esakal | वेध मालवणी लोककलांचा...
sakal

बोलून बातमी शोधा

saptarang niti mehendale book review

दक्षिण कोकणातला प्रसिद्ध मुलूख म्हणजे मालवण-सिंधुदुर्ग आणि तिथं मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा मालवणी. महेश केळुसकर हे मालवणातील फोंडाघाटचे मूळ रहिवासी असून तिथली भाषा व प्रांत याविषयीच्या भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या आहेत.

वेध मालवणी लोककलांचा...

sakal_logo
By
नीती मेहेंदळे

दक्षिण कोकणातला प्रसिद्ध मुलूख म्हणजे मालवण-सिंधुदुर्ग आणि तिथं मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा मालवणी. महेश केळुसकर हे मालवणातील फोंडाघाटचे मूळ रहिवासी असून तिथली भाषा व प्रांत याविषयीच्या भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या आहेत. नुसताच अभिमान बाळगण्यापलीकडे जाऊन त्यांनी त्या मातीतल्या मौखिक परंपरा आणि लोककला यांचा घनिष्ठ संबंध वाचकांसमोर आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

भारतीय लोककलांचा बराच अभ्यास झालाय आणि त्याबद्दल लिहिलं गेलंय. पण मालवणी मुलखातल्या लोककलांचा अभ्यास हा तसा अनोखा व स्वतंत्र विषय, केळुसकर यांनी तो संशोधनासाठी निवडणं हे खरं तर धाडसाचं काम. या तीन पुस्तकांमधली मालवणातील प्रत्येक लोककलेची प्रयोगात्मक केलेली निरीक्षणं व चिकित्सा अभ्यासपूर्ण आहे. लोकसाहित्य व लोककलांच्या विविध लक्षणांपैकी बोध व रंजन यापलीकडं लोकांच्या धार्मिक व मानसिक गरजांची पूर्ती हे एक महत्त्वाचं लक्षण म्हणता येईल. लोकसाहित्याचं संत साहित्य, ग्रामीणसाहित्य, व इतर साहित्याशी असलेलं साम्यं व भेद स्पष्ट करून लोकसाहित्याचं व्यवच्छेदक लक्षण कोणतं या प्रश्नाची सोदाहरण चर्चा या पुस्तकांत केली आहे. केळुसकर यांनी ‘दशावतार’ ‘लळित’ आणि ‘चित्रकथी’ या तीन पुस्तकांमधून मालवणी मुलखातील या लोककलेचा सर्वांगीण वेध घेतलाय. लोकसाहित्याचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे लोकसाहित्य हे अलिखित व मौखिक असून त्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार होत असतो. लोककला प्रयोगसिद्ध होण्यासाठी आवश्यक श्रोता आणि प्रेक्षक यांचा सहभाग याचा परामर्श या पुस्तकात घेतला आहे. काही महत्त्वाच्या संज्ञा यात दिल्या आहेत. विविध संशोधकांची मते केळुसकर यांनी नेमकी व आवश्यक तिथे मांडली आहेत.

दशावतारांचे मूळ हे जरी निश्चित समजलेले नसले तरी त्याची तुलना कर्नाटकातील यक्षगान व बंगाली जात्रा या लोककलांशी केलेली दिसते. दशावतार प्रयोगामध्ये मालवणी प्रयोग, जांब, पेटारा, मुखवटे, रंगभूषा, आदी घटकांचा अंतर्भाव केला जातो. दशावतार वाचताना मुख्य आख्यानात काही प्रमुख भाषिक घटक समोर येतात. त्यात शैलीच्या परंपरा, भाषेवर संस्कृतचा प्रभाव, भाषेतून स्थलवर्णन व स्थलबदल, खटकेबाज संवाद हे महत्त्वाचे. पुनरावृत्ती, प्राकृतता, छंदोबध्दता, अनुप्रासांचे आधिक्य यांनी त्याची संहिता अधिक उठावदार बनते. मालवणी बोली, लोक व्यवहारातील म्हणी, वाक्प्रचार यातून दशावतारी कलाकारांचे मालवणी मुलखाशी असलेले सहचर्य हे पुस्तक व त्यातली भाषा अधोरेखित करते. कसाल, सिंधुदुर्ग इथं ‘मयासुरवध’ या संपूर्ण दशावतारी खेळाचे प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण करून लेखकाने स्वतः त्यावरून संहिता तयार केली आहे. आपली मुक्तरंगपीठ परंपरा बाधित होईल म्हणून अशा आधुनिक तंत्रसुविधा टाळून दशावतारी लोककलाकार भाषेच्या माध्यमातून स्थलकालवाचक संकेत व्यक्त करतात.

