नव्या शिक्षणवाटा (प्रसाद मणेरीकर)

प्रसाद मणेरीकर pmanerikar@gmail.com
रविवार, 17 मे 2020

कोरोनामुळे शैक्षणिक प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला आहे. आगामी काळातल्या शिक्षणवाटा बदलतील का, त्या बदलल्यास कशा असायला हव्यात, बदलांच्या प्रक्रियेत विद्यार्थी हा केंद्रस्थानी कसा राहायला हवा आदी मुद्‌द्‌यांबाबत ऊहापोह.

कोरोनामुळे शैक्षणिक प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला आहे. आगामी काळातल्या शिक्षणवाटा बदलतील का, त्या बदलल्यास कशा असायला हव्यात, बदलांच्या प्रक्रियेत विद्यार्थी हा केंद्रस्थानी कसा राहायला हवा आदी मुद्‌द्‌यांबाबत ऊहापोह.

कोरोनानंतर शिक्षणाचं काय, हा प्रश्न सध्या विविध प्रकारे चर्चेला येऊ लागला आहे. त्यातही सरकारी मंत्र्यांनी "आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे' असं म्हटल्यानंतर तर या प्रश्नाचं महत्त्व आणि गांभीर्य आणखी वाढलं. कारण आपल्याला सर्वात जास्त काळजी वाटते ती अर्थातच ज्येष्ठ नागरिकांची आणि मुलांची. त्यामुळे मुलं, त्यांचं आरोग्य आणि त्यांचं शिक्षण हा मुद्दा निश्‍चितच महत्त्वाचा ठरतो. सध्या परीक्षेचा कालखंड संपला आणि उन्हाळी सुट्ट्यांचा कालखंड सुरू झाला, त्यामुळे सरकारी पातळीवर हा मुद्दा थंड आहे. तो आगामी शैक्षणिक वर्षात फीवाढ न करणं, परीक्षा रद्द करणं किंवा पुढे ढकलणं अशा बाबीपुरताच सध्या मर्यादित आहे. खरा प्रश्न येईल तो जूनमध्ये शाळा सुरू व्हायची स्थिती आली की. त्यातही शाळा जूनऐवजी ऑगस्ट वा सप्टेंबरमध्ये सुरू कराव्यात असाही विचार आहे, काही शाळांनी शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीनं सुरू करायची तयारी चालवली आहे.

दोन महिन्यांचा धडा
गेल्या एक-दोन महिन्यांचा विचार केला तर असं लक्षात येतं, देशव्यापी बंद सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस भीती, दडपण, आणि उत्साह अशा विचित्र अवस्थेत गेले. परीक्षा रद्द झाल्याचा आनंदही झाला. त्यानंतर बंद वाढणार हे लक्षात आल्यावर अनेक ऑनलाइन शिक्षणाचे पर्याय समोर यायला लागले. काही शाळांनी मोबाईलवर अभ्यास पाठवून तो घरी मुलांनी करावा असे प्रयत्न केले; अगदी बालवाडीसहित. काही सरकारी शाळांनाही या प्रकारे काम सुरू केलं. त्यामुळे मुलं गुंतून राहताहेत याचं पालकांना समाधान होतं. त्यानंतर उन्हाळी सुट्टी सुरू झाली. आता या प्रकारच्या सुट्टीतला हमखास पर्याय म्हणजे कोणत्यातरी शिबिरांना जाणं, छंद वर्गांना जाणं; पण सध्या ही व्यवस्था ठप्प असल्यामुळे पुन्हा टीव्ही किंवा कॉंप्युटर किंवा मोबाईल या स्थितीला मुलं येऊन पोचली किंवा त्यांना पोचवलं गेलं.

