घरातले 'राग'रंग (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख
रविवार, 4 मार्च 2018

राग प्रत्येकालाच येत असतो; पण पालकांचा राग अनेकदा मुलांच्या वर्तणुकीवर, भविष्यावर परिणाम करतो. या रागाची कारणं अनेकदा नात्यांच्या गुंत्यापासून ताणापर्यंत अनेक प्रकारची असतात. मात्र, पालक सतत रागाद्वारे व्यक्त होत असतील, तर मुलं दबून तरी जातात किंवा कोडगी तरी होतात. गोष्टी लपवून ठेवायला लागतात. चुकीच्या व्यक्तीकडं ओलावा शोधत फिरतात. 

राग प्रत्येकालाच येत असतो; पण पालकांचा राग अनेकदा मुलांच्या वर्तणुकीवर, भविष्यावर परिणाम करतो. या रागाची कारणं अनेकदा नात्यांच्या गुंत्यापासून ताणापर्यंत अनेक प्रकारची असतात. मात्र, पालक सतत रागाद्वारे व्यक्त होत असतील, तर मुलं दबून तरी जातात किंवा कोडगी तरी होतात. गोष्टी लपवून ठेवायला लागतात. चुकीच्या व्यक्तीकडं ओलावा शोधत फिरतात. 

'आई-बाबा रागावले म्हणून पाचवीतला मुलगा घर सोडून निघून गेला,' अशी एक बातमी काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये वाचली. अशा आणि याहून अधिक तीव्रतेच्या बातम्या आपण अधून-मधून वाचतो, ऐकतो. वाचून काही वेळा मुलांच्या बेजबाबदार वागण्याबद्दल खंत व्यक्त करतो, कधी आई-बाबांच्या अतिसंतापावर खापर फोडतो, तर कधी 'आपल्यावरही अशी वेळ येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही,' या कल्पनेनं कासावीस होतो. पालक म्हणतात ः 'शिस्त लावायची तर काही वेळा तरी रागवावं लागणारच. आई-बाबा म्हणून इतकाही हक्क नाही का आम्हाला? आणि मुलंसुद्धा काही कमी नसतात, सहनशीलतेचा अंत पाहतात अगदी.' 

मुद्दा असा, की हे रागावणं हाताबाहेर जातंय का? आणि आपल्या रागाला मुलं पूर्णपणे जबाबदार असतात का? आई-बाबांचे मुलांबरोबरचे बहुतेक संवाद भविष्याच्या काळजीनं माखलेले असतात, हे खरंय. आजची गळेकापू स्पर्धा, एकाकीपणा, लिमिटेड माणुसकी अशा समस्यांनी भरलेल्या जगात कसं निभावणार आपल्या मुलाचं? त्यासाठी आपल्या मुलांनी सक्षम व्हायला हवं, खूप शिकायला हवं, सगळ्या क्षेत्रात चमकायला हवं असं वाटणारच की! मग चिडचिड का बरं होते? 

हे काही प्रसंग पाहूया. 

सनत शाळेतून घरी आला, तेव्हा वातावरण तंग होतं. आई-बाबांचा काहीतरी वाद झाला होता वाटतं. आई काही न बोलता भराभरा कामं करत होती. बाबा अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. आल्याआल्या सनतनं नेहमीप्रमाणं बूट-मोजे काढून भिरकावले; मात्र बाबा एकदम स्फोट झाल्यासारखे ओरडायला लागले त्याच्यावर. 

*** 

आदिती मैत्रिणींबरोबर पार्टीला गेली होती. परत आली तेव्हा समोर सोफ्यावर लोळत टीव्ही बघणाऱ्या समीराला बघून तिचा संताप अनावर झाला. ''काय बघावं तेव्हा लोळत पडलेली असतेस गं? इतरांची मुलं बघ कशी अभ्यास करतात, भरपूर मार्क्‍स पाडतात, स्कॉलरशिप मिळवतात. जरा झडझडून कष्ट करायला काय होतं तुला?'' 

*** 

''निशांत, खोटं बोललास तू? आज खोटं बोललास, उद्या पैसे चोरशील, परवा आणखी काही करशील. मग चोर-दरोडेखोर व्हायला कितीसा वेळ? का अंडरवर्ल्डचा दादा व्हायचंय? हेच शिकवलं का मी तुला लहानपणापासून? लोक नावं ठेवतील आम्हालाच!'' 

*** 

सनतच्या आईबाबांचं एकमेकांशी भांडण झालं नसतं किंवा आदिती मैत्रिणींच्या मुलाचं कौतुक ऐकून आली नसती किंवा लोक काय म्हणतील याचा निशांतच्या आईबाबांनी विचार केला नसता, तर हेच प्रसंग कदाचित वेगळे घडले असते. 

राग ही एक प्राचीन, मूलभूत भावना आहे. हजारो वर्षांपासून मेंदूमधली सर्किट्‌स यासाठी तयार झाली आहेत. आदिमानवाला जीवघेण्या संकटांपासून बचाव करण्यासाठी राग फार उपयोगी पडत असे. खरं पहायला गेलं, तर आजच्या दैनंदिन जीवनात तशी काही जिवावरची संकटं नसतात, तरी प्रतिक्रिया मात्र तशीच आणि तितक्‍याच तीव्रतेची दिली जाते. ऍड्रिनॅलीनसारखी रसायनं स्रवतात. छातीत धडधड व्हायला लागते, स्नायू ताठरतात, हातपाय फुरफुरायला, शिवशिवायला लागतात. मोठ्या मेंदूचा वापर करून, विचार करून बोलण्याऐवजी तोंडातून फटकन शब्द निघतात. ताबडतोब काहीतरी कृती करावी असं वाटतं; पण खरं तर त्या वेळी काहीच न करणं शहाणपणाचं ठरतं. कारण त्यावेळी आपला पुरातन, पशुवत मेंदू जोमात असतो, त्यावर विचारांचं नियंत्रण नसतं. शिवाय राग असतो साथीच्या रोगासारखा. म्हणजे रागानं राग पसरतो, वाढतो. परिस्थितीच्या आगीवर पाणी घालून ती विझवण्याऐवजी त्यात तेल ओतून तो ती अधिकच भडकावतो. दुसऱ्यावर कुरघोडी करणं हा एकमेव उद्देश शिल्लक उरतो. आपला राग अनाठायी होता हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. ऍरीस्टॉटलनं म्हटलंच आहे ः 'रागावणं सोपं आहे; पण योग्य व्यक्तीवर, योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात रागावणं, हे मात्र अवघड आहे.' 

तणाव आणि राग यांचं एकमेकांशी खूप जवळचं नातं आहे हे सिद्ध झालंय. इन फॅक्‍ट, ताणतणाव अति झाले, की त्यांची परिणती रागात होते. 

मुलांच्या गरजा, आवडीनिवडी, प्रतिक्रिया याविषयी आपल्या काही ठराविक कल्पना असतात. त्यांना छेद देणारी परिस्थिती आली, की आपण कुठंतरी कमी पडतोय ही भावना येते आणि त्यामुळंही ताण येतो. आता हेच पाहा ना, सार्वजनिक ठिकाणी मूल रडायला लागलं की काय होतं? आपण गोरेमोरे होऊन आजूबाजूला बघायला लागतो, सगळी शक्ती एकवटून ते रडणं थांबवायचा प्रयत्न करायला लागतो. 'काय आई आहे, साधं स्वत:च्या मुलाला शांत करता येत नाही हिला,' अशी लोकांच्या मनातली भावना त्यांच्या कटाक्षांमध्ये स्पष्ट उमटलेली दिसते आपल्याला. तो ताण, ती वैफल्याची भावना आपल्याला अस्वस्थ करते. ही अस्वस्थता रागामध्ये कधी रूपांतरीत होते, त्याचा पत्ताही लागत नाही. 

वेळ ही गोष्ट फार दुर्मिळ झालीये आधुनिक जगात. वेळेचा अभाव हाही ताण उत्पन्न करतो. त्यामुळे आपण घाईत असतो तेव्हा राग जास्त पटकन येतो. आपल्याला खूपदा जाणवलं असेल, शहरापासून थोडं दूर गेलो की किती निवांत असतात लोक; पण शहरात मात्र साधं रस्त्यावरून चालत असताना कुणी मध्ये-मध्ये आलं, तरी लोक उतावीळ होतात. गाडी चालवताना तीच कथा. सिग्नलचे काही सेकंद असह्य होतात. सांदीकोपऱ्यातून गाड्या पुढे नेण्याचा प्रयत्न करत, कर्णकटू हॉर्न वाजवत तिथं अगदी रणांगण बनतं. हाच 'इम्पेशन्स' आपण बाहेरून आपल्याबरोबर घरी घेऊन येतो. मग तो दबा धरून बसलेल्या प्राण्यासारखा एखाद्या छोट्याशा ठिणगीनंही रागाच्या स्वरूपात भडकून बाहेर पडतो. 

पालकांच्या सततच्या रागाला तोंड देतादेता मुलं एक तर दबून तरी जातात किंवा कोडगी तरी होतात. गोष्टी लपवून ठेवायला लागतात. चुकीच्या व्यक्तीकडं ओलावा शोधत फिरतात... आणि ताण किंवा राग कसा हाताळायचा ते परिस्थितीवरची आईबाबांची प्रतिक्रिया पाहून ठरवतात. 

आपण जेव्हा आतून शांत, समाधानी असतो, तेव्हा राग येण्याची शक्‍यता कमी असते. अशा वेळी आपण परिस्थितीवर काही तरी उत्तर शोधायचा प्रयत्न करतो किंवा काही वेळा चक्क हसून सोडूनही देतो. 'ऑल इज वेल!' असं वाटत असतं आपल्याला; पण तसं नसेल तेव्हा मात्र आपण मनातल्या मनात काहीबाही बोलायला लागतो. 'काय चाललंय हे? अगदी चुकीचं आहे. मला असं बोलतो? काय किंमत राहिली माझी? लोक काय म्हणतील? किती वेळा तेच तेच सांगायचं?...' याचा अर्थ आपल्याला केव्हा, किती राग येणार आणि आपली त्यावरची प्रतिक्रिया हे आपल्या मानसिक स्थितीवर अवलंबून असतं. आपल्या भावना ही संर्पूणपणे आपली जबाबदारी आहे, दुसरं कुणी त्या मॅनेज करतंय असं वाटलं तर आपण असहायपणे त्यात वाहवत जाणार. असं म्हणतात, की 'अँगर इज अ गुड सर्व्हंट बट अ बॅड मास्टर.' तो आपल्या ताब्यात असतो तोपर्यंत ठीक असतं; पण एकदा का तो आपल्यावर अधिराज्य गाजवायला लागला, आपण त्याच्या कह्यात गेलो, की संपलं! असं जर असेल तर 'मुलं आपल्याला चिडीला आणतात' हे विधान कितपत खरं आहे? 

मानसतज्ज्ञांच्या मते सारखी चिडचिड करणं हे भावनिक अनारोग्याचं लक्षण आहे. तसं होत असेल, तर त्या रागाखाली दडलेली मूळ भावना ओळखून काढायला लागेल. निराशा? हताशपणा? असहायता? सततची घाई? अपराधीपणा? वैयक्तिक ताणतणाव? नवरा-बायकोच्या नात्यात भ्रमनिरास झाल्यामुळे आलेली विफलता? की आणखी काही? मग कदाचित लक्षात येईल, की आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुष्याची गती थोडी मंद करायला हवीये, थोडाफार व्यायाम करायला हवा, आपल्या ताणतणावाचं नियोजन करायला हवं, नाती 'सॉर्ट आऊट' करायला हवीत आणि फारच हाताबाहेर जातंय असं वाटलं तर समुपदेशकाच्या मदतीनं याचा उलगडा करून घ्यायला हवा. 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Parenting tips Vaishali Deshmukh