सल (जयश्री देशकुलकर्णी)

jayashree deshkulkarni
jayashree deshkulkarni

डॉक्टर येऊन तपासून गेले. म्हणाले : ‘‘आजींचं वय पाहता त्यांना हा ताप सहन होईल असं वाटत नाही, तेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं चांगलं. आणि त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनाही बोलावून घ्या. त्यांना पाहून आजींना बरं वाटेल कदाचित.’’

रात्रीचे अकरा वाजायला आले होते. रमाबाई एकीकडे त्यांच्या नेमाचा जप करत होत्या आणि दुसरीकडे झोपेची आराधनाही सुरू होती...
एवढी माळ झाली की अंथरुणाला पाठ टेकायची. बघू, झोप आलीच तर झोपायचं, नाहीतर पुनःश्च नामस्मरण सुरूच. या झोपेचंसद्धा असं विचित्र झालं आहे ना! सकाळी अकरा वाजता नाश्ता झाल्यावर काय झोप येते...तिन्हीसांजेला काय येते...आणि रात्री मात्र झोपेचं नाव नाही! घड्याळाचे पुढं सरकणारे काटे पाहत आणि ठोक्यांचा आवाज ऐकत दिवाणावर पडून राहायचं नुसतं...बऱ्याच वेळा दुपारी पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचता वाचताच इतकी पेंग येते की पुस्तक बाजूला पडतं, डोळ्यांवर चष्मा तसाच असतो आणि रात्रीसारखी गाढ झोप लागून जाते... नातवंडं हळूच खोलीत डोकावून जातात आणि मग नंतर मी जागी झाल्यावर माझी चेष्टा करत राहतात. मग माझं मलाच शरमल्यासारखं होत. शरीर थकलं आहे आता...

मुलं म्हणतात : ‘आई झोप येईल तेव्हा झोपत जा. आता ‘या वेळी कसं झोपू’ असा विचार करत जाऊ नकोस. तुला नाहीतरी आता काय काम आहे? कुठ जायचं नाही की यायचं नाही. आयतं ताट पुढं येतं ते जेवायचं आणि ‘हरी हरी’ करत बसायचं. वयाच्या पंचाहत्तर-ऐंशीपर्यंत काम करत होतीसच ना! आता नव्वदी आली. आता बाकीचे विचार कशाला?’
मुलांचं बरोबर आहे; पण विचार मनात आणायचे नाहीत असं म्हणून ते थोडेच थांबणार आहेत? वेड असतं मन आणि त्यात येणारे विचारसुद्धा! प्रत्येक गोष्ट अशी ठरवून थोडीच होते? नामस्मरणात, चिंतनात मन गुंतवत असतेच की मी; पण हा माझा स्वभावच मेला विचित्र! नाही नाही त्या गोष्टींच्या चिंता करत राहतो. आता नातवंडांचे प्रपंच सुरू झाले...आपले दिवस सरले, काळ बदलला...तरी मी का गुंतते कुणास ठाऊक? मोह कमी करायला हवा हे समजतं; पण उमजत नाही. एकेक करत हळूहळू सर्व अवयव कुरकुरू लागले आहेत. पूर्वीसारखे साथ देत नाहीत आता ते. ऐकायला कमी येतं; पण घरातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी आपल्याला सांगाव्यात असं वाटत असतं आणि घरात सगळ्यांना वाटतं की कशाला म्हातारीला सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात?
‘नातीची सासू थोडी विक्षिप्तच वाटते...नाही म्हणजे, सूनबाई बोलत होती लेकाशी तेव्हा कानावर पडलं. एवढा कसला अहंकार बाई! स्वत:ला तरुण समजते आणि सुनेची बरोबरी करते.’

