‘सकारात्मक दृष्टिकोन ठेवा’ (मृण्मयी कोलवालकर)

mrunmayee kolwalkar
mrunmayee kolwalkar

निरोगी आरोग्यासाठी योग्य तितका व्यायाम करा. आहार चांगला ठेवा. चांगली झोप लागण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या आयुष्याकडं सकारात्मक दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे. खरं तर हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

वेलनेस म्हणजे माझ्या दृष्टीनं मानसिक आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही गोष्टी आहेत. त्याचबरोबर मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्याचा समतोल असणंही खूप गरजेचं आहे. आयुष्यात मानसिक आरोग्य आणि शांतता नसेल, तर ते शरीराच्या दृष्टीनं योग्य नाही. त्याचबरोबर शारीरिक आरोग्य नसेल, तर त्याचाही तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळं या सर्व गोष्टींचा समतोल असणं गरजेचं आहे. त्यासाठी व्यायाम आणि मेडिटेशन या दोन्हीही गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्यामुळं तुमच्या शरीरासह आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
नियमित व्यायाम, योग्य आहार व व्यवस्थित विश्रांती या तीन गोष्टी उत्तम आरोग्य राखण्याचा मंत्र आहे. आपली बॉडी आणि लाइफस्टाइल रोजच बदलत असते. कलाकारांचं आयुष्य आणि दिनक्रम दररोजच बदलत असतो. त्यात नियमितपणा आणि फिक्‍स रूटिन नसतं. जर एखाद्या दिवशी मी खूप दमले असेन, तर कालसारखाच व्यायाम मी करू शकत नाही. त्यामुळं आपल्या शरीराचं ऐकून मी व्यायामामध्ये बदल करते. तसंच, आहाराची वेळ बदलत असल्यानं त्यानुसारच आहार घेते. कधी काय खावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं. कुणीतरी काहीतरी करतं म्हणून आपणही तसंच करणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला काय सूट होतं, याचा जाणीवपूर्वक विचार करूनच आहार घेणं गरजेचं आहे. निरोगी आरोग्यासाठी योग्य तितका व्यायाम करा. आहार चांगला ठेवा. चांगली झोप लागण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या आयुष्याकडं सकारात्मक दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे. खरं तर हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

समजून-उमजून आहार
मी घरातलं साधं जेवणच खाते. ताजं जेवण नेहमीच उत्तम असतं. अभिनयाच्या क्षेत्रात असल्यानं जेवणाच्या वेळा दररोजच बदलत असतात. कधी चित्रीकरण, प्रवास, ऑडिशन्स आणि बैठकांमुळं जेवणाच्या वेळांमध्ये अनेकदा बदल होतात. सर्वांनाच ठराविक वेळी जेवण घेणं जरा अवघडच असतं. त्यामुळं कधी, काय आणि केव्हा खायचं याचं गणित समजलं, तर आपण नियोजन करू शकतो. मात्र, मी तेलकट वा मसालेदार पदार्थ खात नाही. मात्र, नेहमीचे पदार्थ खाते. मी ऋजुता दिवेकर यांचं आहाराविषयीचं पुस्तक वाचलं आहे. त्यांना मी फॉलो करते. त्यामुळं आहाराबद्दलचा दृष्टिकोन बदलला. कुठलंही फॅड फॉलो न करता नेहमीप्रमाणं मी जेवण करते. सीझननुसार फळं खाते. कारण, त्यामागंही काहीतरी दृष्टिकोन आहे. मात्र, कुठलाही आहार समजून-उमजून घेणं गरजेचं आहे. मी गोड पदार्थही खाते; पण ते कधी आणि किती खायचे, हे मी ठरवलेलं आहे. जंकफूड खात नाही. ते कोणत्याही वयोगटासाठी चांगलं नाही. ते सर्वांनीच वर्ज्य करावं. घरी केलेले ताजे पदार्थ खाते. पोहे, भात हे पदार्थही खाते. प्रोटिन जास्तीत जास्त शरीरात जाण्याची काळजी घेते. ड्रायफ्रूट अन् फ्रूटसही खाते. त्याचप्रमाणं आपल्या शरीरात जास्तीत जास्त पाणी कसं जाईल, यासाठी प्रयत्न करते. आपल्या शरीराला ज्या गोष्टी आवश्‍यक असतात, त्या दिवसभरात खाण्याचा प्रयत्न करते.

