‘लव्ह इन टोकियो’ (मुकुंद पोतदार)

मुकुंद पोतदार mukund.potdar@esakal.com
रविवार, 8 सप्टेंबर 2019

ऑलिंपिक चळवळीची ‘अधिक वेगवान-अधिक उत्तुंग-अधिक भक्कम’ ही त्रिसूत्री राबवत बुलेट ट्रेनपासून अगदी नेलकटरपर्यंत तंत्रज्ञानाचे आविष्कार सादर करत मोटारीपासून मोबाईलच्या बाजारपेठेत ठसा उमटवलेला देश म्हणजे जपान. तिसऱ्यांदा ऑलिंपिकसाठी सज्ज झालेल्या आणि प्रत्यक्षात दुसऱ्यांदा आयोजन करणाऱ्या टोकियोत पुढच्या वर्षी पृथ्वीतलावरचा सर्वोच्च क्रीडा सोहळा रंगणार आहे. उगवत्या सूर्याच्या देशाच्या ऑलिंपिकमय चळवळीवर एक नजर.

ऑलिंपिक चळवळीची ‘अधिक वेगवान-अधिक उत्तुंग-अधिक भक्कम’ ही त्रिसूत्री राबवत बुलेट ट्रेनपासून अगदी नेलकटरपर्यंत तंत्रज्ञानाचे आविष्कार सादर करत मोटारीपासून मोबाईलच्या बाजारपेठेत ठसा उमटवलेला देश म्हणजे जपान. तिसऱ्यांदा ऑलिंपिकसाठी सज्ज झालेल्या आणि प्रत्यक्षात दुसऱ्यांदा आयोजन करणाऱ्या टोकियोत पुढच्या वर्षी पृथ्वीतलावरचा सर्वोच्च क्रीडा सोहळा रंगणार आहे. उगवत्या सूर्याच्या देशाच्या ऑलिंपिकमय चळवळीवर एक नजर.

मालामाल असलेली अमेरिका ही अधिकृत महासत्ता आहे, तर डुप्लिकेट मालाचा भरणा करून मालामाल झालेला चीन वेगळ्या प्रकारची महासत्ता आहे. या खंडप्राय देशांच्या तुलनेत स्वदेशी तंत्रज्ञानाचा निकष लावला, तर अधिकृत नव्हे, अनधिकृत तर नव्हेच नव्हे- उलट खरीखुरी महासत्ता म्हणून कोण असा प्रश्न विचारला, तर पृथ्वीतलावरच्या कोणाही व्यक्तीला विचार करण्याची गरज पडणार नाही. जगाच्या नकाशात पूर्वेला असलेल्या एका चिमुकल्या देशाकडं तो बोट दाखवेल. हा देशच आहे उगवत्या सूर्याचा, हा देश म्हणजे जपान.

याच जपानची राजधानी टोकियोत पुढच्या वर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान पृथ्वीतलावरचा सर्वोच्च प्रतिष्ठेचा क्रीडा सोहळा अर्थात ऑलिंपिक होत आहे. ‘टोकियो २०२०’चं काऊंटडाऊन जोरात सुरू झालं आहे. महायुद्धातून सावरत महासत्ता बनलेल्या जपानचा आणि ऑलिंपिकचा विलक्षण संबंध आहे. टोकियोमध्ये ऑलिंपिक दुसऱ्यांदा होत आहे. खरं तर हे तिसरं ऑलिंपिक ठरलं असतं. याचं कारण सन १९४० मध्ये जपानलाच ऑलिंपिकचं यजमानपद मिळालं होतं; पण दुसऱ्या महायुद्धात उडी घेतल्यामुळं जपानला किंमत मोजावी लागली. हिरोशिमा-नागासाकी या दोन ठिकाणी अणुबॉंब टाकण्यात आले.

जपाननं त्यानंतर केलेली प्रगती ही पृथ्वीतलावरच्या अनेक जागतिक आश्‍चर्यांना फिकी पाडणारी असून, ती खराखुरा जागतिक चमत्कार ठरते. सन १९६४ मध्ये म्हणजे १९४० नंतर २४ वर्षांनी म्हणजे दोन तप उलटत असताना जपान दोन अणुहल्ल्यांमधून सावरलं आणि त्यांनी १९६४च्या ऑलिंपिकचं यमजानपद भूषवलं. त्यानिमित्त शिनकान्सेन अर्थात बुलेट ट्रेनचं पदार्पण झालं. जगातल्या या पहिल्यावहिल्या हाय-स्पीड ट्रेनच्या आगमनासह ऑलिंपिक भरवत जपाननं युरोप, अमेरिकेला चकित केलं.आता ५५ वर्षांनी पुन्हा ऑलिंपिकचं यजमानपद भूषवण्यास सज्ज झालेल्या जपाननं आपला खास ठसा उमटवण्याचा संकल्प सोडला असून, तो सिद्धीस नेण्यास रोबोयुक्त तंत्रज्ञानाच्या जोरावर ते सज्ज झाले आहेत.

