esakal | थराराच्या पलीकडचं वास्तव (प्राची कुलकर्णी-गरुड)
sakal

बोलून बातमी शोधा

prachi kulkarni garud

वेब सिरीजच्या यज्ञात रोज नवनव्या समिधा पडत असल्या, तरी काही वेब सिरीज तुमच्या मनाचा ठाव घेतात. "द फॅमिली मॅन' ही अशीच एक वेब सिरीज. मनोज वाजपेयीनं साकारलेला गुप्तचर अधिकारी इथं भेटतो आणि तो या सगळ्या दुनियेतल्या थरारामागचं वास्तव उलगडतो. "आवर्जून पाहावे असे' या श्रेणीत असलेल्या या वेब सिरीजविषयी....

थराराच्या पलीकडचं वास्तव (प्राची कुलकर्णी-गरुड)

sakal_logo
By
प्राची कुलकर्णी-गरुड prachihere@gmail.com

वेब सिरीजच्या यज्ञात रोज नवनव्या समिधा पडत असल्या, तरी काही वेब सिरीज तुमच्या मनाचा ठाव घेतात. "द फॅमिली मॅन' ही अशीच एक वेब सिरीज. मनोज वाजपेयीनं साकारलेला गुप्तचर अधिकारी इथं भेटतो आणि तो या सगळ्या दुनियेतल्या थरारामागचं वास्तव उलगडतो. "आवर्जून पाहावे असे' या श्रेणीत असलेल्या या वेब सिरीजविषयी....

साधारणपणे चाळीशी उलटलेला तो, संसाराला पंधरा वर्षं झालेली. सुंदर बायको, वयात येऊ लागलेली मुलगी आणि बंडखोर लहान मुलगा अशा दोन मुलांचा बाप. कुटुंबासह तो एका टू बीएचके फ्लॅटमध्ये राहतोय. घर लहान म्हणून त्याची आई त्यांच्यासोबत राहत नाहीये. होम लोन सॅंक्‍शन झाल्यावर मोठा फ्लॅट घेऊन त्याला आईला स्वत:च्या घरी आणायचंय खरंतर. बरीच वर्षं वापरून जुनी झालेली गाडी काढून टाकून नवी एसी कार घ्यावी अशी त्याच्या मुलांची इच्छा आहे. सख्खी भावंडं, आई, बायको, मुलं यांच्या अपेक्षांच्या दडपणाखाली आहे तो. सगळ्यांनाच वाटतंय, की तो करतोय ती नोकरी करण्यापेक्षा वेगळं, भारीपैकी आणि लठ्ठ पगार देणारं करिअर त्यानं करायला हवं होतं. या सरकारी नोकरीत त्याची हुशारी, प्रखर बुद्धिमत्ता वाया चालली आहे. तुटपुंजा पगार, कुटुंबाच्या मागण्या, मुलांचे प्रश्न, घर-मुलं-कॉलेजमधली नावीन्य संपलेली नोकरी करून कंटाळलेली आणि दुरावत चाललेली सुंदर बायको...या सगळ्या आवर्तात तो गुरफटला आहे; पण जेव्हा काम समोर येतं तेव्हा मात्र तो मनातला गोंधळ बाजूला सारून आपलं कर्तव्य चोख बजावतो. हा आहे- श्रीकांत तिवारी, मुंबईस्थित "टास्क' नावाच्या एका काल्पनिक सरकारी गुप्तहेर संस्थेचा वरिष्ठ अधिकारी. "ऍमेझॉन प्राइम'वर गेल्या वर्षी रिलीज झालेल्या "द फॅमिली मॅन' या अतिशय उत्कंठापूर्ण वेब सिरीजनं प्रेक्षकांची मनं केव्हाच जिंकून घेतली आहेत..त्याला कारणंही तशीच तगडी आहेत.

