...मुद्दा मानवंदना देण्याचा (महेश झगडे)

...मुद्दा मानवंदना देण्याचा (महेश झगडे)

पोलिस प्रमुखांच्या बदल्या करण्याचे प्रकरण अलीकडेच घडलेले होते. खरे म्हणजे मानवंदना देणे किंवा न देणे हे लोकशाहीत व्यापक जनहित किंवा लोककल्याण याचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. या प्रथा ब्रिटिशकालीन ज्या ‘बांडगुळ’  प्रथा होत्या त्यांपैकी एक होती. केवळ चार-पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळात काही मार्ग काढणे आवश्‍यक होते. मी क्षणाचाही विलंब न करता एक अतिशय धोकादायक पण फक्त तोच एक पर्याय होऊ शकतो यावर विचार करून निर्णय घेतला.

कार्यक्रमाच्या एक-दोन दिवस अगोदर मंत्र्यांच्या खासगी सचिवाचा फोन आला. तेही तसे ओळखीचे होते. कार्यक्रमासाठी तेही येणार असल्याने आणि दूरसंचार मंत्रालयाचे सचिवदेखील येणार असल्याने वाहन वगैरे व्यवस्था करण्याचे त्यांनी संबंधितांना सांगितले होतेच. त्याची मला कल्पना दिली. दूरसंचार खात्याचे सचिवदेखील महाराष्ट्रीयन आणि महाराष्ट्र सेवेतील आय.ए.एस. होते आणि त्यांचा आणि माझा परिचय होताच. खासगी सचिवांनी फोन ठेवता-ठेवता राजशिष्टाचारात कोणतीही कमतरता पडणार नाही याबाबत सूचित केले. ते आमचे रुटीन आहे असे सांगितल्यावर मंत्र्यांना एका अन्य राज्यात नादुरुस्त वाहन दिले गेले होते व त्यामुळे बांका प्रसंग उद्‌भवला होता हेही त्यांनी सांगितले. नाशिकची यंत्रणा त्याबाबत एकदम तरबेज होती. कारण एक तर विभागीय मुख्यालयाचे ठिकाण आणि दुसरे म्हणजे शिर्डीला अव्याहतपणे संपूर्ण देशातून येणाऱ्या व्ही.आय.पीं.चा बंदोबस्त करावा लागत असल्याने त्यात ते काटेकोरपणे व्यवस्था करण्यात निष्णात  होते. 

नाशिककरिता हिंदुस्थान एअरॉनॉटिक्‍सचे ओझर येथील विमानतळ सुमारे २५ कि.मी. आहे; त्याचा वापर होत असे. मंत्री सकाळी दहा वाजता येणार असल्याने संबंधित अधिकाऱ्यांसहित मी साडेनऊ वाजताच तेथे जाऊन पोचलो. विमान येण्यासाठी अर्धा तास वेळ असल्याने व्ही.आय.पी. कक्षात इतर अधिकाऱ्यांबरोबर प्रशासकीय चर्चा करीत वेळ व्यतीत होत होता. विमान धावपट्टीवर येण्यास दहा मिनिटे आहेत असा ‘टॉवर’कडून निरोप आल्यानंतर आम्ही विमान ज्या ठिकाणी येऊन थांबते त्या ठिकाणी पोचलो; पण काही तरी चुकल्यासारखे वाटले आणि पोटात धस्स झाले. मानवंदना देण्यासाठी जी पोलिसांची टीम तयारीत असते आणि त्या टीमसमोर मंत्री उभे राहून ज्या लाकडी चौथऱ्यावरून मानवंदना स्वीकारतात ते तिथे काहीच नव्हते. त्याची व्यवस्था ओझर विमानतळ पुणे ग्रामीण या पोलिस अधीक्षकांच्या हद्दीत असल्याने त्यांनी ती का केली नाही हे सोबतच्या पोलिस अधीक्षकांना त्याबाबत विचारले. त्यावर त्यांनी सांगितले, की कार्यक्रम नाशिक शहरात असल्याने नाशिकचे पोलिस आयुक्त मंत्री नाशिक शहरात पोचल्यावर त्यांना मानवंदना देतील. प्रसंग अतिशय भयंकर होता. राजशिष्टाचाराप्रमाणे जिल्ह्यात मंत्र्यांच्या किंवा व्ही.व्ही.आय.पीं.च्या प्रथम आगमनाच्या ठिकाणीच मानवंदना देण्याची प्रथा आणि  आदेश होते. 

