गोष्ट एका विलक्षण प्रवासाची (मुग्धा ग्रामोपाध्ये)

mugdha gramopadhye
mugdha gramopadhye

अमेरिकेत अडकून बसलो होतो आणि अचानक "वंदे भारत' योजनेअंतर्गत भारतात परतायची संधी मिळाली. तो प्रवास, नंतर पुण्यात परतल्यानंतरही हॉटेलमध्ये क्वारंटाइन वगैरे सगळाच अनुभव वेगळा होता. या अनुभवानं जगण्याकडे बघण्याची दृष्टीच बदलली...

आम्ही अमेरिकेला मुलाकडे जाण्याचं निश्‍चित केलं. त्याप्रमाणं तिकीट बुकिंग केलं आणि दोन मार्चला मुलाकडे डॅलसला निघालो. परतीचं 13 मेचं बुकिंग केलं होतं. साधारण अडीच महिने वास्तव्य होतं. पुणे-मुंबई-डलास असा प्रवास करत आम्ही पोचलो. आमचा आंतरराष्ट्रीय पहिलाच प्रवास होता. त्यामुळे उत्सुकता आणि दडपण दोन्ही होतं; पण काही त्रास न होता आम्ही सुखरूप पोचलो. तिथं आमचे दिवस छान चालले होते. अजून कोरोनाचा प्रसार तिथं फारसा नव्हता. त्यामुळे आमचं फिरणं आणि प्रेक्षणीय स्थळं बघणं सुरू होतं; पण नंतर हळूहळू टीव्हीवर बातम्यांमध्ये कोरोनाची भयानकता कळू लागली आणि जसजसे जायचे दिवस जवळ येऊ लागले, तसतशी आमची काळजी वाढू लागली. तोपर्यंत सर्व फ्लाइट्‌स बंद झाल्या होत्या. सगळंच अनिश्‍चित होतं. आम्ही एक महिना पुढचं बुकिंग करून ठेवलं. रोज बातम्या बघणं आणि काही सकारात्मक घडतं का बघणं हेच फक्त आमच्या हाती होतं.

इतक्‍यात भारत सरकारनं अमेरिकेत अडकलेल्या लोकांसाठी खास विमानसेवा चालू केल्याचं समजलं. मुलगा ऋग्वेदनं मग सर्व माहिती काढून एम्बसीमध्ये आम्हा दोघांची नावं रजिस्टर केली. "वंदे भारत' या योजनेअंतर्गत ही सेवा चालू केली होती. साधारण चार दिवसांनी मुलाला आमची नावं कन्फर्म झाल्याचा मेल आला; पण यामध्ये लॉटरी सिस्टिम असल्यानं पुन्हा अनिश्‍चितता होती. लिस्टमध्ये नाव असेल तरच आम्हाला येता येणार होतं. दोन दिवसांनी कळलं, की लिस्टमध्ये आमचं नाव नव्हतं. त्यामुळे कधी नंबर लागेल याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. अचानक ऑफिसमधून आमचं नाव असल्याचा फोन आला. त्यांना लगेच कन्फर्म सांगणं आवश्‍यक होतं. सोमवारची फ्लाईट होती आणि शनिवारी संध्याकाळी फोन आला होता. फक्त एकच दिवस हातात होता. परत नाही म्हटलं, तर नंबर लगेच लागणं अवघड होतं. म्हणून सगळा विचार करून तिकीट काढलं. अनपेक्षितपणे लॉटरी लागल्यामुळे सगळं चित्र एकदमच बदललं. पॅकिंग करणं, बाकीचं आवरणं चालू झालं. मुलानं झेरॉक्‍स काढणं, फॉर्म भरणं वगैरे सगळी कामं भराभर केली. आमची फ्लाईट शिकागोमधून असल्यानं त्याचं आधी बुकिंग करणं आवश्‍यक होतं. सोमवारी रात्री शिकागोहून साडेअकराची फ्लाईट होती. आम्ही सकाळी बारा वाजता घरातून निघालो. मुलाला जड अंतःकरणानं निरोप दिला. हे सगळं इतक्‍या गडबडीत झालं, की विचार करायला वेळच मिळाला नाही. डॅलस एअरपोर्टवर पोचल्यावर एकदम सगळं शांत शांत वाटलं. आम्ही आलो होतो तेव्हा गर्दीनं भरलेलं हेच का ते एअरपोर्ट असं वाटत होतं. सर्व फॉर्मलिटी पार पडून आम्ही आत गेलो. थोड्या वेळानं शिकागोच्या फ्लाईटचं उड्डाण झालं. विमानात बसताना थर्मल चेकिंग झालं. आम्ही ग्लोव्हज्‌ आणि मास्क लावूनच घरातून निघालो होतो. ते साधारण दर दोन तासांनी बदलून नवीन वापरत होतो. डॅलस ते मुंबई हा साधारण तीस-पस्तीस तासाचा प्रवास होता. या प्रवासात जास्तीत जास्त काळजी घेणं आवश्‍यक होतं आणि तिथंच आमची परीक्षा होती. सोशल डिस्टन्सिंग मात्र चांगलं पाळलं जात होतं. आम्ही शिकागो एअरपोर्टवर साडेचारला पोचलो. आमची रात्रीची साडेअकराची फ्लाइट असल्यानं आम्ही निवांत होतो. आम्ही 3 नंबर टर्मिनलवर आलो होतो आणि आम्हाला 5 नंबर टर्मिनलला जायचं होतं. सामान पण खूप होतं; पण तिथं जायला बसेस होत्या. आमचं सामान चढवायला बस ड्रायव्हरनं मदत केली. आम्ही त्याचे मनापासून आभार मानले. सामान घेऊन 5 नंबरवर गेलो, तर तिथं चेक इनसाठी भली मोठी रांग होती. जवळजवळ अडीच तास आम्ही रांगेत उभे होतो. थर्मल टेस्टिंग करूनच मग आत सोडणार होते. त्यामुळे थोडी धाकधूक होती. नॉर्मल टेंपरेचर असणं आवश्‍यक होतं. आमची टेस्ट झाली. सर्व नॉर्मल आहे म्हटल्यावर आम्हाला इमिग्रेशनसाठी आत सोडलं. आता आम्ही निर्धास्त झालो. मुलाला फोन करून आधी सांगितलं. त्याला पण हायसं झालं. आम्ही घरून आणलेलं खाऊन घेतलं. यामध्ये चार-पाच तास कुठं गेले, ते कळलं नाही. मध्येमध्ये मास्क आणि ग्लोव्हज्‌ बदलणं, सॅनिटायझर लावणं हे न विसरता चालूच होतं. दहा वाजता विमानात बसलो.

