दिवटी ते वीज : ज्योतीची परोपकारी यात्रा!

Vinayak Mahadev Kulkarni
Vinayak Mahadev Kulkarniesakal

अनामिक, अबोध हुरहूर टिपकागदासारखा टिपणाऱ्या मनाचा हा अंधार प्रकाशून टाकण्यासाठी हवी असते ज्योत! दिवटीपासून विजेच्या दिव्यापावेतो मला कोणतेही रूप लाभले तरी जगाला प्रकाश देणे एवढेच काम मी करते.

त्यासाठी माझा देह जळाला तरी मी पर्वा करीत नाही. ज्योतीची ही भावना केवळ परोपकाराचीच नाही, तर तिचा व्यवहार मरता-मरता जगदोद्धार करणाऱ्या एखाद्या माहात्म्याला वा हुतात्म्याला शोभावा असाच आहे.

ज्योत तोच संदेश जळता-जळता साऱ्यांना देत जळते. ज्योतीचे हे नियत कर्म कवीने अतिशय छान, तेवढेच मार्मिक पद्धतीने रेखाटलेले आहे. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet vinayak kulkarni nashik)

विनायक महादेव कुळकर्णी (१९१७ ते २०१०) यांचा जन्म मणेराजुरी (ता. तासगाव, जि. सांगली) येथे झाला.

पुण्यातून बी.ए.मध्ये तर्खडकर सुवर्णपदक, मुंबई विश्वविद्यालयातून मराठी विषयात एम.ए.मध्ये प्रथम क्रमांक, तर नाटककार खाडिलकर या प्रबंधावर पीएच.डी. अशा झगझगीत शैक्षणिक कारकीर्दीनंतर वि. म. अध्यापनाच्या क्षेत्रात उतरले.

प्रारंभी बेळगावचे लिंगराज महाविद्यालय, नंतर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्राध्यापकाचा पुरस्कार त्यांना मिळाला. कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य असे विविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.

विसर्जन हे खंडकाव्य, कमळवेल, पहाटवारा, अश्विनी, पाऊलखुणा, प्रसाद रामायण, फुलवेल, भाववीणा, मृगधारा असे काव्यसंग्रह त्यांनी प्रसवले. बालकवितांचे अनेक संग्रह, मला जगायचंय ही कादंबरी, वृत्ते व अलंकार, भाषाशास्त्रावरील पुस्तक, रामजोशीकृत लावण्या, मुक्तेश्वर सभापर्व अशा अनेक ग्रंथांचे संपादन त्यांनी केले.

भा. रा. तांबे नि गदिमा या दोन कवींच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने कवीला सन्मानित करण्यात आले.

कवीच्या अनेक कविता अनेक गायकांनी स्वरबद्ध केलेल्या आहेत. त्यातील काही प्रसिद्ध रचना म्हणजे माझ्या मराठीची गोडी, अमर हुतात्मे, गाडी आली- गाडी आली, माझा पानमळा, वाऱ्यावरती ध्वज यांचा समावेश आहे. या मायमराठीविषयी कवीच्या मनात अतीव ओढ आहे, ती व्यक्त करताना कवी गातो,

माझ्या मराठीची गोडी

मला वाटते अवीट

माझ्या मराठीचा छंद

मना नित्य मोहवीत

मराठी ज्ञानेशाची, तुक्याची, रामदासाची नि शिवाजीची आहे, याचा कवीला अभिमान वाटतो. केशवसुत, भा. रा. तांबे, गोविंदाग्रजांची ही वाणी, जात्यावरील ओवीपासून डफ, तुणतुण्याच्या तालावर पोवाडे गाणारी. मराठी कवीला मोहविणारे तिचे मधाळ, रसाळ रूप वर्णताना तो म्हणतो,

हिचे स्वरूप देखणे

हिची चाल तडफेची

हिच्या नेत्री प्रभा दाटे

सात्विकाची, कांचनाची

Vinayak Mahadev Kulkarni
का गुदमरतेय मुंबई?

कवीने केलेले मराठीचे देखणे वर्णन मराठी रसिकांच्या पसंतीस उतरलेले आहे. आपली कविता कशी जन्मते, हे सांगताना एका कणिकेत कवी लिहितो,

बागेत मनाच्या अनंत फुलतां फुलें

उमटती तयांवर भ्रमरांची पाउलें

पाकळी हालतां-मरंद कोमल गळे ।।

जल गंधयुक्त ते ओसंडत अंतरीं

ती कवनें माझीं----लहरींवर लहरी ।।

कवीच्या मनाच्या बागेत फुलणारी फुले म्हणजे कविता. एवढीच व्याख्या करून कवी थांबत नाही तर ‘तीवर उमटणारी भावभावनारूपी भ्रमरांची पाऊले, मनातील हळव्या भावना म्हणजे पाकळी, तीतून झरणारी कोमलता म्हणजे मकरंद, अंतरात उठणाऱ्या विविध भावनांचे तरंग म्हणजे गंधयुक्त जल नि त्या उठणाऱ्या लहरी-लहरी म्हणजेच माझी कवनें होत, असे विस्तृत वर्णन करीत तो कवितेची कवी मनात चालणारी आंतरिक प्रक्रियाच उलगडत जातो.

