पु.ल.- सुनीताबाई आणि आयुका (मंगला नारळीकर)

pu-la-deshpande
pu-la-deshpande

ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन येत्या आठ नोव्हेंबरला आहे. पु. ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई या दोघांनी विविध संस्थांना प्रचंड मदत केली. डोळसपणानं हे दोघे ही मदत करत असत. राज्यातल्या अनेक संस्थांशी तसेच शास्त्रज्ञांशी त्यांचा स्नेहबंध होता. वैज्ञानिक जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांच्याशी त्यांचे कौटुबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांचे काम आवडल्यानं देशपांडे दंपतीनं आयुकाला मोठी देणगी दिली. त्याबद्दल आणि त्या दोघांच्या मायेच्या ओलाव्याबद्दल अंतरीचे बोल....

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुल यांचे आणि आमचे तसे जुने संबंध. अगदी पूर्वी, सुनीताबाई आणि ते इंग्लंडला गेले होते, त्या वेळी त्यांची जयंतशी गाठ पडली होती, कुमार चित्रे या त्याच्या मित्राबरोबर जयंतनं त्यांना केम्ब्रिज हिंडून दाखवले होते, तो फार जुना किस्सा झाला. नंतर आम्ही मुंबईत नेव्हीनगर मध्ये ‘टी आय एफ आर’ च्या कॉलनीमध्ये राहत होतो, त्यावेळी प्रथम मराठी नाटकं आणि संगीताचे कार्यक्रम पहायला गिरगाव किंवा दादर भागात जावे लागे. रात्री परत येताना टॅक्सी मिळायला त्रास होई, एवढ्या लांब जाऊन तिकिटं काढणं हे देखील जिकिरीचं असे. `एन सी पी ए ’ चे सेंटर नरीमन पॉइन्ट ला तयार झाले आणि तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा पुल सांभाळू लागले, त्यामुळे आम्हाला तिथे दर्जेदार मराठी नाटके आणि संगीत कार्यक्रम पहायला मिळू लागले. त्यावेळी कधी कधी कार्यक्रमानंतर त्यांच्या तिथल्या ऑफिसमध्ये पुलंना भेटल्याचे आठवते. १९८९ साली आम्ही पुण्यात रहायला आलो कारण तिथे आयुका ची निर्मिती चालू झाली होती. एकदोनदा त्यांच्या आमंत्रणावरून पुल आणि सुनीताबाई यांना भेटायला आम्ही दोघे रूपाली मध्ये गेलो होतो. 

