संशोधनातून प्रशासनाकडे... (महेश झगडे)

महेश झगडे (माजी सनदी अधिकारी)
रविवार, 5 जानेवारी 2020

एखाद्या विषयाचा चौफेर-सखोल अभ्यास, निर्णयक्षमता, जोखीम पत्करण्याची वृत्ती, बेधडकपणा...सनदी अधिकाऱ्याच्या ठायी हे गुण अत्यावश्यक असतात. असे गुण असणाऱ्या अधिकाऱ्याच्या प्रशासकीय कारकीर्दीच्या वाटेवर फुलं नक्कीच अंथरलेली नसतात; किंबहुना त्याला पावलोपावली काट्यांवरूनच चालावं लागतं...तरीही निग्रह असेल तर यंत्रणेला, व्यवस्थेला हवा तसा आकार निश्चितच देता येतो...मग संघर्ष करावा लागला, लढा द्यावा लागला तरी बेहत्तर...
अशाच एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याची संघर्षगाथा, यशोगाथा सांगणारं हे साप्ताहिक सदर

जेव्हा मी एखाद्या विषयाचा खोलवर जाऊन अभ्यास करतो त्या वेळी त्या विषयाबद्दल जेवढं समजून घेता येईल तेवढं घेण्याचा माझा प्रयत्न असतो. काही वेळा मी त्यात हरवून जातो. हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. पुढं प्रशासनात मला या सवयीचा खूप उपयोग झाला...

तुम्ही प्रशासकीय अधिकारी झाला नसतात तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात असतात, असा प्रश्न मला काही वेळा विचारला जातो. प्रशासनात गेलो नसतो तर मी संशोधन केलं असतं. कोणत्या तरी प्रयोगशाळेत रमलो असतो. कृषिशास्त्रात मास्टर्स केल्यानंतर पीएच.डी करायची आणि संशोधनक्षेत्रातच करिअर करायचं असा माझा निर्णय झालेला होता. पण काही वळणं अशी आली की त्यांनी माझ्या करिअरची दिशा बदलून टाकली. आज इतक्‍या वर्षांनी मागं वळून पाहताना माझ्या प्रशासकीय दिवसांवरही या सगळ्या घडामोडींचा प्रभाव होता हे मलाच जाणवत राहतं.

संशोधनक्षेत्राकडे मी ओढला गेलो हीपण खूप नंतरची गोष्ट आहे. मूळ ठरलं होतं शेतीच करायची. तीदेखील शास्त्रीय पद्धतीनं आणि व्यवसाय म्हणून. सत्तरीचं दशक नुकतंच सुरू झालं होतं. जगभरात शेतीच्या क्षेत्रात बरंच काही चाललं होतं. त्याच्या काही काही चर्चा आजूबाजूला असायच्या. त्या काळात इंजिनिअरिंग, मेडिकल याच करिअरच्या मुख्य वाटा असल्या तरी शास्त्रीय शेतीच्या भोवती फिरणाऱ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर माझ्या मनात शास्त्रीय पद्धतीची शेती रुजत होती. शेती हा जगातला सगळ्यात जुना व्यवसाय आणि व्यवसाय म्हणून शेती केल्यास ती उत्तम करिअर असू शकते अशी खात्री असल्यानं बीएस्सी ॲग्रीची वाट पकडायची हे नक्की झालं.
पुण्याच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. वातावरण समजून घेत असतानाच सुरुवातीच्या काही दिवसांतच काही समानधर्मा मित्र भेटले. कॉलेजच्या पहिल्या पहिल्या दिवसांत सगळीकडेच होतात तसा आमचाही एक ग्रूप तयार झाला. आमच्या त्या ग्रूपचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही फारच सिन्सिअर विद्यार्थी होतो. या सुरुवातीच्या दिवसांतच एक गोष्ट लक्षात आली व ती म्हणजे रूढार्थानं अभ्यास करणं हा विषय आमच्या सगळ्यांसाठी फारच सोपा होता. विशेष काही कष्ट न करता अभ्यास होत राहायचा. याचा परिणाम म्हणून आम्ही कॉलेजच्या लायब्ररीकडे वळलो. करिअरची दिशा बदलून टाकणाऱ्या वळणांचा वर मी उल्लेख केला ना, त्यातलं हे एक महत्त्वाचं वळण.