ही प्रक्रिया आपोआपच घडत नसते, त्यासाठी कवितेचा, काव्याचा ध्यास लागावा लागतो. याचे वर्णन करताना ‘छंद’ या चार ओळींच्या कवितेत कवी सांगतो,

छन्द बहुत दुनियेमधीं या

छन्द काव्याचा निराळा

छन्द हा ज्याला कळाला

जीवनां रस त्याला मिळाला!

अनेक छंदांमधील काव्याचा छंद कवीला लागल्याने कवीला जीवनरस चांगलाच कळला म्हणून आकाशातील स्वर्गाची, स्वर्गीय सुखाची इच्छा त्याला नाही. मानवी जीवनच त्याला स्वर्गीय वाटते, म्हणूनच आपली मनीषा व्यक्तविताना तो लिहितो,

गमतसे स्वर्गही येथ उणा!

नरजन्म मिळो हा पुनः-पुन्हा!

नरजन्माची कवीला वाटणारी ओढ चुकीची नाही. मानवी जन्मात जे घडू शकते, ते अन्य कोणत्याही जन्मात शक्य नसते. मानवी जन्म म्हणजे संभावनांच्या अनंत शक्यता होत. नर पशूपासून परमेश्वरापावेतो काहीही बनू शकतो.

या सृष्टीत जी-जी काही निर्मिती आहे, ती-ती सर्व मानवी बुद्धी, मन नि श्रमाचीच देणगी आहे. कवीला केवळ मानवी देहच नको, तर त्यात प्रीतही हवी आहे म्हणूनच तिची भेट होताच त्याला वाटते,

आजवरींच्या प्रवासा

आतां दिला मी विराम

खूण अंतरां पटली

हेंच माझें चिरंधाम !

एकदा खूण पटली, की ती हर क्षणी नवी-नवीच भासते, याची कबुली देताना कवी तिला सांगतो,

Vinayak Mahadev Kulkarni
समाजमनाचे प्रतिबिंब

दिसशी आज निराळी

सखी तूं, दिसशी आज निराळी !

निराळे दिसणे हे नित्य जपल्या जाणाऱ्या नात्यात नवी खुमारी भरणारे असते; पण प्रीत कितीही गहरी असली तरी तिला विरहाचा शाप असतोच नि विरहाला पुनर्मिलनाचे स्वप्न असतेच. ते पूर्ण झाल्यावर आपल्या भावना कथन करताना ‘विरहानंतर’ कवितेत कवी लिहितो,

येतांच तूं कोमलांगी !

माझ्या मनाच्या मंदिरीं

ऊन सोन्याचें सांडलें

आल्या श्रावणाच्या सरी !!

मनाचे मंदिर, सोन्याचे ऊन नि श्रावणाच्या सरी कवीच्या मनातील आत्यंतिक आनंदाच्या नि तिच्याविषयी वाटणाऱ्या पवित्रतेच्या भावना दाखवून जातात.

कवीच्या मनात न्याय, समता नि मानवतेविषयीही अशीच हळवी भावना आहे, ती कधी व्यक्तिगत घटनांतून व्यक्त होते; तर कधी सामाजिक घटनांतून प्रगट होते. कोणीतरी कचऱ्याच्या कुंडीत फेकलेले बाळ पाहून कवीच्या मनांत विचारांचे काहूर माजते, ती पशुवत कृती त्या अजाण बाळाच्या मातेने का केली असावी, याविषयीचे तर्क-कुतर्क त्याच्या मनांत चालतात.

क्षणभर ते बाळ जीवंत आहे, असेही त्याला वाटून जाते. चिखलात कमळ जन्मते तसे कचऱ्यात हे तान्हुले जन्मले की काय, अशीही कल्पना येते; पण ते मृत आहे हे कळाल्यावर त्याला निरोप देताना कवी सांगतो,

जा------जा, सुखानं जा !

एखाद्या अनाथाश्रमात

दीनवाण्या मुद्रेनं वाढण्यापेक्षा

त्या देवाजवळ जा

आणि त्याला टाहो फोडून सांग,----

‘‘देवा, तुझ्या जगाची घडी अजूनही नीट बसलेली नाही!’’

जगाची घडी नीट न बसण्यामागे मनुष्यातील पाशवी नि आसुरी वृत्तीच कारण आहे, याचे दर्शन कवीच्या ‘अणुस्फोटका’ या कवितेतून होते.

अणुस्फोटानंतर हिरोशिमा, नागासाकीही बेचिराख झालेली जपानी नगरे कवीसमोर येतात. त्यातील आसुरी विनाशाचे वर्णन करता-करता उपरोधाने कवी त्या अणुबॉम्बला उद्देशून म्हणतो,

अणुस्फोटका रे ! धन्य धन्य तुझी (!)

केवढें सामर्थ्य !

केवढी महती !

आजपासून आम्ही सारेजण

गाऊं स्फोटका तुझी आरती !!

