शून्यतेकडचा प्रवास... (महेश काळे)

mahesh kale
mahesh kale

‘शून्यता’ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतो काळोख, अंधार, एक प्रकारची पोकळी, अपरिपूर्णता. याच काळोखाचा दिग्दर्शकानं या शॉर्टफिल्ममध्ये अत्यंत खुबीनं वापर केला आहे. केवळ एकवीस मिनिटांच्या या शॉर्टफिल्मची एक खासियत म्हणजे ती पूर्णपणे रात्रीच्या काळोखात चित्रीत करण्यात आली आहे. कलाकारांची निवड, कॅमेरा अँगल्स, त्यांचा विशिष्ट पद्धतीनं केलेला वापर, रात्रीच्या काळोखातही प्रकाशयोजना करताना दोन-तीन रंगांचा केलेला वापर ही या शॉर्टफिल्मची ठळक वैशिष्ट्यं.

माणसाच्या आयुष्याचा प्रवास मोठा अनोखा असतो. शून्यतेकडून पूर्णत्वाकडं जायचा त्याचा प्रयत्न असतो; पण सरतेशेवटी हे सर्व काही शून्यतेकडंच जाणार आहे, या बाबतीत तो अनभिज्ञ असतो. कधीकधी हे पूर्णत्व तो आपल्या जवळच्या, आसपासच्या व्यक्तींमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. शून्यतेकडून पूर्णत्वाकडच्या या प्रवासात त्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळून जातात, तर काही प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात. ‘शून्यता’ ही शॉर्टफिल्म त्याबद्दलच आपल्याशी बोलते.

‘शून्यता’ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतो काळोख, अंधार, एक प्रकारची पोकळी, अपरिपूर्णता. याच काळोखाचा दिग्दर्शकानं या शॉर्टफिल्ममध्ये अत्यंत खुबीनं वापर केला आहे. केवळ एकवीस मिनिटांच्या या शॉर्टफिल्मची एक खासियत म्हणजे ती पूर्णपणे रात्रीच्या काळोखात चित्रीत करण्यात आली आहे. कलाकारांची निवड, कॅमेरा अँगल्स, त्यांचा विशिष्ट पद्धतीनं केलेला वापर, रात्रीच्या काळोखातही प्रकाशयोजना करताना दोन-तीन रंगांचा केलेला वापर ही या शॉर्टफिल्मची ठळक वैशिष्ट्यं. रात्रीच्या वेळेला अधोरेखित करणारं, अत्यंत परिणामकारक असं पार्श्वसंगीत या शॉर्टफिल्मला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. हे पार्श्वसंगीत आणि सभोवतालचा अंधार आपल्यासमोर नकळत अशा काही गोष्टींचा उलगडा करतात, ज्या आपल्याला प्रत्यक्ष पडद्यावर दिसून येत नाहीत. छोट्याशा कालावधीमध्ये बरंच काही पाहिल्याचा आणि अनुभवल्याचा फील ‘शून्यता’ पाहताना आपल्याला येतो. मुंबई शहराचं एक रक्तरंजित-भीषण वास्तव ती तुमच्यासमोर मांडते.
यात जॅकी श्रॉफ एका कॉन्ट्रॅक्ट किलर-शूटरच्या भूमिकेत आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे ‘मधुर!’ आपण गतकाळात केलेल्या चुकांच्या, गुन्ह्यांच्या पश्चात्तापाची सल त्याला सतत मनात कुठंतरी खोलवर जाणवत आहे. मुंबईत रोड-साईड जीवन जगणाऱ्या टिनू (मच्छिंद्र गडकर) नावाच्या मुलाशी त्याची मैत्री आहे. ही मैत्री थोडीशी फिल्मी वाटत असली, तरी मनाला भावणारी आहे. आपला नायक मधुर या टिनूमध्येच स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या मुलामध्येच त्याला आपला भूतकाळ दिसत आहे.