त्या ग्रंथालयानं एक समृद्ध दालन माझ्यासाठी उघडलं -एन्‌सायक्‍लोपीडियाज्‌चं. कॉलेजमध्ये मी कुठं सापडलो नाही तर कुणीही डोळे मिटून सांगावं की मी लायब्ररीत असेन म्हणून. सुरुवातीच्या काळात लायब्ररीतल्या एका कोपऱ्यात ‘एन्‌सायक्‍लोपीडिया ब्रिटानिका’चे खंड घेऊन बसल्याचं मला आजही आठवतं. ‘एन्‌सायक्‍लोपीडिया ब्रिटानिका’च्या बरोबरीनंच भुरळ पडली ती जगभरातून येणाऱ्या नियतकालिकांची. ‘सायन्स रिपोर्टर’ असायचं, ‘नॅशनल जिओग्राफिक’ असायचं, ‘नेचर’ होतं. विज्ञानाला वाहून घेतलेल्या त्या नियतकालिकांमधल्या लेखांमुळे, सखोल मांडणी करणाऱ्या शोधनिबंधांमुळे मी वैज्ञानिक संशोधनांबद्दल विचार करायला लागलो.
बीएस्सी ॲग्रीसाठी प्रवेश घेण्यामागचा हेतू खरंतर होता शास्त्रीय आणि व्यावसायिक पद्धतीनं शेती करण्याचा; पण पहिल्या पाच-सहा महिन्यांतच तो विचार मागं पडायला लागला.
वाचत गेल्यनं अफाट संशोधनविश्वाची दारं किलकिली होत होती आणि विज्ञानसंशोधनाकडं माझा कल झुकायला लागला होता. या वाचनामुळे विचार करण्याची पद्धत बदलून गेली. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धान्त, जैवभौतिकशास्त्रातले सिद्धान्त असे अनेकविध विषय वाचत होतो. सगळेच काही माझ्या त्या वेळच्या अभ्यासक्रमातले विषय होते असं नाही. या सगळ्यात मला सगळ्यात भावलेला विषय होता जेनेटिक्‍स. पदवी अभ्यासक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसांतच मी अशा रीतीनं निव्वळ अभ्यासाचा भाग असणाऱ्या विज्ञानाच्या पलीकडे पसरलेल्या वैज्ञानिक जगाकडे ओढला गेलो.

पुढची वाटचाल संशोधनक्षेत्रातच करायची हा विचार इथं पक्का झाला. मनात प्रश्न खूप होते. शेतीबाहेरच्या अनेक क्षेत्रांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं पायाभूत संशोधन झालं आहे. विजेच्या बाबतीत म्हणा किंवा यंत्रसामग्रीत म्हणा, जितकं पायाभूत संशोधन झालंय त्या तुलनेत शेतीत ते कमी आहे. संकरित शेतीत काही काम झालं आहे; पण त्याही पुढं जायला हवं. अर्थात त्या वेळचे हे विचार परिपक्व नव्हते हे आज लक्षात येतं; पण वैज्ञानिक संशोधनाबाबत जी नवी दृष्टी मिळत होती, तीतून त्या वेळी मनात हे प्रश्न उभे राहत होते. आपल्या आवडी जोपासण्यासाठी या क्षेत्रात खूप वाव आहे हेदेखील जाणवायला लागलं होतं.

