परवरदिग़ार (कौशल श्री. इनामदार)

kaushal inamdar
kaushal inamdar

रत्नागिरीला रात्री उशिरा पोचलो; पण झोप काही लागेना. शेवटी ‘निवडक रवींद्र पिंगे’ या पुस्तकातला ‘चंद्रास्त’ हा पिंगेंनी लिहिलेला बालगंधर्व आणि गोहरबाई यांच्या नात्यावरचा लेख वाचत बसलो. वाचतावाचता एका ओळीवर येऊन थबकलो. ती ओळ होती : ‘बालगंधर्व गोहरबाईंना ‘गोहरबाबा’ म्हणायचे, आणि गोहरबाई बालगंधर्वांना ‘परवरदिग़ार’ म्हणत.’ परवरदिग़ार - परमेश्वर! खरोखरच दैव ज्याच्यावर प्रतिभा बनून प्रसन्न झालं होतं, हेच दैव प्राक्तन बनून मात्र सुरांच्या या परमेश्वराला वेदना, दुःख यांच्या गर्तेत ढकलत होतं. आणि एकाएकी माझ्या डोक्यात ‘परवरदिग़ार परवरदिग़ार’ हे शब्द सुरांत फिरू लागले. मनात आलं : ‘कव्वालीच बरोबर आहे.’

या प्यास अपनी अब्र-ए-करम से बुझाइये
या ख़ुद पहाड़ काट के दरिया निकालिए
- सज्जाद बाक़र रिज़वी

‘प्रतिभा’ ही काही सर्वसामान्यपणे आढळणारी गोष्ट नाही. फार म्हणजे फारच कमी कलाकार ‘प्रतिभावंत’ म्हणावे असे असतात. कुठल्याही चांगल्या कलाकाराला कधीतरी या प्रतिभेचा स्पर्श झालेला असतो. कुणाला तोही न होता, प्रतिभेचं नुसतंच ओझरतं दर्शन होतं; पण प्रतिभा (‘जिनिअस’ या अर्थी) ही एक चंचल स्वामिनी आहे. कमालीचे प्रतिभावंत कलाकारही तिच्या मर्जीची खात्री देऊ शकत नाहीत.
सज्जाद बाक़र रिज़वी यांच्या वरच्या शेरातला ‘अब्र-ए-करम’ म्हणजे प्रतिभा- किंवा दैवी देणगी असा अन्वयार्थ लावला, तर या शेराला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो! दर वेळी दैवी मेघाच्या मेहेरबानीवर सर्जनाची तहान भागेल याची शाश्वती देता येत नाही आणि म्हणूनच हे सर्जन-जल प्यायचं असेल, तर स्वतःच डोंगर खणून ते आपल्यापर्यंत आणावं लागतं... आणि त्यासाठी नदीचं मूळ शोधत जावंच लागतं.
मी काही दैववादी नाही. मला सुचणाऱ्या चाली कुठल्यातरी दैवी योजनेअंतर्गत स्फुरत असतील, असं मला कधीच वाटलं नाही. आजवर जे ऐकलंय, ज्या संगीताचे संस्कार माझ्यावर झाले आहेत, तेच सूर माझ्या संगीतातून उमटतात अशी माझी धारणा होती आणि म्हणूनच त्या अर्थानं मी काही प्रतिभावंत कलाकार नाही, हे मी जाणून आहे. यात विनयाचा भाग नाही. प्रतिभावंत कलाकार मी पाहिले आहेत. त्यांच्या सुचण्याचा ओघ पाहून स्तीमित झालोय. मला मात्र या ‘अब्र-ए-करम’वर अवलंबून राहता येत नाही. क्वचित प्रसंगी असं काही घडतं, की डोंगर खणताखणता एखादा ढग त्या कातळातच रुतून बसलेला आढळतो आणि दैव त्याचं पुसटसं दर्शन आपल्याला देतं आणि त्याच्या (दैवाच्या) अस्तित्वाबद्दल आणि शक्तीबद्दल संभ्रम कायम ठेवतं!
मग अनेकदा असं होतं, की कालांतरानं एखादी चाल ऐकताना असं वाटू लागतं - ‘खरोखरच ही चाल मी केली आहे?’ ती चाल करताना घडलेली सर्जनाची प्रक्रिया काही केल्या आठवत नाही. आपल्या हातून ती कुणी करून घेतली असावी, असा वरकरणी विनयशील; पण खोलात जाऊन पाहिलं तर जरा अहंकारी असा विचार मनात डोकावतो. दर वेळी दैव आपल्या पदरात तयार चालच पाडेल, असं नाही. एखादी खूण, एखादा दुवा, एखादी दिशा सापडते आणि पुढे डोंगर खणणंही फार जिकीरीचं काम आहे असं वाटत नाही!

