esakal | भविष्यातल्या संघर्षाची गोष्ट (महेश काळे)
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh kale

तंत्रज्ञान- मग ते कुठल्याही प्रकारचं असो, माणसापेक्षा ते वरचढ ठरेल? एखादं मशीन, एखादं उपकरण तुमचा वेळ, कष्ट वाचवेल; पण प्रेम, सुख-दुःख, आशा-आकांक्षा या मानवी भावभावनांना ते हात घालू शकेल? धावपळीच्या, स्पर्धेच्या या युगात मानसिक स्तरावर आलेली एक प्रकारची पोकळी ते भरून काढू शकेल?

भविष्यातल्या संघर्षाची गोष्ट (महेश काळे)

sakal_logo
By
महेश काळे

तंत्रज्ञान- मग ते कुठल्याही प्रकारचं असो, माणसापेक्षा ते वरचढ ठरेल? एखादं मशीन, एखादं उपकरण तुमचा वेळ, कष्ट वाचवेल; पण प्रेम, सुख-दुःख, आशा-आकांक्षा या मानवी भावभावनांना ते हात घालू शकेल? धावपळीच्या, स्पर्धेच्या या युगात मानसिक स्तरावर आलेली एक प्रकारची पोकळी ते भरून काढू शकेल? ज्यानं ते निर्माण केलं त्याच्याच जीवावर ते उठलं तर?...
प्रतिभावान चित्रकर्मी आणि साहित्यिक सत्यजित राय यांच्या मूळ लघुकथेवर आधारित आणि सुजॉय घोष निर्मित-दिग्दर्शित "अनुकूल' ही शॉर्टफिल्म या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करते. सत्यजित राय यांनी इतक्‍या वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या भविष्याशी सांगड घालणारी ही कथा लिहिली, यावरून ते काळाच्या किती पुढं होते हेच दिसून येतं.

माणसानं त्याची प्रगती करताना अनेक शोध लावले. स्वतःच्या सुख सोयींसाठी त्यानं अनेक उपकरणं, मशीन्स तयार केली. आज तर आपण "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'पर्यंत येऊन पोचलो आहोत. या सगळ्यांचा ऊहापोह करताना आपल्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. तंत्रज्ञान- मग ते कुठल्याही प्रकारचं असो, माणसापेक्षा ते वरचढ ठरेल? एखादं मशीन, एखादं उपकरण तुमचा वेळ, कष्ट वाचवेल; पण प्रेम, सुख-दुःख, आशा-आकांक्षा या मानवी भावभावनांना ते हात घालू शकेल? धावपळीच्या, स्पर्धेच्या या युगात मानसिक स्तरावर आलेली एक प्रकारची पोकळी ते भरून काढू शकेल? ज्यानं ते निर्माण केलं त्याच्याच जीवावर ते उठलं तर? खरंतर या प्रश्नांना ठोस अशी उत्तरं नाहीत. शेवटी उत्तर ज्याचं त्यानं शोधायचे आहे. काळाच्या गर्भात काय दडलंय याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही.

प्रतिभावान चित्रकर्मी आणि साहित्यिक सत्यजित राय यांच्या मूळ लघुकथेवर आधारित आणि सुजॉय घोष निर्मित-दिग्दर्शित "अनुकूल' ही शॉर्टफिल्म या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करते. सत्यजित राय यांनी इतक्‍या वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या भविष्याशी सांगड घालणारी ही कथा लिहिली, यावरून ते काळाच्या किती पुढं होते हेच दिसून येतं.
शॉर्टफिल्मची सुरुवात होते कोलकता शहरातल्या एका तंत्रज्ञानविषयक सेवा देणाऱ्या संस्थेच्या कार्यालयात. निकुंज बाबू (सौरभ शुक्‍ला) यांना एक प्रॉडक्‍ट विकत हवय आणि ते त्या बाबतीत एका कंपनी अधिकाऱ्याशी बोलत आहेत. हळूहळू आपल्याला उमगतं, की त्यांना खरंतर घरगुती कामासाठी एक मदतनीस हवाय. कंपनी त्यांना एक मानवी रोबो (मानवासारखा दिसणारा आणि तंत्रज्ञान प्रणाली बसवलेला) देऊ करतेय, ज्याचं नाव "अनुकूल' असं आहे. या अनुकूलची एकेक वैशिष्ट्यं ऐकून निकुंजबाबू थक्क होतात आणि त्याला घरी घेऊन येतात.