 १९९१ साली आम्ही आयुकाच्या संचालकासाठी बांधलेल्या घरात राहण्यास आलो. अजून आयुकाची मुख्य बिल्डिंग पुरी व्हायची होती, तिला जरा वेळ लागणार होता, पण आयुकाचं काम जोरात सुरू झालं होतं. पुरेसे प्राध्यापक नेमले नव्हते, पण संस्थेच्या इमारतीपेक्षा राहण्याची घरे लवकर बांधून होतात म्हणून भविष्यकाळात येणाऱ्या प्रोफेसरांच्या साठी घरे लवकर बांधून घेतली आणि त्या घरांतूनच आयुकाची कामे चालू झाली. एका घरात लायब्ररी, एकात कॅन्टीन, एक किंवा दोन घरांत विद्यार्थी होस्टेल, अशी तात्पुरती रचना झाली. एकूण अतिशय उत्साहानं भारलेले दिवस होते ते. सगळे लोक अगदी उत्साहानं, आपल्याला काही तरी सुरेख, विधायक रचना करायची आहे, अशा विश्वासानं काम करत होते. त्या काळात पुल आणि सुनीताबाई आयुकाला भेट देण्यास आले. आम्हाला अर्थात आनंद झाला. जयंतनं ज्या उत्साहानं त्यांना पूर्वी केम्ब्रिज हिंडून दाखवले होते, त्याच उत्साहानं आयुकाची माहिती दिली. आमच्या घरी, मागची बाग आणि तिथली हिरवळ पहात आमचे चहापान झाले. ते १९९२ किंवा १९९३ चा कालखंड असावा, नंतर काही वेळा आम्ही दोघे पुल आणि सुनीताबाई यांना भेटायला, बहुतेक वेळा त्यांच्या आमंत्रणावरून, आधी रूपालीमध्ये आणि नंतर मालतीमाधवमध्ये जात होतो. लहान किंवा तरुण मुलांनी काही चांगलं काम केलं की ज्या उत्साहाने ते आपलं काम ज्येष्ठांना दाखवतात, त्याच उत्साहाने आम्ही आयुकाची माहिती देत असू. ते दोघेही आपुलकीने विचारत.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही दिवसांनी, बहुधा १९९९-२००० मध्ये आम्ही त्यांच्या घरी गेलो असता, सुनीताबाईनी एक आश्चर्याचा आणि आनंद देणारा त्यांचा निर्णय सांगितला. त्या म्हणाल्या, की त्यांचा रूपाली मधला फ्लॅट ते दोघे आयुकाला देणगी म्हणून देऊ  इच्छित आहेत. आम्हाला अर्थात आनंद झाला. जयंतने लगेच या देणगीचा कसा उपयोग करता येईल, याचा विचार केला. आयुकाच्या स्थापनेच्या वेळी आयुकाची खगोलशास्त्राशी संबंधित अशी आठ कर्तव्ये ठरवली गेली होती. खगोलशास्त्रातील संशोधन, पी एच डी साठी विद्यार्थ्याना मार्गदर्शन, विविध युनिव्हर्सिटींमधील खगोलशास्त्रात काम करू इच्छिणाऱ्या शिक्षकान्ना मदत व मार्गदर्शन, जवळ असलेल्या जी एम आर टी ची दुर्बीण चालवणाऱ्या संस्थेशी सहकार्य, खगोलशास्त्राच्या  अभ्यासासाठी कार्यशाळा भरवणे, विविध दुर्बिणीन्च्यावर काम करण्यासाठी वेळ मिळवून देणे, दुर्बिणी व इतर यंत्रांची देखभाल व कम्प्युटरवर आवश्यकतेप्रमाणे प्रोग्राम तयार करणे, समाजामध्ये विज्ञानप्रसार करणे अशी ती कर्तव्ये होती. शालेय विद्यार्थ्यांच्या साठी खास असे काही त्यात नव्हते पण त्याची आवश्यकता दिसत होती. विज्ञानाचे शिक्षण अधिक चांगले देणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे  शालेय जीवनात व्हायला हवे. देशपांडे दंपतीच्या देणगीचा या कामासाठी उपयोग करावा असा जयंतने विचार केला व तसे त्यांना सांगितले. त्यासाठी वेगळी इमारत बांधण्यासाठी आणि तशी संशोधिका सुरु करण्यासाठी देशपांडे दंपतीच्या देणगीचा उपयोग होणार हे त्यांना आवडले. समाजोपयोगी अशा अनेक संस्थांना त्यांच्या फाउंडेशनने मदत केल्याचे माहित होते. मुलांचे आनन्दमय विज्ञानशिक्षण हा देखील त्याच्या जिव्हाळ्याचा विषय होता हे समजून आम्हाला त्यांच्या विषयी वाटणारा प्रेमादर वाढला. पण हे जेव्हा जयंतने आयुकामधील लोकांना सांगितलं, तेव्हा तेथील अकौंटंट श्री अभ्यंकर यांनी नियम सांगितला, की आयुका सरकारी संस्था आहे, तिला स्थावर मालमत्ता देणगीच्या रूपात स्वीकारणे सोयीचे नाही. तो फ्लॅट विकून त्याच्या पैशांत काही उपक्रम करण्यात प्राप्तीकराच्या नियमांचा खूप त्रास झाला असता. त्यामुळे त्यांचा पहिला बेत जरी बारगळला, तरी सुनीताबाईंनी जरा नंतर, रूपालीच्या अपेक्षित किमतीएवढे, म्हणजे एकूण २५ लाख रुपये आयुकाच्या स्वाधीन केले. 

शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञानशोधिकेला कोणते नाव द्यावे हे विचारल्यावर समजले, की त्यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या संस्थांना “ मुक्तांगण ” हे नाव देणे त्यांना आवडते. आम्हालाही ते नाव आवडले. आमचेही मुक्तांगण बांधून तयार झाले. इमारतीला जयंतने नाव दिले “ पुलस्त्य ”. हा सप्तर्षींमधला एक तारा आहे आणि या नावातच पुल आहेत. सुदैवाने या मुक्तांगणासाठी  प्रा. अरविंद गुप्ता यांच्या सारखा, मुलांना खेळणी बनवायला शिकवून, त्यातून विज्ञान शिकवणारा अवलिया संचालक म्हणून मिळाला आणि आमचे मुक्तांगण जोरात चालू झाले. प्रा गुप्ता यांच्या हाताखाली अनेक तरुण-तरुणी मुलांना हसत खेळत विज्ञान शिकवू लागले. विविध शाळातील मुले तिथे येऊन त्याचा लाभ घेऊ लागली, अजूनही घेतात. दुर्बिणीतून तारे दाखवण्याचे कामही तेथे होते. 

