गुरुबिन ग्यान न पावे (आरती ठाकूर-कुंडलकर)

आरती ठाकूर-कुंडलकर
रविवार, 11 मार्च 2018

प्रभाताई कायम सांगतात : ''तंत्राचा अभ्यास करा; पण त्यात गुंतून पडू नका. आपलं गाणं, रागविस्तार, आलापी हे सगळं श्रोत्यांच्या मनाला भिडलं पाहिजे. आलापीमधूनच खरं रागदर्शन घडतं, तिचा अभ्यास करा.'' 

प्रभाताई कायम सांगतात : ''तंत्राचा अभ्यास करा; पण त्यात गुंतून पडू नका. आपलं गाणं, रागविस्तार, आलापी हे सगळं श्रोत्यांच्या मनाला भिडलं पाहिजे. आलापीमधूनच खरं रागदर्शन घडतं, तिचा अभ्यास करा.'' 

एखादा कलाकार घडत असतो त्यात नियती, परमेश्‍वर, आई-वडील, गुरुजन यांचा फार मोठा वाटा असतो, असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून मी स्वत:ला भाग्यवान समजते. कारण, मला वर्षा ठाकूर आणि विजय ठाकूर यांच्यासारखे आई-वडील लाभले. खरंतर आमच्या घरात शास्त्रीय संगीताची कोणतीही परंपरा नाही. आमच्या घरातलं कुणीही संगीत शिकलेलं नाही; पण माझी आवड पाहून आई-वडिलांनी माझ्या संगीतशिक्षणासाठी अपार कष्ट घेतले. माझ्यासाठी खूप सांगीतिक स्वप्नं पाहिली आणि त्या स्वप्नांसाठी ते झटलेही. माझे आई-बाबा दोघंही नोकरी करणारे...तरीसुद्धा ज्येष्ठ कलावंतांचे कार्यक्रम ऐकायला मला घेऊन जाणं, पुण्यात व पुण्याबाहेर विविध संगीतस्पर्धांसाठी घेऊन जाणं, नवनवीन कॅसेट आणून मला ऐकायला लावणं, गुरूंनी सांगितलेला रियाज मी करत आहे की नाही, याकडं बारकाईनं लक्ष देणं आदी बाबी ते माझ्यासाठी आवर्जून आणि आग्रहपूर्वक करत. माझा थोरला भाऊ वीरेंद्र याचं माझ्या संगीतवाटचालीवर अतिशय जाणीवपूर्वक लक्ष असतं व त्याचा मला पाठिंबा असतो. 

माझ्या प्रथम गुरू लीलाताई घारपुरे (उस्ताद अब्दुल करीम खॉंसाहेबांच्या पत्नी बनूबाई यांच्या आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या) यांच्या स्वाधीन आई-बाबांनी मला केलं. त्यांच्याकडं किराणा घराण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं माझं 12 वर्षं शिक्षण झालं. रीतसर गंडाबंधनानंतर त्यांनी मला घराण्याचे 'शुद्धकल्याण', 'मुलतानी', 'तोडी', 'भैरव', 'यमन', 'पूरिया कल्याण', 'वृंदावनी सारंग', 'पूरिया' असे अनेक राग शिकवले. 'यमन' आणि 'तोडी' शिकवताना त्या नेहमी म्हणायच्या : ''हे जन्मभर गायचे राग आहेत.'' 'गुरूविषयी, घराण्याविषयी निष्ठा पाहिजे,' ही विचारसरणी त्यांनी माझ्या मनावर बिंबवली. 'हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, गंगूबाई हनगल, भीमसेन जोशी, फिरोज दस्तूर, प्रभा अत्रे, संगमेश्वर गुरव, रोशनआरा बेगम, माणिक वर्मा यांची गाणी कानात प्राण आणून ऐक,' असं त्या मला सांगायच्या. स्टेजची भीती मनातून जावी म्हणून त्या आम्हा विद्यार्थिनींचे स्वत:च्या घरी, देवळात, गणेशोत्सवात कार्यक्रम घडवून आणायच्या. माझ्या परात्परगुरू हिराबाई बडोदेकर यांच्या घरी त्या मला घेऊन जात असत. हिराबाईंसमोर गाण्याचं भाग्य त्यामुळं मला मिळालं. 'ख्यालाबरोबरच भजन, ठुमरी, दादरा, कजरी, होरी हे गीतप्रकारही गाता आले पाहिजेत,' असा त्यांचा आग्रह असायचा. त्यासाठी त्यांनी मला उपशास्त्रीय संगीताचे जाणकार-अभ्यासक, गुरू डॉ. संजीव शेंडे यांच्याकडं पाठवलं. शेंडेसरांमुळं मला ठुमरीचं लालित्य, आर्जव समजलं. त्यांनी अतिशय प्रेमानं मला उपशास्त्रीय संगीताचे धडे दिले. 

त्यानंतर लीलाताईंमुळंच माझ्या सांगीतिक आयुष्यात एक मोठं असं महत्त्वाचं वळण आलं व ते म्हणजे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचं शिष्यत्व मला लाभलं. या वळणामुळं माझं सांगीतिक जीवन अधिक उजळून निघालं. 

पुण्यातल्या एका कार्यक्रमात लीलाताई मला प्रभाताईंच्या जवळ घेऊन गेल्या आणि प्रभाताईंना म्हणाल्या : ''माझ्या या शिष्येला आता मी तुमच्या स्वाधीन करते आहे. तुम्ही तिला घडवा.'' असा गुरू लाभणं हे माझं भाग्य आणि त्यानंतर गुरुकुल पद्धतीनं प्रभाताईंकडं माझं संगीतशिक्षण सुरू झालं. प्रभाताईंच्या हळुवार, नादमधुर गायकीप्रमाणेच त्यांच्या शांत, संवेदनशील, संयत स्वभावाचा प्रत्यय मला हळूहळू येऊ लागला. ज्यांनी आपल्या प्रतिभेनं किराणा घराण्याला वेगळा पैलू दिला, स्वत:ची 'प्रभा अत्रे किराणा घराणा शैली' तयार केली त्या उत्कृष्ट गायिका, गुरू, बंदिशकार, संगीतकार, चिंतनशील लेखिका, कवयित्री, संगीतावर अधिकारवाणीनं भाष्य करणाऱ्या उत्तम वक्‍त्या, अशा विविध भूमिकांमधून व्यक्त होणाऱ्या, परंपरेबरोबरच नावीन्याचा शोध घेणाऱ्या प्रभाताईंकडून मला खूप काही शिकायला मिळालं. मिळत आहे. 

अतिशय सुरेल, गोलाईयुक्त स्वरोच्चारण, रागाकडं पाहण्याच्या स्वच्छ, विस्तृत दृष्टिकोन, सरगम अलंकाराचा प्रभावी व व्याकरणशुद्ध वापर, प्रथमदर्शनी सोपी वाटणारी; परंतु वास्तवात गुंतागुंतीची तानक्रिया, सरळ तानांचा प्रभावी वापर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीकलाकाराला शोभून दिसणारी गानक्रिया यांचं दर्शन मला प्रभाताईंच्या गाण्यात झालं. प्रभाताई कायम सांगतात : ''तंत्राचा अभ्यास करा; पण त्यात गुंतून न पडता आपलं गाणं, रागविस्तार, आलापी हे सगळं श्रोत्यांच्या मनाला भिडलं पाहिजे. आलापीमधूनच खरं रागदर्शन घडतं, तिचा अभ्यास करा.'' प्रभाताईंच्या अनेक मैफलींमध्ये तसंच सुप्रसिद्ध 'सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवा'च्या त्यांच्या दरवर्षीच्या सांगतेच्या मैफलींमध्ये मला गायनसाथ करण्याची संधी मिळाली. ती साथ करत असतानाच, प्रभाताई रागप्रस्तुतीकरण कसं करत आहेत, मैफलीचं सादरीकरण कसं करत आहेत याचं अतिशय जवळून निरीक्षण करता आलं आणि एक आदर्श वस्तुपाठच मिळाला. 

प्रभाताईंकडं शिकत असतानाच मला केंद्र सरकारची आणि दादर-माटुंगा कल्चरल सेंटरची शिष्यवृत्ती मिळाली. वाणिज्य शाखेची पदवीधर झाल्यानंतर एसएनडीटी महाविद्यालयातून मी संगीत या विषयात एमए केलं. त्या परीक्षेत उत्तम गुणांनी पदवी मिळवल्याबद्दल मला 'गानहिरा' हा पुरस्कार मिळाला. आपल्या घराण्याच्या बुजुर्ग गायिकेच्या नावानं मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय मोलाचा आहे. त्यानंतर माझ्या गाण्याच्या छोट्या छोट्या बैठकी होऊ लागल्या. त्या बैठकींमुळं सादरीकरण कसं करावं, आपलं गाणं कसं मांडावं याचं एक नवीन शिक्षण सुरू झालं. आधीच्या मैफलीत झालेल्या चुका पुढच्या मैफलीत होऊ नयेत, यासाठी डोळसपणे रियाज सुरू झाला. त्या प्रत्येक टप्प्यावर अर्थातच गुरूंचं बहुमोल मार्गदर्शन मला मिळत होतं आणि माझी वाटचाल सुरू होती. सुप्रसिद्ध संवादिनीवादक, संगीततज्ज्ञ डॉ. अरविंद थत्ते यांचं मार्गदर्शन मला काही काळ लाभलं, हा माझ्या आयुष्यात आलेला 'सुयोग'च! पंडित वसंतराव राजूरकर यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या काही बंदिशी मला मिळाल्या, त्यानिमित्तानं त्यांचा बहुमोल सांगीतिक सहवास लाभला. 

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित फिरोझ दस्तूर यांनी माझं गाणं ऐकलं आणि मला आशीर्वाद दिले. त्यांच्याच हस्ते सवाई गंधर्व महोत्सवात मला 'पारुंडेकर स्मृती पुरस्कार' मिळाला. पुण्याच्या 'सवाई गंधर्व स्मारका'त माझ्या गाण्याच्या कार्यक्रमाला खुद्द स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी उपस्थित होते. माझं गाणे ऐकून त्यांनी मला दिलेले आशीर्वाद मी कधीच विसरू शकत नाही. याशिवाय मालिनी राजूरकर, जयश्री पाटणेकर, पद्मा तळवलकर, पंडित बबनराव हळदणकर अशा बुजुर्गांनी माझं गाणं ऐकून मला दिलेले आशीर्वाद हा माझ्यासाठी मोठा ठेवा आहे. यामुळं माझी उमेद वाढली. 

आत्तापर्यंतच्या वाटचालीत पंडित जसराज मित्र मंडळाचा 'वासंती पैंगणकर पुरस्कार', तरंगिणी प्रतिष्ठानचा 'पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती युवा पुरस्कार', गांधर्व महाविद्यालयातर्फे 'पंडित रामकृष्णबुवा वझे पुरस्कार', कलानुभव ट्रस्टचा 'पंडित संगमेश्वर गुरव पुरस्कार' (पंडित उल्हास कशाळकर यांच्या हस्ते), 'सुधा-सिंधू पुरस्कार', 'प्रमिलाबाई देशपांडे पुरस्कार' असे विविध पुरस्कार मिळाले. अशा पुरस्कारांनी वेळोवेळी ऊर्जा मिळत गेली. भारत सरकारच्या आयसीसीआरच्या (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन)'कलाकारयादी'त माझी निवड झाली. 

'बरसे बदारिया', 'वसंतरंग', 'बरसत घन आयो', 'गानप्रभा' (प्रभाताईंच्या बंदिशींवर आधारित), 'रामदास पदावली', 'सैंया निकस गए', 'सुमिरन', 'रागचित्र' अशा वेगवेगळ्या संकल्पनाधिष्ठित कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करताना वेगवेगळे राग, विविध शैलींच्या बंदिशी, भजन, अभंग असे अनेक प्रकारचे बाज मांडण्याची संधी मला मिळाली. पुणे, मुंबई, कोलकता, दिल्ली, बनारस, बडोदा, अहमदाबाद, बेळगाव, धारवाड, कुंदगोळ, गोवा, बंगळूर, इंदूर, देवास, तसेच सिंगापूर आदी ठिकाणी गानमैफली सादर करताना त्या त्या ठिकाणचे श्रोते, त्यानुसार मैफलीची मांडणी आणि त्यातून नवीन विचार...असं एक सुरेल चक्र सुरू झालं. 

माझ्या सांगीतिक प्रवासात आणखी एक महत्त्वाचा उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे सुयोगचा. सुयोग हा एक उत्तम हार्मोनिअमवादक म्हणून सगळ्यांना परिचित आहेच; पण त्याचबरोबर एक समंजस जोडीदार व माझ्या वाटचालीविषयी जाणीवपूर्वक आपली मतं नोंदवणारा, असा सुरेल साथसंगतकार मला संगीतमैफलींमध्ये आणि सहजीवनातही अनुभवायला मिळतो. 

माझ्या मागं नेहमीच खंबीरपणे उभे असणारे माझे कुटुंबीय, माझा थोरला भाऊ वीरेंद्र आणि त्याचा परिवार, माझे सासू-सासरे, माझा सगळा सांगीतिक मित्रपरिवार, माझे सगळे साथसंगतकार यांचा खूप मोठा वाटा माझ्या सांगीतिक प्रवासात आहे. 

आपल्यापर्यंत पोचलेलं हे विद्यादान पुढच्या पिढीपर्यंत पोचवावं, यासाठी मी आणि सुयोगनं 'स्वरावर्तन फाउंडेशन'ची स्थापना केली आहे. विद्यार्थ्यांना गायन-वादन शिकवणं, त्यांना संगीतपरंपरेची नीट ओळख करून देणं, उत्तमोत्तम बंदिशी शिकवणं, त्यांच्या मंचप्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करणं असे विविध उपक्रम आम्ही राबवतो. माझ्या गुरू स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना सांगीतिक मानवंदना म्हणून गेली चार वर्षं आम्ही 'स्वरप्रभा संगीतमहोत्सवा'चंही आयोजन करत आहोत. आमच्या फाउंडेशनद्वारे अनेक बुजुर्ग आणि नवोदित कलाकारांच्या गायनाचे कार्यक्रम आम्ही आजवर केले. 

आई-वडील, रसिकजन यांच्या आशीर्वादामुळं इथपर्यंतची वाटचाल मी करू शकले. आणखी अभ्यास करून पुढं जात राहणं, कलाप्रवासात उन्नत होत राहणं आणि हा प्रवास उत्तम सांगीतिक वातावरणात व्हावा, यासाठी मला आशीर्वाद मिळावेत. 

शेवटी स्वरचित पद्यातून म्हणावसं वाटतं : 
सप्तसुरांच्या साथीने वाट ही चालते आहे 
इंद्रधनू समोर माझ्या, क्षितिज अजून लांब आहे 
गुंफला गजरा सुरांचा दरवळतो सुवास आहे 
अथांग कलासागरातील स्वरमोती वेचित मी पुढे जात आहे
 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Classical Music