‘मुलांच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी तुमच्यावरच’ (कविता लाड-मेढेकर)

kavita lad
kavita lad

पालकांनी एखादी गोष्ट सांगितली म्हणजे ती काहीही न बोलता करायची असा आमचा काळ होता; पण आता तसं राहिलेलं नाही. मुलं ‘का, कशाला, कसे’ असे बरेच प्रश्न अगदी सहज विचारतात. नव्या पिढीची एक गोष्ट चांगलीही आहे, की ते पालकांशी मोकळेपणानं बोलतात. माझी मुलगी सनाया सातवीत आहे. ती बऱ्याच गोष्टी माझ्याशी सहज बोलते. मुलगा ईशान दहावीत आहे. तोही मोकळेपणानं बोलतो. नेटफ्लिक्सवरची एक विनोदी मालिका आम्ही ईशानबरोबर बघत होतो. ती बघताना ईशान म्हणाला : ‘‘माझ्या वर्गात सगळी मुलं ही मालिका बघतात; पण त्यांच्या पालकांना ते माहीत नाही. फक्त मीच असा आहे, की ही मालिका मी माझ्या पालकांबरोबर बघतो आहे आणि त्यांच्यापासून काही लपवत नाही.’’

आपण जसजसे मोठे होत जातो, तसे आपण बऱ्यापैकी आपल्या पालकांचंच प्रतिबिंब बनत असतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून घेत असतो. माझं बालपण अतिशय सुरक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं. सर्वसाधारणपणे जे हवं ते सगळं आम्हाला मिळत गेलं. अर्थात त्या काळी आमच्या काही खूप मोठ्या अपेक्षाही नव्हत्या; पण तरीही घरच्या अशा परिपूर्ण वातावरणामुळे मी नेहमी सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण जगत आले. माझे वडील सरळ, स्पष्ट बोलणारे, ‘आपलं काम चोखपणे करावं, उगाच कोणाची मर्जी राखण्याचा प्रयत्न करू नये,’ अशा स्वभावाचे असल्यामुळं मीदेखील नकळतपणे या गोष्टी त्यांच्याकडून घेतल्या. असं असलं, तरी मी जास्त माझ्या आईसारखी आहे, असं मला वाटतं. अगदी छोटीशी गोष्ट सांगते. लहान असताना मी आईला नेहमी सांगायचे : ‘‘अगं, आज सुट्टी आहे, तर कशाला कामं काढत बसतेस? जरा शांत बस की!’’ ती सतत काहीतरी करत असायची. अगदी सुट्टीच्या दिवशीही विश्रांती घ्याची नाही. गंमत म्हणजे आता मीसुद्धा आई झाल्यावर माझ्या आईसारखीच झाली आहे. माझं सततचं काम, नाटकाचे प्रयोग, शूटिंग, दौरे सुरू असताना सुट्टी मिळेल त्या दिवशी मी अशीच कामं काढते. माझा पती आशिष मला म्हणतो : ‘‘अगं, तू जरा शांत बस. मला हे काम आता करायलाच पाहिजे, असं फार गांभीर्यानं घेऊ नकोस!’’ पण आईकडून नकळत मला ही सवय लागली आहे.
माझे आई-वडील खूप चांगले पालक होते. त्यांनी कधी आम्हा भावंडांवर हात उगारला नाही. आवाज वाढवून बोलण्याची त्यांना कधी गरज पडली नाही. कारण त्या मानानं मी खूप शहाणी मुलगी होते. आम्ही तीन भावंडं- मोठी ताई, मी मधली आणि दोन वर्षांनी लहान भाऊ. मात्र, तिघंही शिस्तीत वाढलो. आईनं मला मारलं होतं, असा एकच प्रसंग मला आठवतो. मी त्यावेळी तिसरीत होते आणि भाऊ पाहिलीत होता. शाळेतून संध्याकाळी सहा वाजता आम्ही घरी यायचो. शाळेत बाई घ्यायला यायच्या. त्यांच्याबरोबर आम्ही घरी यायचो. ते गणपतीचे दिवस होते. आम्ही शाळेतून परत येत होतो. आमच्या शेजारच्या गणपतीचं विसर्जन होतं. ते दिसल्यावर आम्ही दप्तरं बाईंकडे देऊन टाकली आणि शाळेच्या गणवेशातच गणपतीच्या मिरवणुकीसोबत विसर्जनाला गेलो. मस्त नाचत बागडत आम्ही विसर्जन करून आठ-सव्वाआठच्या दरम्यान घरी आलो. घरी आल्यावर मात्र आईनं आम्हाला भरपूर मार दिला होता. कधीही मोठ्या आवाजात न बोलणारी आई आज एवढी का रागावली आहे, ते आम्हाला समजेना. आम्ही गुलालानं माखलो होतो. म्हणून आई बाथरूममध्ये नेऊन आमचे केस धूत होती. तेव्हा आम्हाला जाणवलं, की आई रडतेय. ते बघून मी विचारलं : ‘‘आम्हाला मारून तू आता का रडते आहेस?’’ त्यावर ती म्हणाली : ‘‘मला तुमची किती काळजी वाटली, हे तुम्हाला माहीत आहे का? गेल्या वर्षी एक लहान मूल त्या विसर्जनाच्या तलावात बुडालं होतं. तुमच्याबरोबर घरचं कोणी मोठं नव्हतं. तुम्ही न विचारता तिकडं निघून गेलात. काही झालं असतं, तर आम्ही काय करायचं? अशी काळजी माझ्या मनात होती. पुढच्या वेळी जायचं, तर सांगून जा.’’ आज इतक्या वर्षांनंतरही मला हा प्रसंग ठळकपणे आठवतो आणि तिनं मारण्याचं कारण सांगितल्यावर त्यानंतर कधीही त्या मारण्याचं वाईट वाटलं नाही. आमच्या घरात कधी फार मोठ्यानं बोलण्याची पद्धत नव्हती. दंगामस्ती करताना मोठा आवाज झाला, तरी बाबा लगेच ‘हळू बोला’ असं सांगत असत. त्यामुळं घरात अतिशय मितभाषी वातावरण असायचं.