चित्रकथी पुस्तकातून या कलेचा परिचय घडतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कुडाळ जवळचं पिंगुळी एक लहानसं गाव. तिथले मागास समजले जाणारे ठाकर लोक ‘चित्रकथी’ जतन करण्याचं काम पिढीजात पद्धतीनं करताहेत. अशिक्षित असूनही ही जमात संस्कृतप्रचुर मराठी बोलते हे विशेषच. आर्ष महाकाव्ये आणि लोककला यांची सांगड घालणारी काही विशिष्ट पदे व ओव्या महत्प्रयासाने केळुसकर यांनी या गावातून मौखिक सादरीकरणातून मिळवून आपल्याला उपलब्ध केल्या आहेत. रामायण, महाभारतातील कथाभाग कळसूत्री बाहुल्या किंवा चित्रकथीच्या साह्याने सादर केला जातो. चित्र सादर करताना सोबत पद, गण व ओव्या म्हटल्या जातात. यात आवाजातले चढ उतार व त्यातले नाट्य, संगीताची समज, मर्यादित मुद्राभिनय यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद हे सर्व नेमक्या शब्दात यथोचित मांडण्याचं काम केळुसकर करतात. तिथे आढळणाऱ्या पिंगुळी परंपरेतल्या नऊ लोककलांपैकी चित्रकथी, कळसूत्र, छायाबाहुल्या या महत्त्वाच्या. पैकी चित्रकथीची स्वतःची अशी खास मूलभूत स्वरूपाची वैशिष्ट्ये आहेतच. या तीनही लोककलांची प्रयोजने, निर्मीतीप्रेरणा व प्रयोग ढाचा यात साधर्म्य असल्याने चित्रकथी बरोबर इतर दोन्ही लोककलांच्या स्वरूपाचाही विचार या पुस्तकात केला गेला आहे.

पिंगुळी येथे सध्या काहीच चित्रसंच उपलब्ध असून आदर्श जीवनमूल्यं चित्रकथीतून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. भाषिक प्रयोगात्मकता साधण्याचा लोककलेचा प्रयत्न केळुसकर यांनी अचूक टिपला आहे. चित्रकथींच्या सादरीकरणात वाच्यार्थ, सूचितार्थ, ध्वन्यार्थ, रूपकात्मक अर्थ असे विविध पैलू लक्षात घेऊन अर्थाची परिमिती वाढवली जाते. मौखिक परंपरेत पद्य व गद्य संयुक्तपणे वाटचाल करते.
कळसूत्री बाहुल्या कशा असतात व कशा बनवतात त्याचीही माहिती मोठी वेधक आहे. महाराष्ट्रात तसेच केरळ, कर्नाटक, राजस्थान इत्यादी राज्यांतही वेगवेगळ्या नावांनी हा खेळ प्रचलित आहे.
छायाबाहुल्या खेळात भारूड पक्षी व भारूड यांचे गूढ अस्तित्व जाणवते. भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे हा खेळ बंदिस्त रंगमंचावर सादर केला जातो. काठ्या, पडदा, चामड्याच्या बाहुल्या ज्या बांबूच्या पेटीत ठेवतात तो पेटारा, हे सगळं अद्भुत विश्व लेखक लीलया आपल्यासमोर उलगडून ठेवतो.

केळुसकर यांच्या ‘लळित’ या तिसऱ्या पुस्तकात लळिताचे मुळात स्वरूप कसे होते, त्यातले बदल, भारूड-कीर्तन-लळीत असा झालेला प्रवास याची चर्चा केली आहे. भगवंताच्या लीला दाखवणे हे त्याचे खरे प्रयोजन. संतांनी याला लोकप्रबोधनाचे प्रयोजन जोडले जे पुढे नाट्यात्मतेकडे झुकत गेले. सोंग आणून केलेलं कीर्तन अशी त्याची व्याख्या शब्दकोशात दिली आहे.

भाषिक चमत्कृती हेच या खेळाचं वैशिष्ट्य. नंतर त्यात सोंगं वठवली जाऊ लागली. त्यातली सोंगे विविध भाषा बोलतात. त्याची बीजे भारुडात असल्याने ते रूपकात्मक भाषा बोलतात. लळितासारखे धार्मिक प्रबोधन करणे हे एक प्रयोजन असलेल्या लोककला अध्यात्मिक परिभाषेत बोलत असतात. सूत्रधार लोकांना लळिताचा अर्थ सांगतो. कारण लळिताची भाषा ही आध्यात्मिक साधना असणाऱ्या लोकांना सहज समजते. पण जनसामान्यांना कळण्यासाठी त्या भाषिक संकेतांचे अर्थ उलगडून दाखवावे लागतात.

नेपथ्याऐवजी बरेचदा कायिक व मुद्राभिनयाने ती कसर भरून काढली जाते. विनोदाची विविध प्रकार आणि त्यांचे खेळात करून घेतलेले उपयोग केळुसकर यांनी इथं छोट्या छोट्या उदाहरणांमधून मांडले आहेत.

पुस्तकांची नावं - दशावतार, लळित, चित्रकथी
तिन्ही पुस्तकांचे लेखक- डॉ. महेश केळुसकर
प्रकाशन- अनघा प्रकाशन, ठाणे (९७६९६०३२३९, ९७६९६०३२४०)
१) लळित- पृष्ठं : १६० मूल्य : २५० रु
२) चित्रकथी - पृष्ठं : १६८ मूल्य : २५० रु
३)दशावतार- पृष्ठं : २४६ मूल्य : ३५० र