:चं कुटुंब, व्यवसाय, आवडी यांच्याकडं दुर्लक्ष केल्यावरच ‘सामाजिक कार्यकर्ता’ होता येतं, अशी एक धारणा आहे. हे सगळं करणं आपल्याला जमणार नाही म्हणून समाजातले बहुतांश लोक त्यापासून दूर राहतात. काही लोकांच्या अमर्याद त्यागावर आधारित जी सामाजिक बदलाची यंत्रणा आपण समाज म्हणून राबवतो, त्यामधून आजचं वाचाळ, केवळ स्वत:च्या हक्कांविषयी जागरूक असून कर्तव्यांकडं सोईस्करपणे दुर्लक्ष करणारं आणि सामाजिक प्रश्नांविषयी टोकाची असंवेदनशीलता दाखवणारं बहुमत निर्माण होत असतं. ‘सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आणि सातत्यानं कृतिशील नागरिकत्वाचं’ ‘पुष्पा भावे मॉडेल’ म्हणून मला खूपच महत्त्वाचं वाटतं.

हे जमून येण्यासाठी आवश्यक संवेदनशीलता, अभ्यास, कृतिशीलता आणि सातत्य हे सर्व पुष्पाताईंकडं होतंच; पण आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायला पाहिजे ती म्हणजे, त्यांची ‘निर्भयता’. रमेश किणी प्रकरणाचा पाठपुरावा करताना ही निर्भयता त्यांनी दाखवली. आपण ज्या भागात राहतो, त्या भागात दहशत माजवून, हिंसेचा वापर करून राजकीय सत्ता हस्तगत केली जात आहे आणि त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे, हे लक्षात आल्यावर रूढ अर्थानं कोणतंही संघटन सोबत नसताना पुष्पाताई उभ्या राहिल्या! तो लढा आजच्या राज्यसत्तेच्या दमनाच्या विरोधात लढाई करू इच्छिणाऱ्या प्रत्येकानं मुळातून समजून घेतला पाहिजे. ‘लढे आणि तिढे’ या मेधा कुलकर्णी लिखित आणि वैशाली रोडे संपादित पुस्तकातील याविषयीचं प्रकरण मुळातून वाचलं पाहिजे. या सगळ्या लढाईमध्ये जशी पुष्पाताईंची निर्भयता दिसून येते, तशीच एक विवेकशील तटस्थ अलिप्ततादेखील दिसून येते. रमेश किणी प्रकरणात खूप लढाई देऊनही फारसं काही हाती लागलं नाही, हे प्रांजळपणे मान्य करताना त्यांचा हाच गुण आपल्याला दिसून येतो.

सध्या आपल्या सार्वजनिक आयुष्यात मध्यवर्ती झालेल्या ‘देव आणि धर्म’ याविषयी त्यांची आणि महाराष्ट्र 'अंनिस'ची भूमिका एकसारखी होती. देव आणि धर्म स्वीकारणं हा वैयक्तिक प्रश्न असून, त्याच्या नावावर जर कोणी लोकांचं शोषण करीत असेल, तर त्याला विरोध केला पाहिजे, या घटनात्मक भूमिकेशी त्या कायम ठाम राहिल्या. त्यामुळं ‘अंनिस’ची अनेक शिबिरं, कार्यक्रम यांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला. शनी शिंगणापूरच्या आंदोलनात त्यांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर, श्रीराम लागू, एन. डी. पाटील, बाबा आढाव यांच्यासोबतीनं सक्रिय सहभाग होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे महाराष्ट्रातील संत आणि समाज सुधारकांचा वारसा पुढं नेण्याचं एक काम आहे, ही भूमिका त्या सातत्यानं मांडत. प्रत्येकाला देव आणि धर्माची गरज असेल असं नाही; पण एखादी व्यक्ती ही मानसिक आधार म्हणून किंवा अधिक चांगल्या वर्तनाची प्रेरणा घेण्यासाठी भक्ती करीत असेल, तर त्याला आपण विरोध करू नये, (हा देखील त्यांच्या भूमिकेचा अंनिसच्या वैचारिक भूमिका जडणघडणीमध्ये वाटा होता.) ऑगस्ट २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा पुण्यात निर्घृण खून झाला. त्या घटनेचा पुष्पाताईंना मोठा धक्का बसला होता. वयानं लहान असलेल्या या सहकाऱ्याकडून मी खूप गोष्टी शिकले आहे, असं त्या अनेक वेळा म्हणत असत. एवढ्या सरळ आणि विरोधकांशी संवादाला कायम तयार असलेल्या माणसाचा महाराष्ट्रात कसा काय खून होऊ शकतो, असा प्रश्न अनेक वेळा त्या खासगी संभाषणात उद्विग्नपणे विचारात असत. माझी आई शैला दाभोलकर आणि पुष्पाताईंची चांगली दोस्ती होती. नरेंद्रचे मारेकरी समोरून आले असते, तर त्यानं नक्की काही तरी करून स्वत:ला वाचवलं असतं, असं त्यांचं दोघींचं बोलणं ऐकल्याचं मला आज आठवतंय. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर भविष्यातील कामांबाबत आणि तपासामधील दिरंगाईच्या विरोधात करायच्या आंदोलनाच्या सुरुवातीच्या काही बैठकांना त्या आवर्जून उपस्थित असत. आपण करीत असलेले सर्व प्रयत्न हे राज्यघटनेच्या चौकटीतील असले पाहिजेत, हा त्यांनी आयुष्यभर जपलेला आग्रह या लढाईमध्येदेखील कायम होता. नंतर जसं त्यांचं आजारपण वाढत गेलं, तसा त्यांचा सार्वजनिक वावर कमी होत गेला; पण शेवटपर्यंत त्या आपली सामाजिक संवेदनशीलतेची भूमिका शक्य त्या सर्व पातळ्यांवर निभावत राहिल्या.