आत्ता हे 15-16 तास खरे कसरतीचे होते. सतत मास्क लावून बसणं कसं जमेल याची धास्ती होती. प्रत्येकाच्या सीटवर स्नॅक्‍स आणि कोरड्या पदार्थांची पॅकेट्‌स, पाण्याच्या बाटल्या, मास्क, सॅनिटायझर सर्व ठेवलं होतं. इथं मात्र सोशल डिस्टन्सिंग नव्हतं; पण सगळेजण पुरेपूर काळजी घेत होते. खास इव्हॅक्‍युएशन फ्लाइट असल्यानं नेहमीपेक्षा विमान भाडे पण जास्त होतं. मात्र, त्यांनी सुरवातीलाच त्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. क्वारंटाइनमध्ये राहण्याची जिथं सोय करणार होते, ते पण पेड होतं. साडेअकराला विमानानं उड्डाण घेतलं. सर्व लोकांनी आनंदानं टाळ्या वाजवून मायदेशी परतण्याचा आनंद व्यक्त केला. विमानात सर्व स्टाफनं पीपीई किट घातली होती. कोणतीही वेगळी सर्व्हिस मिळणार नाही, हे त्यांनी आधीच सांगितलं होतं. टीव्ही वगैरे सर्व सेवा बंद होत्या. आता इतके तास हाताची घडी घालून बसणं हे दिव्यच होतं. शेजारचा माणूस कसा आहे ही भीती प्रत्येकाच्या मनात होती. कारणाशिवाय सीटवरून उठण्यासाठी परवानगी नव्हती. वॉशरूमजवळ पण एकानंच एका वेळी जायचं. तिथं गर्दी करायची नाही, असे बरेच निर्बंध होते. विमानातल्या बऱ्याच प्रवाशांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते. कोणाचे जॉब गेलेले, विद्यार्थ्यांचा राहण्याचा, पैशाचा प्रश्न होता, व्हिसा प्रॉब्लेम होता. प्रत्येकजण आपल्या देशात सुरक्षित जाण्यासाठी उत्सुक होता. मुलाकडे जातानाची मानसिक अवस्था आणि येतानाची अवस्था यात जमीन-अस्मानाचा फरक होता. पहाटे दीड वाजता विमान मुंबईला उतरलं. पायलट, क्रू इत्यादींचे सर्वांनी टाळ्या वाजवून आणि "वंदे भारत'च्या घोषणा देऊन आभार मानले. हा क्षण भारावून टाकणारा होता. भारत सरकारच्या प्रयत्नानं आम्ही मायदेशी सुखरूप आलो होतो. विमानातून सर्वांना 30-30 च्या गटानं पाठवत होतं. आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणं अत्यावश्‍यक होतं. ज्यांनी केलं नसेल त्यांच्यासाठी वेगळा काउंटर ठेवला होता. बाहेर पडताना परत थर्मल चेकिंग करून बाहेर सोडत होते. इमिग्रेशन झाल्यावर बाहेर पडलो. तिथं पोलिस स्वागतासाठी उभे होते. प्रत्येकाला आपल्या गावी जाण्यासाठी लाल परी उभी होती. नागपूर, कोल्हापूर, नाशिक, पुणे सर्व ठिकाणी जाण्यासाठी बसेस उभ्या होत्या. सुरुवातीलाच फॉर्म भरला असल्यामुळे बसमध्ये तशी सोय करण्यात आली होती. बसमध्ये 17, 18 प्रवासीच बसवत होते. आमची दुसरीच फ्लाईट असल्यानं अजून त्या लोकांच्या नियोजनामध्ये सुसूत्रता नव्हती. कदाचित पुढच्या फ्लाईट्‌सना ही गोंधळाची परिस्थिती राहणार नाही, अशी आशा आहे. निम्या रस्त्यात गेल्यावर ड्रायव्हरला फोन करून प्राइड हॉटेलला आम्हाला सोडण्याचे आदेश आले. ते कळल्यावर आम्हाला हायसं वाटलं. साडेनऊ वाजता आम्ही हॉटेलवर पोचलो. तिथं परत थर्मल टेस्टिंग झालं. आमची सर्व कागदपत्रं बघून रूम्स दिल्या.

