बकिंगहॅम पॅलेसमधलं बंड (हेमंत देसाई)

hemant desai
hemant desai

ब्रिटनच्या राजघराण्याचा त्याग करण्याचा धाडसी निर्णय राजपुत्र हॅरी आणि मेगन मर्केल यांनी घेतल्यामुळे जगभर खळबळ माजली आहे. एकीकडे युवराज्ञी डायना यांच्या दुर्दैवी मृत्यूचं सावट, माध्यमांचा ससेमिरा आणि त्याच वेळी राजघराण्यातली गुंतागुंत या सगळ्या पार्श्वभूमीवर हॅरी आणि मेगन यांच्या निर्णयाला महत्त्व आहे. हॅरी आणि मेगन यांच्या या बंडखोर पवित्र्यामागचा खरा ‘अर्थ’ काय, त्याचे कोणते परिणाम या दाम्पत्याला भोगावे लागतील, ते पुढं काय करू शकतात, इतर काय पडसाद उमटतील आदी गोष्टींचा वेध.

अनेक वर्षांपूर्वी ब्रिटिश राजघराण्यातल्या अत्यंत मोहक व्यक्तिमत्त्वाच्या युवराज्ञी डायना यांचा अपघाती मृत्यू झाला होता आणि त्यास पॅपाराझींना जबाबदार ठरवण्यात आलं होतं. इटालियन दिग्दर्शक फेलिनीच्या ‘ला डोल्च व्हिटा’ या चित्रपटातल्या छायाचित्रकाराचं ‘पॅपाराझो’ असं नाव होतं आणि त्यावरूनच सेलिब्रिटींच्या खासगी जीवनातली दृश्यं टिपणाऱ्या छायाचित्रकारांना ‘पॅपाराझी’ असं म्हटलं जाऊ लागलं. ‘ल माँद’ या जगद्विख्यात फ्रेंच वृत्तपत्राला डायना यांनी दिलेल्या मुलाखतीत सतत पाठलाग करणाऱ्या वार्ताहरांबद्दलची त्यांची तक्रार आणि संताप प्रकट झाला होता. पाठलाग करणाऱ्या पॅपाराझींपासून डायना यांला सुटका हवी होती; परंतु त्यांचे व्यायाम करतानाचेही फोटो प्रसिद्ध करण्यात आले. अपघातानंतरही त्या आपल्या मदतीसाठी याचना करत होत्या; परंतु त्यांच्या साह्याला धावून जाण्याऐवजी, पॅपाराझी गँग त्यांचे मृत्यूपूर्वीचे अखेरचे क्षण टिपण्यात मग्न होती. त्याकाळी जर मोबाईल असते, तर डायना यांची खूपच सतावणूक झाली असती. आज ब्रिटिश राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मार्कल यांच्यावरही अशीच वेळ आली आहे. ते एका उद्यानात निवांत क्षण घालवत असतानाचे फोटो प्रसारमाध्यमांनी छापले. त्यानंतर अशी छायाचित्रं प्रसिद्ध केल्यास, कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा या दाम्पत्यास द्यावा लागला...

ब्रिटनच्या सध्याच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे राजपुत्र चार्ल्स. अनेक वर्षांपूर्वी चार्ल्स हे भारत भेटीवर आले होते, तेव्हा त्यांनी मुंबईसही भेट दिली होती. त्यावेळी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी घेतलेलं त्यांचं चुंबन वृत्तपत्रांतून गाजलं होतं. चार्ल्स यांचा मोठा मुलगा म्हणजे राजपुत्र विल्यम. त्यांचा थोरला मुलगा म्हणजे सहा वर्षांचा जॉर्ज. या राजघराण्यातल्या सन्मानपदांची ही उतरंड आहे. अशा परिस्थितीत विल्यमचा धाकटा बंधू राजपुत्र हॅरी याला राजघराण्यात मुख्य स्थान लाभणार नव्हतंच. शिवाय या दोन भावांचे संबंध तणावपूर्ण बनले होते. हॅरी आणि त्याची पत्नी मेगन म्हणजे ‘ड्यूक अँड डचेस ऑफ ससेक्स’ होत. हॅरी हा हेलिकॉप्टर वैमानिक आहे, तर मेगन अमेरिकन टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेगनची आई आफ्रिकन-अमेरिकन वंशाची आहे. त्यामुळे मेगनसारखी स्त्री राजघराण्यात यावी का, अशी वंशवादी टीकाही ब्रिटिश माध्यमांतून येऊ लागली होती. प्रसारमाध्यमांनी हॅरीच्या आईचे, म्हणजेच डायना यांचं जीवन खरवडून काढलं आणि आता मेगनच्या मागंही माध्यमं हात धुवून लागली आहेत. बकिंगहॅम पॅलेसच्या आत संशय, मतभेद यामुळे श्वास गुदमरत होता आणि बाहेर माध्यमांची डोमकावळेगिरी सुरू होती आणि आहे. अशा वेळी राजघराण्याचा त्याग करण्याचा धाडसी निर्णय हॅरी आणि मेगन यांनी घेतल्यामुळे जगभर खळबळ माजली.

