ओझं (ज्योती सोनवणे-पवार)

ज्योती सोनवणे-पवार, औरंगाबाद
रविवार, 24 मे 2020

आश्विनीनं बाजारातून आणलेली पिशवी खाली ओतली आणि म्हणाली ः ""हे पाहा काकू, मी हे सर्व साहित्य घेऊन आले.'' आश्विनी पुढं काही बोलणार, तेवढ्यात मध्येच सिंधू म्हणाली ः ""बाबांनी पैसे दिले होते ना तुला सकाळी सामान आणण्यासाठी?''

आश्विनीनं बाजारातून आणलेली पिशवी खाली ओतली आणि म्हणाली ः ""हे पाहा काकू, मी हे सर्व साहित्य घेऊन आले.'' आश्विनी पुढं काही बोलणार, तेवढ्यात मध्येच सिंधू म्हणाली ः ""बाबांनी पैसे दिले होते ना तुला सकाळी सामान आणण्यासाठी?'' ""नाही मीच आणलं, बाबाकडून पैसे का घेऊ? मीही या घरची मुलगी आहे ना? माझंही या घराप्रती काही कर्तव्य आहे ना?''...

राहुलनं गाडी साफ करताकरता आईला हाक मारली ः ""आई, अगं आई आपण किती वाजता निघणार आहोत? ते मला सांग बरं एकदाचं.. म्हणजे मी तेव्हा तयार राहीन.''
""अरे निघालेच बघ, महालक्ष्मींसाठी बनवलेलं फराळाचं भरत होते. झालंच आता,'' आई म्हणाली. ""मलाच का मग सकाळपासून घाई करत होतीस आवर-आवर म्हणून? आणि आता तूच निघत नाहीस घराबाहेर.''
""हे बघ निघाले,'' म्हणत दोन पिशव्या हातात घेऊन मंदा बाहेर पडली.
...गेल्या पाच वर्षांपासून मंदा महालक्ष्मींसाठी दीराकडे गेली नव्हती. तिच्या मोठ्या दीराकडे लक्ष्मी बसत होत्या. सुरुवातीला अगदी बळजबरीनं जावं लागे, नवऱ्याच्या धाकामुळे. अगदी कशीबशी तीन दिवस ती तिथं काढत असे. उगीच कोणाचं उणंदुणं काढणं, बोलणी खायला तिला आवडत नव्हतं आणि तेच सर्व तिथं घडत होतं. ते सर्व तिला गाडीत बसताच आठवू लागलं..
""आई, अगं अशी शांत का बसलीस? बोल ना काही तरी.'' राहुलच्या आवाजानं मंदा भानावर आली आणि म्हणाली ः "पूर्वीचे दिवस आठवले रे बाळा मला.''
""हो गं आई, मलाही आठवतं बघ. बाबा, दीदी, तू, मी कसं जायचो ना टूव्हीलरवर काकाकडे. कधीकधी तर वाटेतच पाऊस लागायचा. तुला वाटे, बाबानं कुठतरी थांबावं; पण बाबा म्हणत ः "काही होत नाही चला, आधीच उशीर झालाय?' आणि आपण भिजत भिजतच जायचो.''
""बाबांना घाईच तशी असायची काकाकडे जाण्याची.''

