‘स्पायडी’ गुंत्यात! (मंदार कुलकर्णी)

मंदार कुलकर्णी mandar.kulkarni@esakal.com
रविवार, 8 सप्टेंबर 2019

डिस्नेची उपकंपनी असलेला मार्व्हल स्टुडिओज आणि सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट यांच्यातली बोलणी फिसकटली आहेत. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पडदा पडला आणि स्पायडरमॅन अखेर ‘मार्व्हल-सोनी’ यांच्या गुंत्यातून मोकळा झाला. खरं तर हे सगळं खूप अचानक घडलं आहे, त्यामुळं नक्की काय होणार हे कुणालाच माहीत नाही; पण थोडा व्यापक दृष्टीनं विचार केला तर असं दिसतं, की स्पायडीला आता खरी शक्ती मिळाली आहे, मिळणार आहे. पुढं काय होणार? ‘स्पायडी’चे चाहते सुखावतील की दुखावतील?...

डिस्नेची उपकंपनी असलेला मार्व्हल स्टुडिओज आणि सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट यांच्यातली बोलणी फिसकटली आहेत. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पडदा पडला आणि स्पायडरमॅन अखेर ‘मार्व्हल-सोनी’ यांच्या गुंत्यातून मोकळा झाला. खरं तर हे सगळं खूप अचानक घडलं आहे, त्यामुळं नक्की काय होणार हे कुणालाच माहीत नाही; पण थोडा व्यापक दृष्टीनं विचार केला तर असं दिसतं, की स्पायडीला आता खरी शक्ती मिळाली आहे, मिळणार आहे. पुढं काय होणार? ‘स्पायडी’चे चाहते सुखावतील की दुखावतील?...

‘फ्रेंडली नेबरहूड स्पायडरमॅन’ असणारा आणि आपल्या जाळ्याचा आणि बुद्धीचा वापर करून वाट्टेल त्या शत्रूला ताब्यात आणू शकणारा स्पायडरमॅन बिचारा आता मात्र स्वतःच अडकला आहे. तो आधी अडकला नव्हता असं नाही. कधी मैत्रीत झालेली चूक, कधी चुकीचा निर्णय, कधी आततायीपणा, तर कधी प्रेमातून झालेल्या चुका या सगळ्यामुळं तो बिचारा स्वतःच्याच जाळ्यात अडकला होताच. मात्र, या वेळी प्रकरण गंभीर आहे. एकीकडं महाशक्तिशाली ‘अॅव्हेंजर्स’च्या साथीमुळं या पोराचंही बळ वाढलेलं असताना आता मात्र हे पोरगं बिचारं अचानकच अनाथ झालं आहे. खलनायकांविरुद्धच्या युद्धात आता या स्पायडरमॅनचा ‘पोरखेळ’ दिसणार नाही. त्याला पुन्हा एकदा एकट्यानंच लढावं लागणार आहे. ‘स्पायडरमॅन होमकमिंग’मध्ये त्याला आयर्नमॅनची साथ होती. ‘फार फ्रॉम होम’मध्ये निक फ्युरी होता; पण आता मात्र त्याला एकटं लढण्यावाचून गत्यंतर नाही. ‘स्पायडी’चा सगळा गुंताच झालाय पार.
नेमकं झालंय तरी काय? होल्ड ऑन! झालंय ते गुंतागुंतीचं आहे. ते एकीकडं अॅव्हेंजर्सप्रेमी ‘स्पायडी’चाहत्यांना दुखावणारं आहे; पण ‘एकट्या’ स्पायडरमॅनच्या चाहत्यांच्या दुसऱ्या गटाला सुखावणारंही आहे. झालंय असं की डिस्नेची आता उपकंपनी असलेला मार्व्हल स्टुडिओज् आणि सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट यांच्यातली बोलणी फिसकटली आहेत. स्पायडरमॅनच्या पुढच्या चित्रपटांमधल्या नफ्यातल्या जास्त वाटा डिस्नेला पाहिजे होता. ते काही सोनीला मान्य झालं नाही. त्यामुळं अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पडदा पडला आणि स्पायडरमॅन अखेर मार्व्हल-सोनी यांच्या गुंत्यातून मोकळा झाला. त्यामुळं या दोन्ही कंपन्यांमध्ये समजा पुढं पुन्हा काही वेगळी बोलणी झाली नाहीत किंवा त्यांनी एकेक पाऊल मागं घेतलं आणि वेगळं काही डील केलं नाही तर गोष्टी बदलतील. सगळ्या सुपरहीरोंचं एक आभासी जग असलेल्या ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ म्हणजे एमसीयूमध्ये स्पायडरमॅन दिसणार नाही. म्हणजे थोडक्यात ‘अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’, ‘एंड गेम’, ‘आयर्न मॅन’ अशा चित्रपटांमध्ये अधूनमधून दिसणाऱ्या स्पायडीच्या करामती आता दिसणार नाहीतच आणि खुद्द स्पायडीच्या चित्रपटांमध्येही ॲव्हेंजर्सची लुडबूड आता दिसणार नाही.