बहुसंख्यांना वाटतं, की मोठमोठ्या बंगल्यांत किंवा प्रासादांत राहणारे लोक सुखी असतात; परंतु अनेकदा ते तसं नसतं. सत्यजित राय यांच्या ‘चारुलता’मधली नायिका श्रीमंती हवेलीत वेळ जात नसल्यामुळे खिडकीबाहेरच्या जगाकडे बघत असते. तेवढाच तिचा बाहेरच्या जगाशी संबंध...हॅरी आणि मेगनला तर राजघराण्यातल्या शिष्टाचारांच्या दडपणाखाली जगण्याचा कंटाळाच आला होता. याखेरीज दिखाऊ चॅरिटीचं काम करत राहावं लागत होतं. त्यातला पोकळपणा आणि राजघराण्यातली व्यक्ती म्हणून जगण्याचं दडपण यांचा उभयतांना उबग आला होता. ‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’ अशी त्यांची भावनावस्था होती. अर्थात दोघांनी बकिंगहॅम पॅलेसबाहेर पाऊल टाकलं, म्हणजे ते लगेच कंगाल होणार आहेत (द प्रिन्स अँड द पॉपर-मार्क ट्वेन), असं बिलकुल नाही. कारण हॅरीला आईची मालमत्ता मिळाली आहे. मात्र, उत्पन्नापैकी पाच टक्के मिळणारा सरकारी तनखा आणि बाकीची ९५ टक्के रक्कम पित्याकडून मिळत होती. भविष्यकाळात त्यांना ती मिळणार नाही. उभयतांचा सुपुत्र आर्ची यालाही राजघराण्याचं वलय लाभणार नाही.
एकीकडे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे ब्रेक्झिटचा निर्णय राबवण्यासाठी शर्थ करत आहेत, तर शाही घराण्यातून निवृत्ती पत्करण्याचं हॅरी आणि मेगन यांनी जाहीर केल्यानंतर, ‘मेक्झिट’ हा शब्द तयार झाला आहे. आपण हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला असल्याचं स्पष्ट करतानाच, भविष्यात राणी एलिझाबेथ यांना आमचा पाठिंबाच राहील, असं त्यांनी घोषित केलं.

राजपुत्र विल्यमची पत्नी कॅथरिन एलिझाबेथ मिडल्टन ही ‘डचेस ऑफ केंब्रिज’ आहे. स्कॉटलंडमधल्या सेंट अँड्र्यूज विद्यापीठात शिकत असताना सन २००१ मध्ये तिची विल्यमशी ओळख झाली. सन २०११ मध्ये दोघांचा विवाह वेस्टमिन्स्टर अॅबे इथं झाला. लहान मुलं, व्यसनाधीनता, कला, आदी क्षेत्रांत ती समाजकार्य करते. कॅथरिन फॅशन जगतातही लोकप्रिय असून, ब्रिटन आणि अमेरिकेतील या जगतावरचा ‘केट मिडल्टन इफेक्ट’ प्रसिद्ध आहे. ‘टाइम’ या नियतकालिकानं २०१२ आणि १३ मध्ये जगातल्या शंभर सर्वांत प्रभावशाली व्यक्तींमध्ये कॅथरिनचा समावेश केला होता. परंतु मेगन आणि कॅथरिन यांचे संबंधही बरे नव्हते, असं बोललं जातं. ब्रिटनमध्ये आठव्या एडवर्डनं घटस्फोटित अमेरिकन स्त्रीशी लग्न करण्याकरिता सिंहासनाचा त्याग केला होता. असो.

