
ज्या करवीरनगरीनं मल्लांना हत्तीवर बसवून त्यांची मिरवणूक काढली तिथंच तेजस्विनी सावंत या करवीरकन्येनं नेमबाजीतल्या पराक्रमानं हा मान मिळवला. जागतिक स्पर्धेत सुयश संपादन केलेल्या तेजस्विनीला ऑलिंपिकच्या वाटचालीत मात्र सतत गतिरोधकांचा सामना करावा लागला. तीन वेळा ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ झाल्यानंतर चौथ्या प्रयत्नात तिला यश आलं. यानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद.
ज्या करवीरनगरीनं मल्लांना हत्तीवर बसवून त्यांची मिरवणूक काढली तिथंच तेजस्विनी सावंत या करवीरकन्येनं नेमबाजीतल्या पराक्रमानं हा मान मिळवला. जागतिक स्पर्धेत सुयश संपादन केलेल्या तेजस्विनीला ऑलिंपिकच्या वाटचालीत मात्र सतत गतिरोधकांचा सामना करावा लागला. तीन वेळा ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ झाल्यानंतर चौथ्या प्रयत्नात तिला यश आलं. यानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद.
भारताची नेमबाज तेजस्विनी सावंत हिनं कतारमधल्या दोहा इथं झालेल्या आशियाई स्पर्धेत ऑलिंपिक कोटा संपादन केला. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठून तिनं ही कामगिरी केली. सन २०१० मध्ये जागतिक स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्ण जिंकलेल्या तेजस्विनीची कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. ज्या करवीरनगरीनं पैलवानांना अशा उत्स्फूर्तपणे डोक्यावर घेतलं तिथंच एका सुकन्येनं सुयश संपादन करून आगळा पायंडा पाडला. नौदलात असलेल्या वडिलांमुळे रुबाबदार पोशाखांचं सुप्त आकर्षण, त्यातून एनसीसीमध्ये प्रवेश, तिथं नेमबाजीचा सराव, परेडसाठी कॅडेट म्हणून निवडीत डावललं जाणं, योजनाबद्ध प्रशिक्षणासाठी जयसिंग कुसाळे यांनी इच्छाशक्तीची कठोर चाचपणी केल्यानंतर होकार देणं, पोशाख घेण्याइतके पैसे नसणं, परिणामी मुलाचा पोशाख घालावा लागणं, निधीअभावीच ड्राय प्रॅक्टिस करावी लागणं (प्रत्यक्ष गोळी न झाडता, नुसता नेम धरणं), कारकीर्दीत यश येत असतानाच वडिलांचं आकस्मिक निधन, मग आईचं आजारपण, त्यानंतर विवाह, मग पुनरागमन, यश मिळूनही वाढत्या वयामुळे पुन्हा पुरेसा आर्थिक पाठिंबा न मिळणं अशा गतिरोधकांवर मात करत तेजस्विनीनं हे यश मिळवलं आहे. यानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद :
प्रश्न : ऑलिंपिक खेळणं हे प्रत्येक क्रीडापटूचं स्वप्न असतं. ते साकार करण्याची महत्त्वाकांक्षा असते. त्यासाठी तो झटत असतो. तुला ऑलिंपिक कधीपासून खुणावत होतं?
तेजस्विनी : मी सन २००६ पासून ऑलिंपिक कोटा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. २००८ (बीजिंग), २०१२ (लंडन) आणि २०१६ (रिओ) अशी तीन वेळा संधी हुकली. यात बीजिंगच्या वेळी माझे तीन कोटा गेले होते. टाय झाल्यानंतर काउंटबॅकवर निकाल लागला होता. लंडनच्या वेळी हेच घडलं; पण तेव्हा फरक थोडा जास्त होता. दोन्ही वेळा हताश होणं अटळ होतं. तुलनेनं रिओच्या वेळी मी आईच्या आजारपणामुळे पुरेसा सराव करू शकले नव्हते. मला वाटतं की कारकीर्द म्हणजे एक गाडी असते. ती धावत असते. गाडी म्हटल्यावर ती कधी बिघडते, अडते. ऑलिंपिक एक थांबा असतो. तो अर्थातच सर्वोच्च प्रतिष्ठेचा असतो; पण तो हुकला म्हणून गाडी थांबवून चालत नसतं. ती धावतीच ठेवावी लागते. माझी वाटचाल अशीच सुरू होती.
