‘मिग’च्या निर्मात्याच्या गावात (जयप्रकाश प्रधान)

jaiprakash pradhan
jaiprakash pradhan

भारतीय हवाई दलात तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावलेली मिग विमाने आता यापुढे हवाई दलाच्या सेवेत नसतील. तशी घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. कारगिलयुद्धातही या विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या विमानांची निर्मिती ज्यांनी केली ते अर्तेम मिकोयान यांच्या जन्मगावाच्या भेटीवर आधारित हा लेख...

भारतीय हवाई दलात मोलाची कामगिरी बजावून अखेरची भरारी घेतलेल्या ‘मिग’ विमानांची निर्मिती करणाऱ्या अर्तेम मिकोयान (Artem Mikoyan) यांच्या जन्मगावालाच भेट देण्याचा योग नुकताच आला. अर्तेम आणि त्यांचे मोठे बंधू अनास्तस (Anastas) मिकोयान हे दोघंही अत्यंत कर्तृत्ववान. अर्मेनिया देशात अलाव्हेरडीजवळ ‘सनाहिन’ हे त्यांचं जन्मगाव. तिथं त्या दोघांच्या नावाचं म्युझियम असून म्युझियमच्या प्रवेशद्वारातच मिकोयान यांनी तयार केलेलं ‘मिग-२१’ हे फायटर विमान ठेवण्यात आलं आहे. मिकोयान यांच्या कर्तृत्वाची सारी कहाणीच तिथं प्रत्यक्ष पाहायला- ऐकायला मिळाली. अर्मेनिया हा दक्षिण कॉकेशस पर्वतराजीमधला अगदी छोटा देश. लोकसंख्या जेमतेम ३३ लाख. क्षेत्रफळ २९ हजार ८०० चौरस किलोमीटर आणि राजधानीचे शहर ‘येरेव्हान’. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधल्या १५ राष्ट्रांमध्ये अर्मेनियाचा समावेश होता; पण १९९१ मध्ये सोव्हिएत युनियनचं साम्राज्य कोसळलं आणि काही प्रजासत्ताकांप्रमाणे अर्मेनियाही स्वतंत्र प्रजासत्ताक झालं. पर्यटनासाठी अर्मेनिया भारतात फारसं परिचित नाही; पण रशिया तसेच युरोपमधल्या विविध देशांमधले पर्यटक इथं मोठ्या प्रमाणात येतात.

