मेंदूलाही रिलॅक्‍स होण्याची गरज (ललित प्रभाकर)

lalit prabhakar
lalit prabhakar

तुमचं शरीर आणि मन उत्तम असेल, तर "स्माईल प्लीज' म्हणायची गरजच भासत नाही. ते आपसूकच येतं. कुटुंबव्यवस्था, मित्रमैत्रिणी यांचाही वेलनेसवर परिणाम होतो. शरीराला रिलॅक्‍स होण्याची गरज असते, तशी मेंदूलाही असते. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांबरोबर ज्यावेळी गप्पा मारता, वेळ घालवता, त्यामुळं तुम्ही रिलॅक्‍स होता.

माझ्या दृष्टीनं वेलनेस म्हणजे सतत कार्यरत राहणं आणि तेच जास्त महत्त्वाचं आहे. सतत काही ना काही तरी शरीराला काम देत राहणं, हे महत्त्वाचं. मध्यंतरीच्या काळामध्ये वेळ असल्यामुळं मी "मार्शल आर्ट' शिकलो. मला ट्रेकिंगला जायची आवड आहे. त्यामुळं आवडीनुसार या गोष्टी केल्यानं तुम्ही फिट राहता. तुमच्या शरीराला आव्हान देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही नेहमी काही ना काही काम करत राहणं, आपल्या आवडी जोपासणं, शरीराला व्यायाम कसा होईल, हे पाहणं गरजेचं आहे.

उत्तम आरोग्याचा मंत्र
आपण शरीराचा किती वापर करतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण हल्ली मोबाईल, लॅपटॉप यांचा मोठ्या प्रमाणात वापर, जॉब प्रोफाईलमुळंही आपण एकाच ठिकाणी बसून काम करतो. अशा वेळी मला असं वाटतं, की आपण आपल्या शरीराचा तितका वापरच करत नाही. नुकतीच मी एक मुलाखत वाचली. त्यात असं म्हटलं होतं, की लहान मुलांची शारीरिक वाढ हल्ली व्यवस्थित होत नाही. कारण ते सगळे मोबाईल आणि कॉम्प्युटर यांतच गुंतलेले असतात. त्यांची शारीरिक हालचालच होत नाही. लहान मुलं आधी मैदानी खेळ खेळायची; परंतु तेच आता इतके कमी झाले आहेत. त्यामुळं शारीरिक हालचालच कमी झाली आहे. त्यामुळं शरीरही तुम्हाला तसाच प्रतिसाद देत जातं. तुम्ही गरजच निर्माण केली नाही, तर शरीरामध्ये काही तयारच होत नाही, अशा आशयाची ती मुलाखत होती. मलाही तेच वाटतं. तुम्ही तुमच्या शरीराला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकता, त्याची सीमा कुठपर्यंत खेचू शकता, हे जास्त महत्त्वाचं आहे. आपलं शरीर ही आपली एकमेव मालमत्ता आहे आणि त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. ते आहे तोपर्यंतच आपण सर्व गोष्टी करू शकतो. विशेषतः शरीर उत्तम असणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यावरच सर्व गोष्टी अवलंबून असतात. आम्हाला कोणत्याही भूमिकेत जायचं असेल, तर शरीर उत्तम असल्यास आमच्यावर मर्यादा येत नाहीत. त्याचा आम्ही चांगल्या पद्धतीनं वापर करून घेऊ शकतो.

पथ्यं कोणतीच नाहीत
आहाराच्या बाबतीत मी सहसा काहीच पथ्यं पाळत नाही. मला घरचं जेवण खूप आवडतं. विशेषतः मांसाहारी खायला खूप आवडतं. कितीही डाएट प्लॅन मेंटेन करावासा वाटला, तरी माझ्याकडून खाण्याबाबतीतली पथ्यं, वेळा अजिबात पाळल्या जात नाहीत. फक्त चित्रीकरणादरम्यान खाण्याच्या वेळा आवर्जून पाळल्या जातात, कारण तिथं तुमच्याकडं लक्ष द्यायला माणसं असतात. त्यामुळं तिथं आमचा आहार खूप वेळेवर आणि सुरळीत असतो. नाही तर इतर वेळेस मी सगळं खातो.

