ग्रीष्मगाथा.. (मुकुंद वेताळ)

mukund vetal
mukund vetal

ज्येष्ठात मी ज्या ज्या वेळी चिंचेकडे पाहतो, तेव्हा मला या झाडाची खरंच किव येते. अहो वसंतोत्सवात या सृष्टीतलं प्रत्येक झाड नटून थटून उभं असताना. हे का, कोणास ठाऊक; पण निष्पर्ण होऊन उभं असतं; पण ग्रीष्म सुरू झाला रे झाला; आणि बाकी सगळेच जण पानाफुलाविना ओके बोके होतात, आणि हा इरेला पेटतो. याच्या रोमारोमातून नवचैतन्याने लालचुटूक धुमारे फुटू लागतात. पाहतापाहता उभं झाडं डवरून जातं. जिथं उष्म्यात जीणं नकोसं होतं; तिथं याला पिवळ्या पिवळ्या, लाल बिंबावल्या, सानुल्या फुलांचा बहर येतो.

चराचरातले सकल सजीव वासंतिकतेच्या अनुपम्य सोहळ्यात रममाण असताना उत्फुल्ल अशा रंगांची रया गेली, वृक्षवल्लरींनी आतापर्यंत फुलवत आणि झुलवत ठेवलेला तो पुष्पसंभार किरजवला आणि हलके हलकेच तरुतळी गळून पडला. आसमंत मंत्रमुग्ध करणारा गंधही वाऱ्यावर विरून गेला. फुलं गेली आणि त्यापाठोपाठ वाऱ्यावर हिंदोळणारी रंगीबेरंगी फुलपाखरंही गेली. पुष्पवनात लपवून ठेवलेले ते मधुघट पुष्पपर्णाविना विरल झालेल्या वृक्षराईत उघडे पडले. उरली सुरली पर्णराशी मलूल पडली. एकूणच सृष्टीवर अवकळाच पसरली. सैरभैर पक्षी आसरा मिळेल तिथं दडी मारून बसले. लाजऱ्या बुजऱ्या कोकिळा खट्टू झाल्या. त्यांच्या कोमल कंठातून येणाऱ्या आणि हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोड ताना आता दुरापास्त झाल्या. सगळंच कसं अनाकलनीय. अनपेक्षित हा निसर्गातला बदल; जैव, अजैव घटकांच्या पचनी पडायला तसा वेळच लागणार होता; पण राजऋतूचा हा आनंदसोहळा संपूच नये असं वाटणंही वावगं नव्हतं. कारण प्रत्येकाला सुख हवंच असतं. ऋतूबदल हे ही त्रिकालाबाधित सत्य आहे.... म्हणून तर ग्रीष्मागमन होतंय. खरं तर ज्येष्ठ आणि आषाढ हे दोनच महिने ग्रीष्माचे; पण ‘वैशाख वणवा’ही म्हणत आपण ग्रीष्माचं अस्तित्व, वैशाखातच गृहीत धरतो. असह्य उकाडा आणि प्रचंड ऊन हे वास्तव नकोसं वाटतं; पण यातच वर्षाकालाचं येणं होऊ घातलंय. आता वसंतातली फलधारणा परिपक्वतेकडं जात आहे. तप्त उन्हानं फळं, शेंगा वाळून तडकतील. इतस्ततः बीजं फेकली, सांडली जातील. सावरीची कापूस बोंडं फाकली रे फाकली, की बीजावरची तलम पांढरीशुभ्र छत्री वाऱ्यावरती कोसो दूर जाऊन बीजवहन करील. गंमत म्हणजे हे दृश्‍य इतकं मनोहर, की तासन्‌तास सावरीकडे पाहतच राहावंसं वाटतं. आसमंतातला हा तरंग म्हणजे निसर्गाची कमालच म्हणावी लागेल.

भर उन्हात मी वडाच्या गार सावलीत बसून त्याचं निरीक्षण करत होतो. त्याच्या पारंब्या म्हणजे एखादा जटाधारी ऋषीच जणू! मोठीमोठी पानं तर ग्रीष्मालाही दाद न देणारी. त्यात मला काहीतरी हालचाल जाणवली. म्हणून खोल पानांत बारीक बघू लागलो, तर भल्यामोठ्या तलवार चोचीचा ग्रे हॉर्नबिल दिसला आणि त्यानं काढलेला धीरगंभीर आवाजही आला. म्हणजे तो एकटाच नव्हता. जोडीदारीणसुद्धा असावी, असं मी मनाशीच म्हणत असताना दोनही दृष्टिक्षेपात आले. फांदीवरून उजव्या बाजूकडून डावीकडे एकेक पाय लयबद्धतेनं उचलत वरवर चाललेला. ते वडाची लाल लाल फुलं खाताना मी पाहतच राहिलो. खरं तर अगदी घनदाट अरण्यात वास्तव करणारा हा जीव हजारो मैल अंतर पार करत ऐन उन्हाळ्यात आपल्याकडे आलेला. राखी धनेश अतिशय दुर्मिळ पक्षी; पण यानं खालेल्या फळांचं बीज ज्यावेळी याच्या विष्ठेतून रानोमाळ पडतील, त्यावेळी त्यांची उगवणक्षमता शत प्रतिशत इतर पक्षांपेक्षा पक्की समजावी, हा एक नैसर्गिक बीजप्रसाराच्या दृष्टीनं मणिकांचन योग आहे. ग्रीष्मातलं हे काम अनेक जीव बेमालूम करतच असतात.

ज्येष्ठात मी ज्या ज्या वेळी चिंचेकडे पाहतो, तेव्हा मला या झाडाची खरंच किव येते. अहो वसंतोत्सवात या सृष्टीतलं प्रत्येक झाड नटून थटून उभं असताना. हे का, कोणास ठाऊक; पण निष्पर्ण होऊन उभं असतं; पण ग्रीष्म सुरू झाला रे झाला; आणि बाकी सगळेच जण पानाफुलाविना ओके बोके होतात, आणि हा इरेला पेटतो. याच्या रोमारोमातून नवचैतन्याने लालचुटूक धुमारे फुटू लागतात. पाहतापाहता उभं झाडं डवरून जातं. जिथं उष्म्यात जीणं नकोसं होतं; तिथं याला पिवळ्या पिवळ्या, लाल बिंबावल्या, सानुल्या फुलांचा बहर येतो. ग्रीष्मात तरी आंबा, वड, कडुनिंबानंतरची गार सावली फक्त चिंचेचीच.
आंब्याचा विषय निघाला म्हणून सांगावसं वाटतं :
गार सावली आंब्याखाली,
काय मजा लोळता.
वाऱ्याची झुळूक गार लागता.

उन्हातान्हातून, चाललेला थकला भागला जीव वाटेत भेटलेल्या आम्रतरुतळी न बसेल तर नवलच म्हणावं लागेल. याच काळात आंबा फलभारानं लवलेला असतो. हिरव्याकंच कैऱ्या गार सावलीत स्वस्थ बसू देत नाहीत. क्वचितच पाडाचा आंबा खायला मिळालाच, तर स्वर्गसुखाचाच आनंद! ग्रीष्मात आंबा तोही झाडावरच पिकलेला मिळाला तर मजाच. क्षुधाशमन तर होतंच; पण शरीरातली उष्णताही कमी होते. गंमत म्हणजे ‘नको नको हा उन्हाळा’ म्हणताना फळांच्या राजाचा मधूर रस तर मिळतोच; पण इतर सगळ्या प्रकारची फळंही ग्रीष्मात खायला मिळतात.

आंब्याचं लेकुरवाळंपण कडूनिंबाच्या मनात भरलं की काय? म्हणून त्यानं त्याच्याच बरोबरीनं फलधारणा केली. अगदी ज्येष्ठातच निंबांब्याला गच्च फळं लगडलेली दिसतात शेजारी शेजारी. अर्थात निंबाची द्राक्षाएवढीच आणि तसेच घडचे घड धारणा पाहून निंबोळ्या खाण्याची अनिवार इच्छा व्हावी; पण त्याचा कडवटपणा ध्यानात येताच- न खाताही तोंड वेंगाडेल कोणीही. मात्र, कडू असल्या, तरी पिकलेल्या निंबोळ्या एकदा तरी अवश्‍य खाव्यात. सुरुवातीला नकोसं वाटेल; पण ती आंबट, तुरट, कडू, गोड एकत्रित खाऊन झाल्यावर नंतरची मुखशुद्धी आणि मुखस्वाद दुसऱ्या कुठल्याच फळातून नाही मिळणार. पिकलेल्या निंबोळ्या कावळे आवडीनं खातात आणि ठायी ठायी विष्ठेतून पांढऱ्याशुभ्र निंबोळ्या पडतात. निसर्गतः हे बीज प्रसारणाचं कार्य कसं बिनबोभाट चालू आहे. वर्षाऋतूच्या आगमनाआधीचं उद्दिष्ट या पाखरांना कुणी ठरवून दिलं, हा एक प्रश्‍नच आहे.

ज्येष्ठात कावळे काडाकुडा गोळा करत कडुनिंबावरच घरटी बनवतात. कावळिणीची ही लगबग आमच्या शेतकऱ्यांना आनंदित करते. कारण कडुनिंबावर कावळीणीनं केलेलं घरटं म्हणजे भरपूर पावसाचा संकेत असतो. बाभळीवरचं घरटं हे कमी पावसाचे स्पष्ट संकेत असतात. ज्येष्ठ जसजसा शेवटास जातो, तसतसा उन्हाळा कडकच होत राहतो. तरीही, मी म्हणणाऱ्या उन्हात ग्रामजीवनातल्या आमच्या कृषकाला रानात जावंच लागतं. नांगरणी, कुळवणी अशी मान्सूनपूर्व मशागतीची कामं चालूच असतात. दुपारच्या वेळी गावात कुत्रंसुद्धा थांबत नाही. तेही रानात जातं धन्याबरोबर त्याच पाठराखण करायला. उन्हाच्या काहिलीनं भला मोठा जबडा आ वासून आणि हातभर जीभ बाहेर काढून ल्हास... ल्हास करत असताना तापमानाची तीव्रता जाणवते. येताजाता या सगळ्या घटकांना शेवटी झाडा-पेडांचाच आधार असतो.

आपत्ती आली, की माणसं ‘जिथं फुलं वेचली तिथ गोक्‍या वेचायची वेळ आली?’ असं म्हणतात; पण मला मात्र पळसाकडं पाहून असं म्हणावंसं वाटतं. कारण वसंताच्या उन्मादकतेत यानं सगळीच पानं फेकून दिली होती. फक्त भरगच्च फुलांचे वस्त्र हा अंगाखांद्यावर वागवत होता. आता ग्रीष्मात सगळी फुलं गळून गेल्यावर पुन्हा पानांचा हिरवा शालू पांघरून उभा आहे. क्षणात आपलं रूप बदलणारा हा एकमेव निसर्गातला बहुरूपी असावा. अर्थात वसंत सुरू व्हायच्या आधीच याला फुलं येतात आणि याचा बहरही लवकर संपतो. त्यामुळे तो त्याला ओकंबोकं न ठेवता लवकरच पानं धारण करतो. म्हणून कुठं सावली न दिसल्यानं गुरंढोरं याच्या गर्द सावलीत विसावतात, रोथावतात आणि भरपूर प्रमाणात शेण पडतं. सावल्या सरल्या की, त्या पोवट्या वाळून कोळ होतात आणि माणसं गोवऱ्या वेचायला येतात. गंमत म्हणजे वसंतात तिथंच फुलं वेचलेली असतात.

आता पक्ष्यांचा विणीचा हंगाम संपलेला असतो. त्यामुळे त्यांची घरटी ओस पडलेली दिसतात. अर्थात त्याच घरट्यांचा पुनर्वापर पक्षी करत नाहीत; पण दुसरंही आयतं घरटं वापरत नाहीत. पक्ष्यांमध्ये प्रजनन कधी करू नये, याचं तारतम्य नक्कीच असतं. अशा खाईत आणि उन्हाच्या लाहीत उत्पत्ती ते टाळतात. दुष्काळात तर पक्षी प्रजनन टाळतात. हा ऋतू त्यांच्यासाठी फार कठीण काळ असतो. प्रसंगी अनेक पक्षी स्थलांतर करतात आणि काही आवर्जून याच काळात येतात. आटलेल्या तळ्यातले मृतप्राय जीव हा आयताच आहार मिळतो आणि त्यातलं उघडं पडलेलं शैवाळ- जे कर्बोदिकांनी युक्त असतं.
तापाने रवीच्या सुके जल तसे झाले तळे कोरडे
तृष्णेने मुख शुष्क ते पशुसही काही सुचेना पुढे।
आशेने जव दूर दूर बघता वाटे धरावी दिशा
आशा पालवती जशी मृगजळे भिन्न छटा या कशा ।।1।।

प्रखर उष्म्यानं अतिशय तापून तहानेनं व्याकुळ हरीण चूर्ण केलेल्या (निळसर) अंजनाप्रमाणं दिसणारं आकाश पाहून दुसऱ्या वनात पाणी असेल असं समजून धावतच राहतं, अशी कालिदासाची या काव्यातली मध्यवर्ती कल्पना आहे. आता ग्रीष्माचा अंत आणि वर्षाऋतूचा आरंभ असा संक्रमणावस्थेचा अंतारंभाचा म्हणजे कहराचाच काळ आहे. जलाशयं, तळी, नद्या पूर्ण उघडे पडले आहेत. प्राणी सैरभैर आहेत. पाण्यासाठी दाही दिशा असा, मेटाकुटीचा काळ आहे. तहानलेल्या हरणांना पाण्याचेच भास होताहेत.

महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रीष्मातली दाहकता, तप्तता पुढे येणाऱ्या वर्षाकालासाठीच असते. जास्त तप्ततेनं हवा निघून जाते. ती पोकळी भरून काढण्यासाठी वारा वाहू लागतो. त्याचबरोबर समुद्रावरचे पाण्यानं भरलेले ढग येतात आणि पाऊस होतो. पहिला पाऊस सर्वांना आनंद देऊन जातो. वाऱ्यावरून आलेली बीजं, पशु-पक्ष्यांनी वाहून आणलेली बीजं जमिनीत रुजतात. त्यातून अंकुर फुटतात. नवे वृक्ष तयार होतात आणि येणाऱ्या ऋतुचक्राचा स्वीकार करतात. त्याच्या आल्दाददायकतेने आनंदी होतात. दाहकतेनं क्षमता निर्माण करतात आणि निसर्गानं दिलेलं सुंदर जीवन परोपरीनं उपभोगतात आणि शेवटी... ‘मातीच तू बा मातीस मिळशी’ या उक्तीप्रमाणं या मातीशी इमान राखतात. ऋतुचक्राचेच घटक होऊन जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com