Latest Marathi Article | नाशिक पर्यटन हब व्हावे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Governor Bhagatsinh Koshyari visited the Pebble Museum, Mr. Pandey while informing him on occasion,

नाशिक पर्यटन हब व्हावे!

लेखक : के. सी. पांडे

नाशिकच्या पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. येथील अनेक स्थळे, वन-डे ट्रीप होऊ शकणारी ठिकाणे आहेत. धर्मक्षेत्र तर आधीपासूनच विकसित आहे. या सगळ्यांचा मेळ घालून पर्यटनाला चालना दिल्यास व पर्यटकांसाठी तशा मूलभूत सुविधा विकसित करीत त्याचे आधुनिक मार्केटिंग केल्यास नाशिकच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल. त्यातूनच अर्थचक्रही गतिमान होईल. सिन्नरस्थित गारगोटी हे जगातील एकमेक स्वमालकीचे असे ठिकाण आहे. शासनाने यासाठी पुढाकार घेत पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे.

प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीला पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, उद्योग, कृषी, सहकार वारसा लाभलेला आहे. यामध्ये ऐतिहासिक व अलीकडच्या काही वर्षांमध्ये उभारलेल्या वास्तूंमुळे जगाच्या पटलावर नाशिकनगरी सुप्रसिद्ध आहे. नाशिकमधील पर्यटन हे नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. प्रभू रामचंद्र वास्तव्य असलेली पंचवटी, त्र्यंबकेश्वर, सोमेश्वर, दादासाहेब फाळके स्मारक, गंगापूर येथील बोट क्लब, तसेच जगातील एकमेव असे सिन्नर येथील गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालय सर्वांना सुपरिचित आहे.

शासकीय पातळीवर पर्यटनवाढीसाठी अथवा त्याच्या विकासासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. टुरिझम म्हणजेच पर्यटनातून महसूल व रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. फक्त गरज आहे ती शासकीय पातळीवर सकारात्मक पाऊल उचलण्याची. शासन पर्यटनवाढीसाठी अनेक प्रयत्न करते ही, पण यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. कुठलीही शासकीय योजना ही लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.

आपण नाशिकमधून दुसरीकडे पर्यटन करण्यासाठी मोठ्या हौशीने जातो. पण नाशिकमधील पर्यटनस्थळांना नियमितपणे भेटी देणे, आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना तेथे घेऊन जाणे अपवादानेच होते. ते करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. निरनिराळ्या संस्थांना या पर्यटनाबद्दल महत्त्व पटवून देणे व त्यांना तेथे जाण्यास प्रवृत्त करणे, ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. गारगोटी परिवार यासाठी कायमच पुढे आलेला आहे.

गारगोटी संग्रहालय बघण्यासाठी दहापेक्षा अधिक पर्यटक असतील तर कोणत्याही वेळेत गारगोटी संग्रहालय बघण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. छोटे-मोठे वाढदिवस, सोहळे, कौटुंबिक अथवा ऑफिस कार्यालयीन कार्यक्रमही गारगोटीत साजरे करता येऊ शकतात. एक पर्यटक जर नाशिक नगरीत आला तर त्याच्या माध्यमातून जवळपास शंभर कुटुंबांना प्रत्यक्षरीत्या व अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळतो.

पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो. पर्यटकाला आवश्यक असणारी निवास, भोजन, वाहतूक, माहिती, मनोरंजन आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील उत्पादनांदेखील मागणी निर्माण होते. सांस्कृतिक आदानप्रदानाच्या माध्यमातून नागरिकांना एकमेकाशी जोडण्याचे कामदेखील पर्यटनाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे पर्यटन विकासात नागरिकांचा जेवढा सहभाग वाढेल तेवढेच त्या भागातील अर्थकारणालादेखील गती मिळते.

जागतिक पर्यटन संघटनेने पर्यटकांना सुंदर संदेश दिला आहे. ‘निसर्ग, संस्कृती आणि यजमान यांचा सन्मान करा, तुम्ही अधिक चांगल्या विश्वाचे दूत बनू शकता’, ही भावना पर्यटकांपुरती मर्यादित न राहता पर्यटनस्थळ परिसरातील नागरिकांनीदेखील स्वागत, सन्मान आणि सुविधा या तीन बाबी लक्षात घेतल्यास पर्यटनाच्या माध्यमातून अपेक्षित विकास शक्य आहे.

जगाच्या पाठीवर अनेक असे देश आहेत, की त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. भारतातही इंधन व रसायने यानंतरचा सर्वांत मोठा व्यवसाय हा पर्यटन आहे. ‘माझं
नाशिक’ असे जेव्हा आपण अभिमानाने म्हणतो, तेव्हा आपण याच्यासाठी काय करतो, आपले योगदान काय आहे याचे आत्मपरीक्षण करावे.