आता मी पालक झाल्यावर काळ बदलला आहे. एक फरक मात्र नक्की जाणवतो. आमच्या पिढीला आमच्या पालकांची थोडी भीतीही वाटते. आमच्या लहानपणी आमचे पालक हे ‘पालक’च होते. ते प्रेमळ असले, तरी त्यांचा एक धाक होता; पण आता आमच्या पिढीचे लोक स्वतः पालक होतात, तेव्हा म्हणतात, की मुलांना काही धाकबिक नको बरं का! फ्रेंडली राहिलं पाहिजे वगैरे...! पण कधीकधी फ्रेंडली म्हणजे इतकं फ्रेंडली होऊन जातं, की मुलांना काही वेळा सांगावे लागतं, की ‘अरे, आम्ही तुमचे पालक आहोत.’

वडिलांनी एखादी गोष्ट सांगितली म्हणजे ती काहीही न बोलता करायची असा आमचा काळ होता; पण आता तसं राहिलेलं नाही. मुलं ‘का, कशाला, कसे’ असे बरेच प्रश्न अगदी सहज विचारतात. हा महत्त्वाचा फरक जाणवतो. नव्या पिढीची एक गोष्ट चांगलीही आहे, की ते पालकांशी मोकळेपणानं बोलतात. माझी मुलगी सनाया सातवीत आहे. ती बऱ्याच गोष्टी माझ्याशी सहज बोलते. मुलगा ईशान दहावीत आहे. तोही मोकळेपणानं बोलतो. नेटफ्लिक्सवरची एक विनोदी मालिका आम्ही ईशानबरोबर बघत होतो. त्यातले विनोदही खूप चांगले असतात, म्हणून आम्ही ती बघतो. ती मालिका बघताना ईशान म्हणाला : ‘‘माझ्या वर्गात सगळी मुलं ही मालिका बघतात; पण त्यांच्या पालकांना ते माहीत नाही. फक्त मीच असा आहे, की ही मालिका मी माझ्या पालकांबरोबर बघतो आहे आणि त्यांच्यापासून काही लपवत नाही.’’ या प्रसंगातून एक गोष्ट लक्षात येते, की शेवटी आपण मुलांपासून काय आणि किती लपविणार? त्यांना बाहेर सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे १५ वर्षाच्या मुलाला हे करू नकोस आणि ते करू नकोस असं सांगण्यापेक्षा काय योग्य आणि काय नाही हे समजण्याइतपत त्यांना आपण तयार करू शकतो. मी आणि आशिष नेहमी म्हणतो, की आपण आपापल्या परीनं सगळं चांगलं करायचे; पण पुढं ती त्यांचं नशीब घेऊन येतात. आपण फक्त त्यांना चांगल्या-वाईटातला फरक नक्कीच सांगितला पाहिजे. पुढं चॉईस त्यांचा असतो. त्यांच्यावर नुसती बंधनं टाकून उपयोग नाही. फोनबाबत बंधनं आम्ही मुलांवर नाही टाकली; पण फोन किती वापरायचा हे मात्र सांगितलं. तसं पाहिलं, तर इंटरनेटवर खूप चांगली माहिती उपलब्ध आहे. ईशानमुळे मला खूप चांगल्या डॉक्युमेंट्रीज पाहायला मिळाल्या. तोही मला चांगल्या डॉक्युमेंट्रीज सुचवतो. उदारणार्थ, ‘मॕक्नोनाल्ड्‍स’संदर्भातली डॉक्युमेंट्री त्यानं मला पाहायला सांगितली. ती खरोखरच चांगली होती. एखादा सिनेमा बघताना कलाकाराचा इतिहास, त्यानं जिंकलेली बक्षिसं इत्यादी गोष्टी मुलं झटक्यात आपल्याला सांगतात. माझ्या मते ही आधुनिक तंत्रज्ञानाची जमेची बाजू आहे.
एक गोष्ट मला नेहमी वाटते, की माझा मुलगा माझा मित्र झाला, तरी पालक आणि मुलगा या नात्यातली अस्पष्ट रेषा ओलांडली जाऊ नये अथवा पुसली जाऊ नये. आम्ही आमच्या वडिलांच्या जवळसुद्धा नाही बसायचो; पण आता तसा काळ नाहीये. त्यामुळं तो फरक मला नक्कीच जाणवतो.