‘थर्ड टाइम लकी’ अशी इंग्लिशमध्ये एक उक्ती आहे. तुझ्या बाबतीत ऑलिंपिक हुकण्याचा इजा-बिजा-तिजा झाला. तू सन २०२४ च्या ऑलिंपिकलासुद्धा पात्र ठरू शकतेस; पण तसं पाहिलं तर सन २०२० म्हणजे ‘अभी नही तो कभी नही’ अशीच स्थिती होती, त्यामुळे कमालीचं दडपण आलं असणार. त्याचा सामना कसा केलास?
मी याबद्दल थोडं वेगळ्या पद्धतीनं सांगते. सचिन तेंडुलकरसुद्धा रोज ट्रेनिंग करतात; पण प्रत्येक डावात ते शतक काढू शकत नाहीत. कधी शून्य, कधी ५८, कधी ९८, तर कधी २०० पेक्षा जास्त अशा धावा होतात. धावा कमी झाल्या म्हणजे प्रयत्न, सराव कमी पडला असं नसतं. ‘प्रयत्न करणं तुमच्या हातात, बाकी दैवाची साथ...’
असं आम्ही क्रीडापटू नेहमी म्हणतो. ‘लक’ अर्थात नशिबाचं प्रमाण मात्र दोन किंवा फार तर पाचच टक्के. हार्डवर्क सगळेच करतात. सर्वांचं ध्येय सुवर्णपदकाचंच असतं; पण प्रत्यक्ष मैदानावर जो थोडा जास्त प्रयत्न करतो तो निसटत्या फरकानं सरस ठरतो. सन २००८ मध्ये समजा मी ९५ गुण मिळवले असतील तर कोटा ९६ पर्यंत ‘क्लोज’ झाला. पुढच्या वेळी मी ९६ मिळवले तर कोटा क्लोज झाला ९७ गुणांना. एखाद्या गुणानं तुमची संधी हुकणं हे दैव असतं; पण त्याचं प्रमाण कमी व्हावं म्हणून तुम्ही प्रयत्नांचं प्रमाण वाढवायचं असतं. तेच तुमच्या हातात असतं.
२०१० मध्ये जागतिक स्पर्धेतल्या यशानंतर सर्वोच्च पातळीवर थेट गेल्या वर्षी राष्ट्रकुल सुवर्ण मिळालं. तीन ऑलिंपिक हुकल्यानंतर मिळालेलं हे यश किती प्रेरक ठरलं?
ते नक्कीच प्रेरक होते. कारण, मी ‘कुमारी तेजस्विनी सावंत’ म्हणून नव्हे तर ‘सौ. तेजस्विनी सावंत-दरेकर’ म्हणून हे यश मिळवलं होतं. ‘लग्न झालं म्हणजे आता फक्त संसार’ असं आपल्याकडे मानलं जातं. आम्हा खेळाडूंकडेही पाहण्याचा दृष्टिकोन असाच असतो. अशा वेळी मी लग्नानंतरही कारकीर्दीची गाडी थांबू दिली नव्हती हेच यातून मला सांगता आलं. यात पती समीर यांचा पाठिंबा मोलाचा होता.
माहेर-सासरशिवाय तुझ्या वाटचालीत आणखी एका व्यक्तीचा वाटा आहे. ती व्यक्ती म्हणजे तुझी प्रशिक्षक कुहेली गांगुली. तुला सीनिअर असलेली कुहेली ही तुझी दीदी आहे. कतारमध्ये त्यांचा पाठिंबा, प्रोत्साहन कसं होतं?