‘सुट्स’ या अमेरिकन न्यायालयीन पार्श्वभूमीवरच्या गाजलेल्या मालिकेतली रॅशेल झेन ही मेगननं साकारलेली भूमिका गाजली होती. तिनं चित्रपटांतही भूमिका केल्या आहेत. मेगन ही स्पष्टवक्ती अशी स्त्रीवादी व्यक्ती असून, स्त्री-पुरुष असमानतेशी निगडित प्रश्नांबाबत ती सक्रिय असते. ‘द टिग’ नावाची तिची लाइफस्टाइल वेबसाइट प्रसिद्ध असून, त्यातला प्रभावशाली स्त्रियांवरचा स्तंभ गाजला आहे. मेगनचा विवाह सन २०११ मध्ये अभिनेते आणि निर्माते टेव्हर एंगल्सन यांच्याबरोबर झाला; पण दोन वर्षांतच ते विभक्त झाले. २०१७ मध्ये मेगननं राजपुत्र हॅरीशी आपला वाङ्‌निश्चय झाल्याचं जाहीर केलं आणि ती अमेरिकेतून लंडनला येऊन स्थायिक झाली. मेगननं अभिनयाला सोडचिठ्ठी दिली. हॅरीशी विवाह झाल्यानंतर मेगन ‘डचेस ऑफ ससेक्स’ झाली आणि राजघराण्यातल्या सदस्याच्या सार्वजनिक जबाबदाऱ्या पार पाडू लागली. एका आम आदमीच्या घरातली घटस्फोटित मुलगी राजघराण्यात आली.

भारतात सन १९४७ नंतर संस्थानं विलीन झाली. सन १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांचे तनखे बंद करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. मात्र, दीडशे वर्षं भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनमध्ये हे तनखे ‘सॉव्हरिन ग्रँट’ या नावानं सुरू आहेत. राजघराण्याचा खर्च तिथल्या सर्वसामान्य जनतेच्या खिशातून चालवला जातो. हॅरी आणि मेगन यांचं विंडसर इस्टेटमध्ये नवं घर होतं आणि त्याचा खर्च करदात्यांच्या पैशातूनच करण्यात आला होता. भारतात राजेशाही संपुष्टात आली असली, तरी राजेपदाचा फायदा अजूनही घेतला जातो आणि तो घेताना राजकीय पक्षांनाही त्याबद्दल भूषण वाटतं.

ब्रिटनच्या घटनेनुसार तिथलं राजेपद हे आता केवळ शोभेचं आहे. महाराणी व्हिक्टोरियाच्या नेतृत्वाखाली (१८१९-१९०१) इंग्रजांचं साम्राज्य जगभर पसरलं. ‘इंग्रजी साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नव्हता,’ हे वाक्य शाळकरी मुलांनाही तोंडपाठ असतं. या राणीच्याच काळात ब्रिटन हे औद्योगिक आणि प्रगत राष्ट्र म्हणून पुढं आलं. विशेष म्हणजे, त्यांच्याच कारकिर्दीत तिथली लोकशाही प्रगल्भ झाली. महाराणी व्हिक्टोरिया ही इसवीसन १८३७ पर्यंत ब्रिटनच्या सिंहासनावर आरुढ असलेल्या चौथ्या विल्यमची पुतणी होती. विल्यमचं १८३७ मध्ये देहावसान झालं आणि व्हिक्टोरिया वयाच्या अठराव्या वर्षी इंग्लंडची राणी झाली आणि व्हिक्टोरियन युग सुरू झालं. त्याआधी त्या देशात राजेशाहीचं प्रभुत्व होतं. त्यानंतरच्या काळात मात्र संसदीय लोकशाही अस्तित्वात आली. याचा अर्थ, पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाचं महत्त्व वाढलं आणि राजा वा राणीला तसा काही अधिकार राहिला नाही. भारतावरच्या ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व कमी करून, इंग्लंडच्या संसदेनं भारत आपल्या कब्जात आणला. सन १८३३च्या पुढे ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी मक्ता निकालात काढण्यात येऊन, इंग्लिश जनतेला व्यापार खुला करण्यात आला. १८५७चं स्वातंत्र्यसमर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धचं सार्वत्रिक बंडच होतं. बदलते वारे लक्षात घेऊन, लॉर्ड कॅनिंगनं ही कंपनी बरखास्त करून भारत हे ब्रिटिश साम्राज्यातलं एक राज्य बनवलं. या राज्याची सम्राज्ञी राणी व्हिक्टोरिया आहे, असं जाहीर करून तिच्या नावाचा जाहीरनामाही प्रसारित करण्यात आला. साहित्य, संगीत वगैरे कलांमध्येही बदल घडू लागले. कादंबरी हा फॉर्म महत्त्वाचा बनला. औद्योगिक क्रांतीमुळे सामाजिक कादंबरी हा प्रकार रुजू लागला. एकूणच कलाव्यवहारांत बदल झाले. राणी व्हिक्टोरियाच्याच कालखंडातच दक्षिण आफ्रिका, इजिप्त वगैरे देश वसाहतीच्या साम्राज्याखाली आले होते.

