निवडणुकांचे दिवस : १ (महेश झगडे)

mahesh zagade
mahesh zagade

जिल्हाधिकारी म्हणाले : ‘‘परिस्थिती अतिशय चांगली आहे; पण वातावरण तणावपूर्ण असतं. तुम्ही काळजी करण्याचं काहीही कारण नाही; पण शक्‍यतो तुम्ही तिकडं जाऊ नये!’’ प्रशासनात हे असंच असतं! दोन्ही बाजू - जरी त्या परस्परविरोधी असल्या तरी - त्या ठामपणे सांगण्याची विलक्षण हातोटी अधिकाऱ्यांना साधलेली असते! मी जिल्हाधिकाऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून दौऱ्यावर निघालो...

‘आयएएस’च्या सेवेत जी अनेकविध कामं असतात त्यांपैकी काही कामं ही करिअरमध्ये न चुकता करावीच लागतात. काही अपवाद वगळले तर त्यातून
कुणीही सुटू शकत नाही. अशा कामांपैकी एक काम म्हणजे, लोकसभेच्या आणि विधानसभांच्या निवडणुकांच्या वेळी परराज्यात निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी म्हणून, निवडणूक-निरीक्षक म्हणून जाणं.

(कै.) टी. एन. शेषन हे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासंदर्भात त्यांनी जी काही पावलं उचलली त्या प्रक्रियेतील हा एक महत्त्वाचा भाग आहे. अर्थात्, देशातील या निवडणुका ज्या ‘रिप्रेझेन्टेशन ऑफ पीपल्स अॅक्‍ट’नुसार होतात त्यात निवडणूक-निरीक्षकांची तरतूद नाही; पण संबंधित राज्यातील प्रशासन हे सत्तेवर असलेल्या पक्षाकडे झुकून त्यानं सत्ताधारी पक्षाला मदत करू नये आणि निकोप वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाला राज्यघटनेनं जे अधिकार दिलेले आहेत, त्यानुसार निवडणूक-निरीक्षकांची नेमणूक होते. या निरीक्षकांचा निवडणूकप्रक्रियेत कोणताही प्रत्यक्ष सहभाग नसतो आणि त्यांनी फक्त निवडणूक-आयोगाचे ‘डोळे आणि कान’ म्हणूनच काम करणं अभिप्रेत असतं. जर स्थानिक प्रशासनाकडून निवडणूकप्रक्रियेत काही अनियमितता होत असतील, दुजाभाव केला जात असेल, पारदर्शकता ठेवली जात नसेल आणि एकंदरीतच प्रक्रियेची निकोपता राखली जात नसेल तर अशा बाबींवर निरीक्षकांनी रोजच्या रोज नजर ठेवून त्याविषयी आयोगाला कळवायचं असतं. त्यावर आयोग संबंधितांवर कारवाई करत असतो. एकंदरीतच, निवडणूक-आयोगाचं महत्त्व निवडणूककाळात अतिशय
मोलाचं असतं.
अलीकडे आयएएस अधिकाऱ्यांबरोबरच आयपीएस, आयआरएस अधिकाऱ्यांचीसुद्धा नियुक्ती कायदा-सुव्यवस्थेवर आणि निवडणूकखर्चावर नजर ठेवण्यासाठी केली जाते.

निवडणूक-निरीक्षक म्हणून जाण्याचे प्रसंग मला नेहमीच आले. या कामकाजातले काही प्रसंग कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखे असतात; विशेषतः दुसऱ्या राज्यातील प्रशासकीय व्यवस्था कशी चालते, तिचे राजकीय आणि सामाजिक संबंध कसे असतात याचं निरीक्षण करण्याची ती एक पर्वणी असते. अर्थात्, निवडणूक-निरीक्षकाचं काम तसं संवेदनक्षमदेखील असतं. काही गैरप्रकार नंतर उघडकीस आले तर, निरीक्षकांनी ते आयोगाला वेळीच का कळवले नाहीत या मुद्द्यावरून किंवा निवडणूकप्रक्रियेत निरीक्षकांकडून कडकपणाचं
स्वीकारलं गेलेलं धोरण स्थानिक प्रशासनाला आवडलं नाही तर स्थानिक जिल्हाधिकारीदेखील निरीक्षकाविरुद्ध आयोगाला कळवू शकतात.
थोडक्यात, निरीक्षकासाठी तो काळ म्हणजे तारेवरची कसरतच असते. अर्थात, काही अपवादात्मक निरीक्षकांनी आपल्या गैरवाजवी वागण्यामुळे आयोगाच्या कारवाईला सामोरं जावं लागण्याची नामुष्की स्वतःवर ओढवून घेतल्याची उदाहरणंही आहेत.