“ पुलस्त्य “ बांधून झाले, तिथे मुक्तांगण ही विज्ञान शोधिका चालू करताना लहानसा समारंभ केला, त्यावेळी पुल हयात नव्हते. सुनीताताईंना आग्रहाचे आमंत्रण आम्ही केले, परंतु त्या आल्या नाहीत. त्यांचा एक डोळा काम करत नव्हता, दुसराही  अधू होता, त्याला धक्का बसू शकेल या भीतीने त्यांनी बाहेर जाणे जवळ जवळ बंद केले होते. त्यांच्या वतीने त्यांचे सुहृद, श्री श्री. पु. भागवत मुक्तांगणाच्या उद् घाटनास आले होते. तो दिवस होता, २७ डिसेंबर, २००२. मुक्तांगण तर जोरात चालू झाले. पुणे व परिसरातील अनेक शाळातील मुले, आपल्या विज्ञानशिक्षकांसह तेथे येतात, २-३ तास थांबून साध्या, कधी कधी टाकाऊ साहित्यातून मजेदार खेळणी बनवायला शिकतात, मग त्यातील विज्ञान शिकतात. आपली खेळणी आणि अशा मजेदार रीतीने विज्ञान शिकण्यातला आनंद ती मुले घरी नेतात. महिन्यातून एकदा इंग्रजी व मराठी किंवा हिंदी मधून शालेय मुलांसाठी जवळच्या आयुकाच्या सुसज्ज अशा मोठ्या चंद्रशेखर हॉलमध्ये व्याख्यान आयोजित केले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या शाळातून मुले व त्यांचे शिक्षक येतात.

एकदा आम्ही सुनीताताईना हे मुक्तांगण पाहायला येण्याचा खूप आग्रह केला. त्यांचा भाचा दिनेश, त्याचा मुलगा आशुतोष आणि भाचीचा मुलगा आश्विन हे त्यांच्या बरोबर येणार होते. त्यावेळी आमचे जुनी, पण पुढचे दार मोठे असून प्रवेशाचा भाग रुंद असणारी टाटा इस्टेट गाडी होती. तिच्यातून त्यांना सांभाळून नेण्याचे ठरले. त्या आल्या. तो दिवस होता, १८ जून, २००७. म्युनिसिपल शाळेतील मुले आनंदाने विज्ञान शिकताना त्यांनी पाहिली. मुक्तांगणकडे नुकतेच एक फुगवून उभारण्याचे, लहानसे फिरते तारांगण आले होते. त्यात रांगत प्रवेश करून त्यांनी आपल्या नातवांसह तारे पाहिले. एकंदरीत त्या खूष झाल्या आणि आयुकासाठी, मुक्तांगणच्या लोकांसाठी त्यांची भेट हा एक मोठा सण झाला. सुनीताताईंच्या हस्ते दोन झाडे आवारात लावून घेतली. 

या भेटीच्या जरा आधी, २००६ मध्ये, सुनीताताईनी आयुकाकडे त्यांच्या मृत्युपत्रातील एक भाग पाठवून दिला. त्यात पुलं आणि त्यांच्या स्वत:च्या पुस्तकांचे कॉपीराईट त्यांच्या मृत्युनंतर आयुकाला मिळणार असे लिहिले होते. नंतर सुनीताताई आजारी झाल्या, काही काळ अंथरुणावर होत्या. त्याही काळात आम्ही शक्य तेव्हा त्यांना भेटण्यास गेलो. नोव्हेंबर २००९ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर पुल आणि सुनीताताई यांच्या पुस्तकांचे कॉपीराईट आयुकाकडे आल्याने आयुकाला त्याची रॉयल्टी मिळत आहे. मुक्तांगणमधील उपक्रमांसाठी तिचा विनियोग होतो. एखादे समाजोपयोगी काम पटले, आवडले, तर कोरडे कौतुक करून न थांबता त्यासाठी अतिशय उदारपणे आर्थिक मदत देण्याची सुनीताताईंची वृत्ती स्पृहणीय होती. पुलंच्या जन्मशताब्दीच्या सांगतेला पुल आणि सुनीताताई यांच्या आयुकाबरोबरच्या या खास नात्याबद्दल लिहून त्याना आदरांजली वाहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com