हृदयबंधांची चित्ररूपं (मंदार कुलकर्णी)

mandar kulkarni
mandar kulkarni

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) नुकताच गोव्यात पार पडला. या महोत्सवातले एकेक चित्रपट बघणं म्हणजे बुद्धीला अक्षरशः खुराक होता. अनेक चित्रपटांत दिग्दर्शक कथेतले काही धागे मुद्दाम सोडून ठेवत होते. बहुतांश चित्रपटांमधले शेवट धूसर होते. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार, कुवतीनुसार आणि आकलनानुसार गाळलेल्या जागा भरा आणि चित्रकृतीचा आनंद घ्या, अशा प्रकारचं आव्हानच
लेखक-दिग्दर्शकांनी दिलं होतं. इथं नेहमीची ‘२१ अपेक्षित’ प्रकारची उत्तरं नव्हती. अनेकांनी आभासांचा खेळ चित्रपटात मांडला. या सगळ्या गोष्टींचा हा एक ‘ट्रेलर’...


फ्रान्समधली एक प्रसन्न सकाळ. अँड्री या हसतमुख महिलेचा आज वाढदिवस आहे. नातवंडं खेळतायत, टेबल मांडलं जातंय, काही जण सजावट करण्यात गुंतले आहेत, व्हिडिओ चित्रीकरणाची तयारी वगैरे सुरू आहे. अगदी उत्फुल्ल वातावरण आहे. अचानक आपल्याला ‘सरप्राइझ’ द्यायला मोठी मुलगी क्लेअर येतेय असं अँड्रीला कळतंय. ही बातमी येतेय आणि त्याच वेळी मोठा पाऊस सुरू झालाय. वादळसुद्धा येईल की काय असं वाटतंय. मुळात क्लेअर हेच वादळ आहे का? की अँड्रीचा वाढदिवस ही वादळापूर्वीची शांतता आहे...? प्रेक्षकांच्या मनात असे प्रश्न यायच्या आधीच एकेक घटना घडत जातात. आई-मुलगी, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण, वडील-मुलगी असे नात्यांचे एकेक कंगोरे उलगडत जातात आणि विस्कटूनही जातात. वाढदिवस साजरा करणं हेच तर मुळात नात्यांचं एक प्रकारचं ‘सेलिब्रेशन’ नसतं का? त्यामुळं नेमका तोच धागा पकडून दिग्दर्शक घटना-घडामोडींची गुंफण करत जातो आणि प्रेक्षकाला हलवून जागं करतो. रक्ताची नाती खरीच असतात का असा प्रश्न हा चित्रपट विचारतो. तो त्याचं अर्थातच उत्तर देत नाही. ते उत्तर तुम्ही द्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या प्रश्नाचीही लड तुमच्याच मनात लावायची आहे.

...आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) दाद मिळालेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या या ‘हॅप्पी बर्थडे’ नावाच्या चित्रपटानं नात्यांमधल्या वादळांचं जे सूचन सुरवातीलाच केलं, तेच खरं तर इतर अनेक चित्रपटांनी वेगळ्या पद्धतींनी केलं. नात्यांच्या रेशमी कापडातला एखादा विसंवादाचा धागा उलगडायचा आणि नंतर तोच पुन्हा जुळतोय का ते बघायचं असाच हा सगळा खेळ होता. बाहेरची वादळं दिसतात; पण नात्यांमधली वादळं दिसत नाहीत. मात्र, त्यांचा परिणाम फार मोठा असतो. हाच सगळा परिणाम एकेका चित्रपटातून दिसत होता. यंदाचा चित्रपट महोत्सव नात्यांना समर्पित होता की काय असा प्रश्न पडावा, इतकी नातेसंबंधांची वीण एकेका चित्रपटातून उलगडत होती. कुठं मुलगी आईवर रागावली आहे, कुठं आई मुलाला सोडूनच गेली आहे, कुठं वडील तुटून गेलेले आहेत, कुठं आजोबांवर आघात झालाय, कुठं एखाद्या घटनेचं सावट संपूर्ण कुटुंबाला पोखरून टाकतंय, तर कुठं आणखी कुठलं नातं हललंय. खरं तर आपल्या आजूबाजूच्या जगात हेच तर आपण बघतो. कुठं हृदयबंध तुटलेले, तर कुठं जुळलेले. या सगळ्या हृदयबंधांचा मागोवा आपण घ्यावा असं तुर्कस्तानपासून ते जर्मनीपर्यंतच्या अनेक दिग्दर्शकांना एकाच वेळी वाटलं हे उल्लेखनीय होतं. नात्यांच्या जखमा आजूबाजूला दिसत असताना कलांच्या माध्यमातून त्यांच्यावर फुंकर घालण्याचा किंवा त्यांच्यामागची कारणं शोधण्याचा हा प्रयत्न विशेष वाटला. एकीकडं नातेसंबंध आणि हृदयबंधांचा वेध घेत असताना दिग्दर्शक त्यातलं माणूसपण ज्या प्रकारे अधोरेखित करत होते ते बघणंही समृद्ध करणारं होतं, दिलासादायक होतं. देशांमधली युद्धं, एखाद्या मोठ्या व्यक्तीवरचे चरित्रपट, साहित्यकृतींचं माध्यमांतर या सगळ्या गोष्टी हळूहळू बाजूला करत माणसांमधले बंध या अगदी बेसिक विषयापर्यंत लेखक-दिग्दर्शकांनी येणं ही एक प्रकारे ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ नाही का? आणि खरं तर या सगळ्या हृदयबंधांमुळंच ‘सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत’ या केशवसुतांच्या कवितेसारखीच चित्ररसिकांची अवस्था होत होती. तुर्कस्तानमधल्या ‘कमिटमेंट’मध्ये बाळ सहा महिन्यांचं झाल्यावर बाहेर पडू इच्छिणाऱ्या वर्किंग मदरची मनोवस्था भारतातल्या आयांपेक्षा वेगळी नव्हती किंवा मॅसेडोनियामधल्या ‘गॉड एक्झिस्ट्स, हर नेम इज पेट्रुनिया’मधल्या लग्नाचं वय उलटून गेलेल्या पेट्रुनियाचं वागणं कुठं खटकत नव्हतं. शेवटी, माणूसपण इथून-तिथून सारखंच हे अधोरेखित होणं हे ‘इफ्फी’सारख्या महोत्सवात जाणवतं आणि म्हणूनच चित्रपटरसिकांना त्याची वारंवार वारी करावीशी वाटते.

