आगळंवेगळं कन्यादान (नेहा अभ्यंकर)

neha abhyankar
neha abhyankar

‘‘मग आता काय ठरवलं आहे तुम्ही?’’ मी तिला विचारलं. ‘‘काय करायचं म्हणजे? आमचं रजिस्टर्ड मॅरेज आधीच झालं आहे. उद्या एक महिना होईल!’’ ती बिनधास्तपणे बोलत होती. ‘‘आजची रात्र तुमच्याकडे राहू. उद्या तुम्ही माझं कन्यादान करणार आहात. बाकी काही नाही. हे सांगण्यासाठी आलो आहोत!’’ ती म्हणाली.

वयाच्या बत्तिसाव्या वर्षी आम्ही उभयतांनी कन्यादान केलं. इतक्या लहानपणी हे धाडस कसं केलं, याचा आज साठी उलटून गेल्यावर विचार करता आश्चर्यच वाटतं. कोथरूडमध्ये वन रूम किचनमध्ये मी, माझे यजमान आणि तीन वर्षांचा आमचा मुलगा असे राहत होतो. आमच्या घरासमोर एक मोकळी जागा होती. सुट्टीत तिथं लहान मुलं खेळत असत. काही दिवसांनंतर तिथं बांधकाम सुरू झालं. एक भला मोठा खड्डा खणला. मोठमोठे दगड उचलणारी क्रेन माझा मुलगा तासन्तास खिडकीतून बघत बसायचा. वर्षभरातच या खड्ड्यानं तलावाचं रूप घेतलं. स्वच्छ पाणी त्यात सोडण्यात आलं. त्यानंतर फिल्टर आणि फाउंटनदेखील तिथं बसवण्यात आले. तलाव जवळून पाहावा याचा मोह आम्हाला होऊ लागला.

दररोज संध्याकाळी मी आणि माझा मुलगा तलावावर जाऊ लागलो. आठ फुटांपासून तीन फुटांपर्यंत खोली त्या तलावाच्या काठावर आखली होती. बेबी पूलच्या इथं मिकी माऊस, टॉम अँड जेरी अशा आकर्षक चित्रांच्या टाईल्स होत्या. हे पाहून माझ्या लेकानं पोहण्याचा आग्रह धरला. आम्हा दोघांनाही पोहता येत नव्हतं, परंतु मुलानं पोहणं शिकावं हा मनात चंग बांधला. शिवाय तलावात घालण्यासाठीचा स्विमिंग कॉस्च्युम, गॉगल आणि कॅप हे सर्व परवडणं जरा अवघड वाटलं, पण माझ्या यजमानांनी तो प्रश्न सोडविला.

आता माझ्यावर एक जबाबदारी आली. चांगला स्विमिंग प्रशिक्षक निवडण्याची. तलावावर जाऊन चांगला प्रशिक्षक शोधण्यास सुरुवात झाली. बेबी पूलमध्ये एक ताई मुलांच्या कलाकलानं पोहायला शिकवताना पाहिली. मनात एकदम पसंत पडली. तिच्याकडे चौकशी करून मी माझ्या मुलाला स्विमिंग शिकवण्यासाठी तिची निवड केली. दररोज पाऊण तास त्याचं डुंबणं चालू झालं.
‘‘पाण्याची पूर्ण भीती जाईस्तोवर त्याला एवढंच करू दे,’’ असं ताईनं मला सुचवलं.
सहा महिन्यांत हळूहळू मोठ्या पूलमध्ये हात मारणं वगैरे सुरू झालं. त्याला फक्त चांगलं पोहता यावं हाच आमचा हेतू होता. दोन दिवस आम्ही तलावावर दिसलो नाही म्हणून ताई पत्ता शोधत आमच्या घरी आली.

‘‘कुठं आहे पत्ता? दोन दिवस नाही आलास??’’ ताईनं दारातून येतानाच विचारलं.
‘‘अगं ताई, त्याला हलकासा ताप आहे! पाठीवर पाणीदार फोड पण आहेत!’’ मी तिला सांगितलं.
वास्तविक पाहता मी डॉक्टरांकडून त्याला नेऊन आणलं होतं. त्याला कांजिण्या झाल्या होत्या. तिला मी काहीच बोलले नव्हते. तिनं त्याचा शर्ट वर केला आणि अंगाला हात लावून ताप पाहिला.
‘‘या धावऱ्या कांजिण्या आहेत. त्याला खाजवू देऊ नका,’’ तिनं मान वळवून मला सांगितलं.
‘‘अगं, तुला कसं कळलं या कांजिण्या आहेत?’’ मी आश्चर्यानं विचारलं. ‘‘मी पुढल्या वर्षी होमिओपॅथिक डॉक्टर होणार आहे!’’ हसतहसत तिनं सांगितलं.
‘‘चला, याला अजून आठ दिवस पोहायला पाठवू नका!’’ असं म्हणत ती पटकन निघून गेली.
रात्री यांना हा किस्सा मी सांगितला. ‘‘म्हणूनच ती एका तासाच्या वर तलावावर थांबत नसेल,’’ असं यजमान म्हणाले.