हे सगळं समजून घेण्यापूर्वी हा सगळा गुंता कसा झाला हे समजून घ्यायला हवं. खरं तर ज्या सुपरहीरोंसाठी त्यांचे चाहते जीव टाकतात, सगळं आयुष्य अक्षरशः समर्पित करतात, त्यांच्या मागचं कॉर्पोरेट-युद्ध कसं असतं आणि ‘भावनांचीही बाजारपेठ’ कशी चालते हेही समजून घ्यायला हवं. स्पायडरमॅन हे मार्व्हल कॉमिक्सचं एक पात्र. आयर्न मॅन, थॉर, कॅप्टन अमेरिका, हल्क वगैरे पात्रांसारखंच. या पात्रांची लोकप्रियता वाढली आणि त्यांचा टीव्हीपासून चित्रपटांपर्यंत सगळीकडंच विस्तार वाढला. नव्वदच्या दशकात ‘कॉमिक बुक बबल’ फुटला आणि मार्व्हल कंपनी संकटात सापडली. त्यातून अनेक कॉर्पोरेट घडामोडी घडल्या. स्पायडरमॅनचे हक्क सोनी एंटरटेन्मेंटला विकणं हा त्यातलाच एक भाग.

स्पायडरमॅन सोनीकडं आला आणि मग सोनीनं टॉबी मग्वायरची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्पायडरमॅन’ चित्रपटांची निर्मिती केली. खरं तर भारतासारख्या देशात त्याआधीही सुपरहीरोंचे चित्रपट प्रदर्शित होत होते; पण ज्यानं व्यापक व्यवसाय केला, व्यापक चाहतावर्ग मिळवला आणि ‘सुपरहीरो’ नावाची गोष्ट अगदी गावखेड्यापर्यंत नेऊन पोचवली ती या टॉबी मग्वायरच्या स्पायडीनं. खरं तर हा स्पायडी उत्तम होता. त्यानं रंजनाचं एक विश्व शहरी भागांपासून ग्रामीण भागापर्यंत विस्तारलंच; पण नेहमीच्या जगण्यापासून थोडं लांब नेणारे हे सुपरहीरो प्रेरणेचे विलक्षण स्रोतही होऊ शकतात हेही दाखवून दिलं. ‘विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी’ या वाक्यानं एका संपूर्ण पिढीला हादरवून टाकलं हे इथं सांगायला हवं. या स्पायडरमॅननं अनेकांचा अक्षरशः दृष्टिकोन बदलला. हॉलिवूडच्या चित्रपटांकडं ते वळायला लागले, वेगळं काही पडद्यावर बघायला लागले. ‘ज्युरॅसिक पार्क’नं हॉलिवूडपटांचं एक जग भारतात अगदी खोलपर्यंत रुजवलं, तसं या ‘स्पायडरमॅन’नं सुपरहीरोंचं जग रुजवलं. त्यानं एक वेगळा इतिहास निर्माण केलाच; पण तळागाळापर्यंतच्या प्रेक्षकांपर्यंत सुपरहीरोची गंमत पोचवली. मला स्वतःला विचाराल तर मला आवडतो तो हा टॉबीचा स्पायडी. लहान, गोंधळलेला, प्रेमात पडू इच्छिणारा, भाबडा; पण त्याच वेळी प्रचंड ऊर्जा स्वतःत भरून असलेला आणि त्याच वेळी स्वतःच्या शक्तीची जाणीव झाल्यावर प्रगल्भताही दाखवणारा.

