हिमनगांची नगरी (जयप्रकाश प्रधान)

jaiprakash pradhan
jaiprakash pradhan

पेरिटो मेरिनो या ग्लेशिअरचं सौंदर्य निरनिराळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या प्रकारे पाहता येतं. तळाकडून त्याची भव्यता अजमावता येते, तर उंचावरून त्याच्यातल्या निळ्या-पांढऱ्या, लहान-मोठ्या गुहा, बोगदे, दऱ्या, तसंच नैसर्गिकरीत्या तयार झालेली विविध आकर्षक शिल्पं दिसू शकतात. दक्षिण अमेरिकेतल्या अर्जेंटिनातलं हे ग्लेशिअर १७०० वर्षांपूर्वीचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या ग्लेशिअरविषयी...

एल्‌ कॅलाफते हे दक्षिण अमेरिकेतल्या अर्जेंटिनामधलं
छोटंसं शहर...‘व्हाईट जायंट’ म्हणून ओळखलं जाणारं ‘पेरिटो मोरेनो’हे भव्य, आगळंवेगळं ग्लेशियर (हिमनग) इथं आहे. ते ‘लॉस ग्लेशिअर्स नॅशनल पार्क’मध्ये असून एल्‌ कॅलाफते हे लॉस ग्लेशिअर्सचं प्रवेशद्वार मानलं जातं. या ग्लेशिअरची व पार्कची सहल मी व पत्नी जयंतीनं काही महिन्यांपूर्वी केली.
आपल्याकडे पॅटॅगोनियाचा हा भाग फारसा परिचित नाही; पण दर वर्षी निदान २० ते २५ लाख पर्यटक या परिसराला भेट देतात.
एल्‌ कॅलाफतेचा विमानतळ अगदी छोटा आहे. भोवती सगळा ओसाड प्रदेश. एल्‌ कॅलाफते ही अर्जेंटिनातल्या सांताक्रुझ विभागातली व पॅटॅगोनिया भागातली महत्त्वाची पर्यटननगरी. मूळ लोकवस्ती अगदी कमी; पण आता ती २०-२५ हजारांच्या घरात आहे. पॅटॅगोनियात छोटी छोटी झुडपं, त्यांची पिवळी फुलं व निळ्याशार बेरीज् सर्वत्र दिसतात. त्यावरूनच ‘एल्‌ कॅलाफते’ हे नाव या गावाला पडलं. हा स्पॅनिश भाषेतला शब्द आहे.

