‘जबाबदारीचं भान देणं आवश्यक’ (मुग्धा गोडबोले-रानडे)

mugdha godbole ranade
mugdha godbole ranade

घरात जी वस्तू येते त्यासाठी घरातला प्रत्येक माणूस कष्ट करत असतो, असं मी ऋचाला नेहमी सांगते. असं नाहीये, की बाबा पैसे कमावून आणतात आणि मी बाहेर जाऊन वस्तू आणून ते पैसे खर्च करून टाकते. मला स्वतःला तसं करणं कधीच पटत नाही. प्रत्येकानं अर्थार्जनात थोडातरी हातभार लावला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आपण वयानं पुरेसे मोठे आहोत, धडधाकट आहोत, सुशिक्षित आहोत, तर घरात का बसून राहायचं? अर्थार्जन का नाही करायचं? आपल्याकडे कौशल्य आहे तर ते का नाही वापरायचं? मी नेहमी ऋचाला सांगते, की तू आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होशील तेव्हा मला खऱ्या अर्थानं आनंद होईल.

माझ्या लहानपणापासून आमच्या घरात शिक्षणाला सर्वांत जास्त महत्त्व होतं. शिक्षण म्हणजे केवळ पदवी नाही, तर बौद्धिक विकास, कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास याला अनन्यसाधारण महत्त्व होतं. माझे आई-वडील दोघंही उच्चविद्याभूषित आहेत. इतर नातेवाईकसुद्धा. त्यामुळे अभ्यासाचं महत्त्व लहानपणापासून कळत होतं. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब असतं, तसं आमचं कुटुंब होतं. बाह्यरूप, कपडे, एखाद्याचं दिसणं या सगळ्यापेक्षा त्याची शैक्षणिक प्रगती, अभ्यास, त्याचं एखाद्या विषयावरचं अथवा भाषेवरचं, कलेवरचं प्रभुत्व या गोष्टींना जास्त महत्त्व होतं. एखादं पुस्तक किंवा सिनेमा चांगला का आहे किंवा वाईट का आहे, या सगळ्या बाबतीत बऱ्यापैकी चर्चा घरात व्हायची. त्यामुळे अतिशय सकस विचारांचा आणि भरपूर वाचनाचा संस्कार आमच्यावर झाला. रोज रात्री जेवणानंतर किंवा सुटीच्या दिवशी घरात सर्वजण वाचत आहेत हे दृश्य अगदी सर्वसामान्य होतं. आई लेखिका असल्यामुळे घरात भरपूर साहित्य यायचं. वडलांचं इंग्लिश वाचन भरपूर होतं. त्यामुळे खूप लहान असल्यापासून मी दोन्ही भाषांतली पुस्तकं वाचायला लागले. माझ्या भावाला खेळाची खूप आवड होती. त्यामुळे क्रीडा साहित्यदेखील खूप यायचं.

माझ्या सुदैवानं अनेक दिग्गज साहित्यिक मला अगदी जवळून बघायला मिळाले. शांताबाई शेळके घरी यायच्या. पु. ल. देशपांडे यांना चार-पाच वेळा भेटण्याचा योग आला. सुनीताबाई काही वेळा आईला अचानक भेटल्या, की तिथं बऱ्याच गप्पा व्हायच्या. त्यावेळी मला त्या भेटण्याचं किंवा गप्पांचं महत्त्व समजत नव्हतं. मोठी झाल्यावर मात्र या गोष्टींचं महत्त्व खूप चांगल्याप्रकारे समजलं. माणूस कर्तृत्वानं मोठा होत जातो, तसा तो अधिक सहज, साधा होत जातो. शांताबाई घरी झोपाळ्यावर बसून गप्पा मारायच्या तेव्हा त्या अगदी सहज आणि साधेपणानं बोलायच्या. ज्यांना आपण मोठी माणसं म्हणून ओळखतो, त्यांना त्यांचं एक सर्वसामान्य आयुष्यदेखील आहे हे खूप लहानपणापासून माझ्या मनावर बिंबलं गेलं. माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची अप्रत्यक्ष शिकवण लहानपणापासून मिळत गेली.