‘हे विश्वची माझे घर’
रेडिओ, डेस्कटॉप, पीसी, इडियट बॉक्‍स अशा एकीकडं क्रमाक्रमानं नामशेष होणाऱ्या वस्तूंची जागा टॅब, पाम टॉप, लॅपटॉप, स्मार्ट फोन असा प्राधान्यक्रम बदलतो आहे. मोटारीपासून मोबाईलपर्यंत तंत्रत्रानाचे नवनवीन आविष्कार करणारा जपान अमेरिका, चीन अशा महासत्तांशी स्पर्धा करतो. अशा वेळी ऑलिंपिकच्या माध्यमातून खास जपानी ठसा उमटण्याची जय्यत तयारी झाली आहे. मुख्य म्हणजे आपल्या देशाचंच नव्हे, तर एकूणच जगाचं ब्रॅंडिंग करण्याचा संकल्प जपाननं सोडला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘हे विश्वची माझे घर’ असा संदेश देण्याचा उदात्त उद्देश जपाननं ठेवला आहे. ‘Universal Future Society’ अशी ही संकल्पना आहे. हे‘ विश्वची माझे घर’ या प्राचीन किंवा ‘करलो दुनिया मुठ्ठीमें’ या लेटेस्ट उक्तीची विलक्षण प्रचिती ऑलिंपिकमध्ये पदोपदी येईल.

खेडूतांचं नव्हे, रोबोंचं गाव
जपानची एक ओळख किंवा वैशिष्ट्य म्हणजे रोबो. ऑलिंपिकमध्ये त्यास विलक्षण चालना मिळेल. ओदायबा उपनगरात ऑलिंपिक व्हिलेज असेल. तिथंच रोबो व्हिलेज उभारण्यात येईल. ऑलिंपिकनिमित्त जपानमध्ये नऊ लाख २० हजार पाहुणे येण्याची आहे. वय, नागरिकत्व किंवा संवाद साधण्यातल्या इतर अनेक मर्यादांवर मात करतील, असे रोबो बनवले जात आहेत.

नम्र स्वयंसेवक-विनम्र रोबो
ऑलिंपिकची यशस्विता अलंबून असते ती स्वयंसेवकांवर. त्यांच्यावर अनुवाद, मार्ग दाखवणं, वाहतूक व्यवस्थेची माहिती, सेल्फ ड्रायव्हिंग कार आदींचं नियोजन करण्याची जबाबदारी आहे. जपानी नागरिक कमरेत झुकून नम्र अभिवादन करतात. त्यामुळं जपानी स्वयंसेवकांच्याही जोडीला असेच विनम्र रोबो असतील.

वादातीत अनुवाद
नव्या जगात संवाद ही मुख्य गरज असते. मानवी अनुवादकांना मर्यादा असतात. जपाननं त्यावर मात केली आहे. त्यांनी एक ॲप विकसित केलं आहे. ‘व्हॉईस ट्रा’ हे रिअल टाईम ट्रान्स्लेशन ऍप भूतानच्या डिझोंग्खापासून उर्दूपर्यंत तब्बल २७ भाषांतल्या मजकुराचा, संवादाचा अनुवाद करेल. प्रत्यक्ष बोल म्हणजे संवादाचं ९० टक्के आकलन करण्याची क्षमता या ॲपची आहे. त्यातून बोलल्या जाणाऱ्या परकीय भाषेचा अनुवाद होईल. आतापर्यंत इंग्लिश, जपानी, कोरियन, चिनी अशा भाषांचं काम पूर्ण झालं आहे. येत्या काळात एकूण संख्या दहापेक्षा जास्त असेल.

सेल्फ-ड्रायव्हिंग टॅक्‍सी
DeNA ही जपानची गेमिंगमधली अग्रगण्य कंपनी आहे. ऑलिंपिकसाठी रोबो टॅक्‍सी अर्थात ड्रायव्हरलेस म्हणजे सेल्फ-ड्रायव्हिंग टॅक्‍सी बनवत आहे. आज गुगल, ऍपल, उबर यांच्यापासून बीएमडब्ल्यू, टोयोटा, मर्सिडीज यांच्यात पूर्णपणे स्वयंचलित वाहनं रस्त्यावर आणण्याची स्पर्धा सुरू आहे. अशा वेळी ऑलिंपिकच्या मुहूर्तावर जपान बाजी मारेल असं दिसतं.

उष्णतेवरही उतारा
यंदा टोकियोमध्ये ४० अंश सेल्सिअसच्यावर तापमान गेलं. युरोपही उष्णतेच्या लाटेनं होरपळून निघाला. ऑलिंपिकची ‘कुल’ नव्हे, तर ‘सो कूल’ अनुभूती घेता यावी म्हणून जपाननं कंबर कसली आहे. त्यासाठी कृत्रिम बर्फाचे स्प्रिंकलर बनवण्यात येत आहेत.
अशा प्रकारे जपानमुळं ऑलिंपिकच्या रूपानं साऱ्या जगाला टोकियो प्रेमात पाडेल हे नक्की. उगवत्या सूर्याच्या या देशाला केवळ सलाम!

हा आहे शुभंकर
शुभंकर हा ऑलिंपिकचा अविभाज्य घटक असतो. ‘टोकियो २०२०’चा शुभंकर आहे मिराईतोवा. मिरा म्हणजे भविष्यकाळ, तर तोवा म्हणजे प्रदीर्घ काळ शाश्वत राहणं. हा शुभंकर जगातील प्रत्येक बांधवाला आशेनं प्रफुल्तित जीवन जगण्याची प्रेरणा देईल, असं जपानला वाटतं. जुन्या गोष्टी चांगल्या शिकणं आणि त्यातून नवं ज्ञान संपादन करणं अशा आशयाची एक जपानी म्हण आहे. त्यापासून हा शुभंकर प्रेरित झाला आहे. ऑलिंपिक संपलेलं असेल, तेव्हा तो जागतिक बांधवांच्या ह्रदयात विराजमान झाला असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang mukund potdar write love in tokyo article