बहुतेक चित्रपटांत खूप मोठ्या घटना-घडामोडी नव्हत्या. उलट, एखाद्या घटनेचा, नात्याचा अगदी बारीकसा पापुद्रा बाहेर काढायचा, कॅलिडोस्कोपसारखी त्याची वेगवेगळी रूपं दाखवायची आणि हा पापुद्रा पुन्हा शक्यतो मूळ ठिकाणी ठेवून द्यायचा किंवा तो तसा ठेवला जाऊ शकतो का याचा निर्णय प्रेक्षकांवर सोडून द्यायचा अशी ही सगळी किमया चित्रकर्मींनी दाखवली. त्यामुळं जास्तीत जास्त सूक्ष्मापर्यंत जाणं या चित्रकर्मींना शक्य होत होतं. ‘द ट्रूथ’ या चित्रपटात एका नामांकित अभिनेत्रीनं आत्मचरित्र लिहिलंय आणि तिची मुलगी आल्यानंतर सत्यं कशी उलगडत जातात हे दिग्दर्शकानं तरल पातळीवर दाखवलं. गेल्या वर्षी अनेक महोत्सवांत गाजलेल्या ‘शॉपलिफ्टर्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक हिरोकाझू कोरे-इडा या चित्रपटात नात्यांचे पदर ज्या विलक्षण पद्धतीनं उलगडतात ते बघणं हा फार सुरेख अनुभव होता. ‘डिस्पाइट द फॉग’ या चित्रपटात निर्वासित आणि दुसऱ्या धर्मातला एक छोटा मुलगा, एका मुलासाठी आसुसलेल्या कुटुंबात आल्यानंतर तिथं होणारी वादळं होती. ‘हेड बर्स्ट’ चित्रपटात स्वतःतल्या वेगळ्या लैंगिक जाणिवांवर एक आर्किटेक्ट मात कशी करू बघतो हे दिग्दर्शकानं दाखवलं. ‘अ व्हाइट व्हाइट डे’ या चित्रपटात एका प्रौढाला त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषात गुंतल्याची माहिती तिच्या मृत्यूनंतर कळल्यावर त्याच्या मनात होणारी आंदोलनं होती. ‘फार फ्रॉम अस’ चित्रपटात मुलाला सोडून गेलेली एक आई कुटुंबात परतल्यावर घडणाऱ्या घटनांचं चित्रण बघायला मिळालं, तर ‘इन्स्टिंक्ट’ या चित्रपटात एक मनोविश्लेषक आणि लैंगिक अत्याचारांचा आजार असलेला तिचा रुग्ण यांच्यातलं द्वंद्व होतं. ‘फ्लेश आऊट’ या चित्रपटात लग्नाच्या आधी किमान वीस किलो वजन वाढण्यासाठीच्या रोज किमान सहा वेळा जेवणं, रात्री उठून जेवणं यांसारख्या प्रथेला वेरिदा ही तरुणी कशी सामोरी जाते याची कथा बघायला मिळाली. ‘स्टिल ह्यूमन’ चित्रपटात एका एकाकी, दिव्यांग ज्येष्ठाच्या आयुष्यात एक मदतनीस कसे रंग भरतो आणि तो त्याची किती छान पद्धतीनं परतफेड करतो याची सकारात्मक गोष्ट होती.