मुलांचं शैक्षणिक नुकसान हा मुद्दा आपण फारच बाऊ करून ताणतोय असं मला वाटतं. याचं कारण शिक्षणाची शाळेशी आपण घातलेली वीण. ती इतकी घट्ट घातली आहे, की आता ती उसवणं आपल्यालाच कठीण होऊन बसलंय.
देशव्यापी बंदी सुरू झाल्यानंतर मुलांना कुठं गुंतवायचं हा प्रश्न पालकांसमोर का उभा ठाकला हे समजून घ्यायला हवं. मुळातच मुलांनी घरात काय करायचं हे गेल्या काही वर्षांमध्ये आपण ठरवून टाकलं, आणि आपल्या गरजामुळे शाळांनी ठरवून टाकलं. त्यामुळे मुलांनी घरी शाळेचा अभ्यास करणं, काहीवेळ टीव्ही, कॉंप्युटर, मोबाईल घेऊन बसणं, थोडा वेळ इतर मुलांबरोबर खेळणं याच्या पलीकडे फारसं काम मुलांच्या वाट्याला घरात येत नाही. घरातल्या एकूण कामांच्या जबाबदारी त्यांचा सहभाग नगण्य असतो, कारण आपणच त्यांना घेऊ दिलेला नसतो. या काळात मला अनेक पालकांनी सांगितलं, की मुलं घरात काम करायला तयार नाहीत; पण ज्या मुलांना घरातली कामं करायची सवय आहे, किंवा जी मुलं स्क्रीनपासून दूर आहेत तिथं हा फारसा प्रश्न आलेला नाही. त्यामुळे भविष्यात घर आणि शाळा यातला समतोल साधण्याचा धडा यातून आपल्याला शिकायला मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आपण मुलांना आणि त्यांच्या विचारांना इतकं बांधून ठेवलं आहे, की आपल्या परवानगीशिवाय त्यांनी काहीच करू नये, आणि आपण सांगू तेच करावं अशीच रचना आपली आहे. यामुळे मुलांना स्वतंत्रपणे विचार करून आपलं काम निवडण्याचा आणि त्याची जबाबदारी घेण्याचा पर्याय बंद केलेला आहे. खरं तर नवनव्या गोष्टी शोधत राहणं आणि त्यानुसार काम करत राहणं ही मुलांची नैसर्गिक सवय. काही उपलब्ध नसलं, तरी तेच काहीतरी शोधून काढतात आणि करत राहतात; पण सातत्यानं आपल्या आज्ञेत आणि सूचना पाळत राहायची सवय मुलांना आपण लावल्यामुळे आता तीच गोष्ट आपल्यावर उलटू लागली. मुलांना स्वातंत्र्य असेल, त्यांना हवं ते करता येत असेल, अर्थात ते करताना काय काळजी घ्यावी हे त्यांच्याशी बोलत असू तर मुलं फारशी आपल्यामागे कटकट करत नाहीत. कोरोनाच्या या कालखंडात आपण हे आवर्जून लक्षात घेण्याची गरज आहे.
देशात टाळेबंदी सुरू झाल्यानंतर अनेक शाळांनी मुलांना काम द्यायला सुरुवात केली आणि मुलांचा वेळ फुकट (?) जात नाही याचं शाळांनी आणि पालकांनी समाधान मिळवलं. खरं तर या काळात एक मोठी शैक्षणिक संधी होती ती मुलांनी स्वतः काहीतरी नवं शोधून ते करण्याची. मुलांना स्वतंत्र करावयाची. स्वत: निर्णय घेऊन तो पार पाडण्याची. घरात राहून करता येईल अशा उपक्रमांची (नेटवरून काढा, वाचा, लिहा, चिकटवा हे सोडून) शाळा आणि पालकांनी योजना करून मुलांसमोर मांडली असती ती मुलांनी नक्की स्वीकारली असती. पण अशी संधी आपण घेतली नाही. अजून वेळ आहे अजून शाळा नेमक्‍या कधी सुरू होणार आहेत हे माहितीच नाहीय, त्यामुळे हा कालखंड मुलांनी आपल्याला आवडेल ते करावं, त्यांनी त्यांचा शोध घ्यावा याच्यासाठी अतिशय प्रभावीपणे वापरून घेता येईल आणि ते त्यांच्या भविष्यासाठी निश्‍चित उपयोगी ठरेल. आणि हे आत्तापुरतं नाही कायमस्वरूपी करण्याची बाब आहे.