वेळ मिळेल तसा व्यायाम
खरं सांगायचं, तर मी रोज व्यायाम करतच नाही. एक तर मला वेळही मिळत नाही आणि माझ्याकडून हे होतही नाही. त्यामुळं वेळ मिळेल तसा मी व्यायाम करतो. मला असं वाटतं, की तुमचं शरीर तितकं लवचिकही असलं पाहिजे. तुम्हाला व्यक्तिरेखेनुसार वजन वाढवताही आलं पाहिजे आणि कमीही करता आलं पाहिजे. फिटनेस गुरूच्या बाबतीत सांगायचं, तर माझा फिटनेस गुरू असा कोणीच नाही. मी माझा व्यायाम स्वतःच करतो. खरं तर मी योगासनं, प्राणायाम वगैरे काहीच करत नाही.

मानसिक आरोग्य महत्त्वाचं
मानसिक आरोग्य हे तुमच्या आजूबाजूच्या माणसांवरही अवलंबून असतं आणि तीच तुम्हाला जास्त मदत करू शकतात. ती तुमच्या बरोबर असताना तुम्ही त्यांच्यासोबत कसा वेळ घालवता, या सर्व गोष्टींमुळं तुमचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहू शकतं. अर्थात बाकीच्या गोष्टीही आहेतच. तुम्हाला जर वाचनाची आवड असेल, फिरण्याची आवड असेल तर ते करायला हवं. या गोष्टी मला आवडतात. त्यामुळं वेळ मिळाला, की मी या गोष्टी आवर्जून करतो. वेगवेगळ्या फिल्म्स, वेब सिरीज बघतो, यानंसुद्धा रिफ्रेश होतं. त्यातूनही बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. तुम्हाला ज्याची आवड आहे, ती तुम्ही कशा पद्धतीनं पूर्ण करता त्यावर खूप काही अवलंबून असतं. तुमच्या आजूबाजूची माणसं जितकी सकारात्मक असतील, तर त्यांच्याबरोबर किंवा इतर चांगल्या माणसांबरोबर आपण वेळ घालवला तर आपल्याला नक्कीच बरं वाटतं.

वजन कमी-जास्त केलं
चित्रपट वा मालिकांमध्ये अभिनय करताना अनेक कलाकारांना व्यक्तिरेखेच्या गरजेनुसार वजन कमी किंवा जास्त करावंच लागतं. त्यासाठी तुमचं शरीर लवचिक असणं गरजेचं आहे. "आनंदी गोपाळ' आणि "मीडियम स्पायसी' या दोन्ही चित्रपटांसाठी मला वजन कमी करावं लागलं होतं. त्या काळात मी व्यायाम आणि डाएटवर नियंत्रण ठेवलं. खरं तर कलाकारांसाठी हे एक आव्हानच असतं. कारण, कमीत कमी वेळात ही कसरत करावी लागते. त्यानंतर पुन्हा आपलं वजन नियंत्रणातही आणावं लागतं.

अक्षयकुमार, चार्ली चॅप्लिनचा आदर्श
खरं तर फिटनेस आणि वेलनेसबाबत माझे दोन-तीन आदर्श आहेत. मी ज्यावेळी अक्षयकुमारकडे पाहतो, त्यावेळी मला कौतुक वाटतं. त्याचं वय पाहता, त्यानं ज्या पद्धतीनं स्वतःला फिट ठेवलं आहे, त्याबद्दल त्याला मानायला हवं. लवचिक असण्याच्या दृष्टीनं, अभिनयाच्या दृष्टीनं चार्ली चॅप्लिननं त्याच्या शरीराचा शेवटपर्यंत वापर केला आहे आणि त्यातूनच त्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर "स्माईल' आणलं. तुमचं शरीर आणि मन उत्तम असेल, तर "स्माईल प्लीज' म्हणायची गरजच भासत नाही. ते आपसूकच येतं.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुटुंबव्यवस्था, मित्रमैत्रिणी यांचाही वेलनेसवर परिणाम होतो. शरीराला जशी रिलॅक्‍स होण्याची गरज असते, तशी मेंदूलाही असते. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांबरोबर ज्यावेळी गप्पा मारता, वेळ घालवता, त्यामुळे तुम्ही रिलॅक्‍स होता.
(शब्दांकन ः अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com