सन २००७ मध्ये माझी नेमणूक उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी फिरोजाबाद या विधानसभा मतदारसंघात झाली होती. या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांच्यात अतिशय चुरस होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्या वेळी ‘रेकॉर्ड ६३९ निमलष्करी दला’च्या तुकड्याही नियुक्त करण्यात आल्या होत्या.
* * *

मी फिरोजाबादला जाण्यासाठी पुण्याहून निघालो. फिरोजाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मला घ्यायला दिल्लीच्या विमानतळावर आले होते. प्रत्येक निवडणूक-निरीक्षकासाठी वर्ग एकचा एक संपर्क-अधिकारी, पीए आदी देण्याची प्रथा आहे. गाडीत बसून निघाल्यानंतर जरा वेगळंच दृश्‍य दिसलं. गाडीच्या पुढं आणि मागं निमलष्करी दलाच्या दोन गाड्या होत्या. या जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती लक्षात घेता निवडणूक-निरीक्षकांच्या सुरक्षिततेसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे असा खुलासा संपर्क-अधिकाऱ्यानं यासंदर्भात माझ्याकडे केला.
त्यावरून परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव मला झाली. संपर्क-अधिकाऱ्यानं प्रवासादरम्यान जिल्ह्याबाबतची माहिती द्यायला सुरुवात केली.
* * *

फिरोजाबाद हे दिल्लीपासून २३०, तर आग्र्यापासून ३७ किलोमीटरवरचं जिल्ह्याचं ठिकाण. हे शहर तसं मोगलकालीन महत्त्वाचं शहर होतं. चंद्रनगर हे त्याचं जुनं नाव. आपला मनसबदार फिरोजशहा याच्या नावानं अकबरानं त्याचं नामकरण केलं. इथला महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे काचेच्या बांगड्या तयार करण्याचा.
अशा बांगड्या तयार करण्याचे कारखाने जवळपास इथल्या प्रत्येक घरात होते. बांगड्या तयार करताना जो कोळशाचा वापर होतो त्यामुळे ताजमहालावर अॅसिडचा पाऊस पडून त्याचा ऱ्हास होत असल्याच्या कारणामुळेही हे शहर प्रकाशझोतात आलेलं होतं. मी पाहिलेल्या अनेक प्रदूषित शहरांपैकी हे एक शहर होतं.
अन्य शहरांच्या तुलनेत इथलं प्रदूषण प्रचंड होतं. शहरात ६२ टक्के हिंदू आणि ३२ टक्के मुस्लिम लोकवस्ती होती. हा मतदारसंघ संवेदनक्षम होता. शिवाय, या मतदारसंघाचा ग्रामीण भाग हा तसा गुन्हेगारीबाबतच ओळखला जात असे. तिथं पोचल्यानंतर जिल्ह्याबाबतची आणि निवडणुकीबाबतची सर्व माहिती मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

माझी व्यवस्था शहरापासून दूर १५-२० किलोमीटरवर असलेल्या ऑर्डनन्स फॅक्‍टरीच्या विश्रामगृहात करण्यात आली होती. तात्पुरतं कॅम्प-कार्यालयही तिथंच तयार करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी कॅम्प-कार्यालयात गेल्यावर पीएनं अधिकची सर्व माहिती दिली. मीदेखील माझ्या कामकाजाची पद्धत समजावून सांगितली.
शक्‍यतो सर्वच गावांना किंवा अगदीच शक्‍य झालं नाही तर जास्तीत जास्त गावांना भेटी
देण्याचा माझा मनोदय होता. हेतू हा की मतदानव्यवस्था आणि आचारसंहितेची अंमलबजावणी स्वतः पाहता यावी आणि ती अत्यंत कडकपणे राबवली जात आहे ना याची प्रत्यक्ष पाहणीत खातरजमा करता यावी.
मी तसं पीएला सांगितलं. संरक्षणासाठी असलेल्या पोलिस दलाला, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही तशा सूचना मी पीएच्या माध्यमातून कळवल्या.
काही वेळानं ही सर्व कामं आटोपून पंधरा दिवसांचा माझा कार्यक्रम घेऊन पीएनं मला दिला व काहीसा संकोचतच तो मला म्हणाला : ‘‘आपको गलत ना लगे तो एक बात कहनी है...’’
त्यावर ‘माझ्याशी कुठलीही गोष्ट निःसंकोचपणे आणि मनमोकळेपणानं बोलावी,’ असं सांगून मी त्याला आश्वस्त केलं.
त्यावर तो मला म्हणाला : ‘‘काही परिसरांतल्या गावांत तुम्हा जाऊ नये. कारण, तिथली गुन्हेगारी विकोपाला गेलेली आहे.’’
समोरच्या व्यक्तीवर कायमस्वरूपी विश्‍वास ठेवण्याचा माझा स्वभाव असला तरी हा पीए स्थानिक प्रशासनानं मला दिलेला असल्यानं आणि ज्या परिसरात मी जाऊ नये म्हणून तो सांगत आहे, त्या परिसरात निवडणुकीची तयारी व्यवस्थित झालेली नसल्यानं कदाचित गुन्हेगारीचं कारण तर पुढं करण्यात येत नसावं ना अशी शंका मला आली. मी तशी ती त्याला बोलून दाखवली आणि ‘माझ्या दौऱ्यात माझ्याबरोबर निमलष्करी दलाच्या गाड्या मागं-पुढं असल्यानं भीती कसली?’ असंही त्याच्या लक्षात आणून दिलं. त्यावर त्याचं उत्तर गंभीर होतं. तो म्हणाला : ‘‘त्या परिसरात प्रशासनाऐवजी गुंडप्रवृत्तीचंच जास्त चालतं आणि जर स्थानिक गुंडांकडून हल्ला झाला तर सर्वांत अगोदर हे निमलष्करी दलाचेच लोक पलायन करतील आणि तुमचं संरक्षण तुम्हालाच करावं लागेल!’’

मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि ही बाब खरी आहे का याची पडताळणी केली.
आपल्या जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था चांगली नाही, असं कोणताही जिल्हाधिकारी कधीही सांगत नसतो. कारण, ती चांगली नसेल तर ते त्याचंच अपयशच असतं.
जिल्हाधिकारी म्हणाले : ‘‘परिस्थिती अतिशय चांगली आहे; पण वातावरण तणावपूर्ण असतं. तुम्ही काळजी करण्याचं काहीही कारण नाही; पण शक्‍यतो तुम्ही तिकडं जाऊ नये!’’ प्रशासनात हे असंच असतं! दोन्ही बाजू - जरी त्या परस्परविरोधी असल्या तरी- त्या ठामपणे सांगण्याची विलक्षण हातोटी अधिकाऱ्यांना साधलेली असते! मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून दौऱ्यावर निघालो. माझ्याबरोबर तहसीलदार दर्जाचा स्थानिक अधिकारी मी माहितीसाठी घेतला. मला त्या भागाविषयी जी काही माहिती मिळालेली होती तिच्या अनुषंगानं मला आणखी माहिती देण्याविषयी मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं.

निवडणुकीची पूर्वतयारी कशी चालली आहे हे समजून घेता घेता दौऱ्यांतील गावांमध्ये फेरफटका मारणं, बूथ ज्या इमारतीत आहे तिची पाहणी करणं असं मी सुरू केलं.
तिथं एक गाव असं होतं की त्या गावात सर्व निवडणुकांमध्ये नेहमीच शंभर टक्के मतदान होत असे. गाव पंधराशे-सोळाशे लोकवस्तीचं असलं तरी नेहमीच शंभर टक्के मतदान होणं ही ‘किमया’ होती आणि ती जाणून घेण्याची मला साहजिकच उत्सुकताही होती. अशा गावांना आवर्जून भेटी द्याव्यात, असेही निवडणूक-आयोगाचे निर्देश असतात. मी त्या शंभर टक्के मतदानाच्या गावात फेरफटका मारला. उन्हाळा कडक असल्यानं लोक झाडांखाली एकत्रित बसलेले दिसले. शंभर टक्के मतदानाचं गमक काय हे जाणून घेण्यासाठी त्या लोकांपैकी काहींना बोलतं करण्याचा प्रयत्न मी केला. सुरुवातीला कुणीच काही बोलत नव्हतं; पण नंतर सर्वांनी एकामागोमाग एक बोलायला सुरुवात केली. इथले सर्व नागरिक निवडणुका, राजकारण, देशप्रेम यांबाबत कसे जागरूक आहेत वगैरे वगैरे...

लोकांनी दिलेल्या या माहितीनं माझं समाधान काही झालं नाही.
गाव एकदम आदर्शवत् असल्यामुळे शंभर टक्के मतदान होतं असा निर्वाळा
गावपातळीवरच्या पटवारी वगैरेंनी (तिकडे तलाठ्याला ‘पटवारी’ असं म्हणतात).
कदाचित असेलही तसं, असा विचार करून आम्ही गाड्या गावाच्या बाहेर लावल्या व गावाकडे निघालो. मतदानकेंद्र ज्या इमारतीत होतं त्या इमारतीची मी पाहणी केली. परतण्यासाठी म्हणून गाड्यांजवळ पोचलो तेव्हा ७०-८० वर्षांचे गृहस्थ काठी टेकवत टेकवत माझ्या दिशेनं आले. काही शासकीय काम अडलेलं असावं म्हणून त्यासंदर्भात त्यांना मला काही सांगायचं असावं असा विचार करत मीच त्यांच्या दिशेनं गेलो. माझे सुरक्षारक्षकदेखील मागोमाग आलेच.
'मला तुम्हाला एकट्यालाच काही सांगायचं आहे,’ असं तो वृद्ध गृहस्थ अत्यंत क्षीण आवाजात मला म्हणाला. त्यामुळे मी इतरांना जरा दूर जाऊन उभं राहायला सांगितलं...

(पूर्वार्ध)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com