नवरात्रीचे नऊ संकल्प... (मंगला गोडबोले)

mangla godbole
mangla godbole

आनंद, उत्साह यांचा काळ म्हणजे कुठलाही उत्सव. येत्या १७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. सणांमध्ये नवरात्रोत्सवाला वेगळं महत्त्व अशासाठी, की हा उत्सव स्त्री-शक्तीच्या जागराचा आणि तिच्या सन्मानाचा. महिला या काळात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, त्याचबरोबर काही नियमही घालून घेतात. खरंतर स्व-अस्तित्वासाठी स्त्रीनं नेमकं काय करायला हवं? ‘सीमेत राहूनही असीम जगणं आणि आपल्या सुरात गाणं’ हे प्रत्येक स्त्रीला जमणं म्हणजेच स्त्री-शक्तीचं जागरण होय. नव्या निर्धाराबद्दल आणि नव्या काळातल्या नवरात्राबद्दल..

यंदाचं वर्ष वेगळं आहे. यंदा लीप वर्ष आणि अधिक मास एकाच वर्षात आले आहेत. हा योग जवळजवळ १६० वर्षांनी आला आहे. यंदा आश्विन हा अधिक मास झाला आहे. त्यामुळं यंदाचा चातुर्मास आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी, असा एकूण पाच महिन्यांचा झालेला आहे. दरवर्षी पितृपंधरवड्यानंतर लगेच नवरात्र सुरू होतं; पण यंदा अधिक मास मध्ये आल्यानं साहजिकच नवरात्र हे पितृपंधरवड्यानंतर एका महिन्यानं आलं आहे आणि यंदा संपूर्ण जगावर कोरोना या एका दुस्तर आजाराची काळी छायाही पसरलेली आहेच.

हे काहीही असलं तरी नवरात्र हा स्त्रियांचा सण, स्त्री-शक्तीचा जागर करण्याचा सण, शक्तिमान देवींची वेगवेगळी रूपं स्मरण्याचा सण, हे नवरात्रीचं महत्त्व आहेच. म्हणूनच अनेक महिला या काळात वेगवेगळे यमनियम पाळतात. पूर्ण उपवास करणं, रोज एकदाच अन्नग्रहण करणं, कुमारिकेचं पूजन, अन्नदान, दीपप्रज्वलन, सवाष्णींचा सत्कार... असे अनेक उपक्रम आपापल्या परीनं करत असतात. एकूणच जीवनात अडीअडचणींचा अधिक कणखररीत्या सामना करता यावा म्हणून ही शक्तीची पूजा करणं अभिप्रेत असतं.

पण सुरुवातीला म्हटलं तसं हे वर्ष वेगळं आहे. मग या वर्षीच्या नवरात्रात शक्ती मिळवण्यासाठी काही वेगळे, आधुनिक निग्रह करता येतील का? असा विचार करताना मला असं जाणावलं, की रोजच्या स्त्रीला लग्न - नवरा - मुलं या निकषांवर सबळ, सक्षम ठरवणं हे काही पुरेसं होणार नाही. एक तर आजची कोणीही विचारी स्त्री केवळ एवढ्या निकषांवर स्वत:ला तोलून घ्यायला तयार होणार नाही. मग आधुनिक काळानुसार या नऊ दिवसांमध्ये दररोज एकेक उपलब्धी, एकेक वर मागायचा ठरवलं, तर ती काय मागेल? किंवा तिनं काय मागणं मागावं? या नऊ दिवसांमध्ये कोणते नऊ नवे संकल्प तिनं सोडावेत?
तर, पहिल्या दिवशी किंवा पहिल्या माळेला तिनं म्हणावं की, “मला जगण्याला पुरेल एवढं शिक्षण घेता येऊ दे.”
दुसर्‍या दिवशी किंवा दुसर्‍या माळेला तिनं म्हणावं की, “मला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होऊ दे." तिसर्‍या दिवशी किंवा तिसर्‍या माळेला तिनं म्हणावं की, “शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन मिळाल्याशिवाय माझ्यावर लग्न करण्याची वेळ कधीही न येऊ दे.”
चौथ्या दिवशी किंवा चौथ्या माळेला तिनं म्हणावं की, “माझं लग्न झालं तरी आई-वडिलांविषयीची माझी जबाबदारी मला पूर्ण करता येऊ दे.”
पाचव्या दिवशी किंवा पाचव्या माळेला तिनं म्हणावं की, “मला हवंसं वाटेल तेव्हाच मला मूल होऊ दे. अन्य कोणाच्या दबावामुळं मूल जन्माला घालण्याची वेळ कधीही माझ्यावर येऊ नये.”