‘बालगंधर्व’ चित्रपटाच्या वेळची ही कथा. ध्वनिमुद्रणाचं काम नितीन देसाईंच्या पवईच्या स्टुडिओत सुरू होतं. स्टुडिओला लागून नितीन देसाईंचं ऑफिस होतं, जिथं दिग्दर्शक रवी जाधव आणि पटकथाकार अभिराम भडकमकर काम करत बसायचे. एके दुपारी मी स्टुडिओत काम करत होतो आणि रवीचा निरोप आला, की एका नवीन गाण्याचा प्रसंग पटकथेमध्ये सुचला आहे. मी ऑफिसमध्ये आलो- जिथं रवी आणि अभिराम काम करत बसले होते.
अभिरामने प्रसंग समजावून सांगितला. बालगंधर्वांचं उतारवय विपन्न अवस्थेत चाललं होतं. अशात भोरच्या महाराजांनी त्यांना भोरला येण्याचं आमंत्रण पाठवलं. बालगंधर्वांचा समज झाला, की आपल्याला कार्यक्रमासाठी बोलावलं आहे; पण तिथं पोचले, तेव्हा कळलं की इथं ना श्रोते आहेत ना साथीदार. महाराजांनी गंधर्वांचं शंकानिरसन करत म्हटलं : ‘‘नारायणराव, आजवर तुम्ही गाण्याची खूप सेवा केलीत. त्याबद्दल तुमचा सत्कार करावा या उद्देशानं तुम्हाला इथं पाचारण केलं आहे.’’ असं म्हणत महाराजांनी बालगंधर्वांना एक पश्मिन्याची शाल आणि पाचशे रुपयांची थैली भेट दिली. एकेकाळी दीड लाख रुपयांच्या थैलीला आपल्या स्वाभिमानापायी नाकरणाऱ्या नारायणरावांच्या मनाला ही मदत स्वीकारताना किती यातना होत असतील, याचा केवळ अंदाजच आपण लावू शकतो. बालगंधर्वांनी ती भेट स्वीकारली खरी; पण भोरहून पुण्याला परतताना वाटेत शिवापूरच्या दर्ग्यावर ते थांबले. पश्मिन्याची शाल दर्ग्यावर चढवली आणि पाचशे रुपये तिथं बसलेल्या फकिराला देऊन टाकले.

या प्रसंगासाठी बालगंधर्वांच्या जगण्याचं तत्त्वज्ञान प्रतिबिंबित होईल, असं गाणं करावं असं रवीनं सुचवलं. त्यानं मला दोन संदर्भ दिले- ‘नटरंग’मधलं ‘खेळ मांडला’ आणि ‘पिंजरा’ चित्रपटातलं ‘कशी नशीबानं थट्टा आज मांडली.’ बालगंधर्व फकिराला थैली देतात, तिथं गाण्याची सुरुवात होते. मी सहज म्हटलं : ‘गाणं दर्ग्यापासून सुरू होतंय. आपण कव्वाली केली तर?’’
रवी आणि अभिरामनं एकमेकांकडे पाहिलं. अभिराम म्हणाला : ‘‘मला कल्पना आवडलीये; पण बालगंधर्वांच्या चित्रपटात कव्वाली?’’ आम्हा तिघांनाही या बोलण्याचा रोख कळत होता. बालगंधर्वांच्या संगीताचे चाहते नसून भक्त आहेत. त्यांचं बालगंधर्वांच्या संगीतावर केवळ प्रेम नव्हे, तर श्रद्धा आहे. या श्रद्धेला तडा जाता कामा नये, असं वाटत होतं. मीही जरा थबकलो. आपण कव्वाली म्हणून तर गेलो; पण गंधर्वभक्तांना ते रुचेल का? शिवाय बालगंधर्वांच्या पदांबरोबर आपण संगीतबद्ध केलेलं गाणं हे त्या सांगीतिक योग्यतेचंही झालं पाहिजे. ‘‘आपण विचार करू जरा दोन दिवस यावर,’’ असं म्हणून मी त्यांची रजा घेतली.

त्या दिवशी मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली : ‘Thinking of doing a qawwali in the movie Balgandharva.’ या पोस्टवर तासाभरातच टोकाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. ‘बालगंधर्वांच्या संगीताला तू गालबोट लावणार’ इथपासून ‘कृपा करून असं काही करू नका’ असे सल्ले मिळू लागले. फक्त कव्वाली घ्यायची म्हटलं, तर त्याला इतका प्रतिकार होता. प्रत्यक्ष घेतली तर काय होईल या विचारानं - ‘आपण हा विचार सोडून द्यावा,’ असं मनात आलं.
त्या दिवशी संध्याकाळी मी रत्नागिरीला जायला निघालो. दुसऱ्या दिवशी तिथं कार्यक्रम होता. रत्नागिरीला रात्री उशिरा पोचलो; पण झोप काही लागेना. शेवटी ‘निवडक रवींद्र पिंगे’ या पुस्तकातला ‘चंद्रास्त’ हा पिंगेंनी लिहिलेला बालगंधर्व आणि गोहरबाई यांच्या नात्यावरचा लेख वाचत बसलो. वाचतावाचता एका ओळीवर येऊन थबकलो. ती ओळ होती : ‘बालगंधर्व गोहरबाईंना ‘गोहरबाबा’ म्हणायचे, आणि गोहरबाई बालगंधर्वांना ‘परवरदिग़ार’ म्हणत.’
परवरदिग़ार - परमेश्वर! खरोखरच दैव ज्याच्यावर प्रतिभा बनून प्रसन्न झालं होतं, हेच दैव प्राक्तन बनून मात्र सुरांच्या या परमेश्वराला वेदना, दुःख यांच्या गर्तेत ढकलत होतं. आणि एकाएकी माझ्या डोक्यात ‘परवरदिग़ार परवरदिग़ार’ हे शब्द सुरांत फिरू लागले. मनात आलं : ‘कव्वालीच बरोबर आहे.’