मोठी झाल्यावर माझा कल अभिनय क्षेत्राकडे आहे, हे जाणवल्यावर अर्थातच आई-बाबांनी या क्षेत्रातले धोके मला सांगण्याचा प्रयत्न केला. कारण सात पिढ्यांमध्ये या क्षेत्रात आमच्या घरातलं कोणी नव्हतं; पण तरीसुद्धा माझं ग्रॕज्युएशन झाल्यावर पदव्युत्तर शिक्षण घेत असताना मी त्यांना सांगितलं, की ‘मला तुम्ही एक वर्ष द्या. मी मुंबईला जाते. (कारण त्यावेळी मला ‘आभाळमाया’ या मालिकेसाठी विचारणा झाली होती.) वर्षभरात माझ्याकडून फार काही झालं नाही, तर परत येऊन पुढचं शिक्षण घेते.’ माझ्या या निर्णयाला त्यांनी होकार दिला. बावीस वर्षांपूर्वी ही नक्कीच मोठी गोष्ट होती. आई-बाबांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मुंबईला जाऊ दिलं. सुदैवानं मला परत फिरून यावं लागलं नाही. आमच्या घरात एकमेकांचं कौतुक कधी तोंडावर केलं जात नाही. शिवाय प्रत्येकजण आपल्या कामाप्रती स्वतंत्रपणे मेहनत करत असतोच. माझी आई मंगला गोडबोले! हे नाव लेखिका म्हणून गाजलेलं; पण जेव्हा टेलिव्हिजनवर अभिनेत्री, संवादलेखक अशी वेगवेगळी कामं करू लागले, त्यावेळी आईनं मला प्रमोट केलंय असं कधीच झालं नाही किंवा तिच्या नावाचा वापर करून मी कधी काम मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. हे सांगण्याची कधी कुणाला गरजच पडली नाही. जे घेऊन आलो आहोत ते आपल्यापुरतं राहणार आहे हा विचार लहानपणापासून अगदी स्वच्छ होता. त्यामुळे जे काही करायचं ते स्वतःच, हे पक्कं होतं. अलीकडेच आईला नववा राज्य पुरस्कार मिळाला, तेव्हा मी पहिल्यांदाच फेसबुकवर तिच्याबद्दल लिहिलं. इतका हा संस्कार खोलवर रुजला आहे.

मी शाळेत वक्तृत्व स्पर्धांत भाग घ्यायचे; पण आईनं मला कधी भाषण लिहून दिलं नाही. घरामध्ये त्या विषयावर चर्चा व्हायची, मुद्दे चर्चिले जायचे, त्यावरून मी मुद्दे लिहायचे. एका वर्षी मी या स्पर्धांच्या सर्व फेऱ्या जिंकून सर्वांत पहिलं बक्षीस मिळवलं होतं. ते जाहीर झाल्यानंतर मी प्रचंड आनंदानं पलीकडे खुर्चीवर बसलेल्या आईला मिठी मारली. तेव्हा आई काही बोलली नाही; पण जाताना ती मला म्हणाली : ‘‘पुन्हा हे असं लोकांसमोर करायचं नाही. हे भावना लपवणं नाहीये, तर प्रदर्शन न करणं आहे. तुला पहिलं बक्षीस मिळालं हे चांगलंच आहे. तुझ्या वयानुसार तुला आनंद होणं हेही ठीक आहे; पण तिथं अशी काही मुलं असतील, जी तुझ्यापेक्षा थोडीशीच कमी असतील. त्यांना कदाचित अशा कृतीमुळे अधिक दुःख होऊ शकतं. हे दुःख आपण त्यांना नाही द्यायचं. घरी जाऊन मी तुझं कौतुक करीन, तुझ्या पाठीवरून हात फिरवीन; पण हे लोकांसमोर यापुढे करायचं नाही.’’ आईचं ते बोलणं ऐकल्यावर मला खूप चुटपुट लागली. नंतर पुन्हा कधी मी असं केलं नाही. सध्याच्या काळात रिअॕलिटी शो असो किंवा आणखी इतर स्पर्धा असोत, पालक आपल्या मुलांकडे एक प्रोजेक्ट म्हणून बघतात. ज्यावेळेला हे पूर्णपणे करण्याची संधी माझ्या आईला होती त्यावेळेला तिनं ते कधीच केलं नाही. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते. बारावीत असताना मला इतर वेळेपेक्षा तुलनेनं कमी गुण मिळाले. माझी खूप रडारड झाली. मी कुठं चुकले हे स्वतःच कबूल करून झालं. ते सगळं झाल्यानंतर रात्री बाबा मला बाहेर जेवायला घेऊन गेले. ते एवढ्यासाठी की, ठीक आहे. एखाद्या वेळेस आपला अंदाज चुकू शकतो; पण त्याच्यानं फार खचून जायचं नाही. पुन्हा प्रयत्न सुरू करायचे हे सांगण्यासाठी. आता मानसोपचारतज्ज्ञांकडून इमोशनल कोशंट, इंटेलिजंट कोशंट, सोशल कोशंट आणि अॕडव्हर्सिटी कोशंट तपासून घेतले जातात. यातला अॕडव्हर्सिटी कोशंट बाबांनी त्यावेळी मला शिकवण्याचा प्रयत्न केला होता. अपयश पचवायला शिकवणं खूप महत्त्वाचं असतं. बाबांनी ते अगदी सहजपणे शिकवलं. ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती.