हा सर्व इतिहास समजून घेतल्याशिवाय सध्याच्या घटनांचा अन्वयार्थ नीटपणे लागणार नाही, म्हणूनच हा प्रपंच. हॅरी आणि मेगन यांनी कॅनडामधल्या व्हँकुअर बेटावर आपल्या नव्या आलिशान घरात नव्यानं आयुष्याची सुरुवात केली आहे. माध्यमांच्या ससेमिऱ्याबद्दल गेल्या वर्षीही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि आता तर मेगन मुलगा आर्चीबरोबर आपल्या श्वानांना हिंडवत असल्याचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर, वकिलांमार्फत त्यांनी माध्यमांना कायदेशीर इशाराच दिला आहे. ‘सन’ आणि ‘डेली मेल’ या वर्तमानपत्रांनी ही छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत. झाडाझुडपांमागे लपून गुपचुपपणे हे फोटो काढण्यात आले. अर्थातच त्यासाठी या दाम्पत्याची परवानगीही घेण्यात आली नव्हती. कॅमेऱ्याच्या लाँग लेन्सेस वापरून त्यांच्या नव्या घरातले फोटोही काढण्याचा प्रयत्न झाला. पॅपाराझींनी तर त्यांच्या घराजवळ तळच ठोकला आहे. कॅनडात वृत्तपत्रस्वातंत्र्य आहे. जोपर्यंत या दाम्पत्याची कायदा मोडून सतावणूक होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे कर्तव्य बजावणारच. कारण त्यांच्या खासगी जीवनात लोकांनाच रस आहे, असा माध्यमांचा युक्तिवाद आहे. आपला खप आणि टीआरपी यापलीकडे काहीएक न पाहणारी माध्यमं किती बेफाम झाली आहेत, हे पाश्यात्त्य देशांतच नव्हे, तर भारतातही पाहायला मिळतं.

हॅरी आणि मेगनच्या विंडसरमधल्या घराचं नूतनीकरण झालं असून, त्याचा तीस लाख डॉलर्स इतका खर्च त्यांना परत फेडावा लागणार आहे. आपल्या वेबसाइटसाठी आणि ब्रँडिंगकरिता ते ‘ससेक्स रॉयल’ हे टायटल यापुढेही वापरणार आहेत का याबाबतचा; तसंच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था याबाबतचा तपशील अद्याप स्पष्ट व्हायचा आहे. परंतु, त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा खर्च करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटलं आहे. हॅरी आणि मेगननं राजघराण्यातून बाहेर पडण्यासाठीच्या औपचारिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ‘हिज अँड हर रॉयल हायनेस’ (एचआरएच) या किताबांचा त्यांना त्याग करावा लागणार आहे. हे दाम्पत्य यापुढे अधिकृतरीत्या राणीचं प्रतिनिधित्व करणार नाही. अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर बकिंगहॅम पॅलेसनं तयार केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की ‘हे निवेदन आपला नातू आणि त्याचं कुटुंब यांच्यासाठी सकारात्मक आणि आधार देणारं आहे, असं राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सांगितले आहे.’ हॅरी, मेगन आणि आर्ची हे कायमच माझ्या कुटुंबाचे लाडके सदस्य असतील, असं ९३ वर्षीय राणीनं आपल्या व्यक्तिगत निवेदनात म्हटलं आहे.

आपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आहे, अशी इच्छा हॅरी आणि मेगनन यांनी जाहीरपणे प्रदर्शित केली आहे. कुठल्याही सामान्य कुटुंबातल्या तरुण दाम्पत्याला असं वाटू शकतं. आतापर्यंत त्यांच्या वार्षिक उत्पन्नातला ९५ टक्के भाग हा प्रिन्स चार्ल्स यांच्याकडूनच डची ऑफ कॉर्नवॉलकडूनच येतो. या ट्रस्टकडे ब्रिटनमधली १ लाख ७१ हजार एकर इतकी जमीन आहे आणि ४५ कोटी डॉलर्स इतक्या व्यापारी मालमत्ता आहेत. घराण्याच्या वारसाला आधार देण्यासाठी सन १३३७ मध्ये हा ट्रस्ट स्थापन झाला. सन २०१९ च्या ताज्या अहवालनुसार, या रिअल इस्टेटमधून गेल्या वर्षी ड्युक अँड डचेस ऑफ केंब्रिजला (युवराज विल्यम आणि केट मिडल्टन) आणि राजपुत्र हॅरी व मेगन यांना मिळून ६५ लाख डॉलर्स देण्यात आले.

सॉव्हरिन ग्रँट नाकारल्यामुळे हॅरी-मेगन यांचं उत्पन्न कमी होणार, हे स्पष्टच आहे. या ग्रँटमुळे रॉयल ऑफिशियल ड्युटीजच्या माध्यमातून त्यांना अतिरिक्त पाच टक्के उत्पन्न मिळत होतं. यामध्ये आंतरराष्ट्रीय दौरे, अधिकृत कार्यक्रमांसाठीचे प्रवास, त्यांचं घर आणि कार्यालय यांच्या देखभालीसाठीचा खर्च वगैरेंचा समावेश होत होता. त्यातला २५ टक्के खर्च हा क्राउन इस्टेटमधल्या उत्पन्नातून भागवला जातो. शिवाय राजघराण्याच्या नियंत्रणांखालच्या संस्थांमार्फत पोर्टफोलिओ गुंतवणुकीतलं उत्पन्न मिळतं. तसंच देशभर विखुरलेल्या मालमत्तांमधूनही काही ना काही महसूल मिळत असतो.

मागच्या दोन वर्षांत हॅरी आणि मेगन यांनी सॉव्हरिन ग्रँटमधूनच फिजी आणि दक्षिण आफ्रिकेचा अधिकृत शाही दौरा केला होता. फिजी आणि टोंगाच्या दौऱ्यावरच एक लाख पाच हजार डॉलर्स इतका खर्च झाला. जहागिरी आणि तनख्यांमधून मिळून या दाम्पत्याकडे तीस लाख डॉलर्स इतका निधी येत असावा, असा अंदाज आहे. यात सुरक्षेवरचा खर्च अंतर्भूत नाही. हॅरी आणि मेगन यांच्या नावाला मार्केट व्हॅल्यू आहे आणि म्हणूनच सेलिब्रिटी एन्डॉर्सेमेंट्समध्ये त्यांना चांगला भाव असेल. या दोघांचीही व्यापाराची जाण चांगली आहेच. हॅरी आणि त्याच्या भावाला आईकडची तीन कोटी पंधरा लाख रुपयांची संपत्ती मिळाली होती, तर फोर्ब्जच्या अंदाजानुसार, मेगनकडे मालिकांमधील वगैरे मिळून एकूण २२ लाख डॉलर्स इतकी संपत्ती आहे. कदाचित ते दोघं मनोरंजन आणि माध्यमक्षेत्रातही काही व्यवसाय-उद्योग करू शकतात, असा होरा आहे. ‘सुट्स’च्या एकेका एपिसोडसाठी मेगन ८५ हजार डॉलर्स मिळवत होती. शाही घराण्याचं ओझं अंगावर नसल्यामुळे ती पुन्हा अभिनयाकडे वळू शकते. पुस्तक लिहून वा भाषणं देऊनही हे दाम्पत्य भरपूर कमाई करू शकतं. आज क्लिंटन पती-पत्नी भाषणं देऊन उत्तम पैसे कमावत आहेत. सन २०१४ ममध्ये हिलरी क्लिंटन यांना ‘हार्ड चॉइसेस’बद्दल एक कोटी ४० लाख डॉलर्सची आगाऊ रक्कम मिळाली होती. २०१७ मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी पेंग्विन रँडम हाउसशी पुस्तक लिहिण्यासाठी साडेसहा कोटी डॉलर्सचा करार केला, तर ब्रुस स्प्रिंग्स्टीन या अमेरिकन गायक आणि गीतलेखकाला चार वर्षांपूर्वी ‘बॉर्न टू रन’करिता एक कोटी डॉलरची रक्कम आगाऊ स्वरूपात मिळाली होती. हॅरी आणि मेगन पॉडकास्ट सुरू करूनही चांगल्यापैकी पैसे मिळवू शकतात. गेल्या वर्षी पॉडकास्टवर ६८ कोटी डॉलर्स इतका जाहिरात खर्च वेगवेगळ्या कंपन्यांनी केला, असं प्राइस वॉटरहाउस कूपर्सचा अहवालच सांगतो. ड्युक अँड डचेसच्या इन्स्टाग्राम अकाउंटचे एक कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यावरच्या स्पॉन्सर्ड कंटेटवरही त्यांना अर्थप्राप्ती करता यऊ शकेल. किम करर्दाशियां वेस्ट आणि कॅली जेन्नेर या सेलिब्रिटीज प्रत्येक पोस्टमागे पाच लाख डॉलर्स कमावत आहेत. हॅरी आणि मेगन यांना एचआरएच हा किताब राखून ठेवता येईल, फक्त त्याचा वापर करता येणार नाही. तात्त्विकदृष्ट्या याचा अर्थ असा, की उद्या त्यांचा विचार बदलला, तर त्यांना आपल्या शाही भूमिका पुन्हा घेता येतील.

