गोष्ट एका ‘नेटका’ची (मंदार कुलकर्णी) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mandar kulkarni

‘मोगरा’ नावाचं नाटक नव्हे, ‘नेटक’ नुकतंच सादर झालं. ते चक्क सादर झालं लाइव्ह. डिजिटल माध्यमातून. बरं, ते सादर करणाऱ्या अभिनेत्रीही एका ठिकाणी नव्हे, तरएका शहरातसुद्धा नव्हत्या. कुणी मुंबईतून, कुणी पुण्यातून, कुणी औरंगाबादमधून त्यात सहभागी होत होती आणि असं असूनसुद्धा अतिशय सुविहितपणे हा प्रयोग होत होता.

गोष्ट एका ‘नेटका’ची (मंदार कुलकर्णी)

‘मोगरा’ नावाचं नाटक नव्हे, ‘नेटक’ नुकतंच सादर झालं. ते चक्क सादर झालं लाइव्ह. डिजिटल माध्यमातून. बरं, ते सादर करणाऱ्या अभिनेत्रीही एका ठिकाणी नव्हे, तरएका शहरातसुद्धा नव्हत्या. कुणी मुंबईतून, कुणी पुण्यातून, कुणी औरंगाबादमधून त्यात सहभागी होत होती आणि असं असूनसुद्धा अतिशय सुविहितपणे हा प्रयोग होत होता. अशा प्रकारे नेटवर नाटक सादर करण्याचा प्रयोग पहिल्यांदाच झाला असेल. या आगळ्यावेगळ्या नेटकाविषयी.

बारा जुलै हा दिवस मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नसला, तरी डिजिटल अक्षरांत तरी नक्कीच लिहिला जाईल. या दिवशी एकीकडे राजस्थानात राजकीय नाट्यमय घडामोडी घडत असताना, दुसरीकडे एक वेगळंच नाटक घडत होतं. चार महिन्यांपासून नाट्यगृहं बंद असली, तरी या दिवशी ‘मोगरा’ नावाचं नाटक सादर होत होतं. हे नाटक सादर होत होतं झूम प्लॅटफॉर्मवर. नाटकांचं लाइव्ह ब्रॉडकास्ट करण्याचे प्रयोग लॉकडाऊनच्या काळात काही जणांनी नक्की सादर केले असले, तरी ती नाटकं आधी रेकॉर्ड आणि शूट केलेली होती आणि फक्त ब्रॉडकास्ट लाइव्ह होतं. ‘मोगरा’ हे नाटक मात्र वेगळं होतं, एकमेवाद्वितीय होतं. हे चक्क सादर होत होतं लाइव्ह. बरं, ते सादर करणाऱ्या अभिनेत्रीही एका ठिकाणी नव्हे, तर एका शहरातसुद्धा नव्हत्या. कुणी मुंबईत, कुणी पुण्यात, तर कुणी औरंगाबादमध्ये. दिग्दर्शक वेगळ्या ठिकाणी, पार्श्वसंगीतकार वेगळ्या ठिकाणी, तंत्रज्ञ आणखी वेगळ्या ठिकाणी. असं असूनसुद्धा अतिशय सुविहितपणे हा प्रयोग होत होता. मराठीतच काय, भारतात किंवा जगातसुद्धा अशा प्रकारे नेटवर नाटक सादर करण्याचा प्रयोग पहिल्यांदाच झाला असेल. म्हणूनच हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा होता. त्याचं नावही वेगळं. नेटक!! नेटवर सादर होणारं नाटक म्हणून ‘नेटक.’

‘बारा जुलैपासून तुमच्या आवडत्या नाट्यगृहात’ अशी जाहिरात सोशल मीडियावर वाचली, तेव्हाच उत्सुकता वाढली होती. यथावकाश ‘तुमचं आवडतं नाट्यगृह’ म्हणजे ‘तुमचं घर’ हे स्पष्ट झालं; पण प्रेक्षकही घरात आणि कलाकारही घरात ही कल्पना मात्र विलक्षणच होती. खरं तर झूम, गुगल मीट वगैरे गोष्टींमुळे ठिकठिकाणांहून कलाकारांनी मैफल, अभिवाचन सादर करणं वगैरे प्रयोग झाले आहेत, यात काही वाद नाहीत; पण या माध्यमाचा अतिशय ताकदीनं वापर मात्र फार कुणी केलेला नाही. ‘मोगरा’नं मात्र तंत्रज्ञानाचा अतिशय समर्पक वापर केलाच; पण अतिशय इंटेन्स असा अनुभवही दिला. सव्वादोन तासांपेक्षा जास्त कालावधी असलेला हा प्रयोग नाट्यप्रेमींना विलक्षण समाधान देऊन गेला.