एक मजेशीर गोष्ट यानिमित्तानं सांगायची म्हणजे, आमच्या ग्रूपमधल्या आणखी एक दोन जणांना वाचनात, विज्ञान-संशोधनाविषयीच्या चर्चांमध्ये रस होता, मी आधी म्हणालो तसं, आम्ही सगळे सिन्सिअर विद्यार्थी होतो, कॉलेजातल्या काही मंडळींच्या दृष्टीनं आम्ही बहुतेक जरा जास्तच सिन्सिअर असू, त्यामुळे आमच्या ग्रूपला ‘सायंटिस्ट ग्रूप’ असं नाव पडलं होतं. आम्हाला, ‘अच्छा, ते सायंटिस्ट ग्रूपवाले!’ असं म्हणताना त्यात थोडा चेष्टा-मस्करीचाही भाग असायचा.

कॉलेजातल्या पहिल्या एक-दोन वर्षांतले आणखी एक-दोन किस्से सांगायला हवेत. माझ्या स्वभावाच्या जडणघडणीविषयी मी जेव्हा विचार करतो तेव्हा ते प्रसंग मला नेहमी आठवतात. त्या वेळी आम्हाला तिमाही परीक्षा द्यावी लागायची. परीक्षा तीसच मार्कांची असायची; पण ते मार्क आमच्या वार्षिक मार्कांमध्ये धरले जायचे, त्यामुळे त्या तिमाही परीक्षा फार लाईटली घेऊन चालायच्या नाहीत. प्रश्नपत्रिकेत ‘टीपा लिहा’ असा एक प्रश्न असायचा. प्रत्येक टिपेसाठी दोन मार्क असायचे; पण पहिल्याच वर्षीच्या या परीक्षेत दोन मार्कांसाठी मी जी टीप लिहिली ती एका दृष्टीनं म्हणजे डिझास्टरच होती, ‘ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा’ या विषयावर. म्हणजे झाडाच्या पानाच्या मागं जी छिद्रं असतात त्यांच्या साह्यानं झाडं श्वासोच्छ्ववास करतात, त्यावर दोन मार्कांसाठी टीप लिहायची होती. माझा त्या विषयाचा भरपूर अभ्यास झाला होता. अगदी एखाद्या पदव्युत्तर परीक्षेच्या विद्यार्थ्याइतका मी त्याचा अभ्यास केला होता. माझ्या हाती लागलेलं सगळं काही मी वाचून काढलं होतं. विषय मला आवडला होता. त्या दोन मार्कांसाठी मी आख्खी उत्तरपत्रिका खर्ची घातली होती, ती जागा कमी पडली म्हणून मी तिला एक पुरवणीही जोडली होती. साहजिकच ही एकच टीप लिहिता लिहिता परीक्षेचा वेळ संपला. मी तीस पैकी दोनच मार्कांचा पेपर सोडवला होता, पेपर संपल्यावर हे माझ्या लक्षात आलं. माझं धाबं दणाणलं होतं.
जेव्हा मी एखाद्या विषयाचा खोलवर जाऊन अभ्यास करतो त्या वेळी त्या विषयाबद्दल जेवढं समजून घेता येईल तेवढं घेण्याचा माझा प्रयत्न असतो. काही वेळा मी त्यात हरवून जातो. हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. पुढे प्रशासनात मला या सवयीचा खूप उपयोग झाला; पण ते नंतर.