पुष्पाताईंचं मोठेपण असं, की आपण एखाद्या विचारानं कार्यक्रमाशी बांधील राहिलो म्हणून त्यांनी त्या कामातील त्रुटींकडं दुर्लक्ष केलं असं होत नसे. सौम्य भाषेत योग्य व्यक्तीला या गोष्टी सांगण्याकडं त्यांचा कायम कल राहिला होता. आणीबाणीचा कालखंड, जनता दलाचा अनुभव याविषयी त्यांनी मांडलेल्या भूमिकादेखील अशाच मुळातून समजून घेण्यासारख्या आहेत. आयुष्यात मिळालेल्या मान-सन्मानांकडं एका तटस्थतेनं बघण्याचं त्यांचं कौशल्य सर्वांनी अंगीकारावं असं होतं. राजश्री शाहू पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, मी सामाजिक कामाशी आयुष्यभर संबंधित आहे; पण मी काही पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ती नाही, असे पुरस्कार हे पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्त्यांना दिले गेले पाहिजेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. अनंतराव भावे यांची सार्थ सोबत या प्रवासातील एक मोठा महत्त्वाचा भाग. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी आयुष्यभर जोडलेल्या सुहृदांनी त्यांची सोबत केली. या कालखंडात आपण त्यांना हवं तितकं भेटू शकलो नाही, याची खंत आणि हुरहूर मनात कायम राहील. पण, तेदेखील पुष्पाताईंच्या विवेकी तटस्थ अलिप्ततेनं स्वीकारता यायला पाहिजे, असा मी प्रयत्न करीत आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपास जन्मलेल्या आणि स्वातंत्र्य आलं तरी आपल्या समाजाच्या जगण्यामधील अनेक प्रश्न सुटलेले नाहीत, या जाणिवेनं अस्वस्थ झालेल्या पिढीच्या पुष्पाताई प्रतिनिधी होत्या. आजच्या मिलेनियल पिढीला तर त्या खूप दूरच्या वाटू शकतात. पण वस्तुस्थिती अशी, की ज्या स्वरूपाची देशाच्या उभारणीची आव्हानं पुष्पाताईंच्या पिढीच्या समोर होती, त्याच स्वरूपाची आव्हानं आजच्या युवांच्या समोर आहेत. त्यांच्या आश्वस्त करणाऱ्या अस्तित्वातून आपल्याला धीर देण्यासाठी आज पुष्पाताई नाहीत. पण, त्यांनी त्यांच्या आयुष्यभर निष्ठेनं जगलेलं ‘संवेदनशील आणि जागरूक नागरिकत्वाचं’ हे ‘ पुष्पा भावे मॉडेल’ आपल्याला कायम प्रेरणा देत राहील...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com