
दृष्टिकोन : युवा पिढीसमोर संधी, आव्हानांमध्ये महासत्तेचा मार्ग
लेखक : राजाराम पानगव्हाणे
एका महापुरुषाने असे म्हटले होते, की तुमच्या देशातील युवा पिढीचे भविष्य काय असेल? तर युवकांच्या ओठांवर जे प्रचलित वाक्य असेल, तेच तुमच्या युवा पिढीचे भविष्य आहे. ध्येयपूर्तीच्या दिशेने योग्य आहे, असे वाक्य आज युवा पिढीच्या ओठी नाही.
त्यामुळे आज इतक्या वर्षांनंतरही हे वाक्य लागू पडत आहे. युवाशक्ती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे. पण त्यातील मोठा वर्ग ध्येयापासून दूर जात असलेला दिसून येतो. यासाठी समाज व्यवस्थेत अनेक आव्हाने युवा पिढीसमोर आहेत.
ही आव्हाने युवा पिढीने स्वीकारली, शासनाने त्यासाठी विधायक प्रयत्न केले तर निश्चित देशातील युवाशक्ती जगात आपले कर्तृत्व सिद्ध करू शकते. (saptarang latest marathi article by rajaram pangavane on education nashik)

आपली भविष्यातील ओळख काय असावी? याचे सुस्पष्ट चित्र भावी पिढ्यांपुढे ठेवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये आपला देश आहे, हे आपले भाग्य मानायला हवे.
आता करोडो लोकांच्या मनात असलेले हे चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणे, त्या ध्येयपूर्तीसाठी समाजाला दिशा देणे, समाजाची जडण-घडण करणे, त्या चित्रातील तत्त्वांच्या विरोधी तत्त्वांशी अहिंसक किंवा परिस्थितीनुसार संघर्ष करणे आणि ते चित्र प्रत्यक्षात आणल्यानंतर ते प्राणपणाने अबाधित राखणे, संवर्धित करणे हे युवा पिढीचे कर्तव्य आहे, आणि तेच आव्हान देखील आहे.
आजच्या युवकांसमोर मोठी आव्हाने आणि समस्या एकावेळी आहेत. सुशिक्षित असून बेकारीशी सामना करणे, नोकरी मिळाली तर नोकरीत समाधान नसणे, आर्थिक विवंचना आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकसंख्या विस्फोट हे सर्वांत महत्त्वाचे आव्हान आहे.
प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा व स्पर्धकांची अफाट संख्या ही आव्हाने आहेत. परीक्षेतून निवड झालेल्या हजारो मुलामुलींमधून प्रत्यक्षात निवड न झाल्याने येणारी निराशा हा चिंतेचा विषय आहे.
शालेय व महाविद्यालयीन जीवनातील शिक्षण प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडते आहे का? हा एक प्रश्न आहे.
केवळ नोकरी मिळविण्यापुरते शिक्षण किंवा आर्थिक विकासासाठी शिक्षण एवढेच शिक्षणाचे मर्यादित स्वरूप आहे का? असा आज प्रश्न आज युवकांसमोर उभा राहत आहे. तरुण पिढीमध्ये वाढणारी व्यसनाधिनता हा प्रश्न देखील गंभीर स्वरुप धारण करत आहे.
व्यसनांच्या आहारी गेलेला युवक दिशाहीन, भरकटलेल्या अवस्थेत दिसून येतो. व्यसनांच्या अधीन गेल्यामुळे तो आपला परिवार सुखी, आनंदी ठेवू शकत नाही. दारू पिणे, नशापान करणे, सिगारेट, पान, तंबाखू हे शरीराला हळुहळू नष्ट करतात.
आरोग्य ही खरी धनसंपदा आहे. समाज माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे आजचा युवक एकलकोंडा होत चालला आहे. संवाद हरवत चालला आहे. परस्परांशी बोलणे कमी झाले आहे. सतत मोबाईलवर गेम्स आणि सीरिज पाहणारी ही पिढी रात्री जागरण जगत आहे.
त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या पुढे येत आहेत. डोळे, मान, मणके आणि विशेष करुन मनोविकार पुढे येत आहेत. युवा पिढीचे मानसिक आरोग्य मोबाईलच्या अतिवापरामुळे धोक्यात येत आहे.
सध्या समाजांमधील पराकोटीची विषमता, गरिबी, बेकारी, व्यसनाधीनता, सार्वजनिक सुविधा व विकासातील असमतोल, आर्थिक मंदीचे सावट, भ्रष्टाचार, अस्वच्छता, प्रदूषण, रोगराई, अज्ञान, निरक्षरता, निकृष्ट दर्जाचे शिक्षण-आरोग्यव्यवस्था-जीवनमान, पराधीनता, अवैज्ञानिकता, दैववाद, सामाजिक अन्याय, शोषण, लिंगभेद, जातीयवाद, धर्मांधता, हिंसाचार, अत्याचार, झुंडशाही, शत्रुभाव, असहिष्णुता, अल्पसंख्याकांमधील असुरक्षितता, लोकशाही संस्थांचा ऱ्हास, सामाजिक अशांतता, दहशतवाद, सांप्रदायिकता, सांस्कृतिक मागासलेपण, बेशिस्तपणा, सुजाण नागरिकत्वाचा अभाव, नैसर्गिक संसाधनांची उधळपट्टी, पर्यावरणीय अरिष्ट अशा एकाहून एक अनेक जटील समस्या दिवसेंदिवस बिकट बनत आहेत. या समस्यांचा थेट संबंध सध्याच्या युवा पिढीशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या येत असतो.