कुहेली दीदी या माझ्या वैयक्तिक प्रशिक्षक आहेत. त्यांना बरोबर नेण्याइतका खर्च मी पुरस्कर्त्यांअभावी करू शकत नव्हते. त्यांच्याशी रोज संवाद मात्र होत होता. तुम्ही नुकताच गोल्ड कोस्टमधल्या सोनेरी यशाचा उल्लेख केलात. मला महाराष्ट्र क्रीडा संचालनालयात नोकरी आहे. राज्य सरकारचा, चंद्रकांत पाटील यांचा पाठिंबा मोलाचा आहे; पण आपल्याकडे ३० पेक्षा जास्त वय झालं की प्रायोजक पाठ फिरवतात. खरं तर भारतीय क्रीडापटू त्याच काळात परिपक्व होतात. त्यांची कारकीर्द स्थिरावते. गोल्ड कोस्टनंतर एका बड्या प्रायोजक कंपनीनं माझ्याकडून चार वेळा माहिती मागवून घेतली आणि ‘देखेंगे देखेंगे' केलं. प्रत्यक्षात त्यांचा अजूनही प्रतिसाद नाही. माझी ही तक्रार नाही; पण इतकंच सांगेन की ऑलिंपिकसाठी खेळाडूला किती प्रकारे कशी मदत लागते याचा सांगोपांग विचार आपल्याकडे सर्वच पातळ्यांवर व्हायला हवा. अर्थात, मी काय किंवा इतर खेळाडू काय, ते प्रयत्न सुरूच ठेवतील याची मला खात्री आहे. मी तरी त्या कारणामुळे अडथळा येऊ दिलेला नाही. व्यायामासह दिनचर्या, सराव कसा झाला, त्यात काही चुकलं तर ते कशामुळे चुकलं, बरोबर झालं तर ते कसं अशी चर्चा कुहेली दीदींशी रोज विस्तारानं व्हायची. आम्ही सतत संपर्कात होतो.
कतारमधील रेंज, तिथलं वातावरण, हवामान, प्रत्यक्ष ऑलिंपिक कोटा मिळण्याचा क्षण आला तेव्हा काय वाटलं?
स्पर्धेत आधी आम्ही दहा दिवसांचा ट्रेनिंग कॅम्प केला होता. तसं सन २०१२ मध्येसुद्धा मी या रेंजवर खेळले होते. रेंज समुद्रकिनाऱ्याजवळ असल्यामुळे वारा होताच; पण त्यानुसार सराव केला होता. अंतिम फेरी गाठलेल्या आठ जणींपैकी पाच जणींना कोटा मिळाला होता. त्यामुळे तीन जणींना मिळणार याची कल्पना होती. तशी घोषणा अंतिम फेरीपूर्वीच झाली तेव्हा झालेला आनंद शब्दांत कसा व्यक्त करू? मी मोबाईल कार्ड ॲक्टिव्हेट केलं नव्हतं, त्यामुळे फक्त कुहेली दीदीला कळवलं. तिने आई, समीर यांना कळवलं. मी कॅपापाई या भारतीय कंपनीचं शूटिंग किट (नेमबाजीचं जॅकेट) घालून ही कामगिरी साकारली याचा अभिमान वाटला.
प्रश्न : तुझ्याच शब्दांत सांगायचं तर गाडी ऑलिंपिकच्या थांब्यापर्यंत आली आहे. आता हा थांबा सोनेरी ठरावा म्हणून कसं नियोजन असेल? कतारहून पुण्यात आल्यावर खरा आनंद झाला असेल ना...
तेजस्विनी : मी गुरुवारी कतारहून आले. इथं आले तेव्हा कळलं की
विषाणूसंसर्गामुळे समीर रुग्णालयात होते; पण मला काहीच कल्पना देण्यात आली नव्हती. आता ते बरे झाले आहेत; पण साधारण एखादा आठवडा ब्रेक घेऊन मी कुहेली दीदीशी चर्चा करेन. आम्ही नियोजन करू आणि मग मी सराव सुरू करेन.
तेजस्विनीला शुभेच्छा देत निरोप घेतला. गतिरोधकांवर मात करणारी ही ‘तेजस्विनी एक्स्प्रेस’ केवळ नेमबाजीच नव्हे तर तमाम खेळांतल्या खेळाडूंसाठी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जगण्याची लढाई लढणाऱ्यांना गतिमान करणारी आहे. तिला सलाम अन् शुभेच्छा!