अर्जेंटिना सरकारनं सन १९२७ मध्ये या शहराची अधिकृतरीत्या घोषणा केली व तिथली वस्ती वाढू लागली. ‘लॉस ग्लेशिअर्स नॅशनल पार्क’ची स्थापना सन १९३७ मध्ये झाली. मग एल्‌ कॅलाफते शहराचा विकास झपाट्यानं होऊ लागला. चांगले रस्ते, घरं, हॉटेलं यांची संख्या वाढली. या शहरात वर्षभराच्या अवधीत टोकाचं हवामान आढळून येत नाही. मात्र, वारे प्रचंड वेगानं वाहत असतात व कधी कधी
एका दिवसातच सगळ्या ऋतूंचा अनुभव येतो! ‘लागो अर्जेंटिनो’ हा इथला विस्तीर्ण तलाव. अतिथंडी व उन्हाळा यातून थोडं सौम्य हवामान या तलावामुळे इथं कायम असतं. ता. सहा फेब्रुवारी १९६२ ला इथं सगळ्यात जास्त म्हणजे ३०.७ डिग्री सेल्सिअस व ता. २७ जुलै २०१४ रोजी १७.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. ‘लागो अर्जेंटिनो’ हा अर्जेंटिनाच्या बाजूचा पॅटॅगोनियातला सगळ्यात मोठा तलाव. तलाव कसला, विस्तीर्ण महासागरच म्हणावा लागेल! क्षेत्रफळ जवळजवळ १५०० चौरस किलोमीटर. हा तलाव समुद्रसपाटीपासून १५५ मीटर उंच आहे व काही ठिकाणी त्याची खोली ७०० मीटरपर्यंत आढळते. अर्जेंटिनाच्या बाजूला त्यात जवळजवळ ३०० ग्लेशिअर्स असून ‘पेरिटो मोरेनो’ ग्लेशिअरही त्यातच येतं. लॉस ग्लेशिअर्स नॅशनल पार्कच्या सहलीसाठी सकाळी लवकर निघावं लागतं.
एल्‌ कॅलाफते या शहरापासून हा सुमारे ८० किलोमीटरचा प्रवास खरोखरच निसर्गरम्य आहे. भव्य लँडस्केप्स व रंगीबेरंगी रानफुलांचे ताटवे लांबवर पसरलेले दिसतात. या पार्कचं तिकीट काढताच प्रत्येक पर्यटकाला एक पिशवी देण्यात येते. पार्कमध्ये फिरताना कुठंही कचरा न टाकता आपल्याजवळच्या पिशवीतच तो टाकावा यासाठी ही पिशवी. या पार्कचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे अर्थातच पेरिटो मोरेनो ग्लेशिअर. त्यामुळे आम्ही तेच ग्लेशिअर पाहण्यासाठी सर्वप्रथम गेलो. हे ग्लेशिअर पाहण्याची व्यवस्था अतिशय उत्तम म्हणावी लागेल. एक तर नॅशनल पार्कमधून ट्रेकिंग करत पर्यटक ग्लेशिअरच्या जवळ जाऊ शकतात किंवा ग्लेशिअरपर्यंत जाण्यासाठी फ्री शटलचीही सोय आहे.
शटलनं जाऊन, जिने उतरून ग्लेशिअरच्या जवळ जाता येतं.
ट्रेकिंगचा मार्ग तसा कठीण आहे व सराव असेल तरच त्या मार्गानं जाणं योग्य असं चौकशी करता समजलं. त्यामुळे आम्ही शटलनं गेलो. डोंगरातला वळणावळणाचा प्रवास दहा-पंधरा मिनिटांत संपला व आम्ही मुख्य सेंटरपाशी आलो. तिथं गिफ्ट शॉप्स, रेस्टॉरंट्‌स, टॉयलेट्‌स आदी सोई आहेत. ग्लेशिअर पाहण्यासाठी निरनिराळ्या पातळ्यांवर ‘व्ह्यूईंग गॅलरीज्‌’ तयार करण्यात आल्या असून, तिथं उतरून जाण्यासाठी जाळीचे उत्तम जिने आहेत. जिने उतरून पर्यटक ग्लेशिअरच्या जास्तीत जास्त जवळ व पायथ्याशी जाऊ शकतात.

अगदी पहिल्या गॅलरीपर्यंत जाण्यासाठी जिन्याबरोबरच लिफ्टचीही सोय आहे. त्यामुळे वृद्ध, अपंग स्त्री-पुरुषांना गॅलरीत लिफ्टच्या साह्यानं जाता येतं. अन्य पर्यटक पायऱ्या उतरून गॅलरीत येतात. इथून या ग्लेशिअरचं विहंगम दर्शन घडतं. या ग्लेशिअरला ‘व्हाईट जायंट ग्लेशिअर’ का म्हटलं जातं याचं उत्तर इथं मिळतं. समोरून ती बर्फाची प्रचंड उंच, लांबलचक भिंत म्हणजे तटबंदीच वाटते! या ग्लेशिअरचं क्षेत्रफळ आहे २५० चौरस किलोमीटर, म्हणजे अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनॉस आयर्स या शहराएवढं. गॅलरीतून समोर जी आडवी बर्फाची भिंत दिसत होती ती जवळजवळ पाच किलोमीटर लांबीची आहे. मध्यभागी तिची उंची ७० मीटर्स, तर दोन्ही बाजूंना निदान ३० मीटर्स आहे. त्यामुळेच ती एखाद्या भव्य, पांढऱ्याशुभ्र तटबंदीसारखीच दिसते. एवढी लांबलचक, उंच, बर्फाची भिंत पाहत राहावीशी वाटते. तिथून पाय लवकर निघत नाही. ‘पण ही तर सुरवात आहे...तुम्ही जेवढे खाली जाल तेवढे ग्लेशिअरच्या जवळ जाल व तेव्हा तुम्हाला त्याची खरी भव्यता समजेल,’ असं गाईडनं सांगितलं. त्यामुळे लोखंडी जाळीच्या जिन्यानं खाली उतरायला सुरवात केली. इथं थंडी फार नव्हती; पण वारे प्रचंड वेगानं वाहत असल्यानं काळजी घ्यावी लागत होती. निदान शंभर पायऱ्या उतरून दुसऱ्या‍ व्ह्यूईंग गॅलरीत आलो. आता आम्ही पेरिटो मोरेनो ग्लेशिअरच्या आणखी जवळ पोचलो होतो. इथून त्याच्या सौंदर्याची झळाळी काही वेगळीच भासत होती. त्या पांढऱ्याशुभ्र रंगात आता निळ्या व अन्य रंगांच्या छटा दिसू लागल्या होत्या. ही रंगसंगती अप्रतिम होती. आम्ही गॅलरीत आलो आणि प्रचंड मोठा आवाज झाला. ग्लेशिअरमधला एक उंच कडा कोसळत असतानाच आम्हाला पाहायला मिळाला. असंच दृश्य आम्ही अलास्कात बऱ्याच ग्लेशिअरमध्ये पाहिलं होतं; पण इथला कानठळ्या बसवणारा तो आवाज व उंच बर्फाळ कडा कोसळतानाचा ‘सीन’ कायमचा लक्षात राहील असा होता.
गाईड म्हणाला : ‘‘ग्लेशिअर कोसळण्याचे प्रकार अनेकदा होतात, त्यांचे प्रचंड मोठे आवाजही ऐकायला मिळतात; पण ग्लेशिअरचा भाग कोसळत असताना प्रत्यक्ष पाहायला मिळणं तसं दुर्मिळ असतं व हेच या व्ह्यूइंग गॅलरीचं वैशिष्ट्य आहे. बऱ्याचदा गॅलरीच्या काचेची तावदानंही ग्लेशिअरच्या या ‘ब्रेकिंग’मुळे फुटतात. हे दृश्य परत पाहायला मिळावं या आशेनं पर्यटक कॅमेरा सरसावून ग्लेशिअरकडे डोळे लावून बसलेले असतात. खूप वाट पाहावी लागते. अखेरीस कंटाळून पर्यटक जायला निघतात आणि त्याच वेळी ग्लेशिअरचा लहान-मोठा कडा कोसळतो. हे असं सतत सुरू असतं...’’

आम्ही शेवटच्या, तिसऱ्या व्ह्यूईंग गॅलरीत जायचं ठरवलं. तिथं गेल्यावर तर तटबंदीच्या पायथ्याशी पोचल्यासारखंच वाटतं. तिथं उभं राहिलं म्हणजे या ग्लेशिअरची खरी भव्यता लक्षात येते. जगातल्या ज्या भव्य ग्लेशिअर्सच्या अगदी जवळ पर्यटक जाऊ शकतात, त्या निवडक ग्लेशिअर्समध्ये पेरिटोचा समावेश होतो. खनिजांमुळे
मधून मधून ग्लेशिअर काळसर दिसते.

काही वेळा छोट्या बोटींतूनही ग्लेशिअरच्या पायथ्याशी जाता येतं; पण ते फार धोकादायक असतं. कारण, ग्लेशिअरचा कोणता भाग कधी तुटून कोसळेल हे काही सांगता येत नाही. ग्लेशिअरच्या एका भागात गिर्यारोहणासाठी परवानगी आहे. अत्यंत धाडसी गिर्यारोहक तिथं जात असतात. पेरिटो मेरिनोचं सौंदर्य निरनिराळ्या ठिकाणांहून निरनिराळ्या प्रकारे पाहता येतं. तळाकडून त्याची भव्यता अजमावता येते, तर उंचावरून त्याच्यातल्या निळ्या-पांढऱ्या, लहान-मोठ्या गुहा, बोगदे, दऱ्या, तसंच नैसर्गिकरीत्या तयार झालेली विविध आकर्षक शिल्पं दिसू शकतात. पेरिटो मोरिनो हे ग्लेशिअर १७०० वर्षांचं जुनं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्याचं आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात बहुसंख्य ग्लेशिअर्स आक्रसत असताना हे ग्लेशिअर मात्र ‘स्थिर (स्टेडी) ग्लेशिअर’ म्हणून ओळखलं जातं. दर वर्षी ते साधारणत: दोन मीटर पुढं जातं व तेवढंच मागं येतं. त्यामुळे जगातले शास्त्रज्ञ या ग्लेशिअरवर बारकाईनं लक्ष ठेवून त्याचा अभ्यास करत असतात. हे ग्लेशिअर ज्या ‘लॉस ग्लेशिअर्स नॅशनल पार्क’मध्ये आहे त्याचं क्षेत्रफळ सहा लाख हेक्टर असून, सन १९३७ मध्ये त्याची स्थापना झाली. त्याचं आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन सन १९८१ मध्ये ‘युनेस्को’नं त्याला ‘वर्ल्ड हेरिटेज’चा दर्जा दिला. या पार्कमध्ये भटकंती करण्यातही वेगळीच मौज येते. आज जो नॅशनल पार्कचा भाग म्हणून ओळखला जातो तो संपूर्ण प्रदेश काही हजार वर्षांपूर्वी ग्लेशिअर्सनी व्यापलेला होता. त्याचा विस्तार होत असतानाच बर्फाच्या नद्यांची झीज झाली. लँडस्केप बदललं. त्यातून खोल अशा मोठमोठ्या दऱ्यांची निर्मिती झाली. वर्षानुवर्षं, शतकानुशतकं ही सर्व प्रक्रिया सुरू राहिली. या भागात चांगलंच थंड वातावरण असतं. ‘ड्राय सीझन’ आढळून येत नाही. वर्षाचं सरासरी तापमान साडेसात डिग्री सेल्सिअस असतं.
ते हिवाळ्यात सहा व उन्हाळ्यात १३.४ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढतं. समुद्रसपाटीपासून ११०० मीटर्सच्या वरती थंडी, बर्फ व जोरदार वारे यांमुळे झाडं-झुडपं वाढणं शक्य नसतं, त्यामुळे हवामान थोडंसं अनुकूल झालं की छोटी झाडं तिथं तग धरतात. त्याच वेळी अँडियन हरणं व काही तुरळक पक्षीही तिथं आढळतात. पार्कच्या दऱ्यांमध्ये व डोंगरउतारांवर झाडांच्या काही जाती आढळतात. त्या अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात.

एल्‌ कॅलाफाते इथलं आणखी एक पाहण्यासारखा ग्लेशिअर म्हणजे ‘उपसाला’. हेही अर्जेंटिनातलं एक मोठं ग्लेशिअर मानलं जातं. त्याचं क्षेत्रफळ ७६५ चौरस किलोमीटर, लांबी ५३ किलोमीटर, रुंदी ३ किलोमीटर आणि उंची ५० मीटर्स आहे. मात्र, हे ग्लेशिअर मोठ्या प्रमाणात आक्रसत आहे. गेल्या २० वर्षांत ते ५० किलोमीटर आक्रसलं आहे. दर वर्षी ते निदान २०० मीटर्स मागं जातं. त्यातून बर्फाचे मोठमोठे कडे कोसळत असतात. हे अतिशय धोकादायक असल्यानं आता त्या ग्लेशिअरच्या जवळ पर्यटकांना नेलं जात नाही. आम्हाला ते तो बऱ्याच अंतरावरून दाखवण्यात आलं. उपसाला ग्लेशिअरच्या खाली पाणी आहे, त्याच्या दबावामुळे ते तुटतं. लागो अर्जेंटिनो हा तलाव मासेमारीसाठीही प्रसिद्ध आहे. त्यात वनस्पती वगैरे सहजपणे उगवत नाहीत. हिवाळ्यात फारसं वारं वाहत नाही, त्यामुळे पाणी स्वच्छ राहतं. ‘रेनबो’ व ‘लेक ट्राऊट’ ही इथली लोकप्रिय मासळी. तलावाच्या सर्व बाजूंनी मासेमारीला वर्षभर परवानगी असते; पण काही वेळा नॅशनल पार्कच्या भागात मासेमारीला बंदी घातली जाते. मासे पकडले तरी माशांची संख्या कमी होऊ नये म्हणून ते पाण्यात पुन्हा सोडून देण्यात येतात. अमेरिकेतल्या अनेक नॅशनल पार्क्समध्ये अशीच पद्धत आहे. रेनबो, ट्राऊटची पिल्लं इथं शंभर वर्षांपूर्वी सोडण्यात आली आहेत. त्यांची संख्या कमी होता कामा नये ही सगळ्यांची जबाबदारी असल्याचं मानण्यात येतं. रेनबो माशाचं वजन ६०० ग्रॅमपासून ते अडीच किलोपर्यंत असतं. त्याचं शरीर जांभळ्या रंगाचं, पाठ निळी-हिरवी व त्याच्या शरीरावर काळे ठिपके असतात.
पॅटॅगोनियातील एल् कॅलाफतेची आमची ही सहल कायमची लक्षात राहणारी ठरली, हे सांगायला नकोच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com