आता काळ खूपच बदलला आहे, मुलांचे प्रश्नच बदलले आहेत. मी पुण्यात डेक्कन जिमखाना परिसारात वाढले आणि माझी मुलगी ऋचा मुंबईच्या अंधेरी भागातल्या कॉस्मोपॉलिटन भागात वाढली. इथं खूप वेगवेगळी भाषक मुलं आजूबाजूला राहतात. त्यामुळे आपण घरात चप्पल घालून फिरत नाही, का फिरत नाही? अशा अनेक नव्या प्रश्नांची उत्तर मला द्यावी लागतात. अशावेळी आपल्या घरात या चार गोष्टी आपण पाळतो आणि त्यातल्या किमान दोन तरी तुला आल्या पाहिजेत हे पालकांनी मुलांना समजावून सांगावं. मी तेच केलं. समजा मला ऋचाला रामरक्षा शिकवायची आहे, तर दर वेळी धार्मिक अर्थानंच शिकवली पाहिजे असं नाही. ती म्हटल्यानं उच्चारांमुळे जिभेला चांगला व्यायाम होतो म्हणून मी ती शिकवते असा दृष्टिकोन ठेवता येतो. हे सगळं करताना ऋचाला वाटू शकतं, की एकीकडे आपण जात वगैरे असं काही मानत नाही, ती कुठं लिहीत नाही. मग तू का रामरक्षा म्हणायला सांगतेस? असे प्रश्नच मला माझ्या लहानपणी पडले नव्हते. कारण आजूबाजूला आपल्यासारखी भरपूर घरं होती. त्यामुळे हे सगळं बदलेलं वातावरण, स्वरूप आहे त्याला तोंड देताना त्या त्या वेळी मला पालक म्हणून वेगळं आव्हान वाटलं.

मी लहानपणापासून ऋचासमोर भरपूर पर्याय ठेवले. तिला वेगवेगळ्या क्लासना घातलं. जेणेकरून त्यातून आपली नेमकी आवड काय आहे, हे तिला समजेल. मध्ये पाच-सहा वर्षं मी काम बंद ठेवलं होतं. त्यावेळी मी तिच्या वेळेचं नियोजन व्यवस्थित करत होते. वाचनासाठी वेळ द्यायचे. तिच्याबरोबर मीसुद्धा तेच पुस्तक वाचायला बसायचे. ऋचाला तिसऱ्या वर्षीच चष्मा लागला. चष्मा घालणं तिला सुरुवातीला आवडायचं नाही. मग मी पण एक चष्मा आणला आणि तिच्यासोबत घालू लागले. ते बघून ती नियमितपणे तो घालू लागली. मला नेहमी वाटतं, की सांगून शिकवण्यापेक्षा मुलं बघून जास्त लवकर शिकतात. त्यामुळे आपण काय करतो आहोत याकडे पालकांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे. ऋचानं टीव्ही पाहू नये म्हणून मी स्वतः टीव्ही बघणं जवळजवळ बंद करून टाकलं. त्यामुळे आजही ऋचा अगदी कमी वेळ टीव्ही बघते. सुरुवातीपासूनच काही गोष्टींमध्ये माझ्यात आणि पती संतोषमध्ये एकमत होतं. ते असलंही पाहिजे. नाहीतर मी दिवसभर टीव्ही नाही बघणार आणि तो संध्याकाळी घरी आल्यावर टीव्हीसमोर बसणार, असं चित्र असलं तर काही उपयोग नाही.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर पालकत्वाचा अनुभव किंवा प्रवास हा खूप आनंददायी अथवा सुंदर असतो असं मी नाही म्हणणार. जन्माला घातलेलं मूल वाढताना बघणं हे खूप आनंददायक असतं, हे भावनिक पातळीवर म्हणायला ठीक आहे; पण त्याचबरोबर ते बऱ्यापैकी तणावपूर्ण असतं. त्यातही माणूस म्हणून आपल्यालाही आयुष्यातला एक छोटासा भाग आपल्यासाठी काही करण्यासाठी द्यायचा असेल, तर ते अजून स्ट्रेसफुल असतं. पालकानं जास्तीत जास्त वेळ मुलाबरोबर द्यावा अशी परिस्थिती असेल आणि त्यावेळी तो पालक म्हणाला की मला नाही वेळ देता येणार, तर अशा वेळी त्याच्याबद्दल चर्चा व्हायला लागते किंवा तो चुकीचा की बरोबर या द्वंद्वात स्वतः खूप अडकायला लागतो. त्याबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण होते. आपण आई म्हणून आपण फार बऱ्या नाही आहोत की काय असं वाटायला लागतं.