यंदा ‘इफ्फी’मधला एकेक चित्रपट बघणं म्हणजे बुद्धीला अक्षरशः खुराक होता. कारण, अनेक चित्रपटांत दिग्दर्शक कथेतले काही धागे मुद्दाम सोडून ठेवत होते. काही वेळा नॉन-लिनिअर पद्धतीचं कथन होतं. बहुतांश चित्रपटांमधले शेवट धूसर होते आणि अनेक शक्यता तुमच्या मनात तयार करणारे होते. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार, कुवतीनुसार आणि आकलनानुसार गाळलेल्या जागा भरा आणि चित्रकृतीचा आनंद घ्या, अशा प्रकारचं आव्हानच लेखक-दिग्दर्शकांनी दिलं होतं. इथं नेहमीची ‘२१ अपेक्षित’ प्रकारची उत्तरं नव्हती. अनेकांनी आभासांचा खेळ चित्रपटात मांडला. ‘अ व्हाइट व्हाइट डे’, ‘द फोर्थ वॉल’ अशा चित्रपटांमध्ये आत्ता जे दिसतंय ते त्या व्यक्तिरेखेच्या मनात घडतंय की प्रत्यक्षात याचा अंदाज बांधणं कठीण होतं. ‘इन्स्टिंक्ट’ हा चित्रपट तर मानसिक द्वंद्वाचाच होता. अनेक जण नेहमीचे चित्रपट फक्त कथेसाठी बघतात. त्यामुळं पुढं काय झालं, अमुक कुठं गेला वगैरे प्रश्न पडतात. महोत्सवातल्या अनेक चित्रपटांत चित्रकर्मींनी हा ठाशीव साचा मोडीत काढला होता. उलट, प्रेक्षकांना क्षणोक्षणी कोडी घालायची आणि प्रेक्षकांनी ती कोडी मनातल्या मनात सोडवत त्या व्यक्तिरेखांच्या अंतरंगात शिरायचं असा हा खेळ होता आणि तो अर्थातच कमालीचा आनंददायी होता. काहींनी प्रतीकांचा वापर फार उत्तम पद्धतीनं करून घेतला होता. ‘डिस्पाइट द फॉग’ या चित्रपटाची सुरवात आणि शेवट धुक्यातच होणं, ‘हेड बर्स्ट’मध्ये नायकानं काळे शर्ट घालणं आणि शेवटी त्याच्या अंगात पांढरा शर्ट असणं, ‘सन-मदर’ चित्रपटात एका गोष्टीतून छोट्या मुलाला वर्तमानाचं आकलन होणं, ‘डॅनिएल’मध्ये एका उद्योगपतीशी बोलणी करताना नायकाच्या आईनं कॉफीचं किरकोळ बिल देणं अशा छोट्या छोट्या गोष्टींमागं प्रचंड विचार असल्याचं जाणवत होतं. कुठं तळ्यातल्या तरंगांचा वापर, कुठं एखादं घर बाहेरून वारंवार दाखवत त्याची कुठं तरी सांगड घालणं, कुठं रंगांचा खेळ, अशा सगळ्या गोष्टींतून उलगडणारी चित्रभाषा जाणून घेण्याची मजा होती.

‘इफ्फी’त बाहेर चकचकाट असतो, म्युरल्सपासून इन्स्टॉलेशन्सपर्यंतच्या कलांची प्रदर्शनं असतात, सेलिब्रिटींच्या सहभागामुळं उजळणारं रेड कार्पेट असतं; पण खरा चित्ररसिक त्यांच्यात रमत नाही. त्याला भेटायचं असतं ते चित्रपटांतल्या माणसांना. पडद्याच्या मागं ही सगळी माणसं कोंबून बसवलेली असतात. अंधार होतो आणि मग ही माणसं बाहेर येतात. तुर्कस्तानमधली असली येते, डेन्मार्कमधला डॅनिएल येतो, फ्रान्समधली फैबिएन येते, बल्गेरियामधला वासिल येतो, कझाकिस्तानमधला बलुआन शोलॉक येतो. त्यांची परंपरा, संस्कृती घेऊन ही माणसं येतातच; पण त्याचबरोबर स्वतःची नाती, आनंद, व्यथा यांचंही ‘बॅगेज’ बरोबर घेऊन येतात. ती तुम्हाला त्यांच्या गोष्टी सांगायला लागतात. या गोष्टींतून ही माणसं त्यांचे हृदयबंध उलगडतात आणि तुमच्याशीही हृदयबंध जोडतात. चित्रपट संपतो तेव्हा ही माणसं पुन्हा पडद्याच्या आड जातात, हरवून जातात...पण बाहेर पडल्यावर जाणवतं, की ही माणसं पडद्याआड गेली तरी त्यांची ‘चित्ररूपं’ मात्र तुमच्या मनातच ठेवून गेली आहेत. ही चित्ररूपं आयुष्यभर तुमच्या हृदयाच्या जवळ राहतात...‘हृदयबंध’ यालाच म्हणतात, नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com