आनंदासाठी करा व्यायाम
खरंतर मी सकाळीच एक्‍सरसाईज करते. मात्र, अनेकदा वेळ मिळाला नाही, तर सायंकाळी व्यायाम करते. शरीरसंपदा योग्य ठेवण्यासाठी कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि डान्स करते. या तीनही गोष्टी मला खूप आवडतात. त्या एकत्र कशा पद्धतीनं करता येतील, यावरच माझा भर असतो. खरंतर नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकलं पाहिजे. तुम्ही खूप थकले असाल, तर तुमच्या शरीरावर कधीच अत्याचार करू नका. व्यायाम हा शरीराला फ्रेश करण्यासाठी असतो, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा नियम मी नेहमीच पाळते. मी खूप थकले असेन, तर मी ब्रिस्क वॉक किंवा लाइट वॉक करते. त्यामुळं कंटाळवाणेपणा आपोआप निघून जातो आणि शरीर थकतही नाही. खरं तर मी अनेक दिवसांपासून पिलाटीस, जिम ट्रेनिंग आणि डान्स असे अनेक प्रकार मी करत आहे. पिलाटीसमध्ये लवचिकता, जिम ट्रेनिंगमध्ये ताकद, तर डान्समुळं स्विफ्टनेस येतो. त्यामुळं या तीनही गोष्टी मला उपयोगाच्या ठरल्या आहेत. खरं तर मला कुणीही फिटनेस गुरू नाहीये; पण मिलिंद सोमण यांच्याकडं पाहून मला फिटनेसची व्याख्या खऱ्या अर्थानं समजली.

सकारात्मक विचारांची गरज
योगासन, प्राणायाम आणि मेडिटेशन या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत; पण मानसिक आरोग्य हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. आपण नेहमीच आपला मेंदू आपल्या ताब्यात ठेवला पाहिजे. त्यासाठी सकारात्मक विचार मनामध्ये आले पाहिजेत. आपण नेहमीच आनंदी राहिलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी कुणी आनंद देईल असं नाही. आनंद अन् मानसिक शांतता ही आपणच मिळवायची असते. कोणत्याही चित्रपट वा मालिकांमध्ये मला वजन कमी वा जास्त करण्याची गरज आली नाही. आतापर्यंत मी शहरी आणि मॉडर्न मुलीच्या भूमिका केल्या. त्यासाठी फिट असणं गरजेचं होतं.

वातावरणाचाही परिणाम
मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाचा आपल्या आरोग्यावर वा दृष्टिकोनावर परिणाम होतो. आमच्या कुटुंबासह मित्र-मैत्रिणी एकत्र भेटल्यावर सर्वजण डाएट व फिटनेसबाबत चर्चा करतो. अशा वातावरणात राहिल्यावर त्याचा आपल्यावरही सकारात्मक परिणाम होतो. कुटुंबीयही नेहमीच आरोग्यावर लक्ष देतात. खरं तर आपल्या आसपास आरोग्याची काळजी घेणारी अन् व्यायामाला महत्त्व देणारी माणसं असली, तर आपला त्यांच्यावर अन् त्यांचा आपल्यावर नेहमीच सकारात्मक परिणाम होत असतो. त्याचबरोबर आहाराबाबतही आपण जागरुक होतो.

फिटनेसबाबत माझा कुणी ठराविक आदर्श नाही आहे. ज्याला फिट राहायचं अशा प्रत्येक माणसाला बघून मला आनंद होतो. फिट राहणं ही भावना अन् त्यांचे प्रयत्न हेच माझ्यासाठी खूप कौतुकास्पद आहे. फिटनेसबाबत माझा दृष्टिकोन मिलिंद सोमण आणि ऋजुता दिवेकर यांच्यामुळं बदलला. शिल्पा शेट्टीचा फिटनेसही मला खूप आवडतो. त्यांचं लाइफस्टाइल अन् डाएट मॉडिफिकेशन पाहून मी खूप सकारात्मक होते. त्यांच्यामुळंच फिटनेसबाबतच्या माझ्या दृष्टिकोनातही बदल झाला. आता त्याचा मला खूप फायदा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फिटनेस चॅलेंज सुरू केलं आहे. देशातल्या तरुणांसह सर्वांनी फिट अन् हेल्दी राहावं, असा संदेश त्यांनी दिला आहे. तो सर्वांच्या फायद्याचाच आहे. त्यामुळं सर्वांनीच आपल्या आरोग्यासह शरीरसंपदेकडंही लक्ष द्यावं.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com