सोनीची निर्मिती असलेल्या या टॉबीच्या पहिल्या चित्रपटानंतर दुसरा चित्रपटही असाच अफाट चालला. तिसऱ्या चित्रपटाच्या वेळी मात्र माशी शिंकली. या वेळी पुन्हा कॉर्पोरेट-संस्कृती एखाद्या गोष्टीचा खूप काथ्याकूट करून त्या गोष्टीची वाट कशी लावू शकते हेही जाणवलं. तिसऱ्या चित्रपटात एकाबरोबर दोन व्हिलन आले. स्पायडी, त्याचा मित्र, त्याची मैत्रीण यांच्यातली खूप गुंतागुंत आली. हे किती तरी धागे इतके एकमेकांत विणले-गुंफले गेले की त्याच्या गुंत्यात स्पायडी पुरता फसला. या चित्रपटाला तुलनेनं कमी यश मिळालं ते या चित्रपटासाठी करण्यात आलेल्या या सगळ्या गुंत्यामुळं. गंमत म्हणजे या तिसऱ्या चित्रपटानं तुलनेनं कमी व्यवसाय केल्यानंतर सोनीनं शक्कल लढवली ती ‘रिबूट’ची. हे ‘रिबूट’ प्रकरण म्हणजेसुद्धा पुन्हा भाबड्या प्रेक्षकांच्या भावनांशी कशा प्रकारे खेळलं जातं त्याचाच नमुना होतं. त्यांनी मग टॉबीला निरोप दिला. त्याच्या जागी अँड्र्यू गारफील्डला आणलं आणि पहिल्या स्पायडीचीच कथा वेगळ्या प्रकारे सादर करण्यात आली. ‘जुन्या बाटलीत नवीन दारू’ म्हणतात तशातला प्रकार. भाबड्या प्रेक्षकांना मात्र हा कॉर्पोरेट चाणाक्षपणा कळला नाही. त्यांनी अँड्र्यूच्या स्पायडीलाही दाद दिली. हा अँड्र्यू असलेल्या दुसऱ्या चित्रपटाच्या वेळी मात्र पुन्हा घोळ झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या बाबतीत पुन्हा निरुत्साह दाखवला आणि इथं सुरू झालं आणखी एक कॉर्पोरेट-नाट्य.

एके काळी झळाळी कमी झालेला मार्व्हल स्टुडिओज आता भरात आला होता आणि सोनीचा स्पायडी मात्र अडखळायला लागला होता. मग दोघांनीही ‘भावनांची बाजारपेठ’ ओळखली. सोनी आणि मार्व्हल यांच्यात एक ‘युती’ झाली आणि स्पायडी इतर अॅव्हेंजर्सबरोबर झळकणार असं ठरलं. त्यात मग नफ्याची वगैरेही व्यवस्थित वाटणी झाली. इतर अॅव्हेंजर्सचा स्पायडी झळकला, तर यांना इतके पैसे किंवा स्पायडीच्या चित्रपटांत दुसरा कुठला सुपरहीरो आला तर त्याला अमुक पैसे वगैरे सगळं ठरलं. त्यातून मग आयर्नमॅन आणि पीटर पार्कर यांच्यातलं
वडील-मुलगासदृश नातं तयार करण्यात आलं, स्पायडीच्या मूळ शक्तींपेक्षा त्याला मिळालेलं तंत्रज्ञान वरचढ चढलं, इतर काही संदर्भही पुन्हा बदलले. स्पायडीचं जगच बदलणार असल्यामुळं पुन्हा अँड्र्यूची गच्छंती झाली आणि टॉम हॉलंड आला. त्याच वेळी हा स्पायडी आणखी पोरगेला झाला. म्हणजे टॉबी मग्वायरचा स्पायडरमॅन हळूहळू प्रगल्भ होत होता, तोच टॉमच्या रूपात मात्र तुलनेनं पोरकटच बनत गेला. गंमत म्हणजे आता या स्पायडीबरोबर इतर अॅव्हेंजर्सही असल्यामुळं त्याच्यातली शक्तीही तुलनेनं कमी झाली. म्हणजे ती त्याची एकट्याची राहिली नाही. ती ‘सामूहिक शक्ती’ झाली. स्पायडी पूर्वी एकटा सगळ्या अचाट व्हिलनशी सामना करू शकायचा. त्यात अपयश यायचं, चुका व्हायच्या; पण तो पुन्हा उठायचा आणि लढायचा. त्याच्या या पडण्याशी, लढण्याशी, रडण्याशी आणि चिडण्याशीसुद्धा प्रेक्षक रिलेट करायचे. या स्पायडीत ते स्वतःला बघायचे. मात्र, नवा ‘अॅव्हेंजर्स टीम’मधला स्पायडी हा तसा नव्हता. तो त्या टीमचा ‘जस्ट’ एक हिस्सा होता. त्याला सांभाळायला आता इतर बरीच मंडळी आली, ती त्याला सल्ले द्यायला लागली, त्याच्याकडून काम करून घ्यायला लागली. स्पायडी म्हणजे नुसता इतरांच्या इशाऱ्यांवर काम करणारा एक प्रकारचा ‘कर्मचारी’च ठरला आणि स्पायडीच्या चित्रपटांमधला ‘सोल’च हरवला.
टॉम हॉलंडचा नवा स्पायडरमॅन खरं तर अॅव्हेंजर्सच्या इतर चित्रपटांतही होताच; पण तो ‘वन ऑफ द सुपरहीरोज्’ आणि दुसरं म्हणजे तो ‘जस्ट’ त्यांच्यातला एक मसाला होता. एखाददुसरं अॅक्शन-दृश्य, काही चटपटीत वाक्यं आणि आत्मविश्वासाचा अभाव असलेली व्यक्तिरेखा म्हणूनच तो प्रोजेक्ट झाला बऱ्याचदा. हे थोडं अवघड होतं मान्य करण्यासाठी. मार्व्हल-सोनी यांच्यातल्या ‘युती’तून स्पाडरमॅनचे जे दोन चित्रपट आले : ‘स्पायडरमॅन- होमकमिंग’ आणि ‘स्पायडरमॅन-फार फ्रॉम होम.’ या दोन्ही चित्रपटांमध्ये एक जाणवलं, की हे काही नेहमीच्या स्पायडरमॅनचे चित्रपट नाहीत. हे चित्रपट म्हणजे अॅव्हेंजर्सच्या साखळीचा नुसता ‘एक हिस्सा’ आहेत. मार्व्हलनं त्यांच्या चित्रपटांचा एक साचा केला आहे. त्या साच्यात स्पायडीलाही बसवण्यात आलं. पहिल्या चित्रपटात त्याची काळजी घ्यायला आयर्न मॅन होता, दुसऱ्या चित्रपटात निक फ्युरी होता. त्यामुळं स्पायडरमॅनला ‘स्व-विकास’ करण्याची तशी काही गरज नव्हती. खूप काळजी घेणारे आई-वडील असल्यावरचं मुलांचं वागणं आणि स्वतःच्या बळावर काही करू बघणाऱ्या मुलांचं वागणं यांत जे जमीन-अस्मानाचं अंतर असतं तेच इथं जाणवलं. अॅव्हेंजर्सचा प्रचंड प्रभाव असलेल्या नवप्रेक्षकांना हे नवे ‘स्पायडरमॅन चित्रपट’ आवडले; पण स्पायडीचे ‘हार्डकोअर’ चाहते असलेल्या एका पिढीच्या हृदयाची तार हे नवे चित्रपट काही छेडू शकले नाहीत. अॅव्हेंजर्स हे खरं तर जगाला वाचवतात नेहमी; पण इथं मात्र ‘स्पायडीला अॅव्हेंजर्सपासून वाचवा’ असा धावाच हे चाहते मनोमन करायला लागले.