स्वतः बालगंधर्वांनी कुठल्याही संगीतप्रकाराला उंबऱ्याबाहेर ठेवलं नाही. ‘वद जाऊ कुणाला’ ही मूळ लावणी होती; ‘हमसे ना बोलो’ या ठुमरीवरून ‘नाही मी बोलत नाथा’ या पदाची रचना गोविंदराव टेंबेंनी केली. पाश्चात्य ऑर्गनला बालगंधर्वांनी मराठी रंगमंचावर स्थान दिलं! अशा पुरोगामी कलाकारानं कव्वालीला का उपरी वागणूक दिली असती? मला जयदेवांची एक गोष्ट आठवली.

जयदेव ‘गीत-गोविंद’ लिहीत बसले होते. एका श्लोकात त्यांनी राधेच्या वक्षस्थळाचं वर्णन कृष्णाच्या दृष्टिकोनातून लिहिलं आणि अचानक थबकले. परमेश्वर स्त्रीबद्दल इतका शारीर विचार कसा करेल या भावनेनं ते त्रस्त झाले. आपण पाप केलं आहे असं वाटून त्यांनी ते पान फाडून फेकून दिलं. घराबाहेर पडताना त्यांच्या पत्नीला म्हणाले : ‘मी नदीवर जाऊन स्नान करून येतो.’ पत्नीनं मान डोलावली आणि आपल्या कामात ती गर्क झाली. काही क्षणातच तिला जयदेव घराच्या दिशेनं परत येताना दिसले. इतक्या लवकर कसे आलात असं विचारता जयदेव म्हणाले : ‘‘जाता जाता काहीतरी सुचलं. ते लिहूनच जाईन.’’ ते आतल्या खोलीत गेले आणि दार लावून घेतलं. बायको पुन्हा कामात व्यग्र झाली. एक प्रहर झाला असेल. तिनं स्वयंपाकघराच्या खिडकीतून डोकावून पाहिलं, तर जयदेव पुन्हा नदीकडून तिला येताना दिसले.
‘‘हे काय, तुम्ही कधी गेलात?’’ असं तिनं विचारताच जयदेव जरा चिडूनच उत्तरले : ‘‘अगं सांगून नाही का गेलो तुला? नदीवर जातोय म्हणून?’’
‘‘अहो, पण काही क्षणांतच परतलात ना - काहीतरी नवीन सुचलंय म्हणून? खोलीचा दरवाजा बंद करून घेतलात.’’
जयदेवना काही कळेनासं झालं. ‘‘मी नाही आलो...’’ असं अस्पष्ट म्हणाले. दोघांचीही नजर त्या बंद दरवाज्याकडे गेली आणि दोघंही खोलीच्या दिशेनं धावले. आत कुणीच नव्हतं; पण जयदेवांनी फाडून फेकून दिलेला श्लोक पुन्हा कुणीतरी लिहून ठेवला होता...
सकाळी मनाच्या इंद्रायणीत बुडवलेला विचार पुन्हा रवींद्र पिंगेंच्या लेखातल्या ‘परवरदिग़ार’ या शब्दाच्या रूपानं वर तरंगत आला.

पहाटेचे तीन वाजले होते. ‘परवरदिग़ार’ या शब्दाला चाल सुचली होती. चित्रपटाची नवीन गाणी स्वानंद किरकिरे लिहिणार होता. तांबडं फुटताच मी त्याला फोन लावला आणि माझा विचार ऐकवला. त्यानं लगेच दुजोरा तर दिलाच; पण दुसऱ्या दिवशी अवघ्या तासाभरात हे गीत लिहून काढलं. प्रसाद साष्टे आणि आदित्य ओक या माझ्या सहकाऱ्यांनी या गीताचं अप्रतिम संगीत संयोजन केलं आणि शंकर महादेवन ते जीव ओतून गायला.

चित्रपट प्रदर्शित झाला आणि आश्चर्य म्हणजे ‘कव्वाली इथं नको होती,’ अशी एकही प्रतिक्रिया आली नाही.
प्रत्यक्ष चाल नाही; पण दैवानं दिशा दाखवली यात शंका नाही. कधी कधी डोंगर खणणं अपरिहार्यच असतं; पण कुठल्या डोंगऱ्याच्या पायथ्याशी कुदळ मारावी म्हणजे पाणी निघेल, हेही कुणाचा तरी ‘करम’ असल्याशिवाय साध्य होत नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com