भूमिका मार्गदर्शकाची हवी (मेघना जोशी)

meghana joshi
meghana joshi

पालकाची मुख्य भूमिका ही पूर्ण पालनकर्त्याचीच नाही, तर मार्गदर्शकाचीही आहे. मात्र, ही मार्गदर्शकाची भूमिका आपण विसरलोय का? शाळेची पुस्तकं वाचणं, गृहपाठ लिहिणं हे आपलं काम नाही- ते मुलांचं काम आहे; पण गेल्या काही वर्षांत मी अनेकांकडून असं ऐकलंय, की ‘त्याला किंवा तिला वाचायचा फार कंटाळा आहे हो- त्यामुळे आम्हीच पुस्तकं वाचून दाखवतो.’ अलिखाणाबाबत बोलाल, तर मेडिकलला असलेल्या मुलाची जर्नल्स पूर्ण करण्यासाठी आईनं काही दिवस रजा घेतलेली मी पाहिली आहे. आता समजतोय का भूमिकांमधला गोंधळ?

ऑनलाईन शिक्षण ही गोष्ट आता नवीन राहिली नाहीय. सध्याचं जग सुपरफास्ट आहे, त्यामुळे महिना दोन महिने एखादी गोष्ट चालू राहिली, की ती जुनी झाली असं म्हणणं कोणाला खटकू नये नाही का? पण त्याबाबत अजूनही चर्चा होतेय, फोटो व्हायरल होतायत आणि ऑनलाईन शिक्षणाबाबत आवडीनं चर्चा होतायत. कोणतीही गोष्ट नव्यानं राबवली जात असताना त्याबाबत चर्चा घडणं, ते कसं सोपं, कसं कठीण वगैरे मतं मांडणं अगदी नैसर्गिक आहे; पण सतत त्याच त्याच मुद्द्यांची चर्चा घडत राहिली, तर मात्र कदाचित ते कंटाळवाणं किंवा नैराश्याकडे नेणारं होतं. अगदी तसाच अनुभव आत्ता येतोय.

हे सगळं लिहिण्याचं कारण ठरलं ते परवाच एका महिलेशी झालेली भेट. बाई सांगत होत्या, की ‘अहो काय सांगू? मी सध्या चार जीबीऐवजी दीड जीबीचं नेट पॅक मारलंय त्यामुळे मुलीचा अभ्यास नाही हो होऊ शकत. का बरं?’ त्यांच्या प्रश्नाला माझं उत्तर ‘आज पूर्णपणे शिक्षण हे मोबाईलशी संबंधित झालेलं आहे ना, तो नसेल तर अभ्यास होणारच कसा,’ वगैरे मुद्दयांशी संबंधित होतं. एकंदर असंच वाटलं मला, की मोबाईल किंवा लॅपटॉप वा संगणक नसेल, तर अभ्यास गायबच होईल.

ही घटना घडली आणि त्या दिवशीच संध्याकाळी सोशल मीडियावर एक फोटो आला- ज्यात आजी संगणकासमोर अभ्यास करतेय आणि मुलगा त्याकडे पाठ करून् मान खाली घालून बसलाय असा. मग काही दिवसांनी त्याचं उत्तर म्हणून आजी संगणकाकडे पाठ करून मान खाली घालून बसलीय आणि मुलगा आजीच्या पाठीवर जोर देत आकाशातले चंद्र, सूर्य तारे पाहतोय असा एक फोटो वायरल झाला.
हे सगळं पाहिलं आणि एक गोष्ट सांगावीशी वाटलीच. आपलं मूल ही एक वेगळी व्यक्ती आहे, ती आपल्यापेक्षा वेगळी व्यक्ती आहे हे अगदी मूल जन्मल्यापासून कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हो, हो, हे ऐकून ऐकून पाठ झालंय, मला माहीत आहे पण त्याचं आचरण करताना काहीतरी गफलत होते. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आजकाल जवळजवळ सारेचजण मुलांबाबत बोलताना ‘त्याला नाही बाबा असं आवडत, त्याला की नाही अमुक अमुकाचा कंटाळा आहे.’ असं सहज म्हणतात. मुलांची आवड आणि आपली आवड वेगवेगळी असू शकते. त्याला किंवा तिला हे आवडत नाही असं आपण म्हणू शकतो ना. त्याची आवड आपल्यापेक्षा वेगळी आहे, ती चांगली किंवा वाईट आहे वगैरेवरही आपण भाष्य करू शकतो. हो, हो, भाष्य करायलाच हवं कारण त्यांची एखादी आवड किंवा त्यांच्या काही आवडी त्यांच्या प्रगतीला मारक असतात हे सांगण्याचं काम आपलंच आहे ना. पालकाची मुख्य भूमिका ही पूर्ण पालनकर्त्याचीच नाही तर मार्गदर्शकाचीही आहे.

वर उल्लेख केलेलं चित्र पाहून मला हेच वाटलं, की ही मार्गदर्शकाची भूमिका आपण विसरलोय का, जशी ती आजी विसरली तशीच. म्हणजे पाहा हं, शाळेची पुस्तकं वाचणं, गृहपाठ लिहिणं हे आपलं काम नाही- ते मुलांचं काम आहे; पण गेल्या काही वर्षांत मी अनेकांकडून असं ऐकलंय, की ‘त्याला किंवा तिला वाचायचा फार कंटाळा आहे हो- त्यामुळे आम्हीच पुस्तकं वाचून दाखवतो.’ अलिखाणाबाबत बोलाल, तर मेडिकलला असलेल्या मुलाची जर्नल्स पूर्ण करण्यासाठी आईनं काही दिवस रजा घेतलेली मी पाहिली आहे. आता समजतोय का भूमिकांमधला गोंधळ? आजीनं पर्यवेक्षकाची किंवा मार्गदर्शकाची भूमिका सोडून विद्यार्थ्याची भूमिका घेतली- त्यामुळे त्याला काही काम उरलं नाही आपसूक आलाच की कंटाळा. स्वावलंबन आणि जबाबदारी स्वीकारणं हे शिक्षणाचं अंतिम आउटपूट आहे हे विसरलं जातंय ह्या सगळ्यांत.

हे असं का घडतं किंवा का घडलं हा प्रश्न मी वारंवार मलाच विचारला, तेव्हा असं जाणवलं की पर्यवेक्षण करणं वा मार्गदर्शन करणं हे संयमाचं काम आहे आणि स्वत:च काम करून मोकळं होणं हे त्यापेक्षा सोप्पं आहे. म्हणजे बघा हं, आपण आई किंवा आज्जीच्या हाताखाली पोळ्या करायला शिकलो असू तर लगेच लक्षात येईल मी काय म्हणत्येय ते. शेवटचे दोन कणकेचे गोळे आपल्या नावानं ठेवलेले असायचे करायला. ते उरले, की हाक यायची. मग आपण जायचो पोळ्या करायला आणि मग सूचना : ‘गोळा नीट करून घे हातावर, अग चिकटतो कसा, पीठ लाव हाताला, ठेव आता पोळपाटावर, लाट बघू’ वगैरे वगैरे आणि एवढं करूनही तो परत चिकटायचाच पोळपाटाला. यावेळी शिकवणारी जर का ताई असेल तर खस्सकन पोळपाट ओढून घ्यायची समोरचा. म्हणायची ‘जा तू बाहेर, मी करते.’ आपण मनात हुश्श. तीच जर का आई असेल तर आई चिकटलेला गोळा हातानं काढायची, तो नीट करायची, परत कणकेत घोळवत म्हणायची : ‘लाट आता.’ मात्र, आजी असेल, तर ती अनेक सूचना देत ते सगळं आपल्याकडून करून घ्यायची. त्यात आजीची शक्ती आणि वेळ दुप्पट का तिप्पटही वाया जायचा; पण आपलं शिक्षण मात्र पूर्ण व्हायचंच. अगदी हेच आत्ता घडतंय. मुलांचा अभ्यास करवून घेणं, त्यासाठी वेळप्रसंगी साम, दाम, दंड, भेद वापरणं यापेक्षा तो आपण करून टाकणं जास्त सोयीचं.

जपानमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला पालक उभे राहतात आणि त्या रस्त्यावरनं मुलं आपापली शाळेला जातात. बघा बरं, जपानी लोकं आपल्या मुलांना कसं स्वावलंबन शिकवतात ते असं म्हणणारे आपण मात्र आपल्या मुलांना, ‘अरे, तुझं पाठ्यपुस्तक आहे ते तू दहांदा वाच, काही अडलं तर मी मदत करतो किंवा करते’ असं म्हणण्याची आणि करण्याची जबाबदारी का घेत नाही? आणि आपल्या मुलांना स्वावलंबन शिकवण्याची संधी आलेली असताना तिचा फायदा का करून घेत नाही? याचं कारण आपला उतावळेपणा तर नसावा ना.

‘अति घाई संकटात नेई’ किंवा ‘सब्र का फल मीठा होता है।’ हे सुविचार आपल्या फक्त शाळेतल्या फळ्यापुरते मार्यादित राहिले की काय कोण जाणे! आपल्या मुलांना आपण बालवाडीत बारावी आणि पाचवीत आयआयटी असं का खेचतो, का एवढी ओढाताण त्यांची? आठवीत देता येणारी चित्रकला परीक्षा सहावीत देता आली पाहिजे वगैरे वगैरे वाद घालणारे पालकही मी पाहिले आहेत.
‘जेनू काम तेनू थाय’ असं माझी आजी लहानपणी आम्हाला सांगायची. त्याला हे दोन्ही आयाम आहेत म्हणजे बहुआयामी बुद्धिमत्तेचाही आणि वाढीनुसार येणाऱ्या प्रगल्भतेचाही. शिक्षण या गोष्टीला तात्त्विक, सामाजिक, मानसशास्त्रीय, आर्थिक अशा अनेकविध अंगांचा स्पर्श होतो हे आपण विसरूनच गेलोय आणि अडकलोय ते फक्त मिळणारे मार्क्स आणि येणारा पैसा यातच.

त्यामुळे अजूनही वेळ गेली नाहीय. सरकार म्हणतंय ‘शाळा बंद शिक्षण चालू’ याचा सकारात्मकतेनं विचार करू. मोबाईल, टीव्ही, पाठ्यपुस्तकं, आकाशवाणी वगैरे वगैरे उपलब्ध पर्यांयांपैकी शक्य असेल ते वापरू आणि मुलाचं शिक्षण थांबणार नाही यासाठी मार्गदर्शक किंवा पर्यवेक्षक बनू. एकापेक्षा अधिक मार्ग वापरू शकलो तर फळ नक्कीच जास्त आणि चांगलं मिळेल. सध्याचे दिवस खडतर आहेत, ते जाणार आहेतच. संगीतकार अनिल मोहिलेनी एका मुलाखतीत सांगितलं, की खडतर गोष्टी असाव्यातच कारण या ‘खडतर’ काळातच ‘खरंतर’ नवनिर्मिती होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com