शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे

Adv. Vitthalrao Hande
Adv. Vitthalrao Handeesakal

''मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी सभापती, राज्य विधान मंडळाचे सदस्य, लोकसभेचे सदस्य, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता, दूरदृष्टी असलेला अभ्यासू वक्ता म्हणून कर्मवीर अॅड. विठ्ठलराव गणपतराव हांडे यांची पुरोगामी महाराष्ट्राला ओळख आहे. मविप्रला त्यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन मोलाचे होते. वडीलकीच्या नात्याने त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्यांचे विधान मंडळातील आणि शेतकरी कामगार पक्षातील कार्य बोलके आहे. त्यांचे कार्य महाराष्ट्र विसरणार नाही. ते स्वतः ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्याच्या जगण्याची व्यथा जाणून होते. म्हणूनच त्यांनी शेतकऱ्याचे हित पाहण्याच्या दृष्टिकोनातून समर्थपणे पक्षीय कार्य केले.''
- प्रा. संजय पवार

कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात १ ऑक्टोबर १९२० ला आडगाव येथे झाला. त्यांचे मूळगाव चाटोरी (ता. निफाड). त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव दगडूजी हांडगे आणि आईचे नाव ममता होते. तर मूळचे चितेगावचे आणि सायन (मुंबई) येथील स्टील भांडे कारखानदार श्री. डफळे यांची कन्या डॉ. सुशीला यांच्याशी त्यांचे लग्न झाले. डॉ. सुशीला यांनी मुबई येथे पवई पॉलिक्लिनिक सुरू केले. या दांपत्यास डॉ. शैलजा, अलका, प्रतिभा व डॉ. शर्मिला अशा एकूण चार कन्या आहेत, ज्या मुंबईत राहतात. कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांनी काकासाहेब वाघ यांच्या खांद्याला खांदा लावून निफाड सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. ते कारखान्याचे संस्थापक सदस्य. कारखाना निवडणूक फॉर्म भरताना चुकून आडनाव हांडे असे लिहिले गेले. झालेली चूक उशिरा लक्षात आली. वेळ निघून गेलेली होती. त्यांनी ताबडतोब मुंबईला जाऊन गॅझेटमध्ये नोंद करून घेतली. तेव्हापासून विठ्ठलराव हांडगेंऐवजी हांडे झाले. बाकीचे भाऊ-भाऊबंद सर्व हांडगे असेच आडनाव लावतात.

Adv. Vitthalrao Hande
गोष्ट माझी : मोठा पुरस्कार

कर्मवीर डॉ. हांडे हे फार उदारमतवादी होते. त्यांनी गावची, त्यांच्या वाट्याची शेती व घर सर्व भावंडांना समान वाटून टाकली. भावा-भावांनी भांडण केलेले त्यांना खपत नसे. ते सर्वांना खडसावून टाकत. त्यामुळे सर्व गावकऱ्यांवर त्यांचा वाचक होता. त्यांना गावात फार मानाचे स्थान होते. गावातील व नातेवाइकांत सगळेच त्यांना आदराने ‘आबा’ म्हणत असत. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण चाटोरी येथे, तर माध्यमिक शिक्षण नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये व त्यानंतरचे उच्च शिक्षण बडोदा, कोल्हापूर, पुणे येथे झाले. सनद मिळाल्यानंतर त्यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसायास प्रारंभ केला अन्‌ तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरवात झाली. विद्यार्थिदशेतच त्यांच्यावर डाव्या विचारांचा प्रभाव पडला व त्या दिशेने त्यांची जडणघडण झाली. १९४८ मध्ये स्थापन झालेल्या शेतकरी कामगार या डाव्या विचारांच्या पक्षाच्या कामात ते सहभागी झाले. डाव्या विचारांच्या पक्षात राहून त्यांनी जो विचार अंगीकारला आणि जी विचारधारा स्वीकारली होती, त्या विचारधारेशी ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. त्यांचे मन समाजकारणात जास्त रमले. त्यांचा खरा पिंड हा सामान्य माणसाच्या हितासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांचा होता.
त्या काळात नाशिक जिल्ह्यात कर्मवीरांनी ‘उदाजी मराठा बोर्डिंग’च्या म्हणजे आजच्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे काम सुरू केले होते. तर दुसऱ्या बाजूने सर्वसामान्य माणसाचे प्रश्‍न तातडीने सोडविले पाहिजे, असा आग्रह सुरू झालेला होता. कारण स्वातंत्र्यानंतरच्या काळात सामान्य माणसांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. केंद्र सरकार परके आहे. ते अन्याय आणि पिळवणूक करते. त्यामुळे त्या सरकारकडून फारसा विकास होण्याची शक्यता त्या वेळी समाजाने गृहीत धरलेली नव्हती. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता करणे गरजेचे होते. १९४७ मध्ये त्यांनी मविप्रच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम केले. १९६८ ते १९७४ या काळात ते विधान परिषदेवर निवडून गेले. लोकसभेवर नाशिक मतदारसंघातून १९७७ ते १९७९ या काळात खासदार होते. १९८६ ते १९९२ या काळात ते पुन्हा विधान परिषदेवर निवडले गेले. जवळपास वीस वर्ष ते लोकप्रतिनिधी राहिले. त्यांनी मविप्र संस्थेचे पदाधिकारी म्हणून दीर्घकाळ काम केले. संस्थेच्या संस्थापकांनंतर संस्थेचे नेतृत्व प्रामुख्याने अॅड. विठ्ठलराव हांडे व अॅड. बाबूरावजी ठाकरे यांनीच केले.

इगतपुरीचा प्रसिद्ध ‘भात लढा’ ही त्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना होय. तत्कालीन मुंबई राज्याच्या सरकारने गुजरातमधील शेतकऱ्यांच्या तांदळाला जास्त भाव आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तांदळाला कमी भाव दिला. हा महाराष्ट्रातील तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होता. या अन्यायाविरुद्ध नाशिक भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता. त्यातूनच इगतपुरीचा ‘भात लढा’ सुरू झाला. कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर विठ्ठलराव हांडे, माजी आमदार पुंजाबाबा गोवर्धने, रामचंद्र नाना भांगरे आदींच्या नेतृत्वाखाली हा भात लढा सुरू झाला. गुजरातच्या शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीच्या भातास सोळा रुपये मण हा भाव दिला जात होता, तर त्याच प्रतीच्या भातास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांस दर मणास साडेसहा रुपये हा भाव दिला जात असे. या अन्यायकारक परिस्थितीमुळे इगतपुरीचा भात लढा सुरू झाला. सरकारने हा लढा दडपण्याचा प्रयत्न केला. नेत्यांना हद्दपार करण्यात आले. शेवटी सरकारला शेतकऱ्यांच्या भाताच्या भावात वाढ करण्याचा निर्णय घ्यावाच लागला. हा त्यांच्या प्रवासातला एक यशस्वी लढा म्हणावा लागेल. त्यांचा मूळ पिंड हा सत्यशोधक विचारांचा. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, तसेच मार्क्सवादी विचारांचा मोठाच प्रभाव त्यांच्यावर होता. काही प्रतिगामी लोकांनी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल टीकात्मक भाष्य केले, तेव्हा ते याविरुद्ध अक्षरशः चवताळून उठले. महात्म्यांच्या जीवनकार्यावर चिखलफेक करणाऱ्या प्रतिगामी विचाराला वेळीच प्रत्युत्तर दिले नाही, तर तो महात्मा फुले यांच्यावर अन्याय ठरेल या भूमिकेतून त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर सलग तीन तास जे आवेशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण भाषण दिले त्याला तोड नाही. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासूनच ते सदस्य होते. माधव एकनाथ मोरे, एकनाथ जयराम जाधव, पांडुरंग बाबूराव गायधनी यांसारख्या शेकाप कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली. बस भाडेवाढीविरुद्ध पक्षाने केलेल्या चळवळीत त्यांनी सहभाग घेतला व त्यामुळे त्यांना तुरुंगवास पत्करावा लागला.

Adv. Vitthalrao Hande
शोधयात्रा : पोलिसांनी दिला आश्रय...

१९६२ मध्ये उपासमारविरोधी कृती समितीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे नाशिक रोड तुरुंगात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. १९७२-७३ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही अनेक वेळा तुरुंगात जावे लागले. गोवा मुक्ती आंदोलनांमध्येही सक्रिय सहभाग नोंदविला. १९७९-८० मध्ये शेतकऱ्यांना उसाचे भाव वाढून मिळावेत म्हणून शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. त्यामुळे धुळे तुरुंगात पंधरा दिवसांचा कारावास पत्करावा लागला. कठीण परिस्थितीतही आपल्या विचार आणि तत्त्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांची संसदीय कामगिरीही अतिशय भरीव राहिलेली आहे. विधिमंडळात त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण भाषणे दिली. जनसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्‍न त्यांनी विधिमंडळात उपस्थित केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. शेतकरी, कामगार यांच्या प्रश्‍नांबरोबरच अनेक सामाजिक प्रश्‍न त्यांनी विधिमंडळात उपस्थित केले. विधिमंडळात चर्चा उपस्थित करण्याचे जेवढे मार्ग आहेत, त्या सर्व मार्गांचा म्हणजे प्रश्‍नोत्तरांचा तास, लक्षवेधी सूचना, विधेयकावरील चर्चा आदी सर्व मार्गांनी त्यांनी वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते व वाहतूक, जंगलतोड, वाळू विक्री, कुटुंब नियोजन, आश्रमशाळांचे प्रश्‍न, परिवहन, सार्वजनिक वितरण व्यवस्था, कांदा खरेदी अशा कितीतरी विषयांवर त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले. शिवाय त्यावर अतिशय अभ्यासपूर्ण भाष्यदेखील केले. त्यांनी सरकारला अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांबाबत निर्णय घ्यायला भाग पाडले. त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्‍नांवर अनेक चळवळी केल्या. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, कष्टकऱ्यांचे अनेक मोर्चे काढले. जागतिकीकरणाच्या विरोधात आंदोलन केले. सेझच्या विरोधात लोकजागृती केली. विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाला विस्थापित करताना त्यांचे न्याय्य पुनर्वसन झाले पाहिजे, अशी त्यांची मनोधारणा होती. ते शेवटपर्यंत मार्क्‍सवादी विचारसरणीशी बांधिल राहिले. त्यांची भूमिका एका लढाऊ कार्यकर्त्याची होती.
सत्ता असो वा नसो त्यांनी आपले काम सुरूच ठेवलेले होते. १९९७ ते २००२ या कालावधीत जनशिक्षण संस्थान, नाशिकचे ते अध्यक्ष होते. अॅड. हांडे संस्थेचे सभापती असताना आदिवासी मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून संस्थेने १९८१ मध्ये इगतपुरी महाविद्यालय सुरू केले. अनेक अडचणीतून हे महाविद्यालय सुरू झाले. इगतपुरीच्या इतिहासप्रसिद्ध भात लढ्यामध्ये त्यांच्याबरोबर असलेले माजी आमदार पुंजाबाबा गोवर्धने यांचे नाव इगतपुरी महाविद्यालयाला देण्याचा निर्णय संस्थेच्या कार्यकारी मंडळाने घेतला. त्या कार्यक्रमास ॲड. हांडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन सरचिटणीस डॉ. वसंतराव पवार यांनी निमंत्रित केले होते. कार्यक्रम संपल्यावर डॉ. पवार त्यांना म्हणाले, ‘तुम्ही गेली अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करीत आहात. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना, मविप्र संस्थेतील काम, विधानसभा, लोकसभा, विधान परिषद या सभागृहाचे सदस्य व राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अशा अनेक नात्यांनी तुम्ही काम केलेले आहे. तुम्ही तुमच्या आठवणी लिहा.’ परंतु त्यांना स्वतःविषयी असे काही लिहिणे प्रशस्त वाटत नव्हते. तेव्हा डॉ. पवार यांनी पुढाकार घेऊन संस्थेतील काही प्राध्यापकांवर ती जबाबदारी सोपविली. या प्रयत्नातून ‘विरोधी पक्षनेता अॅड. विठ्ठलराव हांडे’ या नावाचे पुस्तक लिहिण्याला गती मिळाली. त्यातून विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेल्या कारकीर्दीचा अभ्यास करून संस्थेने त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे अर्धवट राहिलेले काम विद्यमान सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी पूर्ण केले. हे पुस्तक आज अनेक अभ्यासकांना कर्मवीर अॅड. विठ्ठलराव हांडे यांच्या संसदीय कार्याचा परिचय देत आहे, त्याचबरोबर अनेक अभ्यासकांना ते मार्गदर्शक ठरत आहे.

Adv. Vitthalrao Hande
मुखी कुणाच्या पडते लोणी; कुणा मुखी अंगार!

मार्च २००८ मध्ये अॅड. भास्करराव पवार व शंकरराव हांडगे यांनी सांगितले, की ‘हांडे साहेब आजारी आहेत. त्यांना पवईला (मुंबई) भेटायला जायचे आहे.’ आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो, तेव्हा ते व्हीलचेअरमध्ये बसलेले होते. ते बोलायलाही अडखळत होते. तरीही त्यांनी आमची फार आस्थेने चौकशी केली. संस्थेचे काम करणाऱ्यांना संस्थेची गाडी दिली जात असे. संस्थेचे पदाधिकारी असताना त्यांनाही संस्थेने गाडी दिलेली होती. तरीही त्यांनी नेहमी पायीच प्रवास केला. त्यांचे व्यक्तिमत्त्वच निःस्पृह, निःस्वार्थी, निगर्वी आणि कोणताही बडेजाव न मिरवणारे होते. ‘एकच ध्यास, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा विकास’ हे तत्त्व त्यांनी अंतिम श्‍वासापर्यंत जपले. एवढेच नव्हे, तर विरोधी पक्षनेता असलेला हा सामान्य माणूस नेहमीच बसने प्रवास करायचा. अशी साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि तत्त्वनिष्ठ असणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व १६ डिसेंबर २००९ मध्ये त्यांच्या मुलीच्याच हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या कार्याची चिरंतन स्मृती म्हणून मविप्र संस्थेने नाशिक येथील आपल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे ‘अॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय’ असे नामकरण केले आहे, तर चाटोरी येथील विद्यालयालाही ‘अॅड. विठ्ठलराव हांडे माध्यमिक विद्यालय’ असे नाव दिले आहे.

(एच. एस. सी. व्होकेशनल, सिन्नर कॉलेज)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com