या घरात जी वस्तू येते त्यासाठी घरातला प्रत्येक माणूस कष्ट करत असतो, असं मी ऋचाला सांगते. असं नाहीये की बाबा पैसे कमावून आणतात आणि मी बाहेर जाऊन वस्तू आणून ते पैसे खर्च करून टाकते. मला स्वतःला तसं करणं कधीच पटत नाही. प्रत्येकानं अर्थार्जनात थोडातरी हातभार लावला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आपण वयानं पुरेसे मोठे आहोत, धडधाकट आहोत, सुशिक्षित आहोत, तर घरात का बसून राहायचं? मी नेहमी ऋचाला सांगते, की तू आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होशील तेव्हा मला खऱ्या अर्थानं आनंद होईल. मी सहा-सात वर्षं ब्रेक घेतला हा चॉईसचा भाग झाला; पण हे करताना मला कोणापुढे हात पसरायला लागू नयेत असंच मला वाटतं. इथून पुढच्या काळात प्रत्येक मुलीनं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलंच पाहिजे. त्यासाठी घराबाहेर पडणं, काहीतरी काम करणं या गोष्टी केल्याच पाहिजेत. आपली निर्मितीक्षमता, कौशल्य सतत वाढवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. पालकांनी मुलांना ‘जबाबदार स्वातंत्र्य’ म्हणजे काय हे शिकवलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मुलानं दोन वर्षं एकटं राहिलंच पाहिजे. मी ऋचालादेखील सांगितलं आहे, की तुझं कॉलेज वगैरे झाल्यानंतर, तू लग्न करणार असशील, तर त्यापूर्वी एक-दोन वर्षं एकटी राहा. कारण मी स्वतः बावीस वर्षं माझ्या आई-वडिलांकडे राहून जेवढं शिकले, तेवढं मी चार वर्षं एकटी राहून शिकले. त्यामुळे स्वतंत्रपणे सगळ्या गोष्टी करणं आणि इथून पुढच्या काळात पैसा शिकणं म्हणजे केवळ पैसा कमावणं नाही, तर तो साठवणं, त्याचं नियोजन करणं, त्याचा विनियोग करणं हे समजणं फार गरजेचं आहे.

ऋचामुळे मी राग पटकन विसरायला शिकले. कारण आपण कितीही चिडलो, तरी अक्षरशः पाचव्या मिनिटाला मुलं आपल्याकडे परत येतात. मी चिडते, रागावते. माझा स्वभाव अगदी शांत वगैरे नाही. आपण जसं मुलांचा स्वभाव समजून घेतो, तसं मुलंही आपला स्वभाव हळूहळू समजून घेतात आणि त्याप्रमाणे ती आपलं वागणं बदलतात. त्यामुळे सोडून देणं, धरून न ठेवणं आणि तर्क न करणं ही गोष्ट मी नक्कीच ऋचाकडून शिकले. साधारण दोन वर्षांपूर्वी ऋचा स्मार्टफोन हवा म्हणून हट्ट धरून बसली होती. याच हट्टासोबत काही दिवसांपूर्वी ती कुत्र्याचं पिल्लू आणायचं म्हणून मागे लागली होती. मी नुकतंच काही प्रमाणात काम सुरू केलं होतं. त्यामुळे परत ही जबाबदारी नको म्हणून मी कुत्र्याचं पिल्लू घेत नव्हते. एकदा ऋचा म्हणाली, की ‘तू मला मोबाइल पण नाही घेऊन देत आणि कुत्र्याचं पिल्लू पण नाही घेऊन देत.’ हा तिचा तक्रारीचा सूर ऐकून दुसऱ्या दिवशी मी कुत्र्याचं पिल्लू आणलं. पुढं वर्षभर ऋचानं मोबाइलची आठवण काढली नाही. त्या काळात ती गोष्ट खूप महत्त्वाची ठरली. अशा जबाबदारीमुळे मुलं खूप रिस्पॉॕन्सिबल होतात. ती त्या पिल्लाचं सगळं करायची. त्यामुळे मी घरी नसताना मला चिंता नसायची. एकटं मूल असण्याचा जो अपराधी भाव काही प्रमाणात माझ्या मनात होता, तो थोडाफार यामुळे नक्कीच कमी झाला.