अशा प्रकारे आम्ही हे सगळे दिव्य पार करून आपल्या गावात पोचलो. तो आनंद केवळ अविस्मरणीय होता. रूमवर येऊन आधी मास्क आणि ग्लोव्हज काढले आणि मोकळा श्वास घेतला. सहज मिळणाऱ्या गोष्टीचं महत्त्व किती आहे हे समजलं.
एवढा मोठा प्रवास, मानसिक ताण यामुळे पुण्यात हॉटेलला आल्यावर कधी एकदा पाठ टेकतो असे झाले होते. फ्रेश होऊन जेवण करून मस्त झोप काढली. दुसऱ्या दिवशी सर्वांना मेसेजेस करून आम्ही आल्याचे कळवले. सर्वांना सुखद धक्का बसला. दुसऱ्या दिवसापासून आमचं नवीन रूटिन चालू झालं. सकाळी स्टाफ आठ वाजता ब्रेकफास्ट घेऊन यायचा. पीपीई किट घालूनच ते लोक असायचे. दारातूनच ते सर्व खाणं, पाण्याच्या बाटल्या, लागेल ते सर्व द्यायचे. आम्ही खाऊन झालं, की रूमबाहेर सर्व ठेवायचो. सुरवातीला हे रूटिन छान वाटलं; पण 24 तास आम्ही दोघंच एका रूममध्ये... तिसरा माणूस दिसायचा नाही. कर्मचारी एक-दोन मिनिटे यायचे तेवढेच. हॉटेलमध्ये नव्वद लोक असूनही खूप शांतता!! टीव्ही, वायफाय, लॅपटॉप सर्व सुविधा होत्या; पण त्याचाही नंतर तोचतोचपणा वाटू लागला.