सहाव्या दिवशी किंवा सहाव्या माळेला तिनं म्हणावं की, “मला मूल झालं, मुलगा झाला म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता संपली, असा विचार मला कधीही न शिवू दे.”
सातव्या दिवशी किंवा सातव्या माळेला तिनं म्हणावं की, “मुलाला आणि मुलीला समबुद्धीनं वाढवण्याचा विवेक माझ्यामध्ये सदैव राहू दे.”
आठव्या दिवशी किंवा आठव्या माळेला तिनं म्हणावं की, “लग्न होणं, नवरा - मुलं असणं, मुलगा होणं यावरून अन्य बायकांच्या यशापयशाचं मोजमाप करण्याची चूक माझ्या हातून कधीही न होऊ दे.”
नवव्या दिवशी किंवा नवव्या माळेला तिनं म्हणावं की, “मला सुपरवुमन व्हायचा मोह कधीही न होऊ दे.”
घाईघाईनं या मागण्यांवर, प्रार्थनांवर नजर फिरवणाऱ्या एखाद्याला वाटेल, की या गोष्टी गृहीत आहेत. यांचा वेगळा उल्लेख तरी करायला हवाय का? माझा अभ्यास आणि निरीक्षण असं सांगतं, की करायला हवा आहे. पुनःपुन्हा करायला, करत राहायला हवा आहे. कारण या साध्याशा वाटणाऱ्या गोष्टी निग्रहानं व्यवहारात आणणारे लोक, स्त्रिया अजूनही कमीच आहेत.

शिक्षण अपुरं असताना अनेक मुलींची आजही लग्नं होताहेत. “एकच वर्ष राहिलंय पदवीचं”, “मुलाकडचे लोक थांबायला तयार नव्हते”, “लग्नानंतर शिकवायची त्यांची तयारी आहे”, “एवढं चांगलं स्थळ पुन्हा मिळणार नाही...” अशा कारणांनी मुलींचे घाईनं लग्नाचे बार उडवून देणारे, शिक्षणाचे मनसुबे धुळीला मिळवणारे पालक ठिकठिकाणी आहेत. जिथं मुलीच्या शिक्षणानं, कमावतेपणानं काही फरक पडणार नाही, अशा घरांमध्ये मुलींना ‘देण्यात’ कृतकृत्यता मानणारे मुलींचे ‘हितचिंतकही’ सर्वदूर आहेत; पण लग्न- मूल- नवऱ्याची बदली होणं- कौटुंबिक संकटं- नैसर्गिक आपत्ती अशा कारणांमुळं शिक्षण अर्धवट सोडणं अनेकींना फार महागात पडतं, हे वारंवार दिसतं. चांगल्या बौद्धिक कुवतीच्या मुलींना केवळ शिक्षण अपूर्ण राहिल्यानं निव्वळ शारीरिक कष्टाची कामं करून पोट भरण्याची वेळ एकदा येऊ शकते. तेव्हा कोणतंही तत्कालिक किंवा दृश्य, ठोस गरज नसली तरी प्रत्येक मुलीचं लग्न तिचं इच्छित शिक्षण पूर्ण झाल्यावरच व्हायला पाहिजे.

“तिच्या पैशांची काही गरज नाही”, “बायकांच्या पैशांवर आमचं घर चालत नाही", “गब्बर सासर पाहून दिल्यावर ती कमावती हवीच का?” हे सर्व युक्तिवाद कितीही अपरिचित असले तरी प्रत्येक बाबतीत ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलीच पाहिजे. तरच कुटुंबात, समाजात तिला थोडा तरी मान राहतो, ती आत्मसन्मानानं जगू शकते. शिवाय, एखाद्याला पैसा एवढा नकोसा झाला असेल, तर तिनं मिळवलेला पैसा दान देऊन टाकता येईलच की. पैसा वापरणं- वाटणं- उडवणं या गोष्टी ओघानं आणि सहजपणे येतात. मुळात जिनं तिनं आपापल्या कुवतीनं तो मिळवत राहिला पाहिजे. हे आर्थिक स्वावलंबनाचं सूत्र तिच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यास निश्चित मदत करतं.