हृषिकेश जोशी याच्या कल्पनेतून साकार झालेलं हे ‘नेटक’ दिग्दर्शितही त्यानं केलं होतं. तेजस रानडे यानं लिहिलेली ही संहिता. वंदना गुप्ते, भार्गवी चिरमुले, स्पृहा जोशी, मयूरा रानडे आणि गौरी देशपांडे या पाच कलाकारांनी मोगऱ्याचा गंध पोचवला. हे नाटक कशा प्रकारचं आहे, हे सांगितलं, तर त्याच्याबद्दलची उत्सुकता कमी होईल; पण वेगवेगळ्या काळातल्या, वेगवेगळ्या स्तरावरच्या महिला स्वतःचं स्वातंत्र्य कशा प्रकारे मिळवतात, मोकळा श्वास कसा घेतात याची ही कहाणी आहे. सुरुवातीच्या क्षणापासून ही कहाणी तुमचा ताबा घेत जाते आणि या पाच जणी थेट तुमच्या घरात येऊन कथन करतायत असं वाटायला लागतं. ‘काजव्यांचा गाव’सारखे समीपनाट्याचे काही प्रयोग रंगभूमीवर झाले आहेत. ‘मोगरा’ हे नेटकही त्या अर्थानं प्रेक्षकांच्या समीप आलेलं नाट्यच आहे. फक्त ते डिजिटली तुमच्या समीप येतं इतकंच. ते तुम्हाला त्यात गुंतवून ठेवतं, विचार करायला भाग पाडतं आणि वेगवेगळ्या स्तरांची ओळखही करून देतं. ‘मोगरा’ हे त्याचं नाव का आहे आणि त्याचा धागा लेखकानं कशा प्रकारे वेगवेगळ्या कहाण्यांमध्ये गुंफला आहे तेही प्रत्यक्षच बघण्यातच जास्त मजा आहे.

तेजस रानडे यांची संहिता उत्तम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणवाटेपर्यंत जाणाऱ्या स्वानंदीपासून ते वयाच्या उत्तरायणात शिक्षणवाट स्वीकारणाऱ्या महिलेपर्यंतच्या कहाण्या त्यात उलगडतात. लैंगिकता, आत्मसन्मान, कुटुंबपाश अशा वेगवेगळ्या स्तरांवर एकेक जणी स्वतंत्र होतात. त्यांच्या कहाण्या कधी हलवून टाकतात, कधी हेलावून टाकतात, तर कधी हादरवूनही टाकतात. ही संहिता नेटक या माध्यमाला अतिशय साजेशी आहे. कदाचित प्रत्यक्ष रंगभूमीवर ती तितकी परिणामकारक ठरली असती का हे माहीत नाही; पण या ‘नेटका’त मात्र ती विलक्षण प्रभावी ठरते. कलाकारांची अतिशय समर्पक निवड, त्यांनी तन्मयतेनं केलेलं सादरीकरण, दिग्दर्शकानं रंगांच्या वापरापासून कलाकारांच्या हालचालींपर्यंत घेतलेल्या खास जागा, संहितेची वेगळ्या प्रकारे केलेली बांधणी यामुळे हे नेटक थेट तुमच्या हृदयापर्यंत पोचतं.

सोशल मीडियाचा, तंत्रज्ञानाचा वापर करून काही प्रयोग होत असले, तरी अनेक संगीतकर्मी, रंगकर्मी, चित्रकर्मी यांच्यासाठी हे माध्यम सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून अजूनही नवीनच आहे. अनेक जण चाचपडताना दिसत आहेत. फेसबुक लाइव्ह करणं, किंवा नाटकाचं अभिवाचन करणं यापलीकडे फार प्रयोग होताना दिसत नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर या माध्यमाचा पुरेपूर ताकदीनं वापर कशा प्रकारे करता येईल, असा विचार हृषिकेश जोशी करत होता. त्यातून त्याला एक कल्पना सुचली, त्यानं तंत्रज्ञानाशी संबंधित काही जणांशी चर्चा केली. संपूर्ण नाटक अशा प्रकारे सादर करता येईल, याची पुरेशी खात्री झाल्यावर मग त्यानं सर्जनात्मक गोष्टींवर काम सुरू केलं. ‘मोगरा’ ही संहिता नेटक या संकल्पनेत नेमकी फिट झाली आणि त्यानंतर सुरू झाल्या रिहर्सल्स. ‘मोगरा’ हे केवळ अभिवाचन नाही. ते नाटकच आहे- सगळ्या कसोट्यांवर उतरणारं खणखणीत नाटक. त्यामुळे संहितेच्या पाठांतरापासून कलाकारांच्या हालचालींपर्यंत अनेक गोष्टींवर अतिशय मेहनत घेण्यात आली. आपण काही तरी वेगळं करतो आहोत, याची जाणीव आणि उत्सुकता कलाकारांनाही होतीच. फक्त सर्जनात्मक गोष्टीच नव्हे, तर कॅमेऱ्यांच्या अँगलपासून नेट स्पीडपर्यंत अनेक गोष्टी या प्रयोगात महत्त्वाच्या होत्या. त्या सगळ्यांबाबत अनेक चाचण्या करण्यात आल्या, बदल करण्यात आले आणि त्यातून मग ‘मोगरा’ आकार घेत गेला. अजित परब यांचं पार्श्वसंगीतही उल्लेखनीय.