आम्ही मग आमचं रूटिन थोडंफार बसवलं. सकाळी प्राणायाम, थोडे हलके व्यायाम करू लागलो. मन स्थिर आणि शांत ठेवणं हे या काळात खूप गरजेचं होतं. नातेवाईकांचे फोन आणि गप्पा यामुळे आमचा दिवस छान जायचा. त्यांची सर्वांची आमच्याबद्दलची काळजी खूप काही सांगून जायची. दोघांचं फ्रेंड सर्कल बऱ्यापैकी असल्यानं सतत फोन चालूच असायचे. मैत्रिणी सतत फोन करून मनापासून चौकशी करायच्या. खरं तर सध्याच्या काळात सगळ्या जणी इतक्‍या कामात आहेत; पण त्यातून वेळ काढून खूप वेळ गप्पा मारायच्या, हसवायच्या. त्यामुळे एकसुरी न वाटता उत्साह वाटायचा. या काळात काय गमावलं, त्यापेक्षा आपण काय कमावलं हे समजलं. आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं आहेत याची प्रचिती आली. शेवटी सर्व ऐहिक गोष्टींपेक्षा लोकसंग्रह आणि आपले नातेसंबंध हेच महत्त्वाचे आहेत हेच खरं.
हे क्वारंटाइन संपून केव्हा एकदा आपल्या माणसात जायला मिळतं असं सारखं वाटत होतं. त्यावेळी खरं तर आपल्या जोडीदाराचं महत्त्व प्रकर्षानं जाणवत होतं. कारण आम्ही दोघं एकमेकांना आधार होतो. जे एकेकटे राहत होते, त्यांच्याबद्दल खूपच सहानुभूती वाटत होती. आमच्या बसमधल्या उत्साही लोकांनी व्हॉटसअप ग्रुपही केला होता. त्यातून थोडं बोलणं होत असे. मुलगाही तिकडून रोज फोन करून अपडेट्‌स घेत होता. पुण्यात असूनही मुलगी, नातू, जावई भेटू शकत नव्हते. रोज व्हिडिओ कॉल करून नातवाशी बोलल्यावर निखळ आनंद मिळत होता. एके दिवशी मात्र मुलगी, नातू, जावई हॉटेलच्या बाहेर उभे राहून लांबून भेटून गेले. आम्ही खिडकीच्या आतून त्यांना हात हलवून 5 मिनिटं लांबूनच भेटलो. त्यांना पाहून मन भरून आलं. ते बाहेरून आणि आम्ही आतून असं फोनवर बोललो. तेव्हा काच फोडून तुला न्यायला येतो असं नातवानं म्हटल्यावर डोळ्यात पाणी आलं.

पहिल्या चार-पाच दिवसांत एक दिवस डॉक्‍टरांची टीम येऊन थर्मल स्क्रीनिंग आणि जनरल चौकशी करून गेली; पण पुढे काय प्रोसेस आहे हे कळायला मार्ग नव्हता. शेवटी अकराव्या दिवशी स्वॅब टेस्ट घ्यायला डॉक्‍टरांची टीम आली. त्या-त्या मजल्यावर टेस्ट घेण्यात आली. त्या निमित्तानं आम्हाला पाच मिनिटं तरी रूमबाहेर येता आलं. आता रिपोर्ट कधी आणि कसे येतात याची थोडी धाकधूक होती... आणि तीन दिवसांनी रिपोर्ट आले. दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले... आणि आम्ही एकदम रिलॅक्‍स झालो. हॉटेलमधल्या इतर सर्व प्रवाशांचे रिपोर्ट पण निगेटिव्ह आले. त्यामुळे एकच आनंद!
आता मात्र घरी जायचे वेध लागले. दोन दिवस कधी संपतात असं झालं होतं. सकाळी रिसेप्शनवरून फोन आला ः "तुम्ही आज दिवसभरात कधीही घरी जाऊ शकता.' मुलगी प्राजक्ताला फोन करून सांगितलं. तिलाही एकदम आनंद झाला. सामान आवरायचं काही नव्हतंच. कारण काढायची वेळच नव्हती आली. मुलालाही फोन करून लगेच सांगितलं. चौदा दिवसांनी रूममधून बाहेर पडलो होतो. चार भिंतींमधलं जग संपून बाहेरच्या जगात आपल्या माणसांना भेटायला उत्सुक झालो होतो. जावई गाडी घेऊन आला होता, मुलीच्या घरी मुलीला आणि नातवाला भेटलो. लांबूनच नातू पळत आला, त्याला घ्यायचा मोह आवरत नव्हता; पण मन घट्ट करून लांबूनच त्याचे लाड केले आणि "आता लवकरच भेटू'चा निरोप घेऊन घरी आलो...आणि रोजचं रहाटगाडगं चालू झालं.

अशा प्रकारे अमेरिका ते क्वारंटाइन अशी वारी सुफळ संपन्न झाली... एका अत्यंत वेगळ्या आणि अद्वितीय अशा अनुभवातून आम्ही बाहेर पडलो. हा अमेरिका दौरा कायम लक्षात राहील. थोड्या दिवसांनी सगळं जीवन पूर्ववत होईल, कोरोना इतिहासजमा होईल; पण आम्ही आमचा हा अनुभव कधीही विसरू शकणार नाही. लवकरात लवकर हे दुष्टचक्र संपून नवीन आरोग्यदायी पहाट उगवू दे, ही परमेश्वराजवळ प्रार्थना!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com