या समस्या दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण करत आहेत. तरुण पिढीला या समस्यांचा सर्वाधिक सामना करावा लागतो. या समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी युवकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.
नेतृत्वाची नवी पिढी निर्माण होऊन त्यांनी पर्यायी विकासनीती निर्माण करणे आवश्यक आहे. ही गोष्ट वरवर वाटत असली तेवढी सोपी नक्कीच नाही. ही प्रक्रिया दीर्घ, वेळखाऊ आणि कसोटी घेणारी आहे.
उदाहरण द्यायचे झाल्यास सध्या स्मार्ट फोनची जी किंमत आपण मोजतो, ती त्याच्यातील जड पदार्थांच्या वजनासाठी नाही. तर त्या तंत्रज्ञानात समाविष्ट असलेले निसर्गविज्ञान, मनोविज्ञान, समाजविज्ञान, तंत्रज्ञान आणि कलात्मक आविष्कार यांच्या बौद्धिक संपदेसाठी आहे.
जशी कच्च्या मालाची आणि ऊर्जेची जागा ज्ञान घेत आहे, तशीच शारीरिक श्रमाची जागाही बौद्धिक श्रम घेत आहेत. पूर्वीची शारीरिक श्रमाची जागा आता बौद्धिक शक्तीने घेतली आहे. त्यामुळे शारीरिक श्रम कमी होऊन बौद्धिक कार्य वाढल्यामुळे त्यामधूनही अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.
युवकांच्या हाती देशाचे खऱ्या अर्थाने विश्वाचे भवितव्य आहे. भारत हा युवा देश म्हणून ओळखला जातो. १८ ते ३५ वर्षे वयोगटाकडून राष्ट्राला प्रचंड अपेक्षा आहेत. भारतीय तरुणांनी आपल्या बुद्धी चातुर्यावर विदेशातही नावलौकिक मिळवला आहे.
तंत्रज्ञान व इंटरनेट क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे तरुणाई या क्षेत्रांकडे अधिक वळली. इंटरनेट म्हटले की फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर ही समाज माध्यमे आलीच. मात्र या माध्यमांचा वापर करताना तरुणाई बेफाम होऊ पाहत आहे.
दिवसातील बराच अत्यंत महत्त्वाचा वेळ अशा गोष्टींतच वाया जातो. त्यामुळे हे सोशल नेटवर्किंग डोकेदुखी ठरतेय. या सगळ्याला वेळीच आळा घालायला हवा. मात्र ही सर्वस्वी जबाबदारी युवापिढी आणि त्यांच्या पालकांची आहे.
यासोबत तरुणाईचे गुन्हेगारीतील वाढते प्रमाण ही देखील मोठी समस्या आहे. क्राईम ब्युरोच्या आकडेवारीनुसार अनेक गुन्ह्यांमध्ये गजाआड असलेल्या गुन्हेगारांपैकी जवळपास ५० टक्के गुन्हेगार १० ते ३० वयोगटातील आहेत.
ही आकडेवारी पाहून कधी कधी असा प्रश्न पडतो, की हाच तो युवक जो प्रचंड सामर्थ्यवान, उत्साही आहे, ज्याच्या मनगटात विश्व जिंकायची ताकद आहे, तोच युवक वाममार्गाला जाऊन या सर्व मायाजालात कसा गुंततो? याची उत्तरे तुम्हा-आम्हा सर्वांना शोधावी लागणार आहेत.
वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे प्रचंड स्पर्धा वाढत आहे. मात्र, या स्पर्धेतून बाहेर फेकलेला युवक निराशेच्या गर्तेत नकळतपणे अडकला जात आहे. पदवीधर असूनही बेरोजगारीमुळे येणारी निराशा, यातून व्यसनांच्या आहारी जाणे ही साखळी तरुणाई नष्ट करतेय.
अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांपैकी युवकांचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वाढत असलेले प्रमाण पाहता ही धोक्याची घंटा आहे. बेकारी, नैराश्य, व्यसनाधीनता यामुळे तरुण पुढे गुन्हेगारीकडे वळतो.
याच युवाशक्तीचा गैरवापर करणारे धर्मांध, समाजकंटक देखील आहेत. फसवणूक, अमीष दाखवून तरुणांचे धर्म, समुदायाच्या नावाखाली बळी पाडून त्यांना दहशतवादाकडे वळवले जाते, हे गांभीर्य वेळीच ओळखायला हवे.
या सगळ्या समाजातील स्थितीमुळे युवा पिढीसमोरील आव्हाने अजूनच बिकट बनून ते वाढत आहेत. भारतात जरी युवाशक्ती असली, तरी त्या शक्तीचा दुरुपयोग होऊ न देता विकासासाठी, उदात्ततेसाठी सजग झाले पाहिजे.
जेणेकरून ही शक्ती समाजविघातक न बनता राष्ट्र्विकासक व्हावी, यासाठी तरुणांचे समुपदेशन शाळा-महाविद्यालयांतून झाले पाहिजे.
तरुणाईला विकासमार्गावर आणण्यासाठी सतत प्रयत्न व्हायला हवेत. मग तो दिवस दूर नाही, ज्यादिवशी तरुणांच्या बळावर आपला भारत प्रभावशाली बनून महासत्ता बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण करेल.
(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत)