मिशन कारगिल (अनिल पवार)

anil pawar
anil pawar

सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता आणि देशावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतीयांनी आपल्या भागाला आवर्जून भेट द्यावी, असं कारगिलवासीयांना वाटतं. कारगिलच्या सर्वंकष विकासात शिक्षण आणि पर्यटन ही क्षेत्रं मोठी भूमिका बजावू शकतात. त्यातही पर्यटनविकासाच्या प्रयत्नांना वेग मिळाल्यास नजीकच्या काळात इथलं चित्र आमूलाग्र बदलू शकेल. राज्य सरकार, पर्यटन-व्यावसायिक, खासगी संस्था आणि सेवाभावी संघटना यांच्या पुढाकारानं कारगिलचा कायापालट करणारं हे ‘मिशन कारगिल’ यशस्वी व्हायला हवं.
जम्मू-काश्‍मीर सरकारच्या पर्यटन विभागानं आयोजिलेल्या दौऱ्यात सहभागी होऊन नोंदवलेली निरीक्षणं.

भर दुपारची वेळ होती; पण काश्‍मीरमध्ये उन्हाळा सुरू असूनही उन्हाचा चटका अजिबात जाणवत नव्हता. साहजिकच उन्हामुळं घामाघूम होण्याचा प्रश्‍न नव्हता; पण ज्या रस्त्यानं आमची गाडी जात होती तो भाग पाहून खरोखरच घाम फुटेल असं वाटत होतं. कारगिलपासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावरच्या हुंदरमान गावाकडं आम्ही जात होतो. तिकडं जाणारा रस्ता उंचच उंच डोंगररांगांचा नि खोल दऱ्यांचा. समोरच्या डोंगराकडं बघताना छातीत धडकी भरावी नि खाली दरीतल्या नदीकडं नजर टाकली तर डोळे गरगरावेत अशी स्थिती. ज्या डोंगररस्त्यानं आमची गाडी जात होती तो रस्ताही नागमोडी वळणाचा नि थरकाप उडवणारा. त्यामुळं एकाच वेळी धास्ती, धाकधूक नि उत्सुकता अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ मनात उसळला होता. अचानक एका चढावर गाड्या थांबल्या नि सगळे पटापट खाली उतरले. हुंदरमान गावाचा फलक असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळ आम्ही उभे होतो...

निसर्गाच्या वैविध्यानं नटलेल्या कारगिलमधल्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळावं यासाठी जम्मू-काश्‍मीर सरकारच्या पर्यटन विभागाच्या वतीनं प्रसारमाध्यमांचे आणि अन्य राज्यांतल्या पर्यटन कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी आयोजिलेल्या भेटीच्या निमित्तानं आम्ही बटालिक सेक्‍टरमध्ये आलो होतो. आमच्या सोबत असलेले समन्वयक अश्रफ अली सांगत होते : ‘‘खाली दरीत झाडीमध्ये लपलेलं गाव आपलं आहे नि दूरवर हिरव्यागार झाडीमध्ये दिसणारं गाव पाकिस्तानचं आहे. त्या गावाच्या वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचा जो ठिपका दिसतोय ती मशीद आहे. दोन्ही गावांच्या मध्ये देशाची सीमा आहे.’’

आम्ही ज्या रस्त्यावर उभे होतो त्याला लागून डोंगरावर सिमेंटचं बांधकाम असलेलं भारतीय लष्कराचं ठाणं होतं, तर समोरच्या हाथी माथा डोंगराच्या टोकावर दोन पांढरे ठिपके दिसत होते. दुर्बीणीतून पाहिलं तेव्हा ती भारतीय ठाणी असल्याचं समजलं. समोरच्या बाजूला खाली दरीत पाकिस्तानी हद्दीच्या बरंच अलीकडं नदीकाठी भारताचं हेलिपॅड आहे. सीमेवरच्या भारतीय ठाण्यांना लागणारी रसद आणि अन्य सामग्री हेलिकॉप्टरनं तिथं उतरवली जाते आणि खेचर, घोड्यांच्या मदतीनं वळणावळणाच्या पायवाटेनं शिखरावरच्या ठाण्यांपर्यंत नेली जाते. उजवीकडच्या शिखरावर आपली, तर त्याच्या पलीकडच्या शिखरावर पाकिस्तानची ठाणी होती. नुसत्या डोळ्यांनी ती दिसणं अवघडच होतं. गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी इथल्या हुंदरमान गावाचं स्थलांतर करण्यात आलं आहे. याच भागातून पाकिस्तानी सैनिकांनी कारगिल शहरावर तोफगोळ्यांचा वर्षाव केला होता. हे सगळं ऐकताना नि बघताना थरारून जायला होतं.
‘ऊन्ह, थंडी, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता आपले जवान डोळ्यांत तेल घालून सीमेचं रक्षण करतात,’ हे घरी बसून वाचताना वा चित्रपट-टीव्हीवर बघताना आपल्याला कल्पना येत नाही; पण आपले जवान एकीकडं शत्रूशी, तर दुसरीकडं किती खडतर परिस्थितीशी सामना करत असतात हे सीमेवर नुसतं बघतानाही अंगावर काटा येतो.

जवानांनी घडवला नवा इतिहास
अलीकडच्या काळात सर्वाधिक उंचीवर म्हणजे १५ ते १७ हजार फूट उंचीवर लढलं गेलेलं युद्ध अशी सन १९९९ मधल्या कारगिल युद्धाची ओळख आहे. फेब्रुवारी १९९९ मध्ये कारगिल, द्रास, बटालिक सेक्‍टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी आपल्या अतुलनीय शौर्यानं नि सर्वोच्च त्यागानं नवा इतिहास घडवला. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या विजयाला यंदा ता. २६ जुलैला २० वर्षं पूर्ण झाली. निसर्गसौंदर्यानं नटलेल्या कारगिलचं नाव देशात नि जगातही सर्वतोमुखी झालं ते या युद्धामुळेच.
उंच डोंगर, गगनचुंबी शिखरं, खोल दऱ्या, उणे तापमानाचा गारठा, सहा सहा महिने कारगिलचा श्रीनगरशी संपर्क तोडणारी तुफान हिमवृष्टी...अशी मानवी क्षमतेची कसोटी पाहणारी परिस्थिती श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरच्या कारगिल-द्रास-बटालिक टापूमध्ये असते. हीच बाब हेरून पाकिस्तानी सैनिकांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये १७० किलोमीटरच्या पट्ट्यात ताबारेषेपासून आठ किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून डोंगरावरच्या मोक्‍याच्या ठिकाणांवर कब्जा मिळवला. त्याद्वारे श्रीनगर-लेह या महत्त्वाच्या महामार्गावर नियंत्रण मिळवून भारतीय लष्कराची रसद तोडण्याचा त्यांचा डाव होता. टोकाची प्रतिकूल परिस्थिती असतानाही पाकिस्ताननं केलेलं हे दुःसाहस हा भारतासाठी मोठाच धक्का होता. सुरवातीला ‘ही घुसखोरी मुजाहिदीनांनी केली आहे,’ असं भासवण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला; पण हे थेट पाकिस्तानी सैनिकांचं कृत्य आहे हे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय लष्करानं मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘ऑपरेशन विजय’ ही मोहीम हाती घेतली आणि ११ आठवड्यांच्या तुंबळ संघर्षानंतर ता. २६ जुलै रोजी रोमहर्षक विजय मिळवला. रक्त गोठवणारी थंडी, अभेद्य हा शब्द कमी वाटावा अशी आव्हानात्मक शिखरं आणि मोक्‍याच्या ठिकाणी अत्यंत सुसज्ज असलेला शत्रू अशा विपरीत परिस्थितीत लढताना पांढऱ्याशुभ्र बर्फावर आपलं रक्त सांडून भारतीय जवानांनी या शिखरांवर तिरंगा फडकवला.

देशासाठी बलिदान केलेल्या जवानांविषयी कृतज्ञता म्हणून द्रासजवळ महामार्गावर ‘कारगिल युद्धस्मारक’ उभारण्यात आलं आहे. सन १९४७ पासून, तसंच कारगिलच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या जवानांचे नामफलक या ठिकाणी लावलेले आहेत. या जवानांच्या त्यागाचं स्मरण आणि भारताच्या विजयाची आठवण म्हणून दरवर्षी ता २६ जुलै रोजी ‘कारगिल विजयदिवस’ साजरा केला जातो. यंदाच्या ‘विजयदिवसा’च्या दोन दिवस आधी कारगिलहून परतताना या स्मारकाला भेट दिली तेव्हा तिथं २६ तारखेच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. त्यामुळं स्मारकाच्या ठराविक भागातच नागरिकांना प्रवेश दिला जात होता. या स्मारकाच्या पार्श्‍वभूमीवर डावीकडचं टोलोलिंग शिखर, तर समोर दूरवर बर्फाच्छादित टायगर हिल शिखर पाहताना ती काबीज करण्यासाठी भारतीय जवानांना कोणतं दिव्य करावं लागलं असेल याची कल्पनाही काळजाचा ठोका चुकवून जाते.

स्थानिक रहिवाशांचं योगदान
कारगिलच्या युद्धात आपले जवान पराक्रम गाजवत होते तेव्हा त्यांना रसद व अन्य मदत पुरवण्यात स्थानिक रहिवासी आघाडीवर होते. याआधीच्याही प्रत्येक युद्धात या रहिवाशांनी जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य चोख बजावलं आहे. कारगिलच्या युद्धात सीमेवरच्या गावांना मोठी झळ पोचली, मोठी जीवित-वित्तहानी झाली; पण तरीही हे गावकरी जवानांच्या मागं खंबीरपणे उभं राहिले. पाकिस्तानी सैन्यानं डागलेले तोफगोळे कधी, कुठून येऊन आदळतील याचा नेम नसे. त्या दिवसांच्या आठवणी सांगताना कारगिलवासीयांच्या अंगावर आजही शहारे येतात आणि पाकिस्तानवरचा रागही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. युद्ध संपल्यानंतर लष्करानं या भागात रस्ते बांधण्यापासून ते रोजगार पुरवण्यापर्यंत अनेक मार्गांनी गावकऱ्यांना मदत केली. त्यामुळं युद्धानंतर सगळंच चित्र बदलून गेलं असं गावकरी सांगतात.

याच भागातल्या सीमेलगत काकसर हे १०० टक्के मुस्लिम लोकवस्तीचं गाव आहे. गावकरी ठार होऊ नयेत; पण ते कायमचे अपंग व्हावेत आणि त्यांना अद्दल घडावी या हेतूनं पाकिस्तानी सैनिक गावावर गोळीबार करतात. इतकं सहन करावं लागत असूनही भारताला साथ देणाऱ्या या गावाला पाकिस्तानी सैनिक ‘काफिरांचं गाव’ असं संबोधून डिवचत असतात. कारगिलच्या युद्धात धारातीर्थी पडलेले कॅप्टन सौरभ कालिया यांचा मृतदेह याच गावातल्या लोकांनी पाकिस्तानच्या हद्दीतून आणला होता. कालिया यांची आठवण म्हणून या गावात दरवर्षी क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते. युद्धात व अन्य प्रसंगीही सीमेवरच्या अनेक गावांतल्या लोकांनी केलेल्या देशसेवेची इतरांना कल्पना असतेच असं नाही.‘कारगिल विजयदिवस’ साजरा करताना जवानांबरोबरच अशा अनाम गावकऱ्यांविषयीही देशवासीयांनी कृतज्ञ असायला हवं. खरं म्हणजे युद्ध जसं रणमैदानावर खेळलं जातं तसंच ते प्रत्येक आघाडीवर लढलं जातं.
जम्मू-काश्‍मीरमधली परिस्थिती सुरळीत होऊ नये अशी शत्रूची इच्छा आहे. ती फोल ठरवण्याच्या प्रयत्नांनाही बळ मिळायला हवं. तशा प्रयत्नांचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे पर्यटन. विशेष म्हणजे कारगिल याही आघाडीवर अग्रेसर आहे.

गेल्या वर्षभरात कारगिलला येणाऱ्या पर्यटकांची संख्या एक लाखापर्यंत वाढली आहे. कारगिलच्या सौंदर्यानं परदेशी पर्यटकांनाही भुरळ घातली आहे. कारगिल हे श्रीनगर-लेह महामार्गावर असल्यानं श्रीनगरमध्ये येणारे पर्यटक लेहकडं जाताना आणि लेहमध्ये येणारे पर्यटक श्रीनगरला जाताना कारगिलमध्ये एका दिवसासाठी थांबत असतात. तिथल्या युद्धस्मारकालाही ते भेट देतात. पर्यटकांचा कारगिलमधला मुक्काम वाढावा यासाठी राज्य सरकार आणि पर्यटन-व्यावसायिकांचे प्रयत्न सुरू आहेत.

खरं तर काश्‍मीरमधल्या अन्य भागांप्रमाणेच कारगिलचा परिसरही अप्रतिम निसर्गसौंदर्यानं नटलेला आहे. निसर्गानं मुक्तहस्तानं इथं उधळण केली आहे. इथल्या डोंगरांचं रौद्रस्वरूप साहसी पर्यटकांना खुणावत असतं. बर्फाच्छादित रमणीय शिखरं, देशातलं सर्वाधिक उंचीचं दुसऱ्या क्रमांकाचं नून-कून शिखर, हिमनद्यांचा अद्भुत आविष्कार, डोंगरावरून वाहत आलेले बर्फाचे ओहोळ, त्याखालून फुटलेले गार पाण्याचे झरे, मोठ्या खडकांवरून उडी घेणारं पाणी, डोंगराच्या पायथ्याशी खळाळत वाहणाऱ्या नद्या, नद्यांतल्या खडकांमुळे उसळी मारणारं पाणी, कुठं चक्क डोंगरावर, तर कुठं डोंगराच्या पायथ्याशी वसलेली टुमदार गावं, त्यांच्या शेजारी हिरवं वैभव ल्यालेली शेतं, रस्त्याच्या कडेला फुललेले जांभळ्या, पांढऱ्या, पिवळ्या रानफुलांचे ताटवे... या सगळ्या वातावरणात भरून राहिलेल्या शांततेत केवळ नदीच्या वाहत्या पाण्याचाच काय तो आवाज ऐकू येत असतो. प्रदूषित नद्यांची डबकी पाहण्याची सवय झालेल्या आपल्या डोळ्यांना कारगिलमधल्या खळाळत्या, पांढऱ्याशुभ्र नद्या पाहून सुखद धक्का बसतो. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी इथं असंख्य उत्तम लोकेशन्स आहेत. या मनोहारी वातावरणाचा पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी अनेक ठिकाणी नदीकाठी रिसॉर्ट सुरू झाली आहेत.

कारगिलच्या पर्यटनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं साहसी पर्यटनासाठी असलेला मोठा वाव. ट्रेकिंग, कॅम्पिंग, सायकलिंग, बायकिंग, रिव्हर राफ्टिंग, रॅपलिंग, हॉर्स पोलो, प्रस्तरारोहण, आईस हॉकी, स्पीड स्केटिंग, स्नो स्कीईंग आदी साहसी क्रीडाप्रकारासांठी कारगिलचा परिसर उत्तम आहे. त्यासाठी तिथं आवश्‍यक त्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत आणि त्यांचा विस्तार करण्यालाही भरपूर संधी आहे. लेह-लडाख, कारगिल हा मार्ग आव्हानात्मक असल्यानं बायकर्सची त्याला मोठी पसंती असते. गेल्या तीन वर्षांपासून ‘कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’मुळं कारगिलची नवी ओळख निर्माण होत आहे. कारगिलच्या युद्धाच्या काळात जवानांना मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या पाठीशी सारा देश आहे, असा विश्‍वास त्यांना देण्यासाठी पुण्यातल्या ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी तिथल्या मुलांच्या शिक्षणाची पुण्यात सोय करणं आदी उपक्रम हाती घेतले. अशा उपक्रमांतूनच, कारगिलच्या पर्यटनाला चालना मिळावी आणि विधायक कारणांसाठी लोक रस्त्यावर यावेत या हेतूनं ‘सरहद’नं सन २०१७ पासून ‘कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ सुरू केली. ‘जवान और अवाम, एकही है मुकाम’ असा संदेश देणारी आणि कारगिलचं देशाच्या अन्य भागांशी नातं जोडणारी ही मॅरेथॉन येत्या ता. २५ ऑगस्टला होणार आहे.