""खरंच गं आई. गेल्या सहा वर्षांपासून मी बाहेर आहे. पण माझ्या लक्षात येतंय ना! या काळात बाबांमध्ये खूप फरक पडलाय. त्यांना काकाची पहिल्यासारखी ओढ राहिलेली नाही. नाहीतर त्यांना आपल्यापेक्षा काकांचं कुटुंब प्रिय होतं. तुला सुट्टी मिळाली नाही तर तुझ्याशीच भांडत. तुलाच यावं वाटतं नाही म्हणत.''
""काय करतो? गवऱ्या मातीत गेल्यावर सुधार होऊन, आता झाली गत.. "धोबी का कुत्ता, घर का ना घाट का'सारखी...आणि तिथं गेल्यावरही सतत माझ्या मागे लागत ः "काम कर, काम कर' म्हणून. त्यांना वाटे मी सर्वांत लहान म्हणून मी सर्वांत जास्त काम करावं. नोकरीला आहे म्हणून काय झालं?''
""अगं आई, तुला माहीत नाही. तू थोडीशी बसलेली दिसलीस ना, की आजीच बाबांना सागांयची ः "बघ, कशी बसली' म्हणून.''
""माझ्या लक्षात येतं होतं सगळं, माझं आणि मीराकाकूंचं नोकरी करणं सगळ्यांनाच खटकत होतं. त्या कधी त्यांच्या आईकडे जात महालक्ष्मींसाठी, तर कधी सुट्टी न मिळाल्याचा बहाणा करत. मीच दरवर्षी सापडे त्यांना टोमणे मारायला आणि मोठेपणा मिरवून घ्यायला.'' ""काय टोमणे मारत होते गं तुला ते?''
""माझं माहेर गावातच आणि वरून नोकरी. त्यांना वाटे, मी आणि काकू नोकरीला असल्यामुळे पैसे माहेरच्यांनाच पाठवतो- म्हणून असायचे टोमणे सुरू. त्या धाकानं मीराकाकू येतच नसे. काहीही बहाणा सांगायची.'' ""तू का नव्हतीस गं त्यांना सुनावत?''
""तसं केलं तर बाबांसोबत भांडण व्हायचं अन्‌ सगळ्यांना मजाच व्हायची.''
""मोठी काकूही टोमणे मारायची का गं?'' ""तिचा नवरा तिचं कौतुक करे म्हणून तीही चान्स मारून घेई बोलण्याचा. त्याला एवढंच कौतुक होतं, की माझ्या बायकोनं सर्वांचं केलं. तिच्यावर आई-बापानं खूप चांगले संस्कार केलेत आणि आम्हाला असं काही शिकवलंच नाही आमच्या आई-बापानं म्हणून.''
""अगं हो, मला आठवतं. तुम्ही स्वयंपाकघरात असायचा आणि आजी दोन्ही काका, बाबा हे बाहेर गप्पा मारत बसत.''

""मला माहीत आहे राहुल. त्यांचा एकच विषय असायचा- मी, मीराकाकू आणि आमच्या माहेरचे.'' ""हो ना! आजी तर नेहमी म्हणायची ः माझा बाप माझ्याघरी पाणी पित नव्हता. म्हणायचा लेकीच्या घरी पाणी पिऊ नये अन्‌ आता पाहा.''
""त्यात मोठ्या काकाला तर खूप जोर चढायचा. ते तर आमच्यासमोर म्हणायचे ः "लेकीचे पैसे खातात. अरे, तिनं दिले तरी यांना लाज वाटायला पाहिजे ना घ्यायला.' हे वाक्‍य तर अनेकदा ऐकलं मी. तसं पाहिलं तर मीराकाकूंच्या माहेरीही पहिल्यापासून आपल्या मामासारखीच श्रीमंती होती, त्यामुळे तेच आम्हाला खूप देत. किती मागास विचार आहेत गं यांचे? पण तू इतकं ऐकून कसं घेत होतीस?'' ""नुसते विचार मागास नव्हते त्यांचे..तेही तसेच होते सारे.''
"माझा मित्र महेश म्हणत असतो बघ ती म्हण "हम नकटे तुम नकटे, सब नकटोंका मेला. उसमे एक नाक वाला सब नकटो का चेला' तशीच अवस्था होत असेल तुझी. तू बोलत का नव्हती काही त्यांना?'' ""ते नाव घेऊन थोडेच बोलत होते?''
""म्हणजे असेच टोमणे मारायचे तर. पण बाबा काहीच बोलत नव्हते का ग त्यांना?'' ""म्हणतात ना एखादी खोटी गोष्टही दहा वेळा ऐकवली की खरी वाटते, तसं झालं होतं बाबांचं. आणि आई व भाऊ म्हणेल तेचं खरं.. ही बाबांची त्यांच्यावरची श्रद्धा.''
...दोघांच्या बोलण्या-बोलण्यात दोन तासांचा प्रवास सहज झाला होता. काकाचं घर जवळ येत आहे, हे लक्षात येताच राहुल फिल्मी स्टाईलनं आईला म्हणाला ः ""जाने दो माताजी, पुरानी बाते भुला दो.. अब है किसी की मजाल जो हमारे माताजी को कुछ बोले?''
राहुल, मंदा, राहुलची मोठी काकू सिंधू, तिचा मुलगा राजू- जो बारावीत शिकत होता- हे सर्व चहापाणी आटोपल्यावर गप्पा मारत होते. तेवढ्यात सिंधूची मुलगी अश्विनी हातात भली मोठी गच्च भरलेली पिशवी घेऊन आली.
""अश्विनी, उशीर का गं झाला?'' सिंधूनं विचारलं. ""अगं आई, डेकोरेशनसाठी साहित्य घेऊन आले बघ म्हणून झाला उशीर,'' अश्विनी म्हणाली.
"का रे राहुल, किती मोठा झालास? आणि माझ्या लग्नाला का नाही आलास?'' ""तू माझे पेपर विचारात घेऊन लग्न का नाही ठरवलंस?'' राहुल म्हणाला.
""तू नाही तर नाही, काकूही खूप वर्षांनी आल्या महालक्ष्मींना?'' अश्विनी म्हणाली. ""तुझ्या आईनं खूप वर्षांनी फोन केला ना ये म्हणून.. म्हणून आले,'' मंदा म्हणाली. ""अरे, गप्पा काय मारताय, उठा मखर सजवायचंय ना?'' विषय टाळण्यासाठी राहुल म्हणाला.