मुलीचं लग्नाचं वय कोणतं असावं, याबाबत आपण, आपला समाज, आपला कायदा हे सगळेच चाचपडत असतो. १६ व्या, १८ व्या, २१ व्या वर्षी मुलगी विवाहयोग्य मानावी का? यावर कधीपासून मतमतांतरं येत आहेत. तरीही जीवनाच्या एका ना एका टप्प्यावर आपल्याकडं मुलीच्या लग्नाची घाई करणारे पालक निघतातच. मुलगी एकदा ‘उजवली’ की झालं, आजीला नातजावई बघायचाय, वडिलांना हार्टअ‍ॅटॅक आलाय, भाऊ परदेशी जायला निघतोय अशा कारणांनी अनेक मुलींच्या लग्नाची घाई करतात. या सगळ्याची किंमत पुढं त्या मुलीलाच चुकवावी लागते. तेव्हा नुसतं शरीर तयार असून उपयोग नाही. जगण्याला पुरेसं शिक्षण, आर्थिक सक्षमता एवढी सामग्री गोळा झाल्याशिवाय कोण्याही मुलीचं लग्न होऊ नये. एकवेळ उशीर झाला तरी चालेल. फार तर काय होईल, लोक चौकशा करतील, “अजून लग्न झालं नाही का?” वगैरे शंका, खुस्पटं काढतील; पण हे तेवढ्यापुरतं राहील. चुकीचं किंवा अयशस्वी लग्न झालं, तर ते निस्तरताना वर्षानुवर्षं जातील. त्या विवाहितेचं सगळं आयुष्य डागाळून जाईल. म्हणून तिसर्‍या माळेला तो निग्रह करणं गरजेचं आहे.

लग्न झालं, मुलगी सासरची झाली, आता तिचा माहेरशी काही संबंध नाही, “जहाँ डोली पहुंची है वहींसे अर्थी निकलेगी,” यांसारखे विचार आता फारच कालबाह्य झाले. आज वरचेवर फोननं, प्रत्यक्ष येण्याजाण्यानं मुलींचा माहेरशी संपर्क सुरू असतो; पण वरवरचा संपर्क वेगळा आणि ठाम जबाबदारी घेणं वेगळं. जबाबदारीची, आर्थिक सहभाग घेण्याची वेळ आली, की अनेक विवाहित कन्या आजही बिचकतात. कारण वृद्ध आई-वडिलांना, माहेरच्या गरजूंना आर्थिक मदत करण्याचं स्वातंत्र्य त्यांना नाहीये. काहींना छुपेपणानं मदत करावी लागते किंवा माहेरच्यांना मदत केल्यास सतत तिला टोचणी लावली जाते. आज अनेक कुटुंबांमध्ये मुलंच कमी आहेत, फक्त मुलीच आहेत, काही अपत्यं परदेशी राहात आहेत, अशा वेळी त्या मुलींची माहेरच्या ज्येष्ठांना मदत व्हायलाच हवी. मुलींना वाढवताना, शिकवताना मुलग्यांइतकीच संधी देणाऱ्या पालकांचं ऋण, त्यांची जबाबदारी जरूर पडल्यास मुलींनीही उमदेपणानं सुसंस्कृतता समजून घेतली पाहिजे, तरच मुलींच्या आर्थिक स्वावलंबनावर शिक्कामोर्तब होईल.
बाईला कधी मूल व्हावं, किती मुलांवर तिनं थांबावं, मुलगा-मुलगी हवीच हा आग्रह तिच्याबाबत इतरांनी धरू नये, याचे सर्व अधिकार बाईकडं असले पाहिजेत. पतीच्या सहमतीनं तिनं हे निर्णय जरूर घ्यावेत; पण हे कधीही तिच्यावर एकतर्फीपणे लादले जाऊ नयेत. स्वातंत्र्य हे नुसतं हिंडण्याफिरण्याचं किंवा नटण्यामुरडण्याचं नसतं; वैचारिक स्वातंत्र्य हे सर्व स्वातंत्र्यांच्या मुळाशी असतं आणि जिथं तिथं तिचाच विचार, निर्णय प्राध्यान्यानं मानला गेला पाहिजे. पाचव्या माळेचा निग्रह यादृष्टीनं महत्त्वाचा आहे.
आम्ही मुलगा आणि मुलगी यांना सारखंच वाढवतो, असं म्हणणारे पालक आता दुर्मीळ नाहीत; पण दोघांना सारखेच कपडे घेणं, सारख्याच क्लासेसचं शुल्क भरणं एवढ्यापुरती समानता पुरेशी नाही. अगदी प्रेमापोटी, काळजीपोटी का असेना; पण मुलींना परगावी ठेवायला रात्री-अपरात्रीच्या ड्यूटी करू द्यायला नकार येणारे पालक खूप असतात, त्या मुलींच्या आयाही असतात. अशा वेळी संभाव्य धोक्यांची पूर्ण कल्पना देऊन तरी मुलींना अशा, कदाचित ‘अनवट’ संधी घेऊ देणं ही खरी समानता ठरेल. शेवटी अशा प्रत्येक आव्हानामध्ये विकासाच्या संधीही असतात. त्या फक्त मुलांनी का घ्याव्यात? मुलींना का मिळू नयेत?