उद्याच्या शिक्षणाचं काय ?
हेही दिवस निघून जातील; पण प्रश्न आहे तो उद्याचा. सध्या एकूणच मतप्रवाह असा आहे, की शिक्षण हे शक्‍य तेवढं ऑनलाईन करावं. हा विचार म्हणून खूप छान वाटतो; पण या विचाराच्या मुळाशी गेलं, की अनेक प्रश्न समोर दिसू लागतात. हे प्रश्न केवळ तंत्राच्या संदर्भातले नाहीयेत. तांत्रिक मुद्दा आपण आज उद्या सोडवू. आज आपल्याकडे कदाचित तंत्रज्ञान प्रगत नसेल किंवा ग्रामीण पातळीपर्यंत मुलांच्या हातात पोचत नसेल ते उद्या पोचेल तो मुद्दा फार महत्त्वाचा नाहीये. मुद्दा आहे तो मुलांच्या विकासाचा. कारण आपण कितीही पर्याय उभे केले, तरी मुलांच्या शैक्षणिक गरजा नेमक्‍या काय आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही. नाहीतर आजारापेक्षा उपाय भयंकर ठरायचा.
दूरस्थ शिक्षणाचे, तंत्रज्ञानाचे कितीही गोडवे गायले, त्याचं महत्व पुनःपुन्हा मांडलं, तरी मानवी महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही आणि मुलाच्या आठ-दहा वयापर्यंत तर त्याचं महत्त्व खूपच जास्त आहे. याचं कारण शिकणं ही एक दिशा प्रक्रिया नाही. नुसतं वाचलं, पाहिलं, समजलं, सोडवलं, पाठवून दिलं असं शिकणं होत नाही. ऑनलाइन साधनांमध्ये किंवा व्हिडिओंमध्ये त्यांना समोर कोण आहे याच्याशी फार देणंघेणं नसतं. कारण त्याला मानवी चेहरा नसतो; पण शिकणं ही देवाणघेवाण असते. ही देवाणघेवाण अनुभवांची असते, माहितीची, ज्ञानाची असते. भावनांची असते आणि शिक्षणात भावनांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या साऱ्यातून एक परिपूर्ण रूपातलं शिक्षण होत असतं. कोणत्याही वयात आणि त्यातल्या त्यात शालेय आणि बालवाडीच्या वयात तर हा भावनिक आणि व्यक्तिगत संबंधाचा भाग फार महत्त्वाचा असतो.
असं म्हटलं जातं, की प्रत्येक जण आपलं आपण शिकत असेल तर ऑनलाइन शिकायला काय हरकत आहे? शाळा कशाला हवी? हा प्रश्न आता नव्यानं समोर येऊ लागला आहे. शिकणारा व्यक्तिगतरित्या शिकत असला, तो अनुभव व्यक्तिगतरित्या घेत असला, तरी त्या अनुभवात सामाजिक भाग फार महत्त्वाचा आहे. माणसाच्या किंवा मुलांच्या गरजा हे सांगितल्याबरहुकूम काम करणं इतक्‍याच मर्यादित नसतात. त्या मानवी गरजा असतात.
मी गेले काही दिवस या ऑनलाइन (दुरस्त) शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी आहे. वेगवेगळ्या वयोगटांतल्या मुलांसोबत काम करतोय आणि हे पुनःपुन्हा हे लक्षात येतंय, की या प्रक्रियेतला सर्वांत महत्त्वाचा भाग मुलं एकमेकांशी जास्तीत जास्त कशी बोलतील, एकमेकांच्या अडचणी कशा सोडवतील हाच आहे. कारण तोच शिक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यातूनच मुलं चांगली शिकतात. म्हणूनच त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. शिकणं ही एकट्याची प्रक्रिया नसून ती गटाची आहे.

समोर येणारे नवे पर्याय
अर्थात गेल्या दोन महिन्यांच्या काळानंतर शिक्षणाविषयीचे काही चांगले मार्ग समोर येऊ शकतात अशी स्थिती निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ, एखादा अभ्यासक्रम शिकण्यासाठीच आता विविध पर्याय निर्माण होऊ शकतात. म्हणजे एकच अभ्यासक्रम समोरासमोर शिकता येईल, किंवा ऑनलाईन व्यक्तिगतरित्या शिकता येईल किंवा छोट्या समूह गटानं शिकता येईल आशा व्यवस्था निर्माण होऊ शकतात किंवा आपल्याला निर्माण कराव्या लागतील. म्हणजे एखाद्या सोसायटीतली समवयस्क मुलं त्याच भागात एकत्र जमून दूरस्थ पद्धतीनं वा एखाद्या सहकाऱ्याच्या मदतीनं शिकतील- त्यातून त्यांचा त्रासदायक प्रवास वाचेल. अशा पर्यांयातून निवडींना अधिक वाव मिळू शकतो. किंवा मी जे समोरासमोर शिकलोय ते मला पुन्हा शिकायचं असेल तर मला ऑनलाईनचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो. पण हे एका विशिष्ट वयानंतर, साधारण बारा-तेरानंतर करावं त्याआधी भरपूर प्रत्यक्ष अनुभवांना पर्याय नाही.
त्यामुळेच इथं साधारण वयोगटानुसार विचार करावा लागेल. म्हणजे साधारण 8 वयापर्यंत, आठ ते बारा, बारा ते सोळा आणि त्या पुढील असे टप्पे करून व्यवस्था निर्माण करावी लागेल. कारण या वयांतल्या गरजा, विकास अवस्था वेगवेगळ्या असतात.