व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन उद्योगाची महत्त्वाची भूमिका असते. यासाठीपण एक शाश्वत पर्यटनाबद्दलची सुधारित स्वरूपात भूमिका घेणे गरजेचे आहे. गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालय हे जगातील एकमेव वैयक्तिक मालकी असणारे आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे संग्रहालय दाखविले पाहिजे. यासाठी गारगोटी परिवार नेहमीच पुढाकार घ्यायला तयार आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे दर वर्षी पर्यटन महोत्सव साजरा केला पाहिजे. यामधून नाशिकमधील सर्व पर्यटनस्थळांची तेथे उत्कृष्ट दर्जाचे सादरीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन होणे गरजेचे आहे. यामध्ये शैक्षणिक संस्था, सरकारी, निमशासकीय कार्यालय, याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस प्रशासन या सर्वांना एकत्र घेऊन आयोजित केले पाहिजे. नाशिक जिल्ह्यातील नवीन पिढीलाही हा सर्व पर्यटनाचा वारसा व त्याची जगात असलेली ख्याती लक्षात येईल. प्रचार व प्रसार होण्यासाठी निश्चितच पर्यटनात वाढ होण्यासाठी मदत होईल.

नाशिक हे पर्यटनासाठी सर्वार्थाने एक आदर्श ठिकाण आहे. देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी येथे आहे. आपल्या शहराची रचना अथवा विस्तार असा आहे, की नाशिक शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोचण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास प्रवास करावा लागतो. या बाबींकडे आपण सकारात्मकतेने बघितले पाहिजे. पर्यटनस्थळांकडे जाताना अथवा प्रवास करताना किती लवकर आपण त्या स्थळावर पोचतो, याकडे अजूनही व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले गेले नाही. नाशिकचा प्राचीन वारसा सांगणारी स्थळे, येथील हवामान, कृषी, वने, निसर्ग आणि पूर्वजांनी दिलेली देणगी आहेच; पण त्याचबरोबर वैद्यकीय पर्यटन, क्रीडा पर्यटन याकडेही गांभीर्याने बघण्याची गरज आहे.

नाशिक ही भारताची वाइन कॅपिटल म्हणून ओळखली जाते. मिनरलच्या बाबतीत जगाच्या पाठीवर गारगोटी संग्रहालयासारखी वास्तू नाशिक शहरापासून अगदी वीस मिनिटांच्या अंतरावर आहे. यासाठी शासकीय यंत्रणेने पर्यटकांनी भेट नियमितपणे द्यावी, यासाठी चांगले रस्ते व रस्त्यांवर नेमकी माहिती, नकाशे, त्या रस्त्यांची सुरक्षितता यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नाशिकच्या पर्यटनाबाबत सरकारमान्य वेबसाइट असण्याची तातडीने गरज आहे. त्यात नवीन स्थळे समाविष्ट केली गेली पाहिजे. पर्यटकांसाठी हेल्पलाइन देशातील काही महत्त्वाच्या वेबसाइटवर जेथे पर्यटनाची माहिती दिली जाते, त्यामध्ये नाशिकमधील पर्यटनस्थळांची माहितीसुद्धा नाही, ही शोकांतिका आहे.

मुंबईसारख्या मोठ्या शहरातील नागरिकांसाठी वीकेंड डेस्टिनेशन किंवा दिवाळीसारख्या सुटीत आराम करण्यासाठी शहरी धावपळीपासून दूर नेणाऱ्या नाशिकमधील अनेक स्थळे आहेत का? तेथे आपला विरंगुळा होऊ शकतो. जिल्हा प्रशासनाने तातडीने नाशिक नगरीच्या पर्यटनाची माहिती देणारी एक माहितीपत्रक अद्ययावत स्वरूपात प्रसिद्ध केले पाहिजे. कोरोना कालावधीनंतर सर्वांत जास्त फटका जर बसला असेल तो पर्यटनाला आहे. काही ठिकाणचे पर्यटन कायमस्वरूपी बंद झाली. काही आता हळूहळू सुरवात होत आहेत. पण अधिकाधिक पर्यटक येण्यासाठी शासनाने पर्यटकांनाच नव्हे तर पर्यटनस्थळे चालविणाऱ्या व्यवस्थापनांनासुद्धा काही प्रमाणात सहकार्य व विशेष सवलत देण्याचीही गरज आहे, तरच नाशिकमधील पर्यटन भविष्यात अधिकाधिक पद्धतीने विकसित होईल.