अनुकूल हा अगदी निष्पाप आहे, आज्ञाधारक आहे. त्याला वाचायची आवड आहे आणि निकुंजबाबूंकडचा पुस्तक संग्रह पाहून तर तो अगदी हरखून जातो. तो अर्थातच कधीच झोपत नाही, विश्रांती घेत नाही आणि मिळालेल्या वेळेचा सदुपयोग तो वाचनासाठी करतोय; पण खरी मेख तर इथंच आहे. तो केवळ तांत्रिक पद्धतीनं- एखाद्या मशीनवत- वाचन करत नाहीये, तर वाचलेल्या गोष्टींचा अर्थही लावायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळेच तो किंचित उजवाही ठरतोय. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणतात तो यालाच. अनुकूल आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी निकुंजबाबूंशी चर्चाही करतोय, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तो आजूबाजूच्या परिस्थितीचं, वस्तूंचं आणि माणसांचं निरीक्षणही करतोय. फिल्ममधील काही प्रसंगांनंतर त्याचं निकुंजबाबूंबरोबरचं नातं "मालक-नोकर' असं व्यावहारिक न राहता "शिक्षक-विद्यार्थी' या नात्याकडे झुकलेलं दिसतं. निकुंजबाबू स्वतः शिक्षकी पेशात असल्यामुळे अनुकूलच्या प्रश्नांची सर्वतोपरी उत्तरं द्यायचा प्रयत्न करत आहेत. भगवद्‌गीता, धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, खरं-खोटं या विषयांवरच्या त्यांच्या संभाषणाचा अन्वयार्थ आपल्याला पुढे फिल्ममध्ये घडणाऱ्या घटनांमधून लक्षात येतो.

या शॉर्टफिल्ममधला बराचसा भाग, प्रसंग चार भिंतींच्या आत चित्रीत झाले आहेत. मानवी रोबो, कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषयच असा आहे, की कोणाही निर्माता-दिग्दर्शकाला काहीतरी ऍक्‍शनपॅक्‍ड, भव्य-दिव्य करण्याचा मोह व्हावा; पण सुजॉय घोष यांना इथं मानवी भावभावनांचा कोलाज उलगडून दाखवायचाआहे. सुजॉय घोष त्यांच्या "कहानी' या फिल्म फ्रॅंचाईजीमुळे सर्वांना विशेष परिचित आहेत. परंतु त्याची छाप पडू न देता आणि सत्यजित राय यांच्या मूळ कथेला बाधा न पोचवता त्यांनी सहज, सुंदर प्रकारे या फिल्मची हाताळणी केली आहे. संवादांबरोबरच चेहऱ्यावरचे भाव, देहबोली यांनाही त्यांनी विशेष महत्त्व दिलं आहे. अनेक ठिकाणी ते काही जागा सोडून देतात, ज्यांचा अर्थ आपल्याला नंतर लक्षात येतो. एकवीस मिनिटांच्या या शॉर्टफिल्ममध्ये सुजॉय घोष यांनी प्रत्येक सेकंदाचा अगदी खुबीनं वापर केलाय आणि तीन प्रमुख पात्रं निकुंजबाबू, अनुकूल आणि निकुंजबाबूंचे बंधू रतन यांच्या व्यक्तिरेखा ठाशीव करण्याचा आणि उंचावण्याचा प्रयत्न केलाय.