आई होणं हे खूप आनंददायी असल्याची भावना आधीपासूनच माझ्या मनात होती. ती एक पारंपरिक स्त्रीसुलभ भावना असावी; पण मला ईशान झाला, तेव्हा मला जाणवलं, की बापरे, आई होणं ही किती मोठी जबाबदारी आहे. खरं तर मुलांना घडवण्यासाठी ठरवून काही करायचं नसतं. आपण आपलं चांगलं वागत राहिलं पाहिजे. आपल्याकडे बघूनच मुलं शिकतात. आपण जे करतो त्याचंच मुलं हळूहळू अनुकरण करतात. त्यामुळं आपण योग्य प्रकारे वागलो, तर मुलांना फार वेगळं शिकवण्याची गरज नसते. मात्र, तरीही काही वेळा मुलं चुकली, तर एरवी सॉफ्ट असणारी मी दोन शब्द खडसावून विचारू शकते किंवा सांगू शकते, की अमुक गोष्ट मला आवडलेली नाही. मला नेहमी एक वाटतं, की माझी मुलं काही चांगलं करत असतील, तर आपणच स्वतःला शाबासकी देऊन घ्यावी आणि आपली मुलं काही चुकत असतील, तर माझं काय चुकलं याचाही मी विचार करायला हवा.

मुलंदेखील आपल्याला नवनव्या गोष्टी शिकवतच असतात. तंत्रज्ञानाबाबत, इंग्लिश उच्चारांबाबत ती बऱ्याच गोष्टी शिकवतात. मी माझ्या अडतिसाव्या वर्षी आयफोन हातात घेतला. माझी मुलगी जन्मापासून तो बघत आहे. त्यामुळं तिला तो कसा वापरायचा हे माझ्यापेक्षा खूप सहज कळतं. आयपॅड कसा वापरायचा, हे मुलंच मला शिकवतात. मोठा मुलगा ईशान झाल्यावर मी नाटकातून ब्रेक घेतला होता आणि महिन्याचे पंधरा दिवसच शूटिंग करायचं, असं ठरवलं होतं. त्यावेळी सुधीर भट मला म्हणाले होते : ‘‘कविता, तुझं बाळ दोन-अडीच महिन्यांचं होईपर्यंत आपण नाटक थांबवू. नंतर पुन्हा सुरू करू.’’ पण मी सुधीरकाकांना म्हणाले होते : ‘‘माझं पाहिलं बाळ आहे. त्याचं वॅक्सिनेशन वगैरे गोष्टी कशा सांभाळता येतील हे मला माहीत नाही.’’ शिवाय मला असंही वाटलं होतं, की माझं मूल जोपर्यंत ‘मला काही हवंय, काय होतं आहे’ असं सांगू शकत नाही, तोपर्यंत मी त्याच्याजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला न बोलता जे हवं असेल, ते फक्त मला कळू शकेल असं मला आई म्हणून प्रकर्षानं वाटत होतं. त्यामुळं तेव्हा मी काम थांबवलं होतं. तो सात-आठ महिन्यांचा झाल्यावर काम सुरू केलं. कधी आई, कधी सासुबाई त्याला सांभाळायच्या. त्यांच्यासोबत कामाला बाई असायच्याच. त्याही खूप चांगल्या होत्या. संभाळणारे असूनही मी दिवसातून कितीतरी फोन आई किंवा सासूबाईंना करायचे. कारण ती माझी मानसिक गरज होती त्यावेळी.

मुलं झाल्यानंतर एक अभिनेत्री म्हणून काम करताना वेळेचं नियोजन करावंच लागतं; पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्या वेळी आपली प्राथमिकता काय आहे हे स्पष्ट असणं. म्हणजे मी नाटकातून ब्रेक घ्यायचं ठरवलं त्याचं कारणच हे होतं, की मुलाला माझी खूप गरज असताना मी त्याच्याजवळ असावं. आज पंधरा वर्षानंतर मी पुन्हा नाटक करू लागले आहे; पण आज आणि त्याही वेळी माझं हेच मत होतं, की आपण येऊ, तेव्हा आपल्यासाठी काम नक्की असणारच. आमच्या क्षेत्रात खरं तर असं म्हणतात, की तुम्ही एकदा प्रवाहातून बाहेर पडलात, की तुम्ही बाजूला पडता; पण मी त्यावेळी एवढा विचारच केला नव्हता. मला मुलांसाठी वेळ द्यायचा होता आणि तो मी दिला. बस इतकं सरळ होतं सगळं. मुलं लहान असताना मी शूटिंग मात्र करायचे. बारा तासांचं शेड्युल असायचं, सकाळी नऊ ते रात्री नऊ; पण मी त्यावेळी सगळ्या निर्माता- दिग्दर्शकांकडून एक सूट घेतली होती. मी आठलाच माझं काम संपवून घरी यायचे. माझं काम चोख आणि वेळेत पूर्ण होत असल्यामुळं निर्मात्यांनीही याबाबत कधीही अडवलं नाही.

आता ईशान दहावीत आहे म्हणून मला घरी थांबायची गरज नाही. त्याची जबाबदारी मी आणि आशिषनं एकत्रितपणे घेतली आहे. मी पुन्हा काम करायचं ठरवलं, तेव्हा सासू-सासरे, आई-वडील यांच्याबरोबरच पतीचा पाठिंबा खूपच जास्त महत्त्वाचा होता आणि आहे. इतरांचा पाठिंबा असला आणि पतीचा नसला, तर तुम्ही इतका वेळ नाही काम करू शकत. आता मी पूर्ण वेळ काम करू लागले आहे. नाटकाचे २५ प्रयोग महिन्याला करते आहे. त्याचे सतत दौरे सुरू असतात. त्यावेळी मुलांची शाळेतली ओपन हाऊसेस, पालक-शिक्षक मीटिंग्ज, या सर्व गोष्टी आशिषलाच कराव्या लागतात. पूर्वी आम्ही दोघं आलटूनपालटून करायचो. मी दीड महिना अमेरिका दौऱ्यावर गेले, तेव्हा तो म्हणाला : ‘‘तू काळजी करू नकोस. गो अहेड, जस्ट डू इट! तू नाटकासाठी जाते आहेस, शांतपणे जा आणि उत्तमपणे काम कर!’’ हा आत्मविश्वास पतीकडून मिळणं खूपच महत्त्वाचं असतं. हा आत्मविश्वास तुमच्या कामातून, व्यक्तिमत्त्वातून नकळतपणे परावर्तित होतो. माझ्या मुलांसमोर आशिषनं कधीही मला अपराधी वाटेल असे शब्द काढले नाहीत. ‘‘तू काम करतेस, कामामुळे तू घरी नसतेस,’’ असं तो चुकूनही कधी बोलत नाही आणि तसं त्याला आजिबात वाटतही नाही. त्यामुळं मुलांनाही तसं वाटण्याचा संबंधच येत नाही. ही नक्कीच महत्त्वाची गोष्ट आहे. ईशाननं मला एकदा लहानपणी विचारलं होतं, की ‘‘आई तू नाटकात काम करायचीस?’’ मी म्हणाले : ‘‘हो. तू व्हायच्या आधी करायचे. त्यानंतर मी बंद केलं.’’ पण आता त्यानं माझं नाटक बघितलं. त्याला ते खूप छान वाटलं. त्याच्या प्रिन्सिपल, टीचरपासून सगळे म्हणतात : ‘‘तुझी आई उत्तम अभिनेत्री आहे. आम्ही त्यांचं नाटक पाहिलं.’’ याचा मुलांना आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो. त्यांच्या शाळेत रंगभूमीसंदर्भात व्याख्यान देण्यासाठी मला बोलावलं होतं, तेव्हाही त्यांना खूप छान वाटलं होतं.