एकदा मूल जन्माला घातलं, की आपलं कर्तव्य, कर्तृत्व संपलं असं आज फारशा बायका (सुदैवानं) मानत नाहीत; पण मुलं आयुष्याच्या मार्गाला लागल्यावर शिथिलता मात्र अनेकींमध्ये येते. आव्हानांकडं अलगद पाठ फिरवली जाते. आता नवीन शिकून काय करायचंय, असा नकारात्मक विचार बळावतो. आज सरासरी आयुर्मान वाढत चाललंय आणि अपत्यांची संख्या कमी होत चालली आहे. अशा स्थितीत अनेक बायकांना ७५/८० वर्षं सहज जगावं लागणार आणि ४५/५० वर्षं वयापर्यंत त्या एक-दोन मुलांच्या जबाबदारीतून मोकळ्याही होणार आहेत. मग वयाच्या पन्नाशीपासूनची पुढची २५, ३० वर्षं त्या वाया घालवणार आहेत का? या काळात त्या खूप काही करू, मिळवू शकतील. फक्त तशी मनाची सकारात्मकता ठेवावी लागेल. अन्यथा मुलांच्या प्रौढपणीच्या जीवनात अनावश्यक लुडबूड आणि वैफल्य यामध्ये मोठा कालखंड वाया जाईल. यावरही विचारशील कृतीनं मात करता येईल.

हे सर्व करत असताना बाईवर साहजिकच ताण पडतो. विशेषत: संसाराचं पहिलं पाव शतक फार धकाधकीचं जातं. त्यातच आपण सर्व आघाड्यांवर तेवढ्याच ताकदीनं लढायचंच, आपल्याला आदर्श पत्नी- आई- सून अशा सर्व पदव्या संपादन करायच्या आहेत, आपण त्यागमूर्ती आहोत अशा भ्रामक कल्पना काही बायका जोपासतात. त्यांना ‘सुपरवुमन’ होण्याची महत्त्वाकांक्षा ‘डसते’ आणि स्वत:कडं दुर्लक्ष करणं, जिवापाड कामं किंवा जबाबदाऱ्या ओढवून घेणं या प्रवृत्ती बोकाळतात. देह थकतो, मन थकतं, आबाळ होते, अति ताण पडतो आणि अवेळी म्हातारपण येतं. हे टाळण्यासाठी मुळामध्ये सुपरवुमन होण्याचं उद्दिष्टच रद्द करायला हवं. देहाला जरूर ते पोषण- औषध- विसावा वेळच्या वेळी द्यावा. मनाला जरूर ते रंजन- उत्तेजन- प्रेरणाही वेळच्या वेळी द्याव्यात. सतत पळण्याप्रमाणे कधी कधी कडेला थांबून रमतगमत आयुष्याकडं बघण्याची मजाही घ्यावी. यातून स्वत:चा, कुटुंबाचाही लाभच होतो.

नवरात्रीनंतर येतो दसरा. म्हणजे सीमोल्लंघन. सीमा ओलांडणं, विजयोत्सव साजरा करणं, हे या सणाचं वैशिष्ट्य आहे. हे महिलांबाबत विशेषच अर्थपूर्ण वाटतं. कारण महिलांच्या सीमा दुसऱ्यांनी आखून देण्याची परंपरा अगदी लक्ष्मणरेषेपासून सुरू आहे. या सीमांना शतकानुशतकांच्या प्रवासामुळं खुद्द महिला इतक्या सरावलेल्या असतात, की त्या अपरिहार्य आहेत असं त्यांनाच वाटू लागतं. तेव्हा आता बायकांनी आपल्या मनातल्या सीमारेषा तरी प्रयत्नपूर्वक खोडून काढायला हव्यात. रवींद्रनाथ टागोरांनी एका मोठ्या कलावंताला दाद देताना फार मार्मिक पंक्ती लिहिली आहे.

सीमार माने असी तुमी । बाजाओ आपन सूर ॥
म्हणजे काय, तर ‘सीमेमध्ये तू असीम आहेस. तुला आपल्या सुरात गाता येतंय. तू आपला सूर शोधू शकला आहेस.’ या नवरात्रीला काही बायकांना जरी याचं भान आलं, तरी ती मोठीच उपलब्धी ठरेल. सीमेत राहूनही असीम जगणं आणि आपल्या सुरात गाणं सर्वांना जमो, हीच या सणाची सर्वोच्च शुभेच्छा ठरू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com