तिच्याबद्दल माझ्या मनात आता अधिक आदर निर्माण झाला.
हळूहळू आमची मैत्री झाली. तिचा घरोबा वाढला. एके दिवशी तिचा मित्रही आमच्याकडे आला. शांत स्वभाव, धोरणी आणि एकदम हँडसम असा तो होता. तोसुद्धा आमच्यात समरस झाला. दोघंही हुशार, पण अतिशय साधे आणि सुसंस्कृत.
त्यांच्याबरोबर आम्ही खूप वेळा लोणावळा, सिंहगड इथं जाऊन आलो. एका ट्रिपमध्ये त्यांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अजून थोडे पैसे कमवून लग्न पण करणार आहोत हे त्यांनी आम्हाला सांगितलं. दोघंही एकमेकांना साजेसे होते.
काही दिवसांनी आम्ही टू बीएचकेमध्ये राहायला गेलो. घर सजवण्यास त्या दोघांनीपण खूप मदत केली. तो दादा तर आर्किटेक्ट असल्यामुळे घरामध्ये काय काय बदल करायचे, हे सुचवत होता. तेव्हा मला त्यानं सांगितलं, की काही दिवसांनंतर तो स्वतःची आर्किटेक्टची फर्मदेखील काढणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुळव त्याची चालू होती. त्यामुळे दोघंही आपापल्या परीनं पैसे साठवत होते. नंतर घरातलं आमचं रुटीन सुरू झालं. नव्या बिल्डिंगमध्ये आम्ही फक्त दोनच कुटुंब राहायला आलो होतो. त्यामुळे सर्वत्र सामसूम असायची.

अचानक रात्री साडेनाऊ वाजता दारावरची बेल वाजली. दारात बघितलं तर ही दोघं! ती तर घरच्या साध्या पोशाखात आली होती. ‘‘अरे तुम्ही आणि आत्ता या वेळेला?’’ मी घाबरतच त्यांना विचारलं.
‘‘अगं, त्यांना शांत बसू देत. पाणी आण,’’ यजमानांनी मला सांगितलं. ‘‘बसा शांत. पाणी प्या. मग बोला.’’
‘‘तुम्हाला माहीतच आहे, की माझ्या घरून लग्नाला विरोध होणार!’’ ती दीर्घ श्वास घेऊन म्हणाली. ‘‘माझ्या आई-वडिलांना खूप श्रीमंत जावई हवा आहे. माझ्या मतांना काही किंमत नाही!’’ ती दीर्घ श्वास घेऊन म्हणाली आणि रडू लागली.
‘‘मग आता काय ठरवलं आहे तुम्ही?’’ मी तिला विचारलं.
‘‘काय करायचं म्हणजे? आमचं रजिस्टर्ड मॅरेज आधीच झालं आहे. उद्या एक महिना होईल!’’ ती बिनधास्तपणे बोलत होती.
‘‘आजची रात्र तुमच्याकडे राहू. उद्या तुम्ही माझं कन्यादान करणार आहात. बाकी काही नाही. हे सांगण्यासाठी आलो आहोत!’’ ती म्हणाली.
‘‘अगं, पण तुझे वडील पोलिसात आहेत!’’ मी खूप आतून घाबरले होते.
‘‘आम्ही सज्ञान आहोत. चांगले मिळवते आहोत. शिवाय माझ्या घरात त्यांची काहीच तक्रार नाही!’’ असा दादानं खुलासा केला. पुढे दादा म्हणाला, ‘‘आमच्या घरच्यांनी घरातल्या घरात आमचं लग्न करण्याची तयारी केली आहे. फक्त कन्यादानाचा प्रश्न आहे.’’

त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच यजमानांनी सांगितलं, ‘‘हो, आम्ही तिघंही तुमच्या लग्नाला उपस्थित राहू. शिवाय कन्यादानही करू. भाऊ कानपिळी पण करेल तुझी!’’
त्यांच्या या वाक्यावर आम्ही खूप हसलो!
दुसऱ्या दिवशी दादाच्या बंगल्यावर रीतसर लग्न झालं. कन्यादानसुद्धा झालं.
या गोष्टीला आता २८ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्या दोघांचा मुलगा आता आर्किटेक्ट झाला आहे. तिचं सासर आणि माहेर एक झालं आहे. मनातली अढी मिटली. तिच्या आई-वडिलांना जावयाचा अभिमानच वाटतो.

हे सर्व असलं, तरी ते दोघंही आम्हाला आजसुद्धा आई-वडिलांचा मान देतात. कन्यादान केल्याचं सार्थकी लागलं! त्याचं पुण्य मिळाले आणि आमच्या मुलाला मोठी बहीण मिळाली. कन्यादानापासून विणलेले हे धागेदोरे आजही आमच्यात घट्ट आहेत!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com