सर्वसामान्यांच्या दृष्टीने मंत्र्यांना पोलिसांकडून मानवंदना न मिळणे ही बाब क्षुल्लक दिसण्यासारखी असली तरी शासन, राजशिष्टाचार परंपरा या दृष्टीने तो एक भयंकर प्रमाद होता. शिवाय त्याचे राजकारणही अगदी सहजासहजी होऊ शकत होते. कारण येणारे केंद्रीय मंत्री हे ज्या पदाचे होते त्यांच्या विरुद्ध पक्षाचे सरकार राज्यात होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने केंद्रीय मंत्र्यांना मानवंदना न देऊन राजशिष्टाचार पाळला नाही अशीही परिस्थिती उद्‌भवू शकली असती आणि माध्यमांकडून ती उचलून धरली जाण्यासारखी होती. वास्तविकतः यामध्ये सरकारच्या वरिष्ठ पातळीचा यामध्ये काहीही संबंध नसतो; पण शेवटी राजकारण होऊ शकते या सदराखाली ही बाब होती. यावर मानवंदना देण्याची तयारी करण्याची जबाबदारी कोणाची, त्यामध्ये कोणी चूक केली, ती मुद्दामहून झाली की अनवधानाने झाली, अनवधानाने झाली तर असे प्रशासन काय कामाचे हे नंतर निष्पन्न होवो अगर न होवो तथापि मानवंदना न देणे ही जिल्हाधिकारी यांचीच चूक म्हणून कारवाई जिल्हाधिकाऱ्यांवरच बेतू शकत होती. अन्य एका जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांचा ताफा रस्त्यावरून जात असताना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केवळ काळे झेंडे दाखविले म्हणून त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांच्या बदल्या करण्याचे प्रकरण अलीकडेच घडलेले होते. खरे म्हणजे मानवंदना देणे किंवा न देणे हे लोकशाहीत व्यापक जनहित किंवा लोककल्याण याचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. या प्रथा ब्रिटिशकालीन ज्या "बांडगुळ''  प्रथा होत्या त्यांपैकी एक होती. केवळ चार-पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळात काही मार्ग काढणे आवश्‍यक होते. मी क्षणाचाही विलंब न करता एक अतिशय धोकादायक पण फक्त तोच एक पर्याय होऊ शकतो यावर विचार करून निर्णय घेतला. मंत्र्यांच्या आगमनाच्या वेळेस इतर अधिकाऱ्यांबरोबरच विमानतळाची व्यवस्था पाहणारे एच.ए.एल. अधिकारीही होते. त्यांना मी बाजूला घेऊन एक विनंती केली, की टॉवरला त्यांनी मोबाईलवरून मेसेज द्यावा, की काही कारणास्तव विमानाचे लॅंडिंग काही मिनिटे का होईना उशिरा करावे. त्यांच्या दृष्टीने ते सोपे होते. त्यांनी तसा निरोप दिला आणि विमान उतरण्याऐवजी आकाशात घिरट्या घालू लागले. दरम्यानच्या काळात ते विमानतळाचे व्यवस्थापक आणि त्यांचे सुरक्षाप्रमुख यांना बोलावून त्यांचे १५-२० सुरक्षा कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणांहून बोलावून जेथे पोलिस मानवंदनासाठी उभे असतात त्यापेक्षा जरा लांब त्यांना मानवंदनाच्या फॉरमॅटप्रमाणे -- उभे राहून पोलिसच मानवंदना देण्यासाठी उभे असल्याचा आभास निर्माण करण्याच्या सूचना दिल्या. मंत्र्यांचे विमान जेथे येऊन थांबेल त्यापासून ते विमानतळावर बरेच दूर ठेवले. अर्थात मंत्र्यांना उभे राहण्यासाठी लाकडी चौथरा नव्हता; पण दुरून तेथे मानवंदना देण्यासाठी पोलिस उभे आहेत, असे दृश्‍य निर्माण झाले. विमान काही मिनिटांतच उतरले. राजशिष्टाचाराप्रमाणे सर्वांत प्रथम जिल्हाधिकारी यांनी स्वागत करावे ही प्रथा असल्याने मी विमानाच्या शिडीच्या जवळ जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांच्या मागे दूरसंचार खात्याचे सचिवही होते. इतर अधिकाऱ्यांनी स्वागत केल्यानंतर ते सवयीप्रमाणे मानवंदना स्वीकारण्यासाठी निघाले. त्यांना मी कानात बोललो, की ‘‘सर, एक विनंती आहे.’’ ते आणि मी बाजूला गेलो. मी मनोमन अगोदरच ठरविलेल्या प्लॅनप्रमाणे त्यांना सांगितले, की मानवंदनेची तयारी येथे आहे; पण विमानतळावर प्रसारमाध्यमांना प्रवेश नसल्याने त्याचे कव्हरेज होणार नाही. जर मानवंदना नाशिक शहरात कार्यक्रमाच्या ठिकाणीच घेतली तर तेथे अनायसेच प्रसारमाध्यमांचे आणि इलेक्‍ट्रॉनिक चॅनेलचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने प्रसिद्धीच्या दृष्टीने तेथे मानवंदना घेणेच योग्य राहील. अर्थात मी हा पर्याय ‘सुचवीत’ होतो या आवाजामध्ये न बोलता ‘तसेच करावे’ या सुरामध्ये सांगितले. त्यांना ते पटले. आम्ही दोघे पुन्हा इतर सर्वजण थांबले होते तेथे येऊन सांगितले, की मानवंदना नाशिक शहरात होईल.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बऱ्याच वेळेस व्ही.व्ही.आय.पी. स्थानिक माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःच्या गाडीत बरोबर घेतात. तसे काही होऊ नये म्हणून त्यांच्या पक्षातील जे नेते स्वागतासाठी आले होते तेच मंत्रिमहोदयांबरोबर गाडीतून जातील अशी ‘आपोआप’ व्यवस्था केली. मी माझ्या गाडीतून त्या ताफ्यामधून निघालो. हा ताफा कार्यक्रमाच्या स्थळी पोचण्यासाठी किमान अर्धा तास वेळ होता. क्षणाचाही विलंब न करता गाडीत बसल्या-बसल्या मी नाशिक पोलिस आयुक्तांना मोबाईलवरून कार्यक्रमाच्या ठिकाणी मानवंदना देण्याची व्यवस्था आणि तीदेखील जितकी चांगली होईल तितकी देण्यासाठी तयारी करण्यास सांगितले. हे पोलिस आयुक्त अशा बाबतीत हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. त्यांना समारंभ वगैरेंमध्ये जरा जास्तच रस होता. मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी करण्याचे त्यांनी अगदी आनंदाने आणि उत्साहाने मान्य केले. अर्ध्या तासानंतर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो. मानवंदना देण्याची तयारी पाहून तर मी अचंबितच झालो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com