याआधी एक आणखी घटना घडली होती. एकदा मला शाळेतून बोलावणं आलं. तिथं समजलं, की ऋचा बऱ्यापैकी खोटं बोलायला लागली आहे. एका विशिष्ट वयात मुलांना आपल्याकडे खूप काही वेगळं, भारी आहे असं दाखवण्याची इच्छा होत असते. ऋचा त्याच वयातून जात होती. तिनं शाळेत सांगितलं होतं, की तिला बहीण झाली; पण हे खोटं आहे हे टीचरना माहीत होतं. मी टीचरशी बोलले, घरी आल्यावर ऋचाशीपण बोलले; पण त्यावेळी मला असं जाणवलं, की ऋचानं याबाबत आणखी कोणाशीतरी बोलावं. म्हणून मी तिला चाईल्ड कौन्सिलरकडे घेऊन गेले. माझ्यासाठी तो त्यावेळी महत्त्वाचा निर्णय होता- कारण आपल्याकडे कौन्सिलिंग ही गोष्ट अजूनही सहजपणे स्वीकारली जात नाही; पण मला वाटलं, की या गोष्टींचा उपयोग करून का घेऊ नये. माझ्यापेक्षा जास्त चांगलं कौशल्य असणारी व्यक्ती तिच्याशी बोलल्यामुळे शेवटी तिचाच फायदा होणार असेल तर काय हरकत आहे. पाच-सहा महिन्यांनंतर ऋचामध्ये खूप फरक पडला.

आता मी बऱ्यापैकी काम सुरू केलं आहे; पण शाळेच्या मीटिंग्ज, इतर कार्यक्रम हे आधीच ठरलेलं असतं, त्यानुसार वेळेचं नियोजन करता येतं. ऋचाशी कितीही मतभेद झाले, आदळआपट झाली तरी परस्परांतला संवाद आपल्या बाजूनं बंद करायचा नाही हे मी ठरवलं आहे. ऋचा शास्त्रीय गायन शिकते. त्यामुळे मी त्याच्याशी संबंधित गाणी, संगीत तिला ऐकवायचे. हळूहळू तिला इंग्लिश गाणी आवडू लागली. आता कोरियन बँड भरपूर ऐकते. ती हे का ऐकते, ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते. मला ते आवडेलच असं नाही; पण त्याबद्दल जाणून घेणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ऋचा आता मोबाइल वापरते. पण त्यात काही नियम नक्कीच आहेत. पेरेंटल गाईड वगैरे आहेच; पण तिचा स्क्रीन टाइम हा दीड तासच आहे. तिला दोन गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, की दहावी होईपर्यंत तुझा मोबाइल आम्ही बघणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू घरात असो वा बाहेर, आई-बाबांनी फोन केला, की तो उचललाच पाहिजे.

पालकत्व स्वीकारणं ही जबाबदारी आहे. त्यामुळे ज्यांना एका आयुष्यात दोन आयुष्यं जगण्याची आवड आहे त्यांनी हे अंगावर घ्यावं. मी पंचवीस-सव्विसाव्या वर्षापर्यंत माझं आयुष्य जगले; पण त्यानंतर मला परत पहिल्यापासून जगावंसं वाटलं आणि ते मी पुन्हा ऋचाबरोबर करू शकले. मी स्वतः ज्या फ्रेजमधून गेले, ती प्रत्येक फेज मी पुन्हा अनुभवते आहे आणि आता मी दुसऱ्या बाजूनंपण विचार करू शकते. हे दुसऱ्यांदा जगणं आहे. स्वतः पंधराव्या वर्षी अनुभवलेल्या घटनेसारखीच घटना मुलीच्या त्याच वयात अनुभवणं, त्याच्या प्रतिक्रियांमधले फरक बघणं ही सगळी गंमत आहे. ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याची गंमत मी अनुभवते आहे.

(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com