कारगिल परिसरात पाहण्याकरिता, तसंच प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरिता प्रत्येकासाठी काही ना काही आहे. इतिहास, संस्कृती, निसर्ग, साहस, सामाजिक वारसास्थळं यांमुळे हा भाग बहुरंगी झाला आहे. तेव्हा काश्‍मीर खोऱ्यापलीकडचा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येनं इकडं यावं यासाठी राज्य सरकार, तसंच
पर्यटन-व्यावसायिक प्रयत्नशील आहेत. इथल्या पर्यटनाचा मुख्य हंगाम जून ते सप्टेंबर हा असतो. ऑक्‍टोबरमध्ये हिमवृष्टी सुरू झाल्यानंतर श्रीनगर ते कारगिलदरम्यानचा ‘झोजिला पास’ रस्ता एप्रिलपर्यंत बंद असतो. साहजिकच त्याचा परिणाम पर्यटनावरही होतो. ही गैरसोय दूर करण्यासाठी ‘झोजिला पास’पासून बोगद्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. हा बोगदा झाल्यानंतर हा प्रवास सोईचा, सुखकर होईल. लोहमार्गानंही कारगिल जोडण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर येत्या वर्ष-दोन वर्षांत कारगिलसाठी प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे श्रीनगर वा लेहहून कारगिलला रस्त्यानं यावं न लागता थेट कारगिलला येण्याची सोय होईल. शिवाय, अमरनाथ यात्रेकरूंना कारगिलमध्ये येऊन पुढं अमरनाथ यात्रेला जाता येईल. याच्या जोडीनंच डोंगराळ भागात रस्ते, पूल बांधण्याची कामं सुरू आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा अधिक चांगल्या होतील. या पायाभूत सुविधा प्रत्यक्षात आल्यानंतर कारगिलच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
काश्‍मीरखोऱ्यात काही ‘गडबड’ झाली तर त्याचा परिणाम कारगिल, लेह-लडाख अशा शांतता आणि सुरक्षित वातावरण असलेल्या पर्यटनस्थळांवरही होत असतो. पर्यटनावरच इथल्या बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो, तेव्हा सुरक्षेबाबत कोणतीही शंका न बाळगता पर्यटकांनी इथं यावं, असा प्रयत्न स्थानिक आणि अन्य राज्यांतले टूर ऑपरेटर करत असतात. केवळ काश्‍मीरखोरं म्हणजे संपूर्ण जम्मू-काश्‍मीर राज्य नव्हे आणि काही घटनांवरून संपूर्ण राज्यातल्या स्थितीबाबत मत बनवणं योग्य नाही, याचा अनुभव कारगिलच्या दोन दिवसांच्या भेटीत आला. स्थानिक लोक आतिथ्यशील, प्रेमानं स्वागत करणारे आहेत. त्यांच्या वागण्यात नम्रता आणि आपुलकीचा ओलावाही जाणवला.

वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्यामुळं ‘मिनी काश्‍मीर’ अशी कारगिलची ओळख आहे. ही ओळख अधोरेखित होण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना देशवासीयांकडून प्रतिसाद मिळाला तर आपापसातले बंध नि सामाजिक सौहार्द बळकट होण्याला निश्‍चितच हातभार लागेल. सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता आणि देशावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतीयांनी या भागाला आवर्जून भेट द्यावी, असं कारगिलवासीयांना वाटतं. कारगिलच्या सर्वंकष विकासात शिक्षण आणि पर्यटन ही क्षेत्रं मोठी भूमिका बजावू शकतात. त्यातही पर्यटनविकासाच्या प्रयत्नांना वेग मिळाल्यास नजीकच्या काळात इथलं चित्र आमूलाग्र बदलू शकेल. राज्य सरकार, पर्यटन-व्यावसायिक, खासगी संस्था आणि सेवाभावी संघटना यांच्या पुढाकारानं कारगिलचा कायापालट करणारं हे ‘मिशन कारगिल’ यशस्वी व्हावं, अशी अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com