...या चाहत्यांची प्रार्थना बहुतेक ऐकली गेली म्हणा- किंवा कॉर्पोरेट-हाव किती थराला जाऊ शकते हे दाखवायचं होतं म्हणा. अॅव्हेंजर्सच्या माध्यमातून जग जिंकलेल्या मार्व्हलचाही लोभ वाढला आणि सोनीकडं स्पायडरमॅन हे चलनी नाणं असल्यामुळं त्यांनीही चर्चेवरची स्वतःची पकड सोडली नाही. त्यामुळं झालं असं की युती तुटली. आता स्पायडरमॅन पुन्हा एकटा झाला, सुटा झाला. पुढच्या काळात हा स्पायडी ‘एमसीयू’चा भाग असणार नाही. त्यामुळं कदाचित उलट तो जरा प्रगल्भ होईल, स्वतः वाटा शोधेल, स्वतःतली शक्ती वाढवेल, पडेल-धडपडेल; पण पुन्हा उभा राहील. एक बरं आहे, की टॉम हॉलंडनं स्पायडरमॅन चितारण्याचा करार सन २०२१पर्यंत असल्यामुळं तो अचानक बदलला जाणार नाही. मात्र, स्पायडीची कथा वेगळ्या प्रकारे नक्की मांडली जाईल आणि स्पायडरमॅनच्या ‘हार्डकोअर’ चाहत्यांना ही नवी कहाणी कदाचित जास्त सुखावेल. खरं तर हे सगळं खूप अचानक घडलं आहे, त्यामुळं नक्की काय होणार हे कुणालाच माहीत नाही; पण थोडा व्यापक दृष्टीनं विचार केला तर असं दिसतं, की स्पायडीला आता खरी शक्ती मिळाली आहे, मिळणार आहे. ‘विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी’ असं तो म्हणतोच. आता त्याला एकटेपणानं लढण्याची ‘पॉवर’ मिळाली आहे...तो तिचा ‘रिस्पॉन्सिबिलिटी’नं वापर करेल हे नक्कीच. स्पायडी गुंत्यात अडकला नाही, उलट तो गुंत्यातून मुक्त झाला आहे! आता तो भरारी घेईल. त्याचं जाळं फेकेल आणि अजस्र, अफाट, आक्राळविक्राळ व्हिलनना नेस्तनाबूत करेल....अशा प्रकारच्या स्वबळावर लढणाऱ्या स्पायडीच्या जाळ्यात गुरफटून जायला आपल्याला नक्की आवडेल हे मात्र नक्की.... शेवटी, चाहत्यांचीही काही ‘पॉवर’ असतेच की!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang mandar kulkarni write spider man article