हॅरी आणि मेगन महालाबाहेर पडले, तरी त्यांच्याभोवतीचं वलय कायमच राहणार आहे. फक्त सवयीची विलासी जीवनशैली कायम ठेवण्यासाठी त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवावं लागेल. काही झालं, तरी हे ‘प्रिव्हिलेज्ड कपल’च आहे; परंतु वंश आणि पुरुषद्वेष्ट्या समाजाकडून मेगन मार्कलला वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. या सगळ्याशी मुकाबला करणाऱ्या मेगनबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, अशी भावना राणी एलिझाबेथ यांनी व्यक्त केली आहे. ब्रिटिश राजघराण्यातली मागची पिढी अस्ताकडे जात आहे आणि तरुणांमध्ये ज्यांची क्रेझ आहे, ते सदस्य राजघराण्यापासून दूर जात आहेत. मुळात अनेक देशांमध्ये आधुनिक जगाशी सुसंगत इतपतच राजघराण्यांचं महत्त्व ठेवण्यात आलं आहे. शेवटी भूतकाळातल्या कर्तृत्वाच्या बळावरच हा राजेशाही इमला उभा असतो. लोकशाही, उदारीकरण, विकेंद्रीकरण, पारदर्शकता, स्पर्धाशीलता हीच खरी आधुनिक मूल्यं आहेत. अशा काळात राजे आणि राण्यांना सेलिब्रिटीजपलीकडे नसतं महत्त्व देण्याचं कारण नाही. तरीसुद्धा एका मर्यादेपलीकडे शाही जीवन चघळलं जातं.
‘रोमन हॉलिडे’ या चित्रपटात राजकन्या ॲनला शाही सोहळ्यांचा, औपचारिक वागण्याचा आणि दैनंदिन चाकोरीचा वीट येतो. आयुष्यात मनसोक्त जगण्याचा आनंद घेता येत नाही. मग ती सरळ एक दिवस उठून खिडकीतून उडी मारून शाही हवेलीबाहेर पडते. सामान्य व्यक्तीप्रमाणं ती भटकते, लोकांशी मैत्री करते; पण अखेरीस पुन्हा आपल्या जुन्या चाकोरीत तिला परतावंच लागतं. हॅरी-मेगन यांचं मात्र तसं नाही. त्यांनी हा निर्णय कायमसाठी घेतला आहे. त्यांच्यासाठी हा ‘हॉलिडे’ नाही. त्यांच्या या धीट निर्णयाचं मनापासून स्वागत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com