गुन्हेगारी जगतात वावरताना, ऐन तारुण्याची, उमेदीची वर्षं, या अंधाऱ्या दुनियेत घालवताना आयुष्याचं झालेलं मातरं, सोसावे लागलेले वास्तवाचे चटके आणि या सगळ्यातून तावून- सुलाखून निघालेला मधुरचा जीव ही सर्व काही मनाला विचार करायला लावणारं आहे. किंबहुना हा मधुर आता सर्वसामान्य मनुष्य, त्याचं कुटुंब, त्याच्यावरच्या जवाबदाऱ्या, त्यांचं अंतरंग यांमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यालाही आता या गुन्हेगारीच्या दलदलीमधून बाहेर पडायचं आहे. तशी त्याची तीव्र इच्छाही आहे आणि त्याच वेळेस त्याला आपल्या हातून उद्ध्वस्त झालेले संसारही डोळ्यासमोर दिसत आहेत. त्याला हवं आहे एक चांगलं उद्दिष्ट. हेच उद्दिष्ट तो टिनूला मदत करण्याच्या रूपात पाहतो आहे. टिनू चहा विकायचं काम करतोय; पण एकीकडं गुन्हेगारी जगताचं सुप्त आकर्षणही त्याला आहे. त्यातूनच तो अमली पदार्थ विक्रीच्या जाळ्यात ओढला गेला आहे. मधुर आपल्या परीनं त्याला या सर्व गोष्टींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. जे आपल्या बाबतीत झालं, जे आपल्या वाट्याला आलं ते टिनूच्या बाबतीत होऊ नये, असं त्याला पदोपदी वाटतंय. मधुरची ही तळमळ त्याच्या वडिलांबरोबरच्या संवादातून प्रकर्षानं जाणवते. मधुर आपल्या वडिलांना म्हणतो : ‘‘कुछ भी बना सकते थे, बँक मॅनेजर, मेकॅनिक!’’
आपण मोठ्या पडद्यावर अनेकदा गँगस्टर-शूटर पाहिलेला आहे; पण आपल्या देहबोलीतून, रात्रीच्या काळोखातला एक विशिष्ट वावर आणि वैयक्तिक प्रभावीपणातून जॅकी श्रॉफनं साकारलेला हा शूटर खरंच लाजवाब आहे. मनातली चीड, रस्त्यावरचा वावर अशा अनेक गोष्टींची झालर त्याच्या व्यक्तिरेखेला शोभून दिसते. टिनूच्या भूमिकेत मच्छिंद्र गडकरनं कमाल केली आहे. त्याच्या डोळ्यांत दिसणारी चमक विशेष उल्लेखनीय. त्यालाही स्वतःचा एक भूतकाळ आहे आणि आपल्या आईच्या मारेकऱ्याच्या शोधात तो आहे. तो सतत या बाबतीत काहीतरी माहिती मिळवण्याच्या उद्देशानं पोलीस स्टेशनला भेट देतोय; पण प्रत्येक वेळी त्याला अपमानच सहन करावा लागतोय. साहिल वेद आणि लेख टंडन यांनी आपापल्या छोट्याशा भूमिकांना योग्य प्रकारे न्याय दिला आहे.

या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शक चिंतन सारडा यांनी अगोदर ‘डॉन २’ आणि ‘शौकीन’ या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. सुनील खेडेकर आणि त्यांनी मिळून या शॉर्टफिल्मची निर्मितीही केली आहे. दिग्दर्शकाची एक वेगळीच छाप त्यांनी या शॉर्टफिल्मवर पाडली आहे. ‘शून्यता’ची संहिता निश्चितच ताकदीची आणि परिपूर्ण आहे. चिंतन सारडा आणि मनीष त्यागी या दोघांनी मिळून या शॉर्टफिल्मची उत्तम संहिता लिहिली आहे. त्यांनी अगदी प्रामाणिकपणे कथा मांडली आहे. ध्वनियोजना, संगीत आणि संकलन या गोष्टींना शंभरपैकी शंभर गुण द्यायला हवेत. या शॉर्टफिल्मचा कालावधी आणखी थोडा वाढवायला पाहिजे होता, असं मला मनापासून वाटतं.

शॉर्टफिल्मचा शेवट अगदी हृदय हेलावून टाकणारा, डोळ्यांत टचकन् पाणी आणणारा आणि वास्तवाचं भान आणणारा आहे.‘शून्यता’ या शब्दाचा खरा भावार्थ आपल्याला या शेवटातूनच समजतो. किंबहुना दिग्दर्शक आणि त्याच्या संपूर्ण टीमचं हे एक प्रकारचं यशच म्हणावं लागेल.

लॉसएंजलिसमधलं ‘बेस्ट ऑफ इंडिया शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’, दिल्लीतला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल यांच्याबरोबरच अनेक ठिकाणी सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्मचा पुरस्कार ‘शून्यता’ला मिळाला आहे. मोठ्या पडद्यावर ज्या गोष्टी किंवा आशय पोचू शकत नाही, किंवा तेवढा लांबवण्याची गरज नसते, तो आशय शॉर्टफिल्म हे माध्यम नेमक्या पद्धतीनं साकार करतं. सध्याच्या नेट युगामुळं हा आशय विस्तारायलाही मदत होते आहे. याच प्रवाहातली ‘शून्यता’ ही उत्तम शॉर्टफिल्म तुम्हाला विचारप्रवृत्त करायला भाग पाडेल आणि वेगळा अनुभव देईल एवढं मात्र नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com