""हो हो, चल,'' म्हणत आश्विनीनंही त्याला साथ दिली. आश्विनीनं बाजारातून आणलेली पिशवी खाली ओतली आणि म्हणाली ः
""हे पाहा काकू, मी हे सर्व साहित्य घेऊन आले.''
आश्विनी पुढं काही बोलणार, तेवढ्यात मध्येच सिंधू म्हणाली ः ""बाबांनी पैसे दिले होते ना तुला सकाळी सामान आणण्यासाठी?'' ""नाही मीच आणलं, बाबाकडून पैसे का घेऊ? मीही या घरची मुलगी आहे ना? माझंही या घराप्रती काही कर्तव्य आहे ना?''
सिंधूला काही सुधरत नव्हतं. तिला वाटतं होतं, "हिनं असं काही सांगू नये'; पण आश्विनीला वाटत होतं, आपण आपल्या आई-बापासाठी कायकाय केलं ते सर्व सांगावं यांना.

""माय दीदी इज ग्रेट,'' राहुल म्हणाला. राहुलच्या या वाक्‍यानं आश्विनीला आणखीनच जोश आला. ती पुन्हा सांगू लागली ः "अरे राहुल, हे तर कहीच नाही. आईच्या गळ्यातलं हे गंठण आणि बाबांच्या हातातल्या दोन अंगठ्या हे सर्वही मीच केलं आहे.''
""काय सांगतेस? तुझ्यापेक्षा तुझ्या नवऱ्याला ग्रेट म्हणायला पाहिजे. मानलं यार भावजींना मी. तू एवढं करतेस माहेरच्यांसाठी आणि ते काहीच म्हणत नाहीत?''
""का? का म्हणतील ते काही? ते नाही करत त्यांच्या घरच्यांसाठी? ते करतात तेव्हा मीही काही म्हणत नाही त्यांना.''
"बरं, पुरे आता गप्पा. कामाला लागा,'' म्हणत सिंधूनं चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी अश्विनी म्हणाली ः ""माझ्या बाबांनी मला बारावीपर्यंत शिकवलं, नोकरीला लावलं, हे मी कसं विसरणार?''
""नाहीच विसरावं मुलींनी माहेरच्यांना; पण तुझ्या बाबांना आवडतं ना हे सारं?'' मध्येच खोचकपणे मंदा म्हणाली.

""का नाही आवडणार? त्यांनाही काही कष्ट पडले असतील ना मला शिकवायला?''
हे सर्व ऐकताना मंदाच्या मनात गत आठवणीचं काहूर उठलं. तिच्या जिभेवर शब्द आले होते. म्हणावं ः "हो बाई, तुझ्या बाबांना खूप कष्ट लागले तुला बारावी शिकवायला; पण माझ्या बाबांना मला बीएस्सी, बीएड करताना काहीच कष्ट नसतील लागले का गं? हे विचार ना तुझ्या बापाला.''
आई शांत झालेली पाहून राहुलच्या लक्षात आलं, आई पुन्हा जुन्या आठवणीत गेली म्हणून. त्यानं आईकडे पाहिलं आणि आईनंही त्याच्याकडे पाहिलं. राहुलनं नजरेनंच आईला दिलासा दिला- जसा तो अनेक वर्षांपासून देत आला होता. तरीही न राहवून मंदा बोललीच ः ""अग आशू, तुझा नवरा जरी काही म्हणत नसला ना, तरी आपल्याकडे नाही चालत असं. जे आई-वडील मुलींकडून असं काही घेतात, त्यांना नावं ठेवली जातात आपल्याकडे. माझं खरं वाटत नसेल तर विचार तुझ्या आई-बाबांना. हो की नाही हो ताई?''
असं म्हणत मंदानं सिंधूकडे पाहिलं. दोघींची नजरानजर झाली. सिंधूला काय बोलावं हेच सुचत नव्हतं, तर पलंगावर झोपलेला आश्विनीचा बाप जागा असून झोपल्याचं सोंग घेऊन पडला होता. मंदाला मात्र खूप दिवसांपासून डोक्‍यावर असलेलं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. एका प्रकारचा विजयी भाव तिच्या चेहऱ्यावर झळकत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang jyoti sonawane pawar write kathastu article