वंदना गुप्ते, भार्गवी चिरमुले, स्पृहा जोशी, मयूरा रानडे आणि गौरी देशपांडे या पाचही जणींनी अतिशय झोकून देऊन आपल्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येकीला अभिनयसामर्थ्य दाखवण्याची पुरेपूर संधी मिळाली आहे आणि त्यांनी त्याचं सोनं केलं आहे. या पाचही अभिनेत्रींना अभिनय करताना बघणं हा प्रेक्षकांसाठीही एक आनंदाचा भाग आहे. या प्रयोगात आणि संहितेत एक वेगळेपणही आहे. ते कळल्यावर तर या नेटकाचा आस्वाद आणखी घेता येतो. हे नेटक डिजिटल असलं, तरी प्रत्यक्ष रंगमंचावर असलेल्या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. पडद्यापासून पार्श्वसंगीतापर्यंत आणि प्रकाशयोजनेपासून रंगभूषेपर्यंत. या सगळ्या गोष्टींचा वापर कसा केलाय हे मात्र प्रत्यक्षच बघणं उचित ठरेल.

‘मोगरा’ हे नेटक हा मराठी रंगभूमीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. मराठी रंगुभूमीनं ‘वाडा चिरेबंदी’सारखी त्रिनाट्यधारा बघितली आहे, ‘कोडमंत्र’, ‘हॅम्लेट’सारखे भव्य प्रयोग बघितले आहेत, ‘बिंब-प्रतिबिंब’सारखा एका कलाकाराचा स्वतःच्याच डिजिटल प्रतिमेशी संवादाचा प्रयोग बघितला आहे, ‘काजव्यांचा गाव’सारखा प्रेक्षकांच्या अगदी जवळ जाणारा, त्यांच्या अवतीभोवती घडणारा समीपनाट्याचा प्रयोग बघितला आहे. नाटक रंगभूमीवर सादर होण्यालाही ‘प्रयोग’ म्हणतात, ते उगाच नव्हे. या सगळ्या प्रयोगांच्याच ‘लीग’मधला हा नेटकाचा प्रयोग आहे. एकीकडे हे नेटक आशयासाठी आणि सादरीकरणासाठी जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्यानं किती तरी शक्यताही रंगकर्मींसाठी उपलब्ध करून दिल्यानं त्यासाठीही महत्त्वाचं आहे. नाटक डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेणं म्हणजे केवळ ते शूट करून युट्यूबवर टाकणं एवढंच नव्हे, तर ते अशा प्रकारे लाइव्ह सादरही करता येऊ शकतं हे मोगरानं दाखवून दिलं आहे. रंगमंचावर न जाता आणि तरीही नाटकाचा अनुभव कुठंही न उणावू देता असे किती तरी प्रयोग होऊ शकतात. लेखकांपासून तंत्रकर्मींपर्यंत आणि दिग्दर्शकांपासून रंगकर्मींपर्यंत सगळ्यांच्याच पुढ्यात त्यानं एक डिजिटल अवकाश आणून ठेवला आहे. सर्जनशील रंगकर्मी किती तरी प्रकारे आपल्या कल्पना आता प्रत्यक्षात आणू शकतील. कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष रंगमंचावर कधी सादरीकरण होईल माहीत नाही. त्यामुळे त्या काळात हे नेटक महत्त्वाचं आहेच; पण स्मार्ट टीव्हीपासून ‘ग्लास’पर्यंत अनेक गोष्टी अगदी सर्वसामान्यांच्या घरात येत असताना, सगळं नॉर्मल झाल्यानंतरच्या काळातसुद्धा अशा नेटकांची किती तरी रूपं प्रेक्षकांना भुरळ पाडत राहतील. स्थळ, काळ या सगळ्याच मर्यादा हा नेटक नावाचा प्रकार भेदून टाकेल आणि तरीही नाट्यगृहासारखाच अनुभव देत राहील, यात शंकाच नाही. ‘मोगरा’ या पहिल्यावहिल्या नेटकाच्या प्रयोगाला नाट्यप्रेमींनी नक्कीच प्रतिसाद द्यायला हवा. एका वेगळ्या नाट्यअनुभवाची नांदी ‘मोगरा’नं केली आहे, त्याचा दरवळ मात्र कायमस्वरूपी असणार आहे एवढं निश्चित!

Web Title: Saptarang Mandar Kulkarni Write Mogra Drama Digtal Article

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..