मूळचा बंगाली अभिनेता असलेला परमब्रत मुखर्जी यानं अगदी सुरुवातीच्या दृश्‍यापासूनच भूमिकेवर पकड घेतली आहे. तो अंतर्बाह्य अनुकूल आहे. भविष्यात खरोखरच मानवी रोबो निर्माण झाले, तर ते बहुतांशी त्यानं साकारलेल्या अनुकूलसारखेच असतील, असं आपल्याला वाटतं, इतकी त्याची भूमिका प्रभावी ठरली आहे. प्रस्तुत शॉर्टफिल्ममध्ये या मानवी रोबोची जी गुणवैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत, त्यातल्या एकन्‌एक बारकाव्यांचा अभ्यास त्यानं केला आहे असं प्रकर्षानं जाणवतं. मानवी रोबोमधला आज्ञाधारकपणा दाखवताना कुठंही त्याचा अतिरेक होणार नाही याची त्यानं पुरेपूर काळजी घेतली आहे.

सौरभ शुक्‍ला या बहुपैलू अभिनेत्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमी. मिळालेल्या कुठल्याही भूमिकेचं सोनं करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. गाजलेल्या "सत्या' चित्रपटातली कल्लू मामाची भूमिका असो, अथवा या शॉर्टफिल्ममधल्या शिक्षकाची भूमिका असो- प्रत्येक भूमिकेला ते आपलंसं करतात. त्यांच्या अभिनयाचा, त्यांच्या भूमिकांचा आवाका खरंच खूप मोठा आहे. अगदी बारीकसारीक तपशिलांसकट ते ही व्यक्तिरेखा जिवंत करतात. खराज मुखर्जी यांनीही निकुंजबाबूंच्या बंधूंची म्हणजेच रतनची भूमिका उत्तम रीतीनं साकारली आहे. नोकरी गेल्यावरचा राग, चिडचिड अनुकूलबरोबरच्या त्यांच्या संवादातून विशेष प्रकारे प्रकट होते. त्यांच्यातला मानवी रोबोबद्दलचा असंतोष त्यांनी अनुकूलवर केलेल्या हल्ल्यातून दिसून येतो. संपत्ती नावावर झाल्यावरचा आनंद, मानवी रोबोंचा बदला घेण्याची इच्छा ते योग्य पद्धतीनं व्यक्त करतात. हा सगळा विषय नक्की कुठं जाऊ शकतो याची चुणूक आपल्याला या व्यक्तिरेखेच्या निमित्तानं दिसते. किंबहुना चित्रपटात मांडलेल्या विषयाची रतनबाबू म्हणजे दुसरी मिती आहे.

येणाऱ्या परिस्थितीला, आव्हानांना आणि बदलांना सामोरं जायची पद्धत, मानसिकता ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. निकुंजबाबूंनाही जेव्हा त्यांची नोकरी गेल्याचं कळतं, तेव्हा एक माणूस म्हणून त्यांना वाईट वाटतं; पण एक वास्तव म्हणून ते त्याचा लगेच स्वीकारही करतात. त्याउलट रतन मात्र दारू पिऊन, सैरभैर होऊन निकुंजबाबूंशी वाद घालत बसतो.

मानव आणि तंत्रज्ञान आणि त्या अनुषंगानं निर्माण होणारे वाद, प्रश्न हा या शॉर्टफिल्मचा मूळ गाभा आहे. एक प्रेक्षक म्हणून या शॉर्टफिल्ममधील कुठल्याही पात्राला तुम्ही हिरो किंवा खलनायक ठरवू शकत नाही. येऊ घातलेल्या परिस्थितीकडे तटस्थपणे आणि विचारपूर्वक बघण्याचा दृष्टिकोन ही शॉर्टफिल्म तुम्हाला देते. ही शॉर्टफिल्म बघताना जाणवतं, की विषय जरी माणूस आणि रोबो असा असला, तरी तो माणूस आणि यांत्रिकीकरण, माणूस आणि तंत्रज्ञान अशा कुठल्याही प्रकारे बघता येतो.

कॅलिडोस्कोपमध्ये जसा कोन बदलला, की चित्र वेगळं दिसतं तशीच ही शॉर्टफिल्म प्रत्येक जण वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो. सत्यजित राय यांना कालातित चित्रकर्मी आणि साहित्यिक का म्हटलं जातं याचं जणू हे उत्तरच आहे, नाही का?

loading image