नातवाची बायको अंमळ लाडातच वाढली आहे. याला प्रेमविवाह कुणी करायला सांगितला होता? केला ते केला आणि पुन्हा तिच्या मुठीत राहतो अगदी. घरात पुरुष म्हणून काही दरारा नको का! या बायकांच्या मेलं कितीही कलाकलानं नाचलं तरी त्यांचं काही समाधान होतच नाही. आमच्या वेळेला फक्त घरातल्या पुरुषाचा मूड सांभाळला जायचा. बायकांनाही भावना असतात, हे कधी कुणी विचारात घेतच नव्हतं. बायकांनी मुरडीचे कानवले स्वत:च्या स्वभावाला मुरड घालत बनवत राहायचे! नाहीतर आमचे ‘हे’, मरेपर्यंत ताठ मानेनं जगले अगदी. कुणी त्यांचा शब्द खाली पडू देत नव्हतं. मी तर अखेरपर्यंत ‘ह्यां’ची सेवा केली. घड्याळाच्या ठोक्याला जेवण-खाण सारं सांभाळत आले. तेसुद्धा माझ्या वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत. ‘हे’ गेले आणि माझी रयाच गेली. हळूहळू सुनेनं मला स्वयंपाकघर वर्ज्य करून टाकलं. म्हणायला लागली : ‘‘अंगात नाही अवसान आणि उगाचच कशाला तडमडायला येता इथं? निवांत बसून दोन घास खा ना! मी आहे, नातसून आहे दिमतीला आणि पणतूही आहेच की.’’
सगळ खरं बाई तिचं; पण वेळेला ५०-६० माणसांचा स्वयंपाक केलेला, धुणी-भांडी घरात केलेली, नणंदांची-पोरींची बाळंतपणं केलेली...त्यामुळेच शरीर काटक राहिलं; तरी पण थकलं आहे आता तसं. मात्र, मन निवृत्ती घेत नाही ना! नातवंडांना हौसेनं त्यांच्या आवडीचे चार पदार्थ करून घालत होते तसे पणतवंडालाही करून घालावेत अस वाटतं; पण हात कापतात आणि सून, नातसून दोघी ओरडत राहतात. घरात देवपूजा करायला मात्र कुणाची तयारी नसते. जाऊ दे म्हणा! त्यामुळे देवपूजा तरी हळूहळू, शांतपणे अगदी मनाजोगती करते मी. अजून माझ्या मेलीची हौस काही गेली नाही. देवाला नटवायला आवडतं मला. हार करत राहते देवीच्या फोटोसाठी. रांगोळीची चिमूट हातात टिकत नाही, रेष वाकडी येते आणि मनासारखी रांगोळी नाही जमत...मग फुलांची रांगोळी काढते तर आमची सूनबाई लगेच धुसफुसते. म्हणते : ‘‘आई हारासाठी आणि रांगोळीसाठी फुलं वाया घालवत जाऊ नका. महाग आहेत म्हटलं!’’ पण मी म्हणते, बायांनो, तुमच्या हॉटेलसाठी आणि नटण्या-मुरडण्यासाठी, नको त्या शॉपिंगसाठी कितीतरी पैसे उडवताच ना तुम्ही? मग देवाला चार फुलं जास्त वाहिली तर कुठं बिघडलं? पण हे आपलं मनातच बरं का! उघडपणे बोलायची सोय नाही हो! मध्यंतरी तीन-चार दिवस फूलपुडा आलाच नाही म्हणून फ्लॉवरपॉटमधली धूळ खात पडलेली कृत्रिम फुलं काढून धुऊन ती देवाला वाहिली. माझ्याच कल्पनेवर खूश होते मी! तर काय सांगू, नातसून माझ्यावर खेकसलीच. म्हणाली : ‘‘आजी, तुम्ही फ्लॉवरपॉटचा सगळा शोच घालवून टाकलात. का काढलीत ती फुलं?’’
म्हटल : ‘‘सॉरी बाई, घे तुझी फुलं तुला.’’

देवावरची फुलं काढून तिला देऊन टाकली; पण ‘राहू दे आजी आजच्या दिवस देवावर’ असं काही म्हणाली नाही बया! बोलायचं खूप असतं मनात; पण वितंडवाद नको वाटतो आता. डोकं बधीर होतं माझं. पणतू म्हणालासुद्धा त्याच्या आईला : ‘‘मम्मी, राहू दे ना देवावर फुलं. छान दिसतात. नको ना पणजीला बोलूस.’’ पण ती थोडीच ऐकणार? मुलाच्या पाठीत एक धपाटा घालून त्याला घेऊन गेली.
मी म्हणत होते, ‘नको मला फुलं; पण त्याला मारू नकोस गं.’
पण ऐकायला थांबलीच कुठं ती? आता उद्यासुद्धा फुलं नाहीतच देवाला. गावभर फिरतात सगळे; पण फुलं आणावीत असं काही वाटत नाही कुणाला. माझा लेक दिनू बाहेर गेला तर तोच तेवढा आठवणीनं आणतो. तोही बिचारा आता सत्तरीचा झालाय. काय बोलणार त्याला? सारखा कावलेला असतो. मागच्या महिन्यातच त्याची प्लास्टी का काय झाली. हृदयविकाराचा झटका येऊन गेला त्याला. मी देवाला म्हणत असते, ‘अरे बाबा, आता या वयात नको रे दु:ख आणि चिंता देऊस मला! अगदी हसता हसता वर ने!’ लेकाच्या चिडचिडेपणामुळे हल्ली माझी लेक - सुली - गावात असूनदेखील पंधरा-पंधरा दिवसांत इकडे फिरकत नाही. ती येऊन गेली की जरा बरं वाटतं. मायेनं विचारपूस करते ती माझी! ‘काही हवं का’ विचारते आणि येताना आठवणीनं चांगली पावशेर-अर्धा किलो फुलं आणते. ‘तुझ्या देवासाठी आणली’ म्हणत माझ्या हातात देते. ‘तुला तोंडात टाकायला असू देत,’ म्हणून कधी गोळ्या किंवा चॉकलेटं हळूच माझ्या जपमाळेच्या पिशवीत टाकून जाते! मला चमचाभर आईस्क्रीम खायचं असतं; पण त्यासाठी सगळ्या घरा-दारासाठी मोठं एक लिटरचं बॉक्स घेऊन येते. तिचीही तिच्या घरातून लवकर सुटका होत नाही हल्ली. सुना नोकरीला जातात. नातवंडांचं करावं लागतं.

ती म्हणते : ‘‘आई, मुलांपेक्षा या नातवंडांमध्ये जास्त गुंतून व्हायला झालं आहे गं ’’
मी मनात म्हणते, ‘हो बाई, खरं आहे तुझं. तुम्ही सगळे कामाचे.
मी बापडी बिनकामाची. कुणाशी बोलायला नको की मन मोकळं करायला नको. मग बसते त्या रामाला गाऱ्हाणी सांगत. रंजी - म्हणजे माझी थोरली लेक - रंजना मुंबईला असते. तिच्या फोनची चातकासारखी वाट पाहत असते मी. खूप शांत आणि हळवी आहे बिचारी. माझ सगळं भडाभडा बोलणं ऐकून घेते. मग म्हणते : ‘‘आई, मी थोडं बोलू का गं?’’
मग मी भानावर येते. कळतं मला, तिलाही काहीतरी बोलायचं असेल, हितगुज करायचं असेल. ती कधी जावयाबाबत किंवा सुनेबाबत बोलत नाही. तिनं स्वत:चं वेगळं विश्व निर्माण केलं आहे. समाजसेवा करत असते. एका वृद्धाश्रमाचं काम पाहत असते. त्यामुळेच सगळ्यांचं ऐकून घेण्याची तिला सवय आहे. सुली-रंजी दिनूपासून दुरावल्या आहेत. एकमेकांत गैरसमज निर्माण झाले आहेत. पूर्वीसारखं
हसून-खेळून बोलणं, बसणं होत नाही आता तिन्ही भावंडांमध्ये.

रंजी एवढं वृद्धाश्रमाचं काम बघते, मग भावाला समजून घ्यायला काय झालं तिला? मी काही सांगायला गेले की तिघंही म्हणतात : ‘‘आम्ही आमचं बघू! तू कशाला नाही त्या गोष्टींचा विचार करत बसतेस? तुझ्याशी सुना, नातवंडं, जावई, असं सगळं गणगोत गोड आहे ना? मग झालं तर!’’ पण असं म्हणून कसं चालेल? सगळ गणगोत माझंच तर आहे ना! सगळे एकमेकांशी निदान मनानं तरी जोडलेले असावेत असं वाटत राहतं मला. दिनूनं त्याच्या नातवाच्या मुंजीला सुली-रंजीला बोलावलं नव्हतं म्हणून धुमसत राहिल्या आहेत दोघी बहिणी भावाविरुद्ध! मी आपलं म्हटलं दोघींना : ‘‘अगं कशाला कटुता ठेवता नात्यात? सोडून द्या. त्याच्या मुलांच्या लग्नांत त्यानं तुम्हाला मानानं बोलावलं. नातवाबाबतचा निर्णय त्याच्या हातात नाही ना! मुलांचे विचार वेगळे पडतात. आपण कशी काय त्यांच्यावर कुठल्या गोष्टीची जबरदस्ती करायची? उलटं बोलून मोकळे होतात. मग मनःस्ताप आपल्यालाच होतो ना! दिनूचं तेच तर झालंय ना! मुलं ताळतंत्र सोडून वागतात आणि हा जिवाला घोर लावून घेतो.’’
आमची मुलं कशी धाकात, वडीलधाऱ्यांचा मान ठेवून राहिली. हे उघड बोलायचीसुद्धा चोरीच बरं का. लगेच ‘तुमचा काळ वेगळा होता’ हे शब्द तोंडावर फेकले जातात.
चला, रात्रीचे दोनचे ठोके पडले. अजूनही झोप काही आली नाही; पण...रामराया, एकदा कायमचे डोळे मिटू दे बाबा! तुझ्या पायाशी येऊ दे रे. नको दूर लोटूस आता. तुला तरी किती गाऱ्हाणी ऐकवायची? कंटाळत असशील तू! तरी पण ऐक बाबा, तेवढ्या मुलांमधल्या गैरसमजाच्या गाठी सोडव रे! घर कसं हसतं-खेळतं राहू दे. कशाला हवे आहेत अहंकार जपायला? परंपरा जपा...नाती जपा... आपलेपणा जपा....अहंकार जपण्यापेक्षा अशा इतर खूप गोष्टी आहेत जपायला आणि वाढवायला.
***

रमाबाईंच्या डोळ्यांतून त्यांच्या नकळत आसवं ओघळत होती. उशी ओली होत होती. तशातच त्यांचा डोळा लागला. सकाळी रमाबाईंना जाग आली; पण डोळे उघडावेसे वाटतच नव्हते. त्यांनी खूप कष्टानं कूस बदलली. लगेच दिनूनं डोक्यावर हात ठेवला. म्हणाला : ‘‘आई, तुला खूप ताप चढला आहे गं. नेहमीच्या वेळेला उठली नाहीस म्हणून बघायला आलो तर अंगात ताप! डॉक्टरांना फोन केला आहे. येतील इतक्यातच. थोडा चहा घेशील का? बरं वाटेल. मी तुला हात देतो. ऊठ हळूच.’’
रमाबाईंच्या लेकानं, दिनूनं त्यांना आधार देऊन उठून बसवलं.
नातू चहा घेऊन आला. त्यानं तोंडाशी कप धरला. रमाबाईंनी चहाचे दोन घोट घेतले. त्यांना थोडं बरं वाटलं; पण जास्त वेळ बसवेना म्हणून त्या पुन्हा आडव्या झाल्या. डॉक्टर येऊन तपासून गेले. म्हणाले : ‘‘आजींचं वय पाहता त्यांना हा ताप सहन होईल असं वाटत नाही, तेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं चांगलं. आणि त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनाही बोलावून घ्या. त्यांना पाहून आजींना बरं वाटेल कदाचित.’’
दिनूनं फोन करून दोन्ही बहिणींना बोलावून घेतलं. तापानं आलेल्या ग्लानीमधून जेव्हा रमाबाईंनी डोळे उघडले तेव्हा
उश्या-पायथ्याला जमा झालेले आणि त्यांच्याच चिंतेत व्यग्र असलेले कुटुंबीय त्यांना दिसले आणि त्यांना भरून आलं. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या : ‘‘का गं सुले, का गं रंजू, तुम्हाला अशाच वेळी आईला भेटायला यायला सुचलं का? माझ्या जिवाला घोर लावून इतके दिवस दूर का राहिलात?’’
सुली म्हणाली : ‘‘अगं, आम्ही तुझ्यावर थोड्याच रागावलो होतो? आम्ही दिनूदादावर रागावलो होतो. तेसुद्धा त्यानं आम्हाला त्याच्या नातवाच्या मुंजीला बोलावलं नाही म्हणून नव्हे काही! तर साधा फोन करून ‘मुंज घरातल्या घरात करून घेतली, बोलावू शकलो नाही, सॉरी’ एवढं तरी त्यानं म्हणणं अपेक्षित होतं. बिल्डिंगमधले लोक भेटतात आणि ‘तुम्ही मुंजीला का आला नाहीत?’ म्हणून विचारतात. मग वाईट वाटत गं!’’
रंजूनंही सुलीचीच री ओढली. ती म्हणाली : ‘‘अगं आई, आम्ही फक्त दिनूदादाच्या फोनची वाट पाहत होतो आणि बघ, आता तुला हॉस्पिटलमध्ये आणल्यावर या पठ्ठ्यानं फोन केला आम्हाला.
शेवटी आम्ही तिघंही एकाच रक्ताची तर भावंडं आहोत. त्यात कुठं ठेवायचा आहे इगो आणि मानपान? त्यानं फोन केला नसता तरी भाऊबीजेला येणारच होतो आम्ही. तूच तर म्हणायचीस, ‘अहंकाराचा वारा न लागो माझ्या पाडसां’. मी तुला शब्द देते की दादाला आम्ही कधीही अंतर देणार नाही,’’
रमाबाई मलूल हसल्या आणि म्हणाल्या : ‘‘हे ऐकण्यासाठीच माझे कान उत्सुक होते गं. तुमच्यातला दुरावाच माझ मन पोखरत होता. नको तो सल माझं हृदय जाळत होता.’’
एवढं बोलून रमाबाईंनी श्रीरामाचा जप सुरू केला. दिनू हसला व सुलूला आणि रंजीला म्हणाला :‘‘पाहिलंत? आईचा श्रीरामाशी संवाद सुरू झाला!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com