इथं पालकांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. पालकांनी मुलाची शिकण्याची प्रक्रिया समजून घेतली (ती घेतलीच पाहिजे) आणि आपल्या मुलांच्या किंवा त्या बरोबरीनं भोवतालच्या एखाद्या गटाच्या शिक्षणात सहभागी झाले, तर घर परिसरातून मुलांच्या शिकण्यासाठी भरपूर अनुभव उपलब्ध होऊ शकतील. जे शालेय अभ्यासक्रमाशी जोडलेले असतील वा पूरक असतील.
या शिकण्याच्या प्रक्रियेत माहिती मिळवणं, त्यावर प्रक्रिया करणं आणि ती माहिती वापरून पाहणं अशा मुख्य तीन टप्यांचा समावेश होतो. माहिती मिळवण्याचं काही काम जरी ऑनलाइन स्वरूपात झालं, तरी त्यापुढचे दोन टप्पे मुलांच्या गटामध्ये होतील अशी रचना करावी लागेल. सध्या शिक्षण माहिती मिळवण्यापर्यंत थांबतं- ते तिथून पुढे ज्ञानापर्यंत न्यावं लागेल. नाहीतर मुलं प्रचंड माहिती गोळा करतील आणि टीवायएए माहितीचं करायचं काय हे मुलांना कळणारच नाही.
ऑनलाइनच्या माध्यमातून विविध प्रकारचं शिक्षण यापुढे उपलब्ध होईल. या प्रक्रियेत मुलं विविध गटांशी जोडली जातील आणि हे गट कदाचित मोठ्या भौगोलिक परिसरातले, राज्यभरातले, देशभरातले आणि जगभरातले असू शकतील. यातून मुलं ग्लोबल होतील. याला आता सुरुवातही झाली आहे. फक्त यातला पुढचा भाग म्हणजे शिकलेलं वापरून पाहण्याच्या संधी निर्माण कराव्या लागतील. इथंही पालक महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. यातून आस्थापनांवरचे खर्च कमी होऊ शकतात- पर्यायानं शिक्षण स्वस्त होऊ शकतं.

मात्र, तरीही याबाबतीत एक काळजी जाणीवपूर्वक घ्यावी लागेल. ही ऑनलाइन यंत्रणा कशी वापरायची याचं शिक्षण मात्र मुलांना आपल्या द्यावं लागेल. म्हणजे त्यातला तांत्रिक भाग शिकवायची गरज नाही. ती आपली आपण शिकतील; पण प्रश्न दुसरा आहे. कारण या यंत्रणेवर आपलं असलेलं नियंत्रण हे अतिशय मर्यादित आहे. अनेक प्रकारच्या जाहिरातींचा तिथं वावर असतो, त्या सारख्या खुणावत असतात आणि त्या एका क्‍लिकसरशी कुठल्यातरी वेगळ्याच जगात घेऊन जाऊ शकतात. ज्याच्यावर आपलं नियंत्रण आपण हरवून बसू शकतो. इथं मुलांना अतिशय जबाबदारीनं वागण्याची सवय लावावी लागेल आणि सतत खात्री करत राहावं लागेल.

इथं आणखी एक मुद्दा आहे तो स्क्रीन टाईमचा. कोणत्या वयात मुलांना किती स्क्रीन टाइम द्यावा, यावर जगभरात अभ्यास सुरू आहे. त्याचे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होणारे परिणामही समोर येत आहेत. त्यामुळे इथं व्यक्तिगत आणि सरकारची जबाबदारीही मोठी आहे. असे निर्णय लोकानुनयी स्वरूपानं घेण्यापेक्षा अधिक विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. त्यातही साधारण सहा ते आठ वर्षांपर्यंत प्रत्यक्ष शिक्षणाला पर्याय नाही, तिथं आपल्याला स्क्रीन टाइम कमीत कमी ठेवावा लागेल.
हे सर्व करत असताना केवळ आपल्या फक्त शहरी किंवा निमशहरी भागाचा विचार करून चालणार नाही, तर ग्रामीण, आदिवासी, अतिदुर्गम भागाचाही विचार करावा लागणार आहे. शहरी नियम त्यांना लावून चालणार नाहीत. कारण त्यांची घडण, तिथली सामाजिक परिस्थिती सगळंच वेगळं आहे. या भागांमध्ये एक मोठा वर्ग असा आहे, जो सातत्यानं या शिक्षणाच्या आणि शाळेच्या कुंपणावर असतो. या सगळ्या बंद प्रक्रियेमध्ये हा वर्ग शाळेपासून दूर जाणार नाही, यासाठी प्रयत्न करावे लागतील. मुलांच्या हाती टॅब दिला म्हणजे ती आधुनिक झाली आणि आता सहजपणे घरच्या घरी शिकतील असा विचार करून चालणार नाही. त्यामुळे सगळीकडे सरसकट विचार करण्यापेक्षा स्थानिक गरजांना अनुसरून विविध पर्यायांचा विचार कसा करता येईल हे आपल्याला शोधावं लागेल. सरसकट सगळ्यांना एकत्र येण्याला बंदी घालण्यापेक्षा गरजा ओळखून त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang prasad manerikar write education article