व्यस्ततेतही कामाचं नियोजन करायचं ठरवलं, तर ते चांगल्या प्रकारे करता येतं. त्यामुळं मुलंही उत्तम नियोजन करायला शिकतात. एक छोटंसं उदाहरण सांगते. ईशान सकाळी सहा वाजता फुटबॉल खेळायला जातो. आमच्या ताई सकाळी सातला येतात आणि डबे बनवतात. मी दौऱ्यावर नसते, तेव्हा मी ईशानचा डबा बनवते; पण मी दौऱ्यावर होते, तेव्हा सनायानं खूप सहजपणे मार्ग काढला. ती ईशानला म्हणाली : ‘‘तू सहा वाजता जा. ताईंनी केलेला डबा मी शाळेत घेऊन येत जाईन आणि तुझ्या वर्गात आणून देईन.’’ मला ही गोष्ट ईशानकडून कळाल्यावर मुलांचं खूप कौतुक वाटलं. मुलं आपोआपच जबाबदारीनं या गोष्टी शिकतात.

आजच्या काळात गॕजेट्स ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. प्रत्येक तंत्रज्ञानाच्या दोन बाजू असतात. आपण कोणती बाजू बघतो आणि वापरतो ते आपल्या हातात आहे. मुलांना गॅजेट्स द्यायची नाहीत, अशा विचारांचे आम्ही दोघंही नाही. ती या काळाची गरज आहे. ती असू द्यावी. फक्त मुलं ती किती आणि कशी वापरतात हे बघणं ही मात्र पालकांची जबाबदारी. अभ्यास, खेळ सोडून फोन वापरायचा नाही हे स्पष्टपणे मुलांना सांगितलं आहे. तसं झालं, तर फोन काढून घ्यावा लागेल, हेदेखील स्पष्ट केलं. सोशल मीडिया वापरताना वैयक्तिक सुरक्षितता कशी जपावी, हेही मी त्यांना सांगितलं. मुलांना व्यवस्थित समजावून सांगितल्यावर ती जबाबदारीनं वागतात. तरीही माझं याबाबतीत त्यांच्याकडे बारकाईनं लक्ष असतं.

कामासाठी घराबाहेर पडताना मी नेहमीच मुलांना कामाचं महत्त्व पटवून दिलं. तुमच्यासाठी अभ्यास, खेळ जितके महत्त्वाचे आहेत, तितकंच माझ्यासाठी काम महत्त्वाचं आहे, हे त्यांना समजावलं. त्यामुळं मुलांनीदेखील माझ्या कामाचा नेहमीच आदर केला आणि कामासाठी बाहेर जाणं सहजपणे स्वीकारलं. आपली मुलं मातीच्या गोळ्यासारखी असतात. आपण घडवू तशी ती घडतात. आपण आपल्या परीनं मातीला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करायचा. सनायाचे दोन छोटे किस्से सांगते. एकदा आम्ही दोघं घरी नव्हतो. आमचे एक मित्र पत्रिका देण्यासाठी घरी आले. त्यावेळी सनायानं अगदी व्यवस्थितपणे पाणी वगैरे दिलं. ‘‘काका, तू काय खाणार? थोडं तरी खा,’’ असा आग्रह धरला. माझ्या मैत्रिणीला तिचं खूपच कौतुक वाटलं. दुसरा एक प्रसंग म्हणजे, मी अमेरिका दौऱ्यावर होते. तेव्हा गुढीपाडवा होता. आशिषला मी गुढी उभारायला सांगितली; पण त्याला याची फारशी आवड नसल्यानं तो म्हणाला : ‘‘बघतो जमतं का?’’ नंतर त्यानं गुढीचे फोटो टाकून मला सांगितलं, की सनायानं आमच्या ताईंना सांगून खालून फुलं वगैरे आणायला सांगितली आणि सर्व तयारी करून गुढी उभारली. आता या गोष्टी काही मी तिला सांगितल्या नव्हत्या; पण मी त्या करत असताना तिनं बघितलं होतं.

त्यामुळं उद्या माझं मूल कुठं चुकलं, तर आधी मी विचार करीन की माझं काय आणि कुठं चुकलं? नंतर त्याला खडसावीन आणि त्याची चूक दाखवून देईन. घडवताना योग्य प्रकारे घडवलं, तर आपलं मूल चुकीचं वागणार नाही, याची पालकांनी खात्री बाळगावी.... कारण त्यांचा पहिला आदर्श त्यांचे आई-वडीलच असतात.
(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com