अणु-बॉम्बचा अवतार पाहिल्यावर, त्यातून होणारा संहार नि विध्वंस पाहिल्यावर शांततेचीच नाही, तर युद्ध नि महायुद्धाचीही दांतखीळ बसेल, असे सांगत कवी म्हणतो, ‘ज्याप्रमाणे रावणाच्या कैदेत सारे ग्रह-तारे, देवी-देवता होते, तसेच ते आता अणुस्फोटकाच्या घराचे अंगण झाडायला राहतील,’ यातील उपरोध जितका वेधक आहे,

तितकीच कवीच्या मनातील मानवतेविषयीची कणव लक्षणीय आहे. उदात्त नीतिमूल्यांची ज्यांना चाड असते, त्यांच्या मनात चाललेली हुरहूर व्यक्तविताना ‘अबोध हुरहूर’ या कवितेत तो लिहितो,

दीपतील दिशा असा, जरी बाहेर प्रकाश

एक कोपरा मनाचा, माझ्या अंधुक उदास

रसिका ! किती समर्पक ओळी आहेत या. अनामिक, अबोध हुरहूर टिपकागदासारखा टिपणाऱ्या मनाचा हा अंधार प्रकाशून टाकण्यासाठी हवी असते ज्योत! ‘ज्योत’ या कवितेच्या प्रारंभी ज्योत सांगू लागते,

Vinayak Mahadev Kulkarni
थोडा हैं, थोडे की जरुरत हैं।

आधीं होतें मी दिवटी

शेतकऱ्यांची आवडती

झालें इवली मग पणती

घरांघरांतून मिणमिणती !

पूर्वीच्या काळी रात्री प्रकाश मिळावा म्हणून शेतकरी काठीला चिंधी बांधून ती पेटवत असत, तिला दिवटी म्हणत. त्यानंतर पणत्या आल्या, त्या घराघरांना उजळून टाकू लागल्या. कुणी-कुणी देवळात प्रकाश मिळावा म्हणून समई पेटवू लागले, नंतर कंदील आला. त्याचे रसिले वर्णन करताना कवी सांगतो,

काचेचा मग महाल तो

कुणी बांधूनी मज देतो

कंदील त्याला जन म्हणती

मीच तयांतिल परि ज्योती

काचेचा महाल म्हणजे कंदील ही उपमाच सुंदर आहे. त्या कंदिलाचेच पुढचे रूप म्हणजे बत्ती होय. पूर्वी रात्रीच्या वेळी लग्नाच्या वराती वा कोणतेही मोठे काम बत्तीवाचून पार पडत नसे.

बत्तीच्या प्रकाशाचा झगमगाट लग्नाची शोभा औरच करीत असे; पण आता तीही गेली, त्या जागी वीज आली, विजेचे दिवे आले.

साध्या पिवळ्या बल्बपासून एलईडी बल्बपर्यंत अनेकविध बदल झाले, पुढेही होत राहतील याचे सुंदर वर्णन कवी करीत जातो, त्या वेळी वाटते, कवीला प्रकाश देणाऱ्या विविध साधनांचेच वर्णन करायचे आहे की काय? ती तर नुसती जंत्रीच ठरली असती; पण शेवटचे कडवे कवितेचे रूप पालटून टाकते, ज्यात ज्योती सांगते,

एकच ठावें काम मला

प्रकाश द्यावा सकलांला

कसलेंही मज रूप मिळो

देह जळो अन् जग उजळो!

आपले नियत कर्म सांगताना ज्योत म्हणते, ‘दिवटीपासून विजेच्या दिव्यापावेतो मला कोणतेही रूप लाभले तरी जगाला प्रकाश देणे एवढेच काम मी करते. त्यासाठी माझा देह जळाला तरी मी पर्वा करीत नाही.’ ज्योतीची ही भावना केवळ परोपकाराचीच नाही, तर तिचा व्यवहार मरता-मरता जगदोद्धार करणाऱ्या एखाद्या माहात्म्याला वा हुतात्म्याला शोभावा, असाच आहे.

ज्योत तोच संदेश जळता-जळता साऱ्यांना देत जळते. ज्योतीचे हे महान कार्य कवीला सदैव चेतविते, म्हणूनच ‘पलित्याची ज्योती’ या कवितेत तो लिहितो,

जळत-जळत हा देह चालला

परी तयाची खंत कुणाला,

उजळत जोंवर दाहि दिशांला---

तेजकिरण फाकती; उभी मी, पलित्याची ज्योती!

वर्णन पलित्याचे असले, तरी अंतरंग ज्योतीच्या उदात्त भावनेशी जोडलेले आहे. ‘देह जळो’ वा जळत-जळत हा देह चालला म्हणणे असो, ज्योतीचा परोपकारी व्यवहारच वाचकांपुढे उभा करून जातो.

तीच दीक्षा इतरांनीही उचलावी, हा छुपा संदेश कवी कवितेद्वारे देतो, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अगदी साध्या विषयात मोठा आशय मांडण्याच्या प्रयत्नात कवी नक्कीच यशस्वी ठरला आहे, हे या कवितेवरून सहजपणे दिसून येते

Vinayak Mahadev Kulkarni
एक झुंज रजोनिवृत्तीशी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com