आम्ही पती-पत्नी अर्मेनियात १२ दिवसांची भटकंती केली आणि खूप काही आगळंवेगळं आम्ही तिथं पाहू शकलो. राजधानीच्या येरेव्हानपासून १२० किलोमीटर अंतरावर लोरी विभागातल्या आलाव्हेरडी गावाला व परिसराला भेट देण्यासाठी मुद्दाम गेलो. तिथल्या ‘सनाहिन’ (Sanahin) गावात जन्मलेल्या दोन भावांनी केवळ सोव्हिएत युनियनमध्येच बदल घडवला असं नाही तर साऱ्या जगाच्या इतिहासाला एक वेगळं वळण लावण्यास हातभार लावला. त्यातल्या थोरल्या भावाचं नाव अनास्तस मिकोयान व धाकटा अर्तेम मिकोयान. या दोन्ही भावांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारं ‘द मिकोयान ब्रदर्स म्युझियम’ हे अलाव्हेरडी इथं उभारण्यात आलं असून, आम्ही म्युझियमला आवर्जून भेट दिली. या दोन्ही भावांच्या कर्तृत्वाचा आलेख तोंडात बोट घालायला लावणारा आहे. अर्तेम मिकोयान यांचा जन्म ता. ५ ऑगस्ट १९०५ रोजी सनाहिन या गावात झाला. ते अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि तंत्राविषयी त्यांना अगदी सुरुवातीपासून आवड होती. त्यांनी लहानपणी सनाहिन गावाच्या मोकळ्या जागेत एक विमान आणीबाणीच्या परिस्थितीत उतरताना पाहिलं आणि तेव्हापासून ते विमानाच्या प्रेमातच पडले. त्यांनी पहिलं विमान सन१९३६ मध्ये तयार केलं. पुढं त्यांनी व गुरेविच (Gurevich) या दोघांनी मिळून ‘मिकोयान-गुरेविच डिझाईन ब्यूरो’ स्थापन केला आणि रशियाच्या ऐतिहासिक फायटर विमानांचं डिझाईन त्यांनी तयार केलं. त्यामुळे दोघांच्याही आडनावांची पहिली अक्षरं घेऊन ती विमानं ‘मिग’ या नावानं ओळखली जाऊ लागली. तसं नाव त्यांना देण्यात आलं. त्यांनी बरीच विमाने तयार केली; पण ‘मिग-२१’ ही त्यांची मोठी कामगिरी. या काळात अर्तेम मिकोयान यांनी फार मोठं नाव मिळवलं. अनेक सन्मानांचा त्यांच्यावर वर्षाव झाला. त्यांचं निधन सन १९७० मध्ये झालं. सनाहिन या जन्मगावी उभारण्यात आलेल्या म्युझियमचं उद्‌घाटन सन २०१७ मध्ये करण्यात आले. तिथं अगदी प्रवेशद्वारातच मिकोयान यांनी तयार केलेलं ‘मिग-२१’ हे फायटर विमानच प्रत्यक्ष ठेवण्यात आलेलं आहे. मिकोयान यांनी तयार केलेली अन्य काही मिग विमानांची मॉडेल्स म्युझियममध्ये पाहायला मिळतात, तसेच अर्तेम त्या काळी जी ‘ZIL’ ही सोव्हिएत रशियाच्या सरकारची मोटार वापरायचे, तीही समोर दिसते. तसेच त्यांचा जन्म ज्या घरात झाला व जिथं त्यांनी बालपण घालवलं त्या घराचं मॉडेल इथं ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या वैयक्तिक वस्तूंबरोबरच एक पाळणाही ठेवलेला आढळतो. अर्तेम आणि अनास्तस यांचे वडील जॉन यांनी आपल्या स्वत:च्या हातांनी तो लाकडाचा पाळणा तयार केला होता आणि ते त्या दोघा मुलांना त्यात झोका देत असत. अर्तेम यांचे वडीलबंधू अनास्तस मिकोयान हे सोव्हिएत पॉलिट ब्यूरोमध्ये सदस्य म्हणून सर्वात जास्त कालावधी राहिले. स्टॅलिनच्या सुरुवातीच्या काळापासून क्रुश्र्चेव्ह, ब्रेझनेव्हपर्यंत ते या पदावर होते. स्टॅलिनच्या काळात तर कोणतेही वाद न होता राहणं अगदी अशक्यच होतं. खरं पाहता त्यांचं पूर्वायुष्य या खेड्यात अगदी साधेपणानं गेलेलं. अशाही परिस्थितीत क्रुश्र्चेव्ह यांच्या काळात तर त्यांचे स्थान क्रुश्र्चेव्ह यांच्यानंतर म्हणजे क्रमांक दोनचे होते. या अत्यंत कर्तृत्ववान व्यक्तीनं सन १९६१ मध्ये फार मोठी कामगिरी बजावली आणि साऱ्या जगाला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवलं. तेव्हा क्यूबाच्या प्रश्‍नावरून अमेरिका व रशिया या दोन महासत्तांमध्ये फार मोठा तणाव निर्माण झाला होता आणि या दोन्ही बलाढ्य राष्ट्रांमध्ये संघर्ष म्हणजे तिसरे महायुद्ध अटळ असं मानण्यात येत होतं. ते झालं असतं तर फार मोठा विध्वंस झाला असता. तेव्हा क्यूबाचे प्रमुख फिडेल कॅस्ट्रो यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी रशियाचे पहिले डेप्युटी प्रीमिअर अनास्तस मिकोयान गेले होते. वाटाघाटी अत्यंत कठीण अवस्थेत होत्या; पण मिकोयान यांनी त्या यशस्वी केल्या आणि तिसऱ्या महायुद्धाच्या संकटातून साऱ्या या जगाला वाचविणारा वीर म्हणून त्यांचा गौरव झाला. त्याच वेळची त्यांची आणखी एक आठवण त्यांच्या या गावातच समजली. कॅस्ट्रोबरोरब चर्चेच्या फेर्‍या चालू असतानाच मिकोयान यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पत्नीचं येरेव्हान इथं निधन झालं. तिच्या अंत्यविधीसाठी त्वरित येण्यास त्यांना तारेनं कळवण्यात आलं. त्यावर मिकोयान यांनी असे कळविले, की ‘इथल्या वाटाघाटी फार नाजूक अवस्थेत आहेत, त्या सोडून मी आता जर आलो तर चर्चा फिसकटेल आणि मग युद्ध अटळ असेल. त्यामुळे मी येऊ शकत नाही. माझ्या अनुपस्थितीत तिचे अंत्यसंस्कार उरकून घ्या...’ अनास्तस मिकोयान यांच्याविषयी साऱ्या जगातल्या वृत्तपत्रांत छापून आलेल्या लेखांची कात्रणं, वैयक्तिक वापराच्या वस्तू या म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबरोबर मिकोयान चर्चा करत असल्याची छायाचित्रंही आहेत. या गावातच सनाहिन व हॅगपत या दोन मॉनेस्ट्रीज्‌ आहेत. या दोन्हींना ‘युनेस्को’नं ‘वर्ल्ड हेरिटेज’चा दर्जा सन १९९६ मध्ये दिला. या दोन्ही जागांनाही भेट द्यायलाच हवी. त्यावरून उत्तम वास्तुशास्त्र, तसेच प्राचीन आणि मध्ययुगीन काळातलं दैनंदिन जीवन याची कल्पना येते व हजार वर्षांपूर्वीही विज्ञान, साहित्यक्षेत्रातही अर्मेनिया कसा आघाडीवर होता हे समजतं. सनाहिनची स्थापना सन ९६६ मध्ये झाली आणि तेव्हाही तिथं वैद्यक आणि अन्य विज्ञानविषयक विषय शिकवण्यात येत असत. इथं वाचनालय होतं आणि अत्यंत दुर्मिळ आजारांवरील उपचारांची माहिती त्यात उपलब्ध असायची.

जवळजवळ याच काळात हॅगपत मॉनेस्ट्री बांधण्यात आली. इथलं वाचनालयही अकराव्या शतकातलं आहे व तेराव्या शतकात त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. याही मठाचं अनेक वेळा नुकसान झालं; पण तरीही त्याचं मूळ स्वरूप कायम राहिलं आहे. कॉकेशस पर्वतराजीमधला हा प्रदेश गेल्या तीन हजार वर्षांपासून शुद्ध तांब्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथं तांब्याचा कारखाना २५० वर्षांपूर्वी उघडण्यात आला व सोव्हिएत युनियनमधल्या धातूच्या महत्त्वाच्या कारखान्यांपैकी तो एक होता. सोव्हिएत रशियाच्या सुरवातीच्या काळात तांब्याच्या आणि कापडाच्या कारखान्यांनी या भागाची मोठी भरभराट झाली; पण त्यानंतर सर्व उद्योग बंद पडले. गावकऱ्यांची परिस्थिती फारच कठीण झाली. अशाही स्थितीत तिथल्या अनेक प्राचीन वास्तू फार उत्तम तऱ्हेनं जतन करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com