आमचे त्या विषयाचे प्रोफसर फारच कडक होते. त्यांनी मला बोलावणं पाठवलं. आत काय करणार, मी मनाशी विचार केला. चूक झाली होती. ती कबूल करावी असा विचार करून त्यांच्या समोर उभा राहिलो. मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. ‘मी नापास होणार आहे; पण फायनल परीक्षेत मी हे मार्क भरून काढेन’, असं सांगून ‘आत्ता माझी चूक झाली आहे’, असं मी मान्य केलं. त्यांनीही मला खूप झापलं. ‘असं करायचं नसतं, हे पहिलंच वर्ष आहे, असं करत राहिलास तर पुढं कसं करशील’ वगैरे. मग त्यांनी मला बसायला सांगितलं आणि म्हणाले : ‘‘तू जे काही लिहिलं आहेस ते ॲमेझिंग आहे. त्यातले काही मुद्दे माझ्याही वाचण्यातून सुटले होते. मी ते पुन्हा तपासले आणि तू सगळं बरोबर लिहिलं आहेस म्हणून मी तुला पेपराचे पूर्ण मार्क देणार आहे; पण एक गोष्ट लक्षात कायम लक्षात ठेव, तुझ्या ठिकाणी तू बरोबर आहेस.’’ त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं. ते म्हणाले : ‘‘ज्ञान आवश्‍यक आहेच; पण विशिष्ट वेळी आपल्याला त्यातलं काय पाहिजे याचंही भान असायला हवं. आत्ता आपल्याला दोनच मार्क हवे आहेत. एखाद्या विषयात खोलवर शिरायचं झालं तरी त्याचा उपयोग कसा करायचा हेही लक्षात घ्यायला पाहिजे.’’
माझ्यासाठी हा आयुष्यभराचा धडा होता. एक लक्षात आलं की मी कोणत्याही विषयात खूप खोलवर जाऊन अभ्यास करू शकतो. मग तो विषय माझ्या आवडीचा आहे की नाही हा मुद्दा माझ्या लेखी फार महत्त्वाचा नसतो. प्रशासनात आल्यानंतर मला ते प्रकर्षानं जाणवलं. अनेक विषयांमध्ये, मग जमीनमहसूल असेल, गुटखाबंदी असेल, मला या सवयीचा उपयोग झाला आहे.

दुसराही प्रसंग असाच आहे. भौतिकशास्त्राच्या एका प्रॅक्‍टिकलच्या वेळचा. आम्हाला घनत्वाचाही थोडा अभ्यास करावा लागायचा. भौतिकशास्त्राचं मला प्रचंड आकर्षण होतं. त्या प्रॅक्‍टिकलच्या वेळी आमच्या वर्गातल्या एका मुलानं प्रॅक्‍टिकल घेणाऱ्या आमच्या त्या इन्स्ट्रक्‍टरविषयी फळ्यावर एक जरा वैयक्तिक स्वरूपाची फारच वाह्यात कॉमेंट लिहिली होती. त्या वेळीही असे उद्योग चालायचे. इन्स्ट्रक्‍टर एकदम वर्गात आल्यानं त्याला ती कॉमेंट पुसायची संधी मिळाली नाही. ती कॉमेंट पाहिल्यावर एरवी शांत असणारे ते इन्स्ट्रक्‍टर एकदम भडकले. म्हणाले : ‘‘हे कुणी लिहिलंय ते तुम्हाला माहीत आहे. मला त्याचं नाव सांगा.’’ कुणी लिहिलंय हे सगळ्यांना माहीत होतं; पण कुणीच काही बोलायला तयार नव्हतं. मग इन्स्ट्रक्‍टर म्हणाले : ‘‘मी एक प्रॉमिस करतो, ज्या कुणी हे लिहिलंय त्याला मी काहीही करणार नाही. मी विसरून जाईन ते. असं होत असतं हे मला माहितीय...आम्हीही आमच्या कॉलेजच्या दिवसांत असा वाह्यातपणा करायचो; पण आज मला त्याचं नाव समजलं पाहिजे.’’
त्यांनी आम्हाला खरं बोलण्याविषयी एक भाषण दिलं. तरीही सगळे गप्पच. मग मात्र ते म्हणाले : ‘‘मला तुम्ही काही सांगितलं नाहीतर ‘आपला सगळा पोर्शन संपला’ असं जाहीर करून मी तुम्हाला
पुढं काही शिकवणार नाही. तुम्हाला परीक्षेत यावर प्रश्न येईल, मग पाहा, तुम्ही काय करायचं ते.’’

काय करायचं ते मला समजेना. सगळे चुळबूळ करत होते; पण बोलत कुणीच नव्हतं. मला एकदम काय वाटलं कोण जाणे, मी उभा राहिलो आणि म्हणालो : ‘‘सर, ते मी लिहिलंय.’’
सगळे माझ्याकडे पाहायला लागले. हे ऐकल्यावर इन्स्ट्रक्‍टरांची प्रतिक्रिया वेगळीच होती. ते म्हणाले : ‘‘नाही, तू नाही असं लिहू शकत.’’
मी म्हणालो : ‘‘नाही सर, मीच लिहिलंय ते; पण आता आपण प्लीज आम्हाला पुढं शिकवा.’’
मग ते प्रॅक्‍टिकल पार पडलं. जाताना त्या इन्स्ट्रक्‍टरनी मला त्यांना भेटायला सांगितलं. मी गेल्यावर ते मला म्हणाले : ‘‘तू लिहिलेलं नाहीस हे.’’ मी म्हणालो : ‘‘सर, खरं आहे मी केलेलं नाहीये हे; पण मला भौतिकशास्त्रात खूप इंटरेस्ट आहे. मात्र, तो विषय जर मला नीट समजला नाही तर नुसतं पुस्तकातलं वाचण्याचाही काही उपयोग नाही. म्हणून मी तसं म्हणालो. माझी चूक झाली. आय ॲम सॉरी.’’
त्यावर ते म्हणाले : ‘‘अरे, हे ठीक आहे. तू असं करणार नाहीस हे मलाही माहीत होतं. तू खोटं बोललास; पण त्यालाही माझी हरकत नाही.’’

त्या वेळेला मला जाणवलं की मला प्रामाणिकपणे एखादी गोष्ट करायची असेल तर मी रिस्क घेऊ शकतो. हाही माझ्या स्वभावाचा भाग आहे हे लक्षात आलं.
या दोन घटना मी कधीच विसरणार नाही.
मी मेरिटमध्ये येऊन बीएस्सी झालो. ते वर्ष होतं सन १९७९. आणि मग संशोधन करायचं म्हणून प्लांट पॅथॉलॉजीमध्ये एमएस्सीसाठी मला विनासायास प्रवेश मिळाला. आता माझ्या डोळ्यासमोर ध्येय होतं ते फक्त संशोधनात करिअर करण्याचं. संशोधनासाठी मी व्हायरॉलॉजी हा विषय निश्‍चित केला होता. शक्‍य झालं तर एखाद्या परदेशी विद्यापीठात संशोधन करावं असाही मानस होता. एमएस्सीच्या काळात तर मी पूर्ण काळ प्रयोगशाळेतच असायचो. त्याही काळात घडलेल्या एका प्रसंगानं मला काहीही कृती करण्याच्या आधी, कुणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी आवश्‍यक काळजी घेण्याची सवय लागली.

एमएस्सीच्या शेवटच्या सहामाहीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मला एका बहुराष्ट्रीय कंपनीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. विभागप्रमुखांच्या आग्रहाखातर आम्ही काही जण मुलाखतीसाठी गेलो. कंपनी जॉईन करण्याचा माझा इरादा नसल्यानं माझा इंटरव्ह्यू फारच लांबला. खूप वाचत असल्यानं एकेका मुद्द्यावर विचार करण्यापेक्षा डॉट्‌स कनेक्‍ट करण्याचीही मला सवय होती, त्यामुळे ‘हे बरोबर आहे’, ‘ते काही बरोबर नाही’ अशी मतं मी त्या मुलाखतीत मोकळेपणानं मांडत होतो. पुढच्या टप्प्यात मला कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलावून घेतलं. त्यांच्याबरोबरही एक मुलाखत झाली आणि त्यांनी चक्क माझी निवड केली.

नंतर खूप चर्चा, पत्रापत्रीनंतर मी त्या कंपनीबरोबर कामाला सुरवात केली. पण मी तिथं रमलो नाही; पण ती एक स्वतंत्र कथा आहे. ती पुन्हा केव्हातरी सांगेन. मात्र, तिथं न रमल्यामुळे माझ्या करिअरचा मार्ग पुन्हा एकदा बदलला आणि त्या बदलानं मला प्रशासकीय सेवेकडे ओढून नेलं...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang mahesh zagade write leading from the front article