मनोज वाजपेयी हा उत्कृष्ट अभिनेता शीर्षक भूमिकेत आहे. त्यानं या भूमिकेचं सोनं केलं आहे. तो श्रीकांतच वाटतो. त्याच्या देशप्रेमाची प्रखर जाणीव, कर्तव्यबुद्धी, सारासार विवेक, जबाबदारी न टाळता घेतल्या निर्णयाचे परिणाम स्वीकारण्याची वृत्ती...तिवारीच्या पात्रातले एकूणएक कंगोरे इथे दिसतात. एक कर्तव्यकठोर, शूर अधिकारी, मुलांवर प्रेम करणारा बाप, बायकोला घाबरून असलेला टिपिकल नवरा आणि सच्चा मित्र... मनोज वाजपेयी "द फॅमिली मॅन'मधला फॅमिली मॅन नीटच दाखवतो. तीच गोष्ट त्याच्या बायकोची, सुचित्रा उर्फ सुचीची भूमिका करणाऱ्या प्रियमणी या दाक्षिणात्य अभिनेत्रीची. इतक्‍या सहज सुंदरतेनं तिनी सुची साकारली आहे की बास..! कॉलेजमधली प्रोफेसरशिप, तुटपुंज्या रकमेत घरखर्च भागवणं, मुलांचे वाढते खर्च या साऱ्याचा तिला कंटाळा आला आहे. ती आता रूटिनपलीकडच्या नावीन्याच्या शोधात आहे. "अरविंद' ही सुचीच्या मित्राची भूमिका करणारा हॅंडसम अभिनेता शरद केळकर एवढ्या सगळ्या गर्दीतही लक्षात राहतो. याशिवाय कमाल करतो तिसऱ्या मुख्य भूमिकेतला शरीब हाश्‍मी. त्यानं साकारलेलं जेके तळपदे हे पात्र धमाल करतं. हा तळपदे श्रीकांतचा कलीग आहे. अनेक वर्षं एकत्र काम केल्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री आहे. तो वय वाढूनही सडाफटिंगच आहे. त्याच्या तोंडी असलेले "Privacy is a myth, just like democracy..! ' असे संवाद धमाल आणतात. गुल पनागचं "सलोनी भट्ट' या तगड्या काश्‍मिरी अधिकारीच्या रूपातलं दर्शन सुखद आहे.

एकूणच अगदी लहानसहान भूमिकांमधले नटही छाप पाडतात. अचूक पात्रनिवडीच्या बाबतीत दिग्दर्शकानं बाजी मारली आहे. कृष्णा डीके आणि राज निडीमोरू हे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. आजवर आपण कथा-कादंबऱ्या-सिनेमांमधून पाहिलेल्या गुप्तहेरांच्या गूढ जगाची कौटुंबिक बाजू या मालिकेतून आपल्यापुढे फारच प्रभावी पद्धतीनं येते. हे सुपर स्पाय काय खातात-पितात? कुठल्या मिशनवर नसतात तेव्हा कोणते कपडे घालतात? कसे जगतात? त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या कामाची कल्पना असते का? अशा अनेको प्रश्नांची उत्तरं आपल्याला या मलिकेतून मिळतात. अचूक पात्रनिवड, वास्तविक बातम्यांवर आधारित बेतलेलं भनाट कथानक, खिळवून ठेवणारे संवाद, सहज ओघवती भाषा (भरपूर शिव्यांचा भडिमार असला तरीही तो योग्यच वाटतो.) रोजच्या पाहण्यातलं मुंबई शहर या मालिकेत वेगळंच दिसतं. कृष्णा डीके आणि राज निडीमोरू या लेखकद्वयीनं या मालिकेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेल्या घटनांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. 2002 मध्ये घडलेल्या गोध्राच्या दंगलीचे संदर्भ थेट केरळमधे सापडलेल्या इसिस या पाकिस्तानी संघटनेची पाळंमुळं..काश्‍मिरपर्यंत आपल्याला मालिकेत दिसतात.

नेहमीच्या वेगवान, ऍक्‍शनपॅक्‍ड थरारपटांसारखी ही सीरिज नाही. कृत्रिम थराराच्या पलीकडचं वास्तव इथं दिसतं. दहशतवादविरोधी आणि अगदी दहशतवादी दोन्ही गटांतल्या लोकांना एक विशिष्ट आचारसंहिता पाळावीच लागते, हे इथं पाहणं रंजक आहे. जबरदस्त आशयसमृद्ध कथानक आणि घट्ट बांधलेल्या पटकथेचं हे यश आहे. आणि विशेष उल्लेख करायला हवा तो सिनेमॅटोग्रॅफीचा. सलग वनटेक शूट केलेले कितीतरी शॉट्‌स.. खास करून बंदुकीसह पाठलाग करणारे आ वासून दृश्‍य बघायला भाग पाडतात.

सुमीत अरोरा या संवादलेखकानं मलिकेत अक्षरश: जान ओतली आहे. प्रत्येक प्रसंग, पात्रांमधले संवाद कुठेही प्रचारकी, उपदेश करणारे न वाटता "तुमच्याआमच्यातले' वाटतात. संवादात असलेला सहज विनोद प्रसंगातली विसंगती छानच पोचवतात. या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पात्राची मानवी बाजू जास्त ठळक केलेली इथं दिसते. मग तो नायक असो वा खलनायक.

येत्या 20 सप्टेंबर 2020 रोजी या सिरीजचा दुसरा सीझन प्रदर्शित होणार आहे, तेव्हा आपण फोनवर रिमाईंडर लावून ठेवलेलाच बरा... एकूणातच "आवर्जून बघावे असे काही' या श्रेणीतली ही वेब सीरिज आहे, एवढं नक्की!

द फॅमिली मॅन
लेखक-दिग्दर्शक : कृष्णा डीके आणि राज निडीमोरू
संवाद : सुमीत अरोरा
मुख्य कलाकार : मनोज वाजपेयी, प्रियमणी, शबीर हाश्‍मी