'सुकन्या' बनेल 'समृद्ध' (वसुधा जोशी)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

केंद्र सरकारतर्फे राबवली जाणारी 'सुकन्या समृद्धी योजना' अतिशय उपयुक्त आहे. प्राप्तिकरासाठी 80 सीअंतर्गत मिळणारी वजावट आणि मुलीच्या भविष्याच्या तरतुदीसाठी बचत करण्याची लागणारी सवय अशा दोन गोष्टींमुळं ही योजना महत्त्वाची आहे. 

खर्च आटोक्‍यात ठेवून आणि काटकसर करून आपण जे पैसा साठवतो ते योग्य प्रकारे गुंतवले तरच फायदा होतो. योग्य गुंतवणूक म्हणजे काय, तर 'जिच्यातून आपल्याला आकस्मिक गरजेसाठी रोख पैसा हवा तेव्हा उभा करता येईल आणि जी रोखतेची गरज न भासल्यास चांगला परतावा देईल,' अशी गुंतवणूक. किती काळासाठी किती पैसा गुंतवायचा आहे याचा आणि परताव्यावर किती प्राप्तिकर भरावा लागतो याचाही गुंतवणुकीच्या निर्णयाआधी विचार करावा लागतो. 

या सर्व घटकांचा एकत्रितपणे विचार केल्यावर असं दिसून येतं, की केंद्र सरकारच्या अल्पबचत योजना या सुरवातीच्या गुंतवणुकीसाठी योग्य असा पर्याय आहेत. सरकारच्या वित्त मंत्रालयातल्या अल्पबचत विभागातर्फे या योजना तयार होतात. त्यांच्या कार्यवाहीवर देखरेख ठेवण्याचं, नव्या योजना आखण्याचं काम याच विभागाकडून होतं. पोस्ट ऑफिस आणि ठराविक सार्वजनिक बॅंकांच्या शाखा यांच्यामार्फत या योजना राबवण्यात येतात. सर्वसामान्य जनतेला बचत करायला उद्युक्त करणं आणि ती बचत विकासाच्या योजनांसाठी गुंतवणं हे या सर्व योजनांचं उद्दिष्ट. 

पोस्टातल्या मुदत ठेवी, आवर्ती ठेवी, मासिक उत्पन्न योजना, किसान विकासपत्र, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धी योजना या सध्याच्या प्रमुख अल्पबचत योजना असून, त्यातली सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी ही अतिशय लोकप्रिय योजना आहे. 22 जानेवारी 2015 पासून सुरू झालेली 'सुकन्या समृद्धी योजना' हीदेखील विकासकार्यातले सरकारचे अग्रक्रम आणि सर्वसामान्य लोकांची बचत यांची उत्तमरीत्या सांगड घालते. 

प्राप्तिकरातल्या सवलती लक्षात घेता अल्पबचत योजनांवरचा परतावा उजवा ठरतो. मात्र, पोस्टाच्या कामातला लोकांनी गृहीत धरलेला विलंब आणि या योजनांची कमी प्रसिद्धी, मधल्या दलालांचं कमी कमिशन वा दलालांना फाटा यांमुळं या योजना खासगी योजनांच्या सततच्या जाहिरातींपुढं फिक्‍या पडतात. त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. 

सुकन्या समृद्धी योजना अतिशय उपयुक्त अशी योजना आहे. या योजनेत दहा वर्षांहून कमी वय असलेल्या मुलीच्या नावानं पालकांनी खातं उघडायचं आहे. एक पालक फक्त दोन खाती उघडू शकतो - एका मुलीसाठी एक याप्रमाणं. पोस्ट ऑफिस किंवा विहीत बॅंक शाखेमध्ये एक हजार रुपये एवढी किमान रक्कम भरून खातं उघडावं लागतं. त्यावेळी पालकांजवळ मुलीचा जन्मदाखला, स्वतःची ओळख आणि निवास दर्शवणारी कागदपत्रं असणं आवश्‍यक आहे. खातं उघडल्यानंतर दर वर्षी किमान एक हजार रुपये आणि कमाल दीड लाख रुपये भरून खातं चालू ठेवावं लागतं. किमान रक्कम एकदाच वा शंभर रुपयांच्या पटीत भरलेली चालते. पैसे ऑनलाइन भरता येतात आणि जिच्या नावानं खातं आहे, ती मुलगी स्वतःही पैसे भरू शकते. 

उघडलेलं खातं 14 वर्षं चालू ठेवावं लागतं. खातं उघडल्यापासून 21 वर्षांनी ते परिपक्व होतं. त्यानंतर खात्यातल्या साठलेल्या रकमेवर व्याज दिलं जात नाही. मुदतीच्या काळात सध्या 8.1 टक्के दरानं व्याज दिलं जातं. (अल्पबचत योजनांवरचे व्याजदर तिमाहीसाठी ठरवले जातात. सर्व व्याजदर कमी होण्याकडं सध्याचा कल आहे.) खात्यातल्या रकमेवर दर महिन्याच्या दहा तारखेला व्याज काढलं जातं. 

मुलगी दहावी पास झाल्यानंतर खात्यातून पैसे काढता येतात; तसंच मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर खात्यातली सर्व रक्कम काढता येते. म्हणजे तरुण मुलीचं उच्च शिक्षण- नोकरी- लग्न यांसाठी एकरकमी मूल्य उपलब्ध होते. ती उपलब्ध झाल्यास मुलगा आणि मुलगी यांच्यात जो भेदभाव केला जातो त्याचं मुख्य कारण नाहीसं होईल, हा या योजनेचा हेतू आहे. 

मुख्य म्हणजे खात्यात भरलेल्या रकमेचा प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सीखालील वजावटीत समावेश होतो. योजनेमध्ये मिळणारं व्याज आणि खात्यातून काढलेली रक्कम, परिपक्वतेची रक्कम यांच्यावर प्राप्तिकर लावला जात नाही. त्यामुळं मुलींच्या भवितव्यासाठी जोडणी करण्